Tuesday, July 7, 2020

आणि ३ सप्टेंबर १९९२ ही आमच्या लग्नाची तारीख ठरली.....

     माझ्या घरी लग्नाची चर्चा सुरू झाली. लग्न कुठे करायचं? कधी करायचं? वगैरे. मी मात्र पत्र लिहण्यात आणि माझ्या व्यवसायात मग्न होतो. मला लग्न कुठेही आणि कधीही केलं तरी चाललं असतं. ताई आणि प्रेमक्का आमच्या घरी आले की मी म्हणायचो माझं लग्न एकदम साध्या पद्धतीने कमी खर्चात करायचं. अगदी रजिस्टर मॅरेज असलं तरी चालेल. मला सुमन बरोबर लग्न करून माझा संसार मांडायचा होता. ताई मला ओरडायची तू तुझ्या व्यवसायाकडे लक्ष दे... लग्नाचं आम्ही बघू... माझ्यापेक्षा घरच्यांना आमच्या लग्नाची जास्त उत्सुकता होती. मित्र पण माझ्या लग्नाविषयी बोलायचे. पुंढा तू अजिबात काळजी करू नकोस लग्न एकदम थाटामाटात करायचं लग्न एकदाच होत.तू काळजी करू नकोस आम्ही मदत करू तुझ्या लग्नासाठी ! असे माझे जिवलग मित्र होते.

    कुंदापूरहुन डोंबिवलीत आल्यावर आम्ही सर्वजण टिळक नगर मधल्या शिवप्रसाद इमारतीत एकत्र राहायचो. जस जस भावाचे आणि बहिणींचं लग्न झाले तसे त्यांनी वेगळं घर घेतली. ते सर्व त्यांच्या स्वतःच्या घरी राहायला गेले. आता आमच्याकडे आई, अण्णा, वहिनी,अण्णांची मुलं संदेश, संकेत आणि मी राहायचो. माझं लग्न झालं की मला पण वेगळं घर करायला लागणार होतं. मला फार वाईट वाटत होतं. इतके वर्ष आम्ही सर्व एकत्र होतो. आता लग्नानंतर वेगळं होयला लागणार होतं. अण्णांनी मला लायब्ररीची जागा मिळवून दिली होती. माझा स्वतंत्र व्यवसाय उभा करून दिला. दोन भावंडांचे आणि दोन बहिणींचे लग्नही लावून दिलं. त्यामुळे अण्णांकडे अजून माझ्या घरासाठी व लग्नासाठी पैसे मागायचे नाही, स्वबळावर लग्न करायच, घरही  घ्यायचं असं मी ठरवलं. लग्नाच्या आधी मला माझं स्वतःच घर करायचं होतं. ताई ने सांगितलं होतं घरासाठी काही मदत लागली तर मी करेन. मला कोणाकडूनही पैश्यांची मदत घ्यायची नव्हती. स्वतःच्या पैशांनी सर्व उभ करायचं होतं. पैसे असून किंवा घरच्यांच्या मदतीनं सर्व करणं सोपं होतं. हातात काही शिल्लक नसतांना पैशांसाठी धडपड करून पैसे जमवून घर आणि लग्न करण्याचा आनंद काही वेगळाच होता. माझ्या समोर मोठं आव्हान उभं राहिलं, ते मी स्वीकारलं!

मी माझ्यासाठी घर बघायला सुरुवात केली. माझ्याकडे पैसे नव्हते मला कर्ज ही काढायचं नव्हतं. त्यामुळे ओनरशीप घर घेणं मला शक्य नव्हतं. घेतलं तर डिपॉझिट किंवा भाड्याच घर घ्यायचं होतं. माझ काही मोठ स्वप्न नव्हतं. अगदी साधं घर पण मला चाललं असतं. मी आणि ताईने घर शोधायला सुरुवात केली. आम्ही बरेचसे घरे बघितली एक तर घर पसंद येत नव्हतं. नाहीतर जास्त रक्कम असल्या कारणाने ते मला परवडत नव्हतं. एके दिवशी वेंकटेश अण्णाने त्याच्या एका मित्राची ओळख करून दिली.मंजुनाथ भट असं त्यांचं नाव. ते घराचे रंग रंगोटीचे काम आणि घरातली इतर कामे करायचे. त्यांनी त्यांचा ओळखीत एक घर असल्याचे सुचवलं. दत्तनगरला वडार वाडी इथे ते घर होतं. मी आणि ताई ते घर बघायला गेलो. तिकडे मावशीची मुलगी जवळच्या इमारतीत राहायची. वडार वाडीच्या मैदानाच्या बाजूला ते घर होतं. सुंदरबाई निवास त्या इमारतीच नाव. तळ मजल्यावर जिन्याच्या बाजूला सिंगल रूम आणि छोटसं किचन असं ते घर होतं. घर दाखवण्यासाठी स्वतः मालक आले होते. त्या जागेचे ४० हजार डिपॉझिट आणि दीडशे रुपये भाडं असे त्यांनी सांगितले. रूम काय एवढी खास नव्हती. बरीचशी कामं करायला लागणार होतं. पुष्कळ घर बघून झाले होते. स्वतंत्र घर करायची घाई होती. ताई बोलली जवळ आहे आणि आपल्या बजेटमध्ये बसतंय तर विचार कर तळ मजला असल्या कारणाने पावसाळ्यात घरी पाणी शिरत का?नळाला पाणी असतं का? मालकाची वागणूक कशी आहे? असे काही प्रश्नांची बाजूवाल्यांकडून महिती मिळवली. तो परिसर मला आवडला नव्हता. तरी पण नाईलाजाने मी ते घ्यायचं ठरवलं. काही महिने इथे राहून अजून थोडे पैसे जमा करून दुसरं घर बघूया असा विचार केला. मला घराचं डिपॉझिट आणि किरकोळ कामा सकट अंदाजे ४५ हजार रुपये उभे करायला लागणार होते.

व्यवसाय वाढवण्यासाठी अण्णांनी काही काळ भिशी चालवली होती. व्यवसायात रोख रकमेसाठी भिशीची गरज असायची. काही मित्र व दुकानदारांना एकत्र करून दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करायचे. दर महिन्याला ठरलेल्या दिवशी त्याची बोली लागायची. दुकानदार आपल्या गरजेनुसार बोली लावायचे. ज्याची जास्त बोली असेल त्याला ते पैसे दिले जायचे. ज्याला पैशांची गरज असायची त्याला पैसे वापरायला मिळायचे. सर्वात शेवटी पैसे उचळणार्याला चांगलं व्याज मिळायचं. भिशी चालवण्याऱ्याला जोखीम उचलायला लागायचं. अण्णांनी बरेच वर्ष भिशी चालवली नंतर काही कारणास्तव ती बंद केली. मला घरासाठी पैश्यांची गरज होती. मी भिशी सुरु करायचा विचार केला. बरेचसे लोकांशी बोलल्यावर त्यातले काही मित्र आणि दुकानदार माझ्याकडे भिशी लावायला तयार झाले. खूप विचार करून त्यातले १४ जणांना निवडले. प्रत्येकी  महिन्याला ३ हजार असे १५ महिन्याची भिशीची जुलै महिन्यापासून सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात भिशीतले ४५ हजार रुपये मला मिळाले. त्यातून ४० हजार रुपये घर मालकाला देऊन घर ताब्यात घेतलं उरलेल्या ५ हजार रुपये घरातल्या वस्तू साठी वापरले.



एप्रिल महिन्यात लग्न ठेवायचं, नाहीतर सरळ गणपतीच्या दरम्यान ठेवायचं यावर घरी चर्चा सुरू होती. सुमनच लग्न झालं तर कळसाला इंदिरा अक्का एकटी पडली असती. घर खूप मोठं कामही जास्त असल्या कारणाने अक्काला एकटीला सर्व झेपत नव्हतं. त्यात ती कधी कधी आजारी पडायची. सुमन घरचं काम एकटीच सांभाळायची. तीच लग्न झाल्यावर अक्काला मदतीला घरातलं कोणतरी हवं होतं. म्हणून भावाजीने सुमनचा भाऊ सुखानंदच लग्न करायचं विचार केला. लगेच सुखानंदसाठी स्थळ ही आलं. दोन्ही लग्न एकत्र करायचं ठरलं.

आम्ही कुंदापूर सोडल्यावर गणपतीला एकत्र कधी गावाला गेलो नव्हतो. आमच्याकडे मोठ्या काकांकडे गणपती असायचा. जर लग्न गणेश चतुर्थीच्या दरम्यान ठेवलं तर सर्व जण गणपतीला काकांकडे एकत्र जमणार होतो. या दरम्यान अण्णा आणि भावाजीचे लग्नाच्या तारीखेवरून दोन चार वेळा बोलणी झाली. मी आणि सुमन ज्या तारखेची उत्साहानं वाट पाहत होतो ती ठरवायची होती. सुमनच्या घरून आणि माझ्या घरातल्या सर्वांच्या सहमतीने ३ सप्टेंबर १९९२ ही आमच्या लग्नाची तारीख ठरली.....


5 comments:

  1. पै मस्तच वाचताना खूप आनंद वाटला. तुमचे विचार पटले छान

    ReplyDelete
  2. किती छान लिहिताय तुम्ही सर! आणि तुमच्या कष्टाला योजकतेला मनापासून सलाम! लग्नाची धामधूम मज्जा आणणार आहे.

    ReplyDelete
  3. Excellent presentation. Such an expressive yet simple style of writing. Pundalik sir great going.

    ReplyDelete