लग्नापूर्वी सुमननं कधीच माझं उत्पन्न विचारलं नव्हतं. लायब्ररी आणि इतर व्यवसायात दरमहा किती पैसे मिळतात, मी किती कमवतो ? याची तिला काही कल्पना नव्हती. मीही याचा कधी खुलासा केला नव्हता. माझी धडपड, मेहनत तिनं पाहिली होती. एकतर आमचं नातं जवळचं. माझा स्वभावही तिला आवडला. म्हणून माझ्यावरच्या प्रेमामुळे तिनं काहीही विचार न करता माझ्याशी लग्न करायचं ठरवलं.
आमचं घर तसं लहान. तिथं आम्ही दोघंच राहत असल्यामुळे समाधानी होतो. फक्त घरी कोणी पाहुणे आले, की पंचाईत होत असे. पण सगळे मित्र नातेवाईक समंजस होते. लग्न गावी झाल्यामुळे मित्र जरा नाराज झाले होते. म्हणून एक कल्पना लढवली.
सोमवार हा सुटीचा दिवस. त्या दिवशी मी घरी असताना हळुहळू या सगळ्यांना बोलवायला सुरुवात केली. काहीजणांना जेवायला, तर काहींना नाश्त्यासाठी. सुमन करीत असलेल्या स्वादिष्ट मसाला डोश्याची चवच वेगळी. माझ्या सगळ्या मित्रांना हा मसाला डोसा खूप आवडायचा. त्याबरोबर सांबारही. सगळे मित्रगण सुमनचं खूप कौतुक करायचे !
डोंबिवलीत माझ्या ओळखीचे बरेच जण होते. लग्नानंतर तेही आम्हाला जेवायला बोलवत असत. त्यांच्याकडून जेवणानंतर भेटवस्तू मिळत असत. घरच्यांनीही माझ्याकडे कुठली वस्तू आहे आणि काय गरज आहे, याचा व्यवस्थित अदमास घेऊन आम्हाला त्याप्रमाणे वस्तू दिल्या. त्यामुळे माझ्याकडे टी .व्ही., फ्रीज सोडून बाकी सगळ्या गृहोपयोगी वस्तू आल्या. बरीचशी भांडी आणि इतर सामानानं स्वयंपाकघर भरून गेलं.
मी १९८९ मध्ये नोंदवलेला गॅस अजूनपर्यंत मिळाला नव्हता. दोन स्टोव्ह घेतले होते. माझं स्वतंत्र रेशन कार्ड बनवायला घेतलं. त्यात सुमनचंही नाव घालायचं होतं. रेशन कार्ड नसल्यानं रॉकेलसाठी करावी लागलेली खूप धडपड अजूनही आठवते.
सगळी कामं आटोपून मी घरी आल्यावर जेवण करून आम्ही दोघं रोज रात्री डोंबिवली स्टेशनजवळ फिरायला जात होतो. रामनगरला निरनिराळी फळं खूप स्वस्तात मिळायची. तेव्हा केळ्यांंचा दर होता, दोन रु. डझन...चिकू,पेरू केळी अशी स्वस्त मिळणारी फळं घरी आणण्याचा कार्यक्रम ठरलेला. येता जाता कधी कधी गंमत होत असे. रामनगरला शिव मंदिर रोडवर अशोकाची बरीच मोठी झाडं होती. रात्री त्यावर पक्ष्यांचा मुक्काम. कधी कधी त्यांनी केलेली 'शी' डोक्यावर किंवा शर्टवर पडायची. सुमन म्हणायची 'आता नक्की काहीतरी चांगलं घडणार' !
कळसाला असताना सुमनला सिनेमाचं खूप आकर्षण होतं. पण तिथं थिएटर नव्हतं .छोटं गाव, लोकसंख्याही कमी. त्यामुळे एखाद्या तंबूत कधीतरी तिला सिनेमा बघायला मिळत असे. त्यातही कन्नड सिनेमे जास्त. आता दर सोमवारी मी सुमनला चित्रपट दाखवायचं ठरवलं. टिळक टॉकीजला अमिताभ बच्चनचा 'परवरीश' हा हिंदी चित्रपट लागला होता. संध्याकाळी सहाचा शो. सुमनबरोबरचा माझा हा पहिला चित्रपट. त्याची Story मला आवडली होती. डाकूच्या घरी वाढलेला पोलिसांचा मुलगा डाकू होतो आणि पोलिसांच्या घरी वाढलेला डाकूचा मुलगा पोलीस बनतो.
आम्हाला त्या घरात सहा महिने झाले असतील. आता रुळायलाही लागलो, संसार फुलायला लागला. घराचं रंगकाम केलं तर ते अधिक छान दिसेल, असा विचार करून तसा निर्णय घेतला. रंगकाम करणारे मंजुनाथ भट यांना बोलावलं. जवळपास तीन हजार रुपये खर्च करून घर छान सुशोभित केलं.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नात्यातल्या मुलांच्या परीक्षा संपल्या. मी कुंदापूरला असताना मावसभाऊ बाळूअण्णा परीक्षा संपल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा सगळ्या लहान मुलांना जमवून विविध खेळांबरोबरच खाण्या पिण्याची चांगली सोय करायचा. मीही इकडे माझ्या घरी आमच्या घरातल्या मुलांसाठी असंच काहीतरी करायचं ठरवलं.
आधी सुमनसोबत चर्चा करून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातल्या सोमवारी मुलांसाठी 'बच्चा पार्टी' ठरवली. घर लहान असल्यामुळे कोणते खेळ खेळायचे, हा प्रश्न होता. मुलांसाठी पाव भाजी ठरली. घरीच छोट्या जागेवर खेळता येतील, असे चार पाच खेळ ठरवले. अण्णा आणि बहिणींच्या मिळून आठ मुलांना बोलावलं. अशी पार्टी आहे, याचा सुगावा लागताच सगळी मुलं खुश झाली. सगळे पहिल्यांदाच माझ्या घरी एकत्र जमणार होते.
पावभाजीचं सगळं सामान, अमूल बटर, पाव भाजी मसाला रविवारीच राम नगरहून आणून ठेवला. ताजे पाव फक्त सोमवारी सकाळी आणायचे होते. मुलांसाठी विविध खेळांची तयारी, स्पर्धेत जिंकलेल्यांना पेन, पेन्सिल, खोड रबर, कंपास बॉक्स, पट्टी, गोष्टींची पुस्तकं वगैरे शालोपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देणार होतो.
एरवी सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत लोळणारा मी त्यादिवशी मात्र 'बच्चा पार्टी' असल्यानं लवकर उठलो. मुलं यायच्या आधी मला पावभाजी बनवायची होती. त्यादिवशी पहिल्यांदा मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. सुमननं तशी थोडीफार मदत केली होती. पावभाजी तयार करायला मला जवळपास दीड ते दोन तास लागले. सगळ्यांना ११ वाजता बोलावलं. त्यांचे घरातले त्यांना आमच्याकडे सोडून गेले. मोठ्यांना प्रवेश नव्हता.
बरोबर ११ वाजता विविध स्पर्धा, खेळांना सुरुवात झाली. स्पर्धेत विजेत्याला बक्षीस दिलं की दुसरे बालामित्र नाराज होत होते. सगळ्याच मुलांचे मी लाड करत होतो. त्यामुळे शेवटी प्रत्येकालाच एक एक बक्षीस देऊन त्यांना खूश केलं. स्पर्धा संपल्यावर सगळ्यांना पावभाजीची मेजवानी मिळाली. त्यावर्षी, म्हणजे १९९३ पासून दरवर्षी एप्रिल महिन्यात माझ्या घरी मुलांसाठी 'बच्चा पार्टी'ची प्रथाच पडून गेली...
संसाराची सुरवात खूप छान झाली आनंदी वातावरण पिक्चर दाखविला हे छान
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteनेटका प्रपंच !! बच्चापार्टीची कल्पना सुंदर
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसंसाराची खूप छान सुरुवात! तुमच्याकडे कल्पना अक्षरशः पोतडी भरून आहेत. मनापासून कौतुक!!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteबारीक बारीक तपशील वाचायला खूप मजा येते
ReplyDeleteधन्यवाद.
Delete