Friday, July 17, 2020

सहजीवनाची सफर !

अगदी साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यासाठी सगळ्यांचाच लागलेला हातभार...यामुळे हा सोहळा अतिशय अविस्मरणीय ठरला. कुंकूमपत्रिका नसतानाही केवळ तोंडी आमंत्रणांवर २०० हून अधिक सुहृद आपुलकीपोटी लग्नाला आले होते. त्यातल्या बऱ्याच जणांना मी ओळखतही नव्हतो. आमचं एवढं मोठं गणगोत असल्याचा पत्ता लग्नाच्या दिवशी लागला. हे सगळं शक्य झालं, अण्णांमुळेच. वडील स्वर्गवासी झाल्यानंतर अण्णांनीच वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून पुढाकार घेतला आणि आम्हा भावडांची घरं बसवून सगळ्यांना व्यवस्थित मार्गस्थ केलं. अगदी ९० च्या दशकातही हे कठीण होतं. अण्णांचे सगळ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. परिवारात असो वा परिचित... कुठल्याही कार्यक्रमात ते जातीनं हजर. त्यामुळे सगळेजण अण्णांच्या शब्दाचा मान राखायचे आणि ही बाब लग्नात माझ्या ध्यानी आली. अण्णांबरोबरच माझे सगळे भाऊ, बहीण, वहिनी, या सगळ्यांनीच माझ्या लग्नासाठी अपार मेहनत घेतली होती. त्यांच्यामुळेच हे सगळं सहजसाध्य झालं, हे आपुलकीचं ऋण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.

लग्नाच्या दिवशी मी आणि सुमन सालीग्रामला राहिलो. आमच्याकडे लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा असते. आम्ही सगळे गावात असल्यानं दुसऱ्या दिवशी कुंदापूरला काकांकडे पूजा होती. मी आणि सुमन पहिल्यांदाच पूजेला बसलो. आतापर्यंत कोणाकडेही पूजेसाठी गेलो तर पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात मग्न असे. त्यांचा चहा, नाश्ता, जेवणाच्या सरबराईकडे मी बघत होतो. जेवणाआधी प्रसाद मात्र न विसरता खात होतो. हा प्रसाद माझ्या अत्यंत आवडीचा. आज मी स्वतः पूजेला बसलो होतो. माझं संपूर्ण लक्ष पूजेकडेच होतं. पहिल्यांदाच पूजेची कथा लक्ष देऊन ऐकली. नंतर तीर्थप्रसाद घेऊन आम्ही दोघांनी सगळ्या वडीलधाऱ्या ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. जेवणं झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी कळसाला निघालो.

पाच दिवस सासुरवाडी (नवीन !) राहणार होतो. लग्नाच्या आधी आणि आता तिथं राहण्यात खूप फरक होता. आता मी आणि सुमन एकत्र होतो. सकाळचं फूल फेकण्याची गरज नव्हती. बाकी दिवसभरही मी आधीसारखाच तिच्या मागेच असे. सप्टेंबर महिना असल्यामुळे जोरदार पाऊस पडत होता. पावसाला सुरुवात झाली की दिवसभर कोसळत असे, थांबण्याचं नाव नाही !  कधी कधी भीती वाटायची. विजेचा कडकडाट एवढा मोठा व्हायचा की, जवळच कुठेतरी वीज कोसळल्याची धास्ती वाटत होती. यामुळे तिकडच्या मुसळधार पावसाळ्याचे दिवस अनुभवायला मिळाले. आम्हा दोघांना तीन दिवस सुमनच्या तिन्ही काकांनी जेवायला बोलावलं. 

एके दिवशी सकाळी कुदरेमुखला आमच्या नातेवाईकांकडे गेलो. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कुदरेमुख गार्डनची सैर केली. हे गार्डन पाहण्यासारखं आहे. माणसं तशी कमी होती. चारही बाजूला डोंगर आणि मध्ये ते गार्डन. त्या वेळी डोंगरावर ढग भरून आले होते. निरनिराळी फुलांची झाडं, पक्ष्यांचे आवाज असं निसर्ग सौंदर्य  जवळून न्याहाळता आलं. आज सुमन माझी 'गाईड' होती. तिकडची विविध ठिकाणं दाखवण्याचं काम ती करीत होती. आम्ही दोघांनी काही फोटोही काढले. गार्डन फिरून जेवायला गेलो. तिथल्या नातेवाईकांचं आदरातिथ्य, पाहुणचार पाहूनच मन भरून आलं. त्यांच्या घरी आल्यापासून जेवून निघेपर्यंत त्यांनी आमची व्यवस्थित  काळजी घेतली होती.



दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शृंगेरीला शंकराचार्यांच्या प्राचीन मठाकडे निघालो. तिथं जाण्यासाठी दोन तास लागले. मंदिराच्या मागे तळं होतं. त्याचं पाणी एवढं स्वच्छ की, आतले मासे व्यवस्थित फिरताना दिसत होते. मंदिरासमोर एक खांब होता. तो खांब एका विशिष्ट पद्धतीनं उभारण्यात आला असल्याची भक्तांची समजूत आहे. तो खांब ज्या दगडावर उभा आहे, तिथं एका बाजूनं कागद टाकून दुसऱ्या बाजूनी काढता येतो. मी तशी कृती केली, तेव्हा खरोखरच कागद बाहेर काढता आला.



नंतर आम्ही देवळात गेलो. ते सरस्वतीचं मंदिर आहे. मंदिरात बरेचसे लोक आणि त्यातही पर्यटक जास्त होते. तरीही मंदिरात संपूर्ण शांतता होती. सरस्वती मातेचं देर्शन घेऊन पुढे एका छोट्या हॉटेलात मसाला डोसा खाल्ला. 'मला डोसा फक्त तुझ्याच हातचा आवडतो. त्यामुळे या डोशाला ती चव नाही', या शब्दांत सुमनला थोडासा मस्का मारला! 

पाचव्या दिवशी आम्हला निघायचं होतं. सकाळीच कळसाहुन निघून दुपारपर्यंत सालीग्राम गाठायचं होतं. सकाळी दोघेही तयार झालो. इथपर्यंत सगळं ठीक होतं. निघताना सुमनचे डोळे भरून आले. आम्ही दोघांनी इंदिरा अक्का आणि भावजींच्या पाया पडलो. सुमननं पाव शतकाचं आयुष्य त्या घरात काढलं होतं. ते घर, गाव, आई-वडील, भावंड, काका, काकू, कळसाचा निसर्गरम्य परिसर...असे हे सगळे प्रेमाचे पाश सोडून सुमन आज माझ्या सोबत मुंबईला निघाली, माझ्याबरोबर नव्या आयुष्याचा अध्याय सुरू करण्यासाठी...तो क्षण माझ्यासाठीही खूप जड होता. त्यांचा निरोप घेतला.

संध्याकाळी चार वाजता सालीग्रामहून मुंबईसाठी जाणारी बस वेळेवर सुटली. पण सातारच्या पुढे घाटातून उतरताना आमच्या बसचा अपघात झाला. ड्रायव्हरनं अचानक ब्रेक मारल्यामुळे अनेक प्रवाशांना लहानमोठी दुखापत झाली, किरकोळ जखमाही झाल्या. सुदैवानं आम्हा दोघांना काहीही लागलं नाही. पोलिसांनी आमची बस पोलीस स्टेशनला नेली. जवळपास सहा तास तिकडेच होतो. 

या घटनेमुळे बस डोंबिवलीत पोहोचायला रात्रीचे आठ वाजून गेले होते. घरी वहिनी, ताई, भाऊ. बहीण, मुलं सगळेच आमची वाट बघत होते. घरी पोहोचल्यावर दोघांना ओवाळून घरात प्रवेश करून दिला.

त्या वेळी अधिक मास असल्या कारणानं आम्हाला काही दिवस अण्णांकडे रहावं लागलं. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात स्थलांतर करून दत्त नगर इथल्या सुंदराबाई निवासमध्ये आम्ही नव्या आयुष्याची सुरुवात केली...



सकाळी दुकान उघडून नऊ वाजता मी नाश्त्याला घरी येत होतो. सुमन रोज नवीन नाश्ता बनवत होती. नंतर मी लायब्ररीत जात असे. सकाळची कामं, स्वयंपाक आटपून दुपारी १२ वाजता सुमन लायब्ररीत येऊन थोडावेळ  बसायची. तीही आता व्यवसायात मला मदत करायला लागली. लायब्ररी बंद करून दुकानात कोणी मला सोडायला आलं की, आम्ही दोघंही दुपारी एक वाजता घरी निघत असू. माझ्याकडे नवीन सायकल होती. सुमनला सायकलवर पुढे बसवून  घरी यायचा आमचा त्या वेळी कार्यक्रम होता आणि त्या सफरीचा आनंदही काही वेगळाच...

6 comments:

  1. सहजीवनाचा साथीदार ,योग्य निवड सगळं वर्णन छान न

    ReplyDelete
  2. मस्त 👌🏻👌🏻नवीन सुरुवात

    ReplyDelete
  3. मस्तच.... cycle वर जाताना काही romantic गाणी म्हटलीत की नाही....

    ReplyDelete
    Replies
    1. तेव्हा त्याचा विचार आला नाही....

      Delete