Saturday, July 11, 2020

लगबग, लगीनघाईची!

दैनंदिन कामांत कितीही बुडालेला असलो तरी, आठवड्यातून कमीत कमी तीन तरी पत्रं सुमनला पाठवून तिच्याशी संवाद साधण्याचा आनंद घेत होतो. घरातल्या रोजच्या घडामोडींबरोबरच  तिला मी घर घेतल्याचीही वार्ता दिली. लग्नानंतर आपलं स्वतंत्र घर असल्याचं समजल्यावर ती अतिशय हरखून गेली. आमच्याकडे सुरू असलेली लग्नाची तयारी, मी पैशांसाठी करीत असलेली धडपड, कपड्यांची खरेदी असा सगळा तपशील पत्रातून देत होतो. तिच्याकडूनही आठवड्यात एक तरी पत्रोत्तर येत असे. त्यांच्याकडच्या तयारीबद्दल ती माहिती द्यायची. लग्नघटिका जवळ येत होती, तसतशी सगळ्यांच्या मनात आमच्या लग्नाबद्दलची उत्सुकता वाढत होती. गावं लांब असल्यानं जाऊन येणं, सुमनला भेटणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती जवळ नसल्याचा विरह सतत जाणवत होता. 
लग्न कसं होणार ? पुढचा संसार कसा असेल ? सुंदर निसर्गरम्य वातावरणात  वाढलेली सुमन डोंबिवलीसारख्या शहरी वातावरणात  कशी जुळवून घेईल? असे असंख्य प्रश्न मनात फेर धरत होते आणि त्याच काहीशा अप्रत्यक्ष तणावात कधी कधी रात्रभर झोपही लागत नव्हती. कधी एकदा लग्न होऊन सुमनला इकडे आणतो, अशी मनाची अधीर अवस्था झाली होती. अजून लग्नाच्या इतर तयारीखेरीज माझ्या कपड्यांची खरेदीही बाकी होती. 
माझ्याकडे चांगले आणि नवीन कपडे नव्हतेच. लग्न ठरण्यापूर्वी कपड्यांचा मी फारसा विचारही करीत नव्हतो. चार- पाच जीन्स पॅन्ट, त्यावर हाफ शर्ट किंवा टी शर्ट असाच पेहराव. पायात नेहमी स्लीपर. या विषयात माझे ‘तज्ज्ञ  सल्लागार’  मित्र भरपूर होते. ‘नवीन  चांगले कपडे घालत जा, छान दिसशील’असा त्यांचा आपुलकीचा सल्ला. पण मी तिकडे साफ दुर्लक्ष करीत असे. माझी स्वतःची कपड्यांची स्टाईल वेगळीच होती. ताई मला नेहमी चिडवायची, ‘काय हा तुझा अवतार ! टपोरी दिसतोस टपोरी ! चांगले कपडे घे, छान दिसशील’...पण आता लग्न ठरल्यामुळे कपड्यांचा सगळाच ‘गेट-अप’ बदलणं आवश्यक होतं. ऑगस्ट महिन्यात सगळी आर्थिक तरतूद झाल्यामुळे वेगानं  तयारीला लागलो. 

प्रेमाक्काचे पती, आमचे जिजाजी मुरलीधर भट. ते तेव्हा कॅनरा बँकेत कामाला होते. त्यांचं मुख्य काम ओळखीच्यांकडून रोज पैसे गोळा करून ते बँकेत भरणं, (पिग्मी कलेक्शन). त्यामुळे मुंबईपासून सगळीकडे त्यांच्या अनेक ओळखी.कापड खरेदीसाठी त्यांनी मला फ्लोरा फाऊंटन इथं असलेल्या एका मोठ्या ‘रेमंड’ शोरूममध्ये नेलं. अशा शोरूममध्ये जायची माझी पहिलीच वेळ. तिथलं भपकेबाज वातावरण, तिथले कपडे, त्यांच्या किमती बघूनच मी गपगार ! दुकानात येणारे बहुतेक लोक रईसजादे, खूप श्रीमंत. सगळेच भरपूर खरेदी करत होते. काय घ्यायचं, कुठला रंग पसंत करायचा, हेही कळेनासे झालं. पहिल्यांदाच जास्त किंमतीचे कपडे खरेदी करीत होतो, तेही  ‘रेमंड’ सारख्या शोरूम मधून ! कपडे निवडण्यात जिजाजींनी  मला छान मदत केली. किती कपडे शिवायचे आणि काय शिवायचे आहेत, हे त्यांनी नीट विचारलं. मला एक सफारी सूट, तीन पॅन्ट, फुल हातांचे दोन शर्ट आणि एक हाफ शर्ट शिवायचा आहे, असं सांगितलं. त्याप्रमाणे सफारीसाठी  ग्रे रंगाचा पीस घेतला. अजून तीन निरनिराळ्या रंगांचे पॅन्ट पीस व शर्ट पीस निवडले. त्यावेळी या सर्व कपड्यांचं बिल तीन हजार रुपयांच्या आसपास झालं. तसे मला पैसे खूप जास्त वाटत होते पण लग्नासाठी एकदाच खर्च करायचे होते, म्हणून  समाधान वाटून हात सैल सोडला.  शोरूमवाल्यांना कदाचित वाटलं नसेल की मी एवढी खरेदी करेन ! सर्व खरेदी करण्यासाठी आम्हाला दोन तास लागले. आता कपडे शिवायला टाकायचे होते.

जिजाजींच्या ओळखीचे एक टेलर, कोटीयन यांचं फोर्टमध्येच दुकान होतं. त्यांनी जिजाजी आणि श्रीधरअण्णांना खूप मदत केली होती. आम्ही सर्वजण त्यांना कोटीयन अंकल म्हणत होतो. जिजाजी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. लग्नाचे कपडे शिवण्यात ते एकदम निष्णात. त्यांनी आमच्यासाठी नाश्ता मागवला. गप्पा मारता मारता नाशाता उरकला. जिजाजींनी माझी ओळख करून दिली. माझ्या लग्नाचंही त्यांना सांगितलं. आम्ही आणलेले कपडे त्यांना दाखवले. ‘रेमंड’ चे कपडे असल्यानं ते खुश झाले. त्यांनी माझ्या गरजा विचारून मापं घेतली. फोर्टमधलं खूप जुनं दुकान असल्यानं त्यांच्याकडे कामंही खूप आणि शिलाईचे दरही जास्त होते. मला 10 दिवसांत कपडे शिवून पाहिजेत, असं त्यांना सांगितलं.त्यांनी दोन दिवसांनी परत ‘फिटिंग ट्रायल’ साठी बोलावलं. पुढच्या आठ दिवसांत माझे सर्व कपडे शिवून त्यांनी तयार ठेवले. जिजाजींनी ते तयार शिवलेले कपडे आणलेही. या सगळ्या कपड्यांचं 1,800 रु. झालेलं बिल मी चुकतं केलं...या लग्नासाठी प्रेमाक्का आणि जिजाजींनी केलेली मदत मी आजही विसरू शकत नाही !
आता किरकोळ खरेदी. डोंबिवलीतच चार रस्त्यांवरच्या फडके वॉचमधून एच.एम.टी. कंपनीचं गोल्डन कलरचं मनगटी घड्याळ घेतलं. माझ्याकडे चांगल्या चपला नव्हत्या. एक दिवस मी आणि ताईनं जाऊन मानपाडा रोडवरील जेमिनी फूट वेअरमधून छान सँडल घेतले. पुढे ताईच्या ओळखीच्या दुकानातून बॉडी स्प्रे आणि लेदरचे बेल्ट घेतले. बाकीचीही छोटी मोठी खरेदी केली.ऑगस्ट महिन्याच्या २५ तारखेपर्यंत माझ्या लग्नखरेदीचा हा सिलसिला सुरूच होता !



कमीत कमी खर्चात लग्न करायचं होतं. घरातल्या घरात लग्न असल्यानं साखरपुडा केला नव्हता. देवाणघेवाणही काहीच नव्हती. मला हवी होती फक्त सुमन... आणि तिच्यासाठीच तर हा सगळा घाट ! लग्नाच्या पत्रिकाही छापल्या नव्हत्या, सर्वांना तोंडीच आमंत्रण. तसंही बाहेरच्या कोणाला बोलावलं नव्हतं, सगळेच कुटुंबातले... तेव्हा गणेशोत्सव जवळ आल्यानं मित्रांपैकी कोणीच येणार नव्हतं. लग्न गावीच असल्यानं जाण्यायेण्यात चार दिवस तरी गेले असते.
गणेश चतुर्थी होती, ३१ ऑगस्टला. आमच्याकडे चतुर्थीच्या एक दिवस आधी गौरीची पूजा असायची. मोठ्या काकांकडे गणपती असे. यंदा माझं लग्न त्याच दरम्यान असल्यानं सर्वजण ३० ऑगस्टला काकांकडे गौरी पूजेला जमणार होते. मी सोडून सर्वांनी २८ ऑगस्टचं बसचं तिकीट काढलं. जास्त दिवस दुकान बंद ठेवू शकत नसल्यानं मला दुकान सांभाळायचं होतं. माझं ३१ तारखेचं तिकीट होतं. माझ्याबरोबर योगेश भट, आमच्या नात्यातला- जो आमच्या दुकानातही काम करीत होता. तो आणि अण्णांचे शेजारचे खास मित्र एस. व्ही. पै असे तिघे एकत्र जाणार होतो.

घरातले सर्वजण २८ तारखेला गावी निघाले. घरी मी पहिल्यांदाच एकटा राहिलो. चहा, नाश्ता, जेवण मलाच बनवायला लागायचं. सकाळी चहा बनवून त्याबरोबर खारी किंवा टोस्ट खाऊन दुकानात जायचं. दुपारी घरी आल्यावर मॅग्गी किंवा अंडा बुर्जी बनवून ब्रेडबरोबर खायची. मी घरी एकटाच असल्यानं जेवणानंतर चेहऱ्याला दुधाची साय, हळदी पावडर मिसळून लावून घ्यायचा कार्यक्रम असे. राम नगरला सुखसागर डेअरीच्या बाजूला मित्राच्या ओळखीचं सलून होतं. तिथं २०० रुपये देऊन चेहरा ब्लिचिंग करून घेतला ! चार दिवसांनी लग्न होतं. नवरदेवाचा चेहरा चांगला उजळून दिसायला हवा होता ना !

11 comments:

  1. वाह मस्तच लिहिली आहे लग्नाची तयारी, प्रत्येकाला आपलं लग्न नक्की आठवलं असेल

    ReplyDelete
  2. वाह मस्तच लिहिली आहे लग्नाची तयारी, प्रत्येकाला आपलं लग्न नक्की आठवलं असेल

    ReplyDelete
  3. तुमच्या लग्नाची गोष्ट वाचतोय हे माहीत असून सुद्धा.
    मला मानव लग्न डोळ्या समोर येत होते.
    येव्हढे छान नव्हे नव्हे, अप्रतिम लिखाण.

    ReplyDelete
  4. वा वा मस्त तयारी सुरू आहे. 💐💐

    ReplyDelete
  5. खूप रंगवून लिहीलेली आठवण आहे. जणूकाही मी पण लग्नाला निघालेय असं वाटलं.

    ReplyDelete
  6. ऐन गणपतीत मस्त मुहूर्त काढलात !

    ReplyDelete