Friday, July 3, 2020

१ फेब्रुवारी १९९२ बाल वाचनालायची दमदार सुरुवात.....

मार्ग सापडला !

एक जानेवारी १९९२... मुंबईत परतलो. सुरुवातीचे काही दिवस माझं कुठेच लक्ष लागत नव्हतं. सुमन सतत डोळ्यांसमोर उभी राहत होती. तिकडच्या नऊ दिवसांच्या वास्तव्यात छान निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबर सुमनचा सहवास...ध्यानीमनी तिचाच ध्यास लागला होता. आम्ही दोघेही आपापल्या घरांतून लग्नाची परवानगी मिळवण्यात यशस्वी झालो होतो. आमच्या दोघांमधील अतूट प्रेमापोटीच हे शक्य झालं. ‘काहीही झालं तरी लग्न करायचं, मागे वळायचं नाही’,  हा ठाम निर्धार आम्हा दोघांनाही एक वेगळंच आत्मबळ देत होता. नवीन वर्षाची सुरुवात सुंदर झाली, सारं जग जणू सुंदर दिसू लागलं. प्रेमविवाहात इतरांच्या मार्गात येत असलेले अनेक काटेरी अडथळे आम्हाला ओलांडावे लागले नाहीत. पुढचं सगळं नियोजन मी अण्णा आणि भावजींवर सोडून दिलं. लग्नाची तारीख, विवाहस्थळ सर्व काही तेच बघणार होते. आता विवाहाची जबाबदारी येऊ घातल्यामुळे मला मात्र माझ्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करून उत्पन्न वाढवणंही गरजेचं झालं होतं. त्यानुसार लायब्ररी आणि बाकी अर्थार्जनाकडे लक्ष द्यायला लागलो.

लायब्ररीमध्ये मासिकं ठेवायला सुरुवात करून सहा महिने झाले होते. १९९२ च्या जानेवारी महिन्यात सुप्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांनी त्यांच्या ‘घरदार' मासिकासाठी नवीन योजना आखली होती. त्यांनी ‘घरदार’ ची काही मासिकं आपल्या लायब्ररीत ठेवायला दिली होती. त्यांची जाहिरात करून बरेच सभासद मी त्यांना मिळवून दिले. त्यांची योजना मला खूप भावली. त्यांनी एक पत्रक काढलं होतं. सभासदांनी एका वर्षासाठी फक्त १०० रुपये वर्गणी भरायची. त्यात त्यांना दर महिन्याला एक मासिक अशी 12 मासिकं  मिळण्याची योजना होती. वर्ष संपलं की सभासदांचे १०० रुपये त्यांना परत मिळणार होते. म्हणजे वर्षभर मासिक फुकट !  मराठे यांना हे कसं परवडत असेल, याचा मी विचार करीत होतो. याविषयी मित्र आणि काही सभासदांबरोबर चर्चा केली. त्या योजनेत खरोखरच व्यवसायचं मोठं गुपित  दडल्याचं माझ्या ध्यानी आलं.

त्याकाळी बाजारात बरीच वाचकप्रिय मासिकं होती. फक्त नव्या मासिकाला बाजारात जाहिरात खूप करावी लागे. चांगले लेखक ,लेख, कथा, महिन्याचं भविष्य, थोडीफार जेवणाची रेसिपी असा मसाला मासिकात असेल तर वाचक निश्चितपणे लायब्ररीतून आणून वाचत असत. काही लोकं तर विकतही घेत होते.

‘माहेर’,  ‘मानिनी’, ‘मेनका’. ‘गृहलक्ष्मी’, ‘आहेर’, ‘अलका’, ‘अनुराग’, ‘अनुराधा’, असे बरेचसे अंक लोक वाचत होते. ह. मो. मराठे यांनी उत्तम छपाई, सुंदर मुखपृष्ठ, वेधक सजावट, निवडक लेख,असं सुसज्ज ‘घरदार' मासिक अभिजात मराठी वाचकांसाठी उपलब्ध केलं. ही योजना मला खूप आवडली. अशीच योजना ‘फ्रेंड्स लायब्ररी' मध्येही वेगळ्या प्रकारे राबवायचं मी ठरवलं. लायब्ररीचे सभासद वाढवण्यासाठी  मी प्रयत्नशील होतोच.

 त्या काळात इतर वाचनालयं वाचक वर्ग वाढवण्याचा फारसा प्रयत्न करत नव्हती. बहुतेक जुनी वाचनालयं प्रचार आणि प्रसारासाठी धडपडताना दिसत नव्हती. त्याचं कारण कदाचित त्यांच्याकडे अपुरी असलेली सभासद संख्या, अपुरी जागा. या पार्श्वभूमीवर, आपल्या वाचनालयाचं पुढचं भविष्य उज्ज्वल असू शकेल, या निरीक्षणातून पुढची पावलं टाकायचा मी  निश्चय केला. सभासद संख्या वाढवून मला लायब्ररीचा मोठा विस्तार करायचा होता. ‘शालेय विद्यार्थी’  हेच भावी वाचक असं माझं  मत होतं. आज मुलांना वाचनाची गोडी लागली तर हेच आपले पुढचे वाचक असतील, याची खूणगाठ बांधून व्यापक विचार केला आणि एका खूप मोठ्या योजनेचा आराखडा मनात उभा राहिला. बाल वाचनालय सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी लायब्ररीत  स्वतंत्र दालन उघडलं. लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं, गणित, थोर पुरुषांची चरित्रं,  विज्ञान, कोडी, करमणूक, चांदोबासारखी लहान मुलांची मासिकं विकत आणली. नवीन पुस्तकांनी सहा ते 14 वयोगटांतील मुलांसाठी बाल विभाग सुसज्ज केला. प्रवेश फी नाही, अनामत रक्कमही नाही. फक्त १०० रुपये भरायचे. वर्षभर पुस्तकं घरी नेऊन वाचायची. एक वर्षानंतर सुरुवातीला भरलेली रक्कम म्हणजेच १०० रुपये परत ! एकदा मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली की पुढे ती वाचन सुरू ठेवतील, असं माझं मत होतं. काही लोकांशी संवाद साधून योजना अंमलात आणायचं ठरवलं. फ्रेंड्स लायब्ररीचा बोर्ड होता. त्यावर सविस्तर माहिती लिहिली. लोकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी माहितीपत्रकंही छापायचं ठरवलं. ‘भारत प्रिंटिंग प्रेस’ चा  डेव्हिस माझ्या ओळखीचा होता. पांडुरंग वाडी येथे मॉडेल शाळेजवळ त्याचा प्रिंटिंग प्रेस आणि दुकान होतं. त्याच्याकडून अवघ्या पाच दिवसांत हजारभर पत्रकं छापून घेतली.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टिळक नगर आणि आसपासच्या परिसरात घरोघरी पत्रकं वाटली. एक फेब्रुवारीपासून बाल वाचनालयात नावं नोंदणीला सुरुवात केली. शाळेत जाणारे येणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक बोर्ड वाचत होते, चौकशी करत होते. वर्षभरानंतर १०० रुपये  परत मिळणार असले तरी, ती रक्कमही त्या काळात काहीजणांना खूप जास्त वाटायची. पण तरीही सुजाण डोंबिवलीकरांचा प्रतिसाद चांगला होता.



काही म्हणायचे, ‘एवढीच पुस्तकं आहेत की अजून येणार, त्यात मुलांची मासिकं मिळतील का? आता मुलांच्या परीक्षा आहेत. आम्ही  नंतर येऊ. एका वेळी एकच पुस्तक मिळेल की जास्त पुस्तकं मिळतील ? रोज दोन-तीन वेळा पुस्तकं बदलली तर जास्त पैसे आकारले जातील का’ ? इत्यादी, इत्यादी... काही लोकांनी तर ‘लायब्ररी बंद झाली तर आमचे पैसे कसे परत मिळणार’? असंही विचारायला कमी केलं नाही ! पण प्रतिसाद उत्साहवर्धक होता.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात  सुरुवातीस योजनेला थोडा कमी प्रतिसाद लाभला. एप्रिल महिन्यात मात्र चित्र पालटलं. परीक्षा संपल्यावर तब्बल ९२ सभासदांनी आपलं नाव नोंदवलं. यामुळे, माझ्याकडे ९,२०० रुपये जमा झाले. यामधली जास्तीत जास्त रक्कम मुलांची नवीन पुस्तकं आणण्यासाठीच कारणी घातली.

विद्यार्थ्यांबरोबरच  त्यांचे पालकही  लायब्ररीत  यायला लागले. सभासदांची रेलचेल वाढायला लागली. अजून एक वर्षासाठी तरी सभासद संख्या शंभरीनं वाढली होती. त्या एका महिन्यात केलेल्या धडपडीची दृश्य फळं दिसायला लागली. पुढच्या वर्षी ती सर्व रक्कम परत करायची आर्थिक जोखीम मी उचलली होती. सभासद संख्या वाढल्यामुळे मी त्याचा जास्त विचार केला नाही. मात्र, हे सर्व शक्य झालं, ते ह. मो. मराठे यांच्या ‘घरदार' मासिकाच्या योजनेमुळे. माझ्या उत्कर्षाचा मार्ग त्यामध्येच मला सापडला, हे मी कधीच विसरू शकणार नाही. आजही मी त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत असतो...

4 comments:

  1. खूप मेहनत करून व्यवसाय वाढवला छान

    ReplyDelete
  2. 'घरदार'च्या धर्तीवर तुम्ही देखील घरदार विस्तारण्याची योजना आखली हे लै भारी केलंत

    ReplyDelete
    Replies
    1. हो बालवाचनालयाची तेव्हा गरज होती.

      Delete