आपल्या जीवनात काही माणसं अशी काही घर करून बसतात की, रक्ताचं नसूनही त्याहीपेक्षा एक आगळंवेगळं नातं त्यांच्याशी फुलून येतं. अशा व्यक्ती आपल्या 'फॅमिली फ्रेंड' च्या नावानं ओळखल्या जातात. माझ्या आयुष्यात शंकर नाईक- ज्यांना मी 'अंकल' म्हणतो ते आणि त्यांच्या पत्नी डॉ. तारा नाईक यांच्याबरोबर असंच काहीसं नातं जुळलं.
तारा नाईक या डोंबिवलीतल्या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ तसंच प्रसूती तज्ज्ञ. त्यांचं आमच्या दुकानासमोरच अश्विनी हॉस्पिटल होतं. १९८२ मध्ये मी दुकानात असताना काही स्टेशनरी वस्तू घ्यायला अंकल तिथं आले, तेव्हा त्यांची ओळख झाली. मंगलोरहून ते डोंबिवलीत वास्तव्याला आले. घरी ते तुळू, तर माझ्याशी कन्नडमध्ये बोलत असत. सुरुवातीला हॉस्पिटलच्या मागेच छोटया घरात राहून नाईक दांपत्य लायब्ररीसमोरच्या मेघदूत सोसायटीत रहायला आलं. अण्णांचा दुसरा मुलगा संकेत याचा जन्म नाईक यांच्याच हॉस्पिटलमधला, १३ जून १९८३ चा.आमचे बंध तेव्हापासूनचे. काही काळातच नाईकांनी टिळक नगर पोस्ट ऑफिस समोरच्या इमारतीत जागा घेऊन जास्त बेडचं मोठं हॉस्पिटल बांधलं.
फेब्रुवारी महिन्यात सुमनला डॉ. नाईक यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यांनी तिची तपासणी केली. मला त्यांनी बोलावून 'गुड न्यूज' असल्याचं शुभ वर्तमान दिलं. आमच्या आनंदाला परिसीमाच राहिली नाही. मी लगेच पहिली बातमी अण्णांना दिली. आई, ताई, वहिनी, भाऊ, बहीण, जिजाजी, मित्र यांनाही सांगितलं. कळसाला इंदिराअक्का आणि भावजींपर्यंत बातमी पोहोचवली. अख्या परिवारात आनंदाची जणू बरसातच झाली.. डॉ. नाईक यांच्याशी घरगुती संबंध आणि लायब्ररीजवळच दवाखाना असल्यानं सुमनचं नाव तिथंच नोंदवलं.
मार्च महिन्यापासूनच मी सुमनला चेकअपसाठी घेऊन जात असे. तिच्या खाण्या पिण्याकडे संपूर्ण लक्ष होतंच. अधूनमधून आई, ताई, प्रेमाक्का सुमनशी गप्पा मारायला आमच्याकडे येत असत. अशावेळी घरच्यांचा धीर आणि मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं. सुमनची आई, इंदिरा अक्का वगळता आम्ही सगळीच भावंडं डोंबिवलीत जवळ जवळ राहत असल्यानं त्यांना आमच्याकडे येणं जाणं सोपं होतं.
आमचं लग्न होऊन आता सात महिने झाले. त्यामुळे एकदा कळसाला जाऊन यायचा विचार आला. गावी जायला सुमनचा कधीच आग्रह नव्हता. पण नंतर एक-दोन वर्षं जाणं कठीण असल्यानं मीच तिला तसं सूतोवाच केलं. त्याचवेळी मे महिन्यात आपल्याकडे खूप उन्हाळा असला तरी कळसाला मात्र थंड वातावरण असतं. म्हणून दोघे कळसाला जाऊन आलो. या वेळी तिकडे फणस, कच्चे काजू खायला मिळाले. काजू आणि फणसाची भाजी मस्त लागत होती. पुढचं चेक-अप असल्यानं आम्ही फक्त पाचच दिवस कळसाला राहिलो.
कळसाहून परतून चार दिवस झाले असतील. एकदा रात्री १२ च्या सुमारास माझ्या पोटात जोरात दुखायला लागलं. नीट बसताही येईना. बरेचसे घरगुती उपाय करून पाहिले, पण दुखणं सहन करता येत नव्हतं. मला सुमनची काळजी वाटत होती. शेवटी तिला अण्णांकडे पाठवलं. मी आणि पांडुरंग अण्णा रात्री उशिरा डॉ. राव यांच्या श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी ऍडमिट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी एक्स-रे आणि सोनोग्राफी करण्यात आली. दुपारी राव डॉक्टर स्वतः तपासायला आले. त्यांनी मला ओळखलंही आणि 'किडनी स्टोन' ची शक्यता वर्तवली. पण दिलासा देऊन ऑपरेशन न करता फक्त सलाईन लावून इलाज करण्याचं आश्वासन दिलं. राव डॉक्टरांनी माझा हात हातात घेतला, तेव्हाच मला बरं वाटायला लागलं आणि त्यांच्या या एका वाक्यानं तर पूर्णच बरं झाल्यासारखं वाटलं. दुसऱ्याच दिवशी मी अधिकच व्यवस्थित झालो. तरीही डॉक्टरांनी एक दिवस थांबायला सांगितलं. मला नीट जेवण जात होतं, पोटात दुखणंही बंद झालं. मी पूर्णपणे बरा होऊन घरी आलो. माझ्या आजारानं सुमनला खूप वाईट वाटलं होतं. मी घरी परतल्यावर तिला बरं वाटलं.
ऑक्टोबर महिना जवळ येत होता. सुमनची अधिक चांगली काळजी घ्यायच्या हेतूनं नवरात्रीच्या दिवसांत ताईनं आम्हाला तिच्याच घरी मुक्कामाला बोलावलं. टिळक नगर पोस्ट ऑफिससमोरच्या बाळकृष्ण इमारतीत ती राहत होती. तिकडून हॉस्पिटलही जवळ. ताईला रेवती आणि रम्या या दोन कन्या. दोघी आमच्या लाडक्या. अभ्यासातही त्या हुशार. रेवती ग्रीन इंग्लिश स्कूलमध्ये आणि रम्या आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होती. जिजाजी डोंबिवली एम.आय. डी. सी. त एका खासगी कंपनीत अकाउंटटंचं काम करीत होते. रात्री मी घरी आल्यावर खूप गप्पा आणि रेवती आणि रम्याशी मस्ती करण्याच्या आनंदात दिवस कसे संपले, कळलंच नाही. त्याचबरोबर सुमनलाही जास्त वेळ द्यायला मी प्रयत्नशील होतो. त्यामुळे तीही आनंदी असे.
अण्णांच्या घरून आई सकाळी निघाली की, संध्याकाळपर्यंत ताईकडे असायची. या सगळ्यांचा मोठाच आधार वाटत होता. डॉक्टरांनी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याची तारीख दिली होती.
२२ ऑक्टोबरला सकाळी सुमनला प्रसववेदना सुरु झाल्या. मी लायब्ररीत होतो. ताईनं मला बोलावलं. घरी गेलो तेव्हा, सुमन अस्वस्थ वाटत होती. तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं. ते जवळच असल्यानं चालत पाच मिनिटांत पोहोचलो. तेव्हा डॉक्टर नव्हते. सिस्टरनं त्यांना लगेचच कळवलं. त्यांनी सुमनला ऍडमिट व्हायला सांगितलं.
दुपारी डॉक्टर आल्या. आमचं घरचं नातं असल्यानं त्या सुमनकडे जातीनं लक्ष देत होत्या. मलाही आता धीर आला. डॉक्टरांनी सुमनला ऑपेरेशन थिएटरमध्ये नेलं. इकडे मीच अस्वस्थ. ताई आणि आई मला धीर देत होत्या, पण माझं मन थाऱ्यावर नव्हतं. कधी एकदा आतून कोण बाहेर येतंय, याची वाट पाहत होतो. ऑक्टोबर महिन्यातही बाहेर पाऊस पडत होता. आम्ही ज्याची प्रतीक्षा करीत होतो, ती घडी काही वेळातच आली. मी बाप झाल्याची गोड बातमी समजली. आतून सिस्टर हातात बाळ घेऊन बाहेर आल्या. तिनं पुत्ररत्न झाल्याची खुश खबर देऊन माझ्या हातात आमच्या मुलाला सोपवलं. तो दिवस होता, शुक्रवार, २२ ऑक्टोबर १९९३. दुपारी ३.५४ मिनिटांनी अष्टमी उत्तर आषाढ नक्षत्रात सुमननं आमच्या गोंडस मुलाला जन्म दिला, तिच्या स्त्री जन्माचं जणू सार्थक झालं...
पुत्राच्या जन्माने जीवनात खूपच आनंद झाला. हि गोष्ट खरच महत्ववाची
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूप खूप अभिनंदन ! आता अधिक बाललीला ऐकायला मिळणार.
ReplyDeleteनक्कीच.
Deleteअभिनंदन, आणखी बाल मिला ऐकण्याची ओढ लागली
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुंदरच
ReplyDeleteधन्यवाद.
Delete