कुठल्याही व्यवसायाला यशस्वीपणे पुढे न्यायचं असेल तर घरच्यांचा पाठिंबा आवश्यकच आणि तसा तो मला कायम मिळाला. शिवाय, या यशात सगळ्यात मोठा वाटा कर्मचाऱ्यांचाही असतो. १९८० पासून पुस्तकांच्या दुकानात काम करीत असल्यानं त्या क्षेत्राची बरीचशी माहिती मिळवली. या काळात अनुभवानंही खूप काही शिकलो. पुस्तकं. ग्रंथ कुठे मिळतात, कोण किती टक्के सवलत देतो, मासिकांच्या बाजारात कुठली मासिकं कुठे मिळतात, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकाशनांची कार्यालयं आदी सगळी इत्यंभूत माहिती मी मिळवली. लायब्ररीचा व्यवसाय एका उंचीवर नेऊन या विद्येच्या क्षेत्रात नावारूपाला येण्याचं उद्दीष्ट माझ्यासमोर होतं, तसा दृढनिश्चय करून नेटानं पावलं टाकायला सुरुवात केली.
मी बाहेर दुसऱ्या कामात गर्क असल्यामुळे लायब्ररीकडे बघताना काही अडचणी जाणवत होत्या.आतापर्यंत बरीच मुलं-मुली काम करून सोडून गेली होती. याला कारण त्यांच्या वैयक्तिक समस्या. त्यामुळे लायब्ररी चांगल्या प्रकारे दीर्घकाळ सांभाळू शकेल, अशा व्यक्तीच्या मी शोधात होतो. शिवाय, लग्न झाल्यानंतर माझ्यावरची जवाबदारीही वाढलेली होती.
त्याप्रमाणे मी बऱ्याच लोकांकडे, लायब्ररीसाठी एखादा चांगला माणूस हवा असल्याचं सूतोवाच केलं. काहीजण यायचे, पण मला हवं असं कोणी भेटलं नाही. आमच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या ‘अलंकार पॉवर लॉण्ड्री’ त दोन मुलं कपडे इस्त्री ला द्ययायल येत होती. ते दोघे रहायला डोंबिवली पश्चिमेला होते. त्यांच्यापैकी जितू हा माझ्या चांगला ओळखीचा होता. त्यांनी आपल्या ओळखीत शेजारीच दहावी पास झालेला एक मुलगा असल्याचं सांगितलं. असा मुलगा आपली लायब्ररी कितपत संभाळू शकेल, या शंकेपोटी मी आधी काही लक्षच दिलं नाही. तसंही लायब्ररी सांभाळण्यासाठी वर्षा नावाची मुलगी होती.
पण वेळ आली की, सर्व काही नकळत व्यवस्थित घडत जातं, तसंच झालं. एक दिवस जितू त्या मुलाला माझ्याकडे घेऊन आला, आमची ओळख झाली. तो मुलगा दिसायला सुंदर, नीट केस विंचरलेले, चेहऱ्यावर हास्य. पोशाखही छान. जेमतेम १७-१८ वर्षांचा असेल. एकूण स्वभावाला चांगला वाटत होता. लायब्ररीत येणाऱ्या सभासदांशी चांगला व्यवहार करायच्या दृष्टीनं मी त्याच्याकडे बघून विचार करीत होतो. हा मुलगा माझ्याकडे काम करु शकेल का ? पुस्तकं चांगल्या प्रकारे सांभाळेल का ? सभासदांबरोबर नीट व्यवहार करेल का ? असे प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. तो रहायला पलीकडे गरिबांच्या पाड्यात होता. घरून लायब्ररीत यायला अर्धा तास तरी लागणार. सकाळी, संध्याकाळी लायब्ररीत जाण्या येण्यात दिवसाचे दोन तास जाणार होते. अशा परिस्थितीत तो किती दिवस काम करील, याची मला शंका होती. तरीही जितूच्या आग्रहावरून त्याला कामावर नेमण्याचा निर्णय घेतला.
त्याचं नाव, अजय पेंडूरकर... अजयनं १९९२ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. ठाण्यातल्या एका कंपनीत काम करीत असलेल्या अजयला लोकलचा प्रवास आवडत नव्हता. त्याच्या घरी तो, आई, बहीण आणि भाऊ असं चौघांचं कुटुंब. अजय आईचा खूप लाडका. अजयचाही आईवर खूप जीव. त्याला घरी सर्वजण लाडानं ‘अजू’ या नावानं हाक मारत असत. १९९३ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अजय लायब्ररीत यायला लागला. हसत खेळत स्वभावाचा अजय महिनाभरातच माझ्यासह सगळ्या सभासदांचाही अत्यंत आवडता झाला.
अजयचं काम तर सुरू झालं, पण तो फक्त वेळ पाळत नव्हता. मात्र, एकदा लायब्ररीत आल्यावर कोणतंही काम आपुलकीनं करायचा. साफसफाईपासून पुस्तकं नीट लावण्यापर्यंतची सगळी कामं तो मन लावून करीत असे. त्याला लायब्ररीची आवड निर्माण झाली. सभासदांशी चांगलं नातं जुळलं.लायब्ररीत येणारे माझे सगळे मित्र त्याचेही मित्र झाले.असं असलं तरीही तो किती दिवस काम करील, हे सांगता येत नव्हतं. पण तो असेपर्यंत मला बाकीच्या कामांसाठी वेळ देणं शक्य झालं.
माझा वाचनप्रेमी मित्र विनायक हा मानपाडा रोडवरच्या ‘ज्ञानविकास वाचनालया’चा सभासद होता. तो अधूनमधून तिकडून पुस्तकं घेऊन माझ्याकडे येत असे. ‘ज्ञानविकास’ चे मालक श्री. परांजपे यांच्याशी विनायकची चांगली ओळख. ‘ज्ञानविकास वाचनालया’त येऊन तिथली पुस्तकं, ग्रंथ, मासिकांची मांडणी कशी आहे, हे बघण्यासाठी विनायक नेहमी मला आग्रह करीत असे. ‘त्यांच्याकडे किती सभासद येतात, ते नीट बघ. म्हणजे त्याप्रमाणे आपणही आपल्या लायब्ररीत आवश्यक ते बदल करून घेऊ’, असा सल्ला विनायकनं मला दिला. सुरुवातीला मी त्याला टाळत होतो. मग एक दिवस आम्ही दोघे ‘ज्ञानविकास वाचनालया’त आलो. मी नेहमी जाता येता ते वाचनालय बाहेरून बघत असे. आज प्रत्यक्षात तिथं जायचा योग आला. परांजपेकाका सभासदांशी बोलण्यात गर्क होते. मी वाचनालयात सगळीकडे नजर फिरवली. पुस्तकं नीटनेटकी लावलेली होती. प्रत्येक कप्प्यावर लेखक किंवा विषयांची नावं लिहिली होती. समोर एकजण टेबलावर पुस्तकांना कव्हरं घालत होता. वाचनालय एकदम स्वछ, कुठेही पसारा नाही. परांजपेकाका स्वतः सभासदांना हाताळत पुस्तकांची नोंद करीत होते. माझ्यासमोरच पाच मिनिटांच्या कालावधीत तीन- चार सभासद पुस्तकं बदलून गेले. आश्चर्य म्हणजे, काका कुठल्याही सभासदांना नंबर विचारीत नव्हते ! प्रत्येक सभासदांचं आडनाव त्यांच्या लक्षात होतं. आडनावावरून त्यांची फाईल काढत होते. काकांची कमालीची तीव्र स्मरणशक्ती बघून मी तर चकीतच झालो. समोरच्या दोन स्टँडवर मासिकं लावली होती. त्यात कन्नड, तामिळ, मल्याळी, गुजराथी, इंग्रजी, हिंदी, मराठी अशी सगळ्या भाषांमधली ताजी मासिकं होती. सभासद जरा कमी झाल्यावर काकांनी आम्हाला चहा विचारला. विनायक चहा पित नव्हता मग त्यांनी फक्त दोन चहा मागवले माझ्यासाठी आणि स्वतःसाठी.
विनायकनं काकांशी माझी ओळख करून दिली. ‘फ्रेंड्स लायब्ररी’ चा मालक म्हणून मुद्दाम सांगितलं नव्हतं. थोड्या गप्पा मारल्या आणि नंतर विनायकनं ‘फ्रेंड्स’चा विषय काढला. ‘टिळक नगरमध्ये लायब्ररी सुरू होऊन सात वर्षं झाली, पण तिकडे पाहिजे तेवढे सभासद नाहीत याचं कारण काय असेल’? विनायकनं मुद्दा मांडला.
मग परांजपेकाका बोलायला लागले. त्याकडे मी नीट लक्ष देऊन ऐकत होतो. टिळक नगरला रहदारी कमी. ते सकाळी नऊला लायब्ररी उघडतात, तोपर्यंत लोक कामावर निघालेले असतात. तिकडे फक्त मराठी मासिकं आहेत. त्यांनी बाहेरून काचेचा दरवाजा लावून घेतलाय. त्यामुळे ते वाचनालय नाही, तर सलूनसारखं दिसतंय. दरवाजा असल्यामुळे बायका आत यायला घाबरतात. मालक स्वतः लायब्ररीत बसत नाहीत, तर सभासद कसे जमतील ? अशा विविध अचूक मुद्यांवर काकांनी नेमकं बोट ठेवलं. ते वेळेच्या बाबतीत खूपच तत्पर, कडक. मी असं ऐकलं होतं की, एकदा सकाळी त्यांची चावी हरवली होती तर त्यांनी चावीवाल्याला बोलवून टाळं तोडून वेळेवर लायब्ररी उघडली होती! परांजपेकाका वाचनालयाच्या व्यवसायात खरोखरच महान !
त्या दिवसापासून परांजपेकाकांना मी लायब्ररी क्षेत्रातले माझे गुरू मानायला लागलो. मी एकलव्य नसलो, तरी ते माझे द्रोणाचार्य होते. त्यांनी सांगितलेल्या एक-एक गोष्टी लक्षात ठेवून माझ्याकडून जे काही बदल लायब्ररीत करता येतील, ते सगळे बदल करण्याचा निर्णय घेतला. पाहिला बदल म्हणजे, सलूनप्रमाणे दिसणारा बाहेरचा तो काचेचा दरवाजा आधी काढून टाकला ! आता लायब्ररी मोठी दिसायला लागली आणि त्याचा अपेक्षित परिणामही लगेचच जाणवायला लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना बाहेरून पुस्तकं दिसायला लागली. चरित्र, कथा कादंबरी, आरोग्य, कविता, नाटक,जेवणाच्या पदार्थांची पुस्तकं, शेती, अशा विविध पुस्तकांची खरेदी केली. इंग्रजी आणि हिंदी मासिकं ठेवायला सुरुवात केली. सर्वात महत्वाचं म्हणजे, परांजपेकाकांनी सल्ला दिल्याप्रमाणे लायब्ररी सकाळी साडेसात वाजता उघडायला सुरुवात केली आणि तो परिपाठ आजही कायम आहे. परांजपेकाकांचा सल्ला कमालीचा फलदायी ठरला !
Khup chhan
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteBusiness secrets ����
ReplyDeleteSecrets must be kept secret.
Deleteदोन्ही व्यक्ती उत्तम काम करतात तुम्हाला मदत खूप
ReplyDeleteधन्यवाद.
Delete💐🙏🏻मस्त च
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteव्यवसायात यशस्वी होण्यासाठी जे जे गुण हवेत ते तुमच्याकडे आहेत आणि परमेश्वर कृपेनं साथीला उत्तम सहकारी मिळालेत. म्हणूनच तुमच्या बाबतीत नशीब आणि यश एकत्र आले आहेत.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमस्तच.एकदम छान !
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद.
Delete