Saturday, July 25, 2020

नामकरण...

सुमनला ऑपरेशन थिएटरमधून रूममध्ये आणलं होतं. ती शुद्धीवर येण्याची मी वाट बघत होतो. बाळाला तयार करून सुमनच्या बाजूलाच झोपवलं होतं. ती शुद्धीवर येताच बाळाला दाखवून मुलगा झाल्याचं सांगितलं. तिला वेदना होत होत्या. पण बाळाला पाहून तिच्या चेहऱ्यावरच्या मंद हास्यांनी मला भरून आलं. सुमननं नऊ महिने बाळाला सांभाळलं, दिवस-रात्र त्याची काळजी घेतली आणि आताही त्या सगळ्या वेदना तिलाच सहन कराव्या लागत होत्या. तिचं दुखणं मी घेऊ शकत नव्हतो. मी फक्त तिला दिलासा देऊ शकत होतो. सुमनच्या चेहऱ्यावर बाळाला जन्म दिल्याचं समाधान होतं. २२ ऑक्टोबर १९९३ हा दिवस आम्हा दोघांसाठीही अविस्मरणीय ठरला.

मला मुलगा झाल्याची बातमी सर्वांपर्यंत पोहोचली. घरातले तर होतेच. नातेवाईक, मित्र, लायब्ररीचे काही सभासदही  बाळाला बघायला आले. हॉस्पिटलमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काही म्हणायचे, 'हा पुंडासारखा दिसतोय' तर काहींच्या मते तो  आईवर गेलाय. मला काहीच कळायचं नाही. एक मात्र खरं की त्याची मस्ती मात्र माझ्यासारखीच होती! सकाळी साफसफाई करणारे कर्मचारी आले की ते पंखा बंद करायचे. पंखा बंद झाला की बाळाची रडायला सुरुवात. पंखा सुरू केला की मात्र शांत झोपत असे.



नऊ दिवसांनी आम्ही बाळाला घेऊन घरी आलो. ताईनं बाळाच्या कपड्यांसकट इतर सगळ्या वस्तूंची तयारी केली. ११ व्या दिवशी बाळाला पाळण्यात घालायचा कार्यक्रम ठरला. कळसाहून इंदिराअक्का, भावजी, सुमनची मोठी बहीण प्रतिमा असे सगळे आले. आई काही दिवसांसाठी माझ्याकडे येऊन राहिली होती. कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच मी सगळी तयारी केली. बाळाचं नावं आमच्या कुलदेवस्थानी ठेवायचं ठरवलं. त्यामुळे त्याचं बारसं न करता फक्त पाळण्याचा कार्यक्रम ठेवला होता.



वेंकटेशअण्णानं त्याच्या मुलाच्या वेळेला घेतलेला नवीन पाळणा नंतर पांडुरंग अण्णानं त्याच्या मुलीसाठी नेला होता. तो मी आता माझ्या घरी घेऊन आलो. त्यादिवशी सकाळी फुगे वगैरे लावून पाळणा सजवून ठेवला. संध्याकाळी सर्व मंडळी जमली. बाळाला बघून सगळे म्हणाले, 'हा पुंडापेक्षा जास्त मस्ती करेल'! ताई, वहिनीनं मिळून नाश्त्याची तयारी केली होती. परिवारातल्या छोट्या, मोठ्या सदस्यांच्या उपस्थितीत पाळण्याचा कार्यक्रम पार पडला.

गोव्यातली म्हाळसा नारायणी आमची कुलदेवता. कुठलाही कार्यक्रम असेल किंवा परिवारात काही समस्या निर्माण झाल्या की आई देवीचं नाव घ्यायची. गोव्यात म्हार्दोळला देवीचं भव्य मंदिर आहे. मी आमच्या बाळाचं नाव देवळात ठेवायचं, असं ठरवलं होतं. सहा महिन्यांनी, म्हणजेच एप्रिल महिन्यात गोव्याला जायचं ठरवलं. याच दरम्यान आमच्या घरी पाण्याची समस्या निर्माण झाली. सुंदरबाई निवासमध्ये नळाला पाणी येत नव्हतं. बाहेरून पाणी भरायला लागत असे. हे घरी समजल्यावर अण्णांनी त्यांच्याकडे रहायला बोलावलं. त्याप्रमाणे मी आणि सुमन बाळाला घेऊन अण्णांकडे रहायला गेलो.

एप्रिल महिन्यात अण्णांचे मित्र डी. जी. नायक यांच्याही मुलाची मुंज होती, गोव्याच्याच रामनाथी मंदिरात. ते सगळे त्यांच्या गाडीनं जाणार होते. एप्रिल महिन्यात शाळांना सुट्या असल्यामुळे गोव्याला जाणाऱ्या सगळ्या बस फुल्ल होत्या. अण्णांनी त्यांना विचारलं, 'यांना तुमच्या बरोबर न्याल का' ? त्यांनी होकार दिला. त्यांच्या गाडीतून आम्ही चौघांनी त्यांच्याबरोबर गोव्याला जायचं ठरवलं.

एप्रिलचा महिना, उन्हाळ्याचे दिवस. डी.जी.नायक यांची मारुती व्हॕन होती. ते त्यांची पत्नी आणि दोन मुलं. आमच्याकडून आई, संकेत,मी, सुमन आणि आमचं बाळ असे निघालो. गाडी धावत असताना हवेमुळे उन्हाळा  जाणवत नव्हता. गाडी ट्रॕफीकमध्ये अडकली की खूप उकडायचं. बाळानं कुठेच त्रास दिला नाही. त्यादिवशी रात्री १० च्या दरम्यान राजापूरला पोहोचलो. गाडी बाजूला लावून दोघांच्या घरून आणलेला डबा संपवला. तिथेच नंतर थोडा वेळ  आराम करून निघालो. त्या वेळी मला गाडी चालवता येत नव्हती. नायक यांनी स्वतः गोव्यापर्यंत एकट्यानं गाडी चालवली. आम्ही सकाळी देवळात पोहोचलो. आम्हाला म्हार्दोळला सोडून ते पुढे निघाले.

म्हाळसा नारायणी देवी मंदिरात मी पहिल्यांदा आलो होतो. पुरातन काळातलं हे भव्य मंदिर. तिथं प्रवेश करताना काही स्थानिक लोक फुलं आणि हार घेऊन आमच्या मागे धावत आले. त्यांच्याकडून देवीसाठी हार व फुलं घेतली. मंदिरात प्रवेश करून आधी देवीचं दर्शन घेतलं. देवळातलं वातावरण प्रसन्न होतं. देवळात आमच्यासारख्या भक्तांची वर्दळ होती. स्थानिक लोकांपेक्षा बाहेरचे लोक जास्त होते. परदेशातले लोक वास्तू बघण्यासाठी जमले होते. देवळाच्या बाजूला राहण्यासाठी खोल्यांची चांगली सोय होती. ऑफिसमध्ये जाऊन रूम बुक करून आलो. आम्ही दोन दिवस तिकडे राहणार होतो. रूम स्वच्छ आणि राहण्यासाठी सर्व सोयी होत्या. सकाळी एक बाई बाहेरून पाणी गरम करून द्यायची. सर्वजण आंघोळ करून मंदिरात जात होतो. दिवसभर देवळात पूजा, भजनाचे कार्यक्रम सुरू असायचे. देवळात गेल्यावर मन शांत आणि प्रसन्न होत असे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री ठरलेल्या वेळेवर पूजा,आरती होत होत्या. पूजा संपल्यावर सगळ्यांना प्रसाद मिळायचा. नंतर तिथं जमलेले लोक नाश्ता आणि जेवणासाठी कॅन्टीनला जायचे. तिकडे रोज निरनिराळे पदार्थ असायचे. त्या जेवणाची चव निराळीच.



आम्ही आधीच देवळातल्या भटजींना बाळाचं नाव ठेवण्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी आई, संकेत, सुमन आणि मी बाळाला घेऊन देवळात गेलो. आमच्यासाठी पूजेची वेगळी तयारी आधीपासून करून ठेवली होती. सांगितलेल्या वेळेवर आम्ही पोहोचलो. भटजीही आले. देवीची पूजा संपल्यावर बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यांनी नावाचा विचार केला असेल, असं मला वाटल्यामुळे आम्ही काहीच ठरवलं नव्हतं. त्यांनी ठरवलेलं नावं आम्हाला मान्य होतं. भटजींनी आम्हाला विचारलं, 'तुम्ही काही नाव ठरवलंय का'? तेव्हा, 'तुम्हीच नाव ठेवणार ना'? आम्ही भटजींना विचारलं. इतक्यात संकेतनं नाव सुचवलं, 'संतोष'... आणि म्हाळसा नारायणी देवीसमोर संतोष हेच बाळाचं नांव  ठेवलं गेलं. त्यादिवशी, आमच्या मुलाचं नाव 'संतोष पुंडलिक पै' ठरलं...


10 comments:

  1. बाळपण छान च नामकरण सोहळ्याचे वर्णन मस्त.

    ReplyDelete
  2. वा इतकं सुंदर साध्या भाषेतलं लेखन वाचून बर वाटतं. खूप डिटेल मध्ये लिहिता आपण.म्हाळसा देवीचं मंदिर खूप छान आहे आताच जानेवारी मध्ये गेलो होतो.

    ReplyDelete
  3. वा इतकं सुंदर साध्या भाषेतलं लेखन वाचून बर वाटतं. खूप डिटेल मध्ये लिहिता आपण.म्हाळसा देवीचं मंदिर खूप छान आहे आताच जानेवारी मध्ये गेलो होतो.

    ReplyDelete
  4. वाचून खूप 'संतोष' वाटला

    ReplyDelete