Monday, July 13, 2020

लग्नाचा पूर्वरंग.....



तर ठरल्याप्रमाणे ३१ ऑगस्टला  गावी निघायचं होतं. आदल्या रात्रीच सगळी बॅग तयार केली. सकाळी दुकान उघडायचं असल्यानं वेळ मिळणार नव्हता. घरी एकटा असल्यानं मलाच सर्व बघायला लागत होतं. एरवी आई, वहिनी किवां ताई मदतीला असायच्या. TV वर गणपतीबाप्पाचे कार्यक्रम सुरू होते, पण माझं तिकडे लक्ष लागत नव्हतं. उद्याचा दिवस कसा जाणार ? बस कधी पकडणार ? परवा कधी पोहोचणार ? सुमन काय करत असेल ? ती कळसाहून कधी निघेल ? कधी आपण भेटू ? अशा असंख्य विचारांची गर्दी डोक्यात ठेवून झोपी गेलो.

सकाळी सात वाजता दुकान उघडायचं होतं. साडेपाच वाजता उठलो. चहा नाश्ता करून सर्व सामान, बॅग वगैरे बरोबर घेतलं. वहिनी आणि आईनं वारंवार बजावून 'घराबाहेर पडताना विजेची सगळी बटणं, पाण्याचा नळ नीट बंद कर, कुलूप नीट लाव', अशा नित्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांचं व्यवस्थित पालन केलं. आज घर सोडताना काहीतरी वेगळं वाटत होतं, एक सुखद हुरहूर मनात दाटली होती. 

सातच्या आधीच दुकान उघडलं. गणेश चतुर्थीसाठी, शेवटच्या क्षणीही थर्माकोल, रंगीत कागद, टाचण्या, खळ, अगरबत्ती, मोदक असं बरंचसं सामान खरेदी करायला अनेक भक्त येत  होते. ओळखीचे लोक मला बघून विचारणा करीत,  'अरे, तीन तारखेला तुझं लग्न आणि  तू अजून इथंच ? कधी जाणार गावी' ? त्यांना माझी संध्याकाळची बस असल्याचं सांगितलं. त्यादिवशी गर्दी खूप असल्यामुळे वेळ कसा गेला, ते कळलं नाही. नंतर दुपारी दुकान बंद करून योगेश भटच्या घरी निघालो.

योगेशचं सोनारपड्याला दुकान होतं. तो व्यवसाय शिकण्यासाठी माझ्याकडे काम करीत असे. माझी खूप काळजी घ्यायचा. त्यांच्याकडे गणपती असल्यानं  माझं दुपारचं जेवण तिथंच होतं. मी पोहोचल्यावर गणपतीची पूजा झाली. पूजा करणाऱ्या भटजींना माझ्या लग्नाचं कळलं. त्यांनी बोलावलं. गणपतीची प्रार्थना करून प्रसाद दिला. हा मला शुभशकून वाटला. पूजा झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. जेवणात वेगवेगळे चविष्ट पदार्थ होते. एरवी अशा जेवणावर मी ताव मारणारा, पण त्यादिवशी मात्र जेवण जात नव्हतं. माझं आजचं जेवण बघून सगळेच मला चिडवत होते. थोडावेळ आराम करून मी आणि योगेश निघालो. चार रस्त्यावरून चार वाजताची बस होती. अण्णांचे मित्र एस.व्ही.पै आमच्या आधीच आले होते. बरोबर चार वाजता बस आली. आम्ही तिघे निघालो.

गावाला पोहोचायला किमान २० तास तरी लागणार होते. बसमध्ये मी आणि योगेश एकत्र, तर पै यांना समोरची सीट होती. मी खिडकीजवळ बसून बाहेर बघत होतो. योगेश बरेचसे प्रश्न विचारत होता, पण माझं लक्ष नव्हतं. अधूनमधून मी जुजबी उत्तरं देत होतो. पुणे आणि साताऱ्यामध्ये आमची बस बिघडली. ती दुरुस्त व्हायला तासभर मोडला. जेवण्यासाठी कराडला एका हॉटेलसमोर बस उभी राहिली. मला इच्छा नव्हती. पण त्या दोघांच्या आग्रहापोटी थोडंसं जेवून बसमध्ये जाऊन झोपलो. नंतर मात्र बसचा वेग वाढला. 

१ सप्टेंबरला दुपारी एकपर्यंत कुंदापूरला आलो. पै आधीच हेमाडी गावी उतरले. मी आणि योगेश कुंदापूरला उतरून काकांच्या घरी आलो. तिथं आमचं जोरदार स्वागत झालं. प्रवासाचा शीण आला होता. त्यामुळे लगबगीनं सगळं आवरून दोघेही भरपूर जेवलो. सगळे गप्पा मारत होते. मला सुमनबद्दल चौकशी करायची होती. शेवटी वहिनीला विचारलं, 'सुमन कळसाहून आलीय का' ? 
'उद्या संध्याकाळी लग्नस्थळी येईल', वहिनीचं उत्तर ! 

कुंदापूरजवळच काकांच्या घरापासून १० किमी अंतरावर चेम्पि इथल्या वेंकटरमण देवस्थानात लग्न होतं. सुमनही आजच आली असती तर नक्कीच भेटलो असतो. आता माझी आणि सुमनची भेट २ तारखेला,  म्हणजे उद्या संध्याकाळीच!

त्या दिवशी संध्याकाळी घरातल्या सगळ्यांबरोबर मीही फिरायला गेलो. जवळच्याच गंगोळी नदी किनाऱ्याला पोहोचलो. एरवी मस्ती करणारा मी शांत होतो. संध्याकाळची वेळ. सूर्यबिंब अस्तांचलास जातानाचं रमणी दृश्य मनाचा ठाव घेत होतं. अशा वेधक वातावरणात एकदम आठवण झाली, सुमनची. ती आता बरोबर असती तर तिलाही हा आनंद लुटता आला असता, असे विचार येत होते. थोड्या वेळानंतर घरी परतलो. वेळ जाता जात नव्हता. घराच्या बाहेर येऊन बसलो. पुढे बस स्टॉप होता. बाहेरगावच्या बसेसची वर्दळ सतत सुरु होती. ते दृश्य बघत होतो. तेवढयात जेवायचं बोलावणं आलं. नंतर जेवून झोपी गेलो.

२ सप्टेंबरला सकाळी प्रार्थनेसाठी कुंदापूर वेंकटरमण देवस्थानात जायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे सगळे मंदिरात गेलो. ज्या मंदिराशी माझ्या बालपणाच्या आठवणी निगडित होत्या, त्याच मंदिरात आज माझ्या आयुष्याचा नवा श्रीगणेशा करण्यासाठी, माझ्या लग्नासाठी प्रार्थना करत होतो. माझं मन अतिशय प्रसन्न  झालं. आज प्रार्थनेसाठी माझ्याबरोबर माझं सगळं कुटुंब बरोबर होतं. तिथून प्रसाद घेऊन घरी आलो. जेवणं झाली. आता  संध्याकाळपर्यंत कसातरी TP (टाइमपास ! ) करायचा होता आणि संध्याकाळी कसंही करून सुमनला भेटायचं होतं.

संध्याकाळी पाच वाजता चेम्पिला, म्हणजे लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. सुमन आल्याचं समजलं. ती जवळच्या सालीग्रामला उतरल्याचं कळलं. तिथं जवळच भावजींची बहीण सीताअक्का यांचा बंगला होता. मी लगेच बॅग ठेवून सुमनला भेटायला निघालो. तिकडे खूप गर्दी होती. मुलींचंच मोठ्या प्रमाणावर राज्य ! मेंदी काढण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. त्यांच्यात सुमन होतीच. आम्ही एकमेकांना पाहून सूचक नेत्रपल्लवीही केली. तिला आनंद झाल्याची पावती तिच्या नजरेतून मिळाली. डोळ्यांच्या इशाऱ्यांनी मी तिला थोड्या वेळानं भेटण्याची खूण केली. सर्व मुली आमच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या ! त्या गोकुळात मी एकटाच पुरुष असल्याचं लक्षात आल्यावर जरा अवघडलो.  सरळ तिथून निघून परत चॅम्पिला आलो. सगळे  विचारायला लागले,  'कुठे गेला होतास'?  ते मला शोधत होते. पण त्यांना कळलं पाहिजे ना,  मी जाऊन जाऊन जाणार कुठे ?




थोड्या वेळात सुमननं मला बोलावल्याचा 'संदेसा' आला. क्षणाचाही विलंब न करता तिला भेटायला निघालो. रात्रीचे साडेसात-आठ वाजले असतील. मी बंगल्याजवळ पोहोचलो. सुमनही माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मग आम्ही गुजगोष्टी करत चॅम्पि देवळात आलो. देवळाबाहेरच्या कठड्यावर नंतर तासभर बोलत होतो. लग्नाच्या आधीचा आमचा संवाद ! उद्या ३ सप्टेंबर. विवाहाचा शुभदिन, सकाळी १०.३० लग्नाचा मुहूर्त होता...

6 comments:

  1. प्रेमा काय देऊ तुला,भाग्य दिले तू मला!! अशी अवस्था झालेल्या प्रेमवीराची मस्त प्रेमकहाणी!

    ReplyDelete
  2. पैं काका, काकू पण वाचतात का तुम्ही लिहिताय ते! त्यांना खूपच छान वाटतं असेल.किती छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात हे पाहून. खूप खूप शुभेच्छा विवाहासाठी. आम्ही वर्हाडी पण उत्सुक आहोत.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की या लग्नाला...

      Delete
  3. हळुवार निरागस प्रेमकथा !

    ReplyDelete