संतोषचं नामकरण करून गोव्याहून आम्ही डोंबिवलीला परतलो. लगेचच लायब्ररी आणि इतर व्यवसायांकडे लक्ष केंद्रित केलं. घरी मस्ती करणारा संतोष काहीच काम करून देत नसे. त्यामुळे अधून मधून त्याला लायब्ररीत घेऊन जात असे. तो लायब्ररीत आल्यावर बरीच मुलं जमायची. तो लायब्ररीत आला की टेबलावरच्या सगळ्या वस्तू खाली टाकत असे .एक मिनिट एका जागेवर बसत नव्हता. त्याचे घारे डोळे सगळ्यांना आवडत होते. तो लायब्ररीत दिसला नाही की सभासद संतोषची विचारणाही करीत असत. त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे संतोष सर्वांचा लाडका ठरला.
सुंदराबाई निवास मध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे दुसरी घेण्याचा सल्ला अण्णांनी दिला आणि तशी जागा मिळेपर्यंत त्यांच्याकडेच रहाण्याचं त्यांनी आग्रहानं सुचवलं. अण्णांचं म्हणणं बरोबर होतं. पाण्याच्या समस्येमुळे आमची खूप धावपळ होत होती. छोटंसं घर आणि त्यात तळमजला. घरासमोर रहदारी असल्यानं संतोषची काळजी वाटत होती. अण्णांच्या सांगण्यानुसार सुंदराबाई निवासची जागा सोडायचा विचार केला. पण अण्णांच्याही घरी आपण किती दिवस रहाणार ? दुसरं घर बघायला सुरुवात केली. या वेळी घर शोधायला अण्णा स्वत: माझ्या बरोबर फिरत होते.
मला काही समस्या, अडचणी निर्माण झाल्या तर सगळं कुटुंब माझ्यामागे उभं रहात असे. मी ही त्यांच्या अडचणीवेळी त्यांच्या मदतीला धावत असे. मित्रही मदतील होतेच. पण लायब्ररी, घर घेणं किंवा लग्नावेळी यांच्यापैकी कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली नव्हती, सगळं स्वबळावर केलं.
आता बरीचशी घरं पाहून झाली होती. शक्यतो टिळक नगर किंवा गोपाळ नगर या भागातलं घर सोयीस्कर पडलं असतं. एका दलालामार्फत घर दाखवण्यात आलं. अण्णा, मलाही ते आवडलं. आता ‘होम मिनिस्टर’ ची म्हणजेच सुमनची परवानगी आवश्यक होती.
गोपाळ नगर गल्ली नं. एकमध्ये नीलकंठ दीप सोसायटीत पहिल्या मजल्यावर सिंगल रूम किचनचं छोटसं घर माझ्या बजेटमध्ये बसत होतं. सुमनला घर दाखवायला नेलं.आधीचा अनुभव असल्यामुळे तिनं आधी शेजारी लोकांकडे पाण्याची चौकशी केली. तिकडे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास पाणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुमनला घर पसंत पडलं. तिच्या होकारानं मलाही आनंद झाला.
आता पैशांची जमवा जमव. पैसे मागितले असते तर सगळ्यांनीच मदत केली असती. पण स्वबळावर घर घेण्यावर मी ठाम होतो. सुंदरबाई निवास मधलं घर सोडल्यावर तिकडच्या मालकांच्या मागे लागून डिपॉझिटचे पैसे मिळवले. माझ्याकडे भिशीचे पैसे जमले होते. त्या महिन्यात एल.आय.सी.चं कमिशनही चांगलं आलं होतं. लायब्ररीत वर्गणी पुरेशी जमा झाली होती. सगळं मिळून नीलकंठ दीपमधील घर घेण्यापर्यंतची आर्थिक तजवीज झाली. घरमालकांना पूर्ण पैसे देऊन माझ्या नावावर घराचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. घर त्यांनी छान ठेवलं होतं. घरात जास्त काम करायची गरज नव्हती.ऑगस्ट महिन्यात तिथं रहायला जायचं ठरलं.
आई म्हणायची, ‘प्रत्येक घराचं ऋण असतं. त्या जागेचं ऋण असेपर्यंत आपण तिथं राहतो. ऋण संपलं की ती जागा सोडून आपण दुसरीकडे स्थलांतरित होतो’. माझे वडील व्यावसायिक होते. त्यांनी बरेचसे उद्योग केले होते. त्यामुळे ते अनेक ठिकाणी राहिले होते. ते काही महिने मुंबईतही येऊन राहिले होते. आईही त्यांच्या सोबत निरनिराळ्या ठिकाणी राहिली होती. तिचे अनुभव ती नेहमी सांगायची. त्याचबरोबर माझेही अनुभव होतेच. आम्ही कुंदापूर सोडून डोंबिवलीत रहायला आलो. धिवप्रसाद इमारत सोडून गोपाळ नगरात न्यू अश्विनी मध्ये रहायला आलो. तिथून सुंदरबाई निवासमध्ये काही महिने काढले. कन्नडमधली एक म्हण आई नेहमी सांगायची. ‘मधूवे माडी नोडू, मने कट्टी नोडू’. म्हणजे लग्न करून बघ, घर बांधून बघ! प्रत्येकाच्या जीवनात लग्न आणि घर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.खूप मेहनतीनं माझं लग्न झालं. नंतर पुत्रजन्मही झाला, आता स्वतःचं घर म्हणजे माझ्या नावावर ओनरशिपचं घरही झालं...
आमच्याकडे नवीन घर घेतल्यावर वास्तूची पूजा करून गृहप्रवेश करायची पद्धत आहे. त्याप्रमाणे भटजींना बोलावून पूजेचा मुहूर्त काढला. गृहप्रवेशाची पूजा पहाटे सूर्योदयाच्या वेळी करायची असते. सुमन आणि मला पूजेला बसायला लागणार होतं. संतोषला संभाळणं कठीण होतं.तो झोपला तरच आम्हाला काम करायला मिळायचं. नाही तर अन्य कोणाला तरी त्याच्याबरोबर थांबायला लागत असे. संकेतनं ही जवाबदारी स्वीकारली.अण्णांना पूजा विधीची संपूर्ण माहिती होती. स्टेशन जवळच्या कामत बंधूंकडून पूजेचं सगळं साहित्य अण्णांनी आदल्या दिवशीच आणलं. त्यांच्या घरून पूजेचं सगळं सामान सकाळी सातच्या सुमारास आम्ही नवीन घरी आणलं. सकाळच्या या पूजा विधीला आम्ही गणहोम म्हणतो. गणपतीची आराधना आणि होमहवन करून गृहप्रवेश केल्यानंतर ती वास्तू पवित्र होते. हे त्या मागचं मुख्य सूत्र. त्या जागेवर काही दोष असतील तर ते या विधीनंतर दूर होतात, अशी श्रद्धा आहे. परिवारातले सगळेजण पूजेला जमले .सकाळी 11 वाजेपर्यंत पूजा विधी संपन्न झाला. मी आणि सुमननं सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. आलेल्या सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी केली होती. नंतर सगळी नातेवाईक मंडळी आपापल्या घरी निघून गेली. आई आमच्या घरी राहिली होती. संतोष लहान असल्यानं त्या दिवसापासून नवीन घरी आम्हाला आईचा चांगलाच आधार मिळाला....
Very nice. Proud of you !!
ReplyDeleteGreat style of writing. Simply beautiful. Keep up the good work sir.
ReplyDeleteThank you for your compliments.
Deleteआई ति आईच.
ReplyDelete