Wednesday, July 29, 2020

संतोषचा पहिला वाढदिवस...


नवीन घरी, नवीन शेजारी अशा सगळ्यांशी हळुहळू ओळख वाढत होती.लायब्ररीचा आता अजून विस्तार करायचं विचारचक्र मनात सुरू होतं.त्यासाठी प्लास्टिक सिलिंग मशीन विकण्याचा निर्णय घेतला.ऑर्डर्स चांगल्या येत होत्या, पण मी वेळ देऊ शकत नव्हतो.ऑर्डर्स वाढल्यामुळे दोन मशीन घेतली होती. ती मशीन विकण्यासंबंधी मित्रांसोबत चर्चा केली. तेवढ्यात माझा मित्र विनायकनं मशीन सकट फ्रेंड्स प्लास्टिकचा व्यवसाय घ्यायची तयारी दाखवली, मी एक जवाबदारीतू मोकळा झालो.

आता मला लायब्ररीचा विस्तार करणं शक्य झालं.प्लॅस्टिकची मशीन विकल्यानंतर लायब्ररीच्या आतला भाग मोकळा झाला. त्या जागेवर अजून लोखंडी रॅक मागवले.पुस्तकांची संख्याही वाढवली.आता लायब्ररी प्रशस्त आणि पुस्तकांनी भरलेली दिसायला लागली.नवीन पुस्तकं बघून सभासदांचीही संख्या वाढायला लागली.लायब्ररीचं उत्पन्न वाढायला लागलं. याचदरम्यान लायब्ररीचा कर्मचारीवर्गही वाढवला. अजय होताच. त्याच्याबरोबर तृप्ती या मुलीची नेमणूक केली.

लग्न होऊन दोन वर्षं लोटली.दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. संतोषची मस्ती दिवसागणिक वाढत होती. तो आठ महिन्यांचा असतानाच चालायला लागला. त्याला लायब्ररीत घेऊन जायला मला खूप आवडायचं. त्याला खाली सोडलं की सुसाट पळायचा. मग माझी धावपळ. कधी कधी खूप रागही येत असे.

 शनिवार, 22 ऑक्टोबरला संतोषचा पहिला वाढदिवस. सगळ्यांच्या लक्षात राहील, असा साजरा करायचा होता. गावी कधी कोणाचा वाढदिवस साजरा केला नव्हता. मुळात वाढदिवस काय असतो, हेच माहीत नव्हतं.साजरा करण्याचं दूरच... चित्रपटात वाढदिवस साजरा करताना पाहिलं होतं, तेवढंच. डोंबिवलीत आल्यावर आमच्या परिवारातल्या अनेक मुला मुलींचे पहिले वाढदिवस मीच पुढाकार घेऊन थाटामाटात साजरा केले होते.

संतोषचा पहिला वाढदिवस कसा साजरा करायचा?कुठे करायचा? कोणा कोणाला बोलवायचं? पाहुण्यांचा नाश्ता ? संतोषचा ड्रेस ? वगैरे प्रश्न उभे राहिले. तेवढीच पैशांचीही तरतूद करायला लागणार होती. सुमनबरोबर विचार करून आठ दिवस आधीपासून तयारीला लागलो.सुरूवात कुठून करायची, तर आधी कपडे खरेदी.

संतोषच्या वाढत्या मस्तीमुळे खरेदीसाठी फक्त मी आणि सुमन गेलो. संतोषला जाकीटवाला ड्रेस खूप आवडायचा आणि त्याला तो ड्रेस सूटही होत होता.स्टेशन जवळील रिस्पॉन्स दुकानातून हजार रुपयांचा आणि केळकर रोडवरील अन्य एका दुकानातून एक ड्रेस घेतला.घरी आल्यावर त्याला ते कपडे घालून पाहिले. एकदा नवीन ड्रेस घातला की तो ते काढायला मागत नव्हता! कशी तरी समजूत घालून कपडे बदलायला लागायचे. 

वाढदिवसासाठी आमंत्रितांची यादी बनवली. घर लहान. तरीही घरीच वाढदिवस करायचं ठरवलं.त्यातल्या त्यात जवळच्या लोकांना निवडलं. प्रत्येकाला तोंडी निमंत्रण दिलं.काही लोकांना घरी जाऊन तर काहीजणांना लायब्ररीमध्ये आमंत्रणं दिलं. लहान मुलं, मोठे, सर्व मिळून शंभर एक लोक येणार होते.परिवारतल्या, लहान मुलांना सहा वाजता तर सभासदांना सात वाजता आणि मित्रमंडळींना रात्री आठ वाजता अशा वेगवेगळ्या वेळी बोलावलं.
स्टेशननजिकच्या मोंजिनिजच्या दुकानात केक ऑर्डर करण्यासाठी गेलो.त्यांनी दाखवलेल्या अनेक केक डिझाईनमधून विमानतळाचं डिझाईन निवडलं. पाच किलो केकची ऑर्डर दिली. आता नाश्ता. पाईनअॅपल पुडिंग म्हणजे पाईनअॅपलचा शिरा,समोसा, खारे काजू, चॉकलेटस आणि बटाटा वेफर्स द्यायचं ठरलं.सामोसे आणि शिरा गरम गरम लागणार होते.त्याची मित्राकडे आधीचऑर्डर देऊन ठेवली.



आता वाढदिवसाचं डेकोरेशन. वेंकटेश अण्णानं त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याचे मित्र वहाब कुलकर्णी यांच्याकडून छान डेकोरेशन बनवून घेतलं होतं. मुंब्रा इथं रहाणारा वहाब उत्तम कलाकार होता. त्याला लायब्ररीत बोलावून वाढदिवसाच्या डेकोरेशनचं सांगितलं.त्यांनी मटेरिअलसकट 1,200 रुपये सांगितले, पण एक हजार रुपयांत त्याला पटवलं. 



वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच सगळी तयारी झाली. 22 तारखेला दुपारी जेवणानंतर बाकी तयारीला लागलो.वहाबला यायला उशीर झाला होता. त्या दिवशी चिडायचं नाही म्हणून शांत होतो. वहाबनं दुपारी तीन वाजता डेकोरेशनला सुरुवात केली.पावणे सहा वाजता डेकोरेशन पूर्ण झालं. उशीर झाला, पण डेकोरेशन अप्रतिम झालं होतं.



सुरुवातीला मोठा फुगा फोडण्यात आला, ज्यात चॉकलेटस भरली होती. फुगा फुटला की सगळी मुलं एकमेकांच्या अंगावर पडून चॉकलेटं शोधायला लागली. ज्यांना चॉकलेटं मिळाली नाही, ती रडायला लागली तर काहींना दोन तीन चॉकलेटस मिळाली.बरोबर साडे सहा वाजता केक कापण्यात आला. 'हॅपी बर्थडे'च्या सुरांनी सगळं घर भरून गेलं. मी आणि सुमननं संतोषला केक भरवला. नवीन कपडे घालून आलेली मुलं, माणसं, डेकोरेशन आणि केक पाहून संतोष खुश झाला.एवढी माणसं आमच्या घरी पहिल्यांदाच आली होती.सगळ्यांनीच डेकोरेशनचं कौतुक केलं. प्रत्येकानं काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या.त्यात खेळणी जास्त होती. संतोषच्या हाती खेळणी आली की खेळायला सुरुवात. बाकी कोणाकडे तो लक्षच देत नव्हता.त्याच्याकडून ती खेळणी काढून घेताना नाके नऊ येत होती. जिजाजी आलेल्या प्रत्येकाचे फोटो काढत होते.त्यांची फोटोग्राफी अप्रतिम. एकंदरीत संतोषचा पहिला वाढदिवस सर्वांनी मिळून, लक्षात राहील असा साजरा केला...

8 comments:

  1. वाढदिवस खूपच छान साजरा केला सगळ्या गोष्टी आठवणी ने व र्णन केल्या मस्तच

    ReplyDelete
  2. आम्ही पण Birthday party मस्त enjoy केली !

    ReplyDelete
  3. पार्टी enjoy केली

    ReplyDelete