Wednesday, July 1, 2020

सगळ्यांची मान्यता!

...उद्या निघायचं होतं, म्हणून मी आदल्या दिवशी लवकर झोपून उठलो. उद्यापासून सुमनच्या अंगावर फूल टाकता येणार नाही, म्हणून आज निघण्यापूर्वीच ही कृती केली. सुमन नेहमीप्रमाणे झोपेत होती. नंतर मी स्वयंपाकघरात शिरलो. अक्कानं माझ्यासाठी चहा बनवून ठेवला होता. तिथं मी आणि अक्काच होतो. माझ्याबरोबर चहा घेत घेत अक्कानं विचारलं, ‘पुंढा, तू सुमनशी लग्न करणार आहेस’? अक्कानं अचानक टाकलेल्या या गुगलीनं माझी विकेटच गेली, चांगलाच गोंधळलो. ‘अक्काला  कळलं कसं’? काल रात्रीपर्यंत सगळं ठीक होतं. मी झोपल्यानंतर नक्कीच काहीतरी घडलं असेल...पण सुमन उठल्याशिवाय तर मला काहीच समजणार नव्हतं. आता उत्तर देणं आवश्यक होतं. मला लाज वाटत होती. मी मान खाली घालून हळू आवाजात ‘होकार’ दिला ! अक्का माझ्या होकारानं आनंदित झाली. इतके दिवस गुप्त ठेवलेलं प्रेम आज उघडकीला आलं,माझं काळीज सुपाएवढं होऊन मन आनंदानं थुईथुई नाचू लागलं !



तेवढ्यातच ‘पैंजणां’ चा मंजूळ ध्वनी कानी आला. लगेचच अक्काची नजर चुकवून सुमनला गाठलं आणि तिचा हात पकडून अक्कानं आपल्या लग्नाचं सकाळी विचारल्याची गोड वार्ता तिला दिली. ती माझ्याकडे बघून छानशी हसली आणि लाजलीही ! काम असल्याचं सांगून ‘आपण या विषयावर नंतर बोलू या’, म्हणून निघूनही गेली. मी विचार करीतच राहिलो ‘रातोरात काय झालं असेल’ ? डोळे मिटून दूध प्यायलेला मांजरासारखं वाटायला लागलं !
घरच्यांना हे समजलं कसं ? हे सुमनकडून ऐकल्याशिवाय मला चैन पडत नव्हतं. नाश्ता करतानाही हेच विचार मनात पिंगा घालत होते आणि त्याचवेळी मनातल्या मनात आनंदही होत होता. त्या वेळी भावजी किंवा अक्काच्या नजरेला नजर मिळवण्याची हिम्मत होत नव्हती. भावजींनी याचा आपल्याला सुगावा लागला असल्याचं जराही दर्शवलं नाही. सुमनचे दोन्ही भाऊही आधीसारखेच वागत होते. कदाचित त्यांना सांगितलं नसावं. नंतर सुमन वेळ काढून माझ्याकडे आली. रात्री घडलेलं सांगायला तिनं सुरुवात केली. मी रात्री झोपल्यावर अक्कानं सुमनला सांगितलं, ‘तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. त्यांना तुझं जातक पाठवलं आहे’! हे ऐकल्यावर सुमनला काय बोलायचं, हेच कळेनासं झालं. कशी तरी हिम्मत करून तिनं, मी तिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं आहे, असं अक्काला सांगितलं. मी अक्काला सांगण्याआधीच तिला सांगून सुमननं माझी कामगिरी फत्ते करून टाकली आणि माझा मार्ग एकदम सोपा झाला.

‘दुपारी मला सोडायला माझ्याबरोबर मंगलोरला चल’, असा हट्ट मी  सुमनजवळ धरला. तिनं  घरी विचारायला सांगितलं. पण तिचं माझ्या बरोबर येणं भावजींवर अवलंबून होतं. सुमनला माझ्या बरोबर मंगलोरपर्यंत नेण्यासाठी सकाळीच मी अक्काला मस्का मारला होता. तेव्हा अक्कानं भावजींना कसं तरी ‘पटवलं’.दुपारी सर्व एकत्र जेवायला बसलो.आज जेवणात खीरही होती. अक्काचं नेहमीप्रमाणे माझ्या जेवणाकडे लक्ष होतंच. आज अक्काकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता.
जेवणानंतर मी बॅग भरायला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी अक्कानं मुंबईला नेण्यासाठी भरपूर सामान काढून ठेवलं होतं. वेलची ,काळीमिरी, केळी, कॉफी पावडर असं सामान होतं. बॅग भरल्यावर विश्रांती घेऊन मंगलोरला जायला सिद्ध झालो. भावजी आणि अक्काच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. चहा घेऊन मी सुमन आणि भावजी निघालो.



कळसाहून मंगलोरसाठी थेट बस होती. आम्हा तिघांना बसायला जागा मिळाली. मी, सुमन एका सीटवर आणि भावजी वेगळ्या सीटवर बसले. बस सुरू झाल्यावर माझं अजिबात बाहेर लक्ष नव्हतं. गप्पा मारता मारता कधी मंगलोर आलं, ते कळलंच नाही. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही मंगलोरला पोहोचल्यानंतर रिक्षा करून सुमनची मोठी बहीण, प्रतिमाकडे गेलो. तिनं आमच्या जेवणाची तयारी केलीच होती. माझ्यासाठी खास कोळंबीची भाजी आणि मासे तळून ठेवले होते. प्रतिमाचं घर लहान असल्यामुळे सुमनबरोबर जास्त बोलता नाही आलं. 31 डिसेंबर असल्यामुळे टीव्हीवर वर्षाअखेरीचे विशेष कार्यक्रम सुरू होते.
रात्री 10 वाजता माझी ट्रेन होती. नऊ वाजता तिथून निघालो. सुमन उंबरठ्यावर उभी राहून टाटा करीत होती. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कदाचित तिलाही भरून आलं असेल. या भेटीचा शेवटचा निरोप घेऊन मी आणि प्रतिमाचे पती मंगलोर स्टेशनवर आलो.

ट्रेन अगदी वेळेवर सुटली. मला झोप येत नव्हती. कळसामधले नऊ दिवस, सुमनबरोबरचा सुखद सहवास, नंतर अक्का, भावजींनी विवाहाला दिलेली परवानगी अशा आनंददायी घटना डोळ्यांसमोर येत असल्यानं मला झोप अशी येतच नव्हती. एक चांगली गोष्ट म्हणजे सुमनच्या घरून होकार होता.आता मला माझ्या घरच्यांना ‘पटवायचं’ होतं. विचार करता करता खूप उशिरा झोप लागली. पहाटे ट्रेन मिरजला थांबली. मिरजहून त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमधून कल्याणसाठी निघालो. दुपारपर्यंत कल्याणला आणि नंतर घरी आलो. लगेचच आधी आंघोळ केली.

घरच्यांनी विचारलं, ‘प्रवास कसा झाला?, गाव कसा वाटला? अक्का वगैरे कसे आहेत? कुठे कुठे उतरला होता? कोण कोण भेटलं?' अशा अनेक प्रश्नांची माझ्यावर सरबत्तीच झाली. कळसा आवडल्याचं सांगून मी लगेचच दुकानाकडे निघालो. तिकडून लायब्ररीत गेलो. भेटलेले सगळेजण प्रवासाबद्दल विचारत होते. माझं कुठंही लक्ष लागत नव्हतं. कळसामधल्या सोनेरी दिवसांनीच केलेलं गारूड अजूनही मनाच्या पटलावर फेर धरत होतं. त्याच दिवशी घरी सांगायचं ठरवलं.

रात्री अण्णा, आई, वहिनी, भाऊ सर्वजण घरात होतेच. प्रास्ताविक करताना गावाकडचे अनुभव सांगितले. शेवटी हिम्मत करून सुमनबरोबर विवाहबद्ध होणार असल्याचं सगळ्यांना सांगितलं ! चकीत होऊन सर्वजण माझ्याकडे बघायला लागले. मी ‘लग्न करू का’?असं विचारलं नव्हतं. तर ‘लग्न करतोय’, असं सांगितल्यामुळे कदाचित अण्णा आणि वहिनींना जरा वाईट वाटलं असेल. मी अक्कानं होकार दिल्याचंही बोललो. माझ्या कामामुळे अण्णा माझ्यावर खुश होते. सर्वांच्या लाडका होतोच. अण्णांनी होकार दिला ! आता फक्त व्यंकटेशअण्णाला सांगायचं होतं. दुसऱ्या दिवशी जेवण उरकल्यावर अण्णाच्या घरी गेलो. तो समोरच्याच इमारतीत रहात होता. तो इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये इकॉनॉमिकस शिकवत असे. तर वहिनी बिर्ला कॉलेजमध्ये बॉटनी विषय शिकवत होती. त्यांनाही मी कळसाला गेल्याची माहिती होती. मी सुमनबरोबर लग्न करीत असल्याचं उभयतांना सांगितलं. अण्णांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. जवळचे संबंध असल्यानं पुढे समस्या यायला नकोत, असं त्यांचं मत होतं. पण, ‘मी लग्न करणार तर फक्त आणि फक्त सुमनबरोबरच’! असं अण्णांना ठाम सांगितलं... दोघांनी विचार करून नाईलाजानं विवाहाची परवानगी दिली. आता सुमन आणि माझ्याही घरातली ज्येष्ठ मंडळी आमच्या विवाहासाठी  तयार झाली होती. फक्त लग्नाच्या मुहूर्ताचीच बाकी होती...

9 comments:

  1. कळसाला जाण जीवनात कलाटणी देणारा ठरले खूप छान झाले.

    ReplyDelete
  2. मस्तच 👌👌👌💐💐

    ReplyDelete
  3. वा वा चला लग्नाचा बेत पूर्ण
    ज्या कामासाठी गेलात ते पूर्ण ( एक टप्पा) झाले.आनंद वाटला आम्हाला पण.

    ReplyDelete
  4. कथा जितकी रंगली तितक्याच सहजपणे होकार मिळवलात.एक सुखान्त शेवट!!आता लग्नाची धामधूम वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  5. मंझील मंझील....

    ReplyDelete