लग्न... प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय दिवस हा लग्नाचा दिवस ! म्हणूनच ३ सप्टेंबर १९९२ हा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, सोनेरी आठवणींच्या सुगंधी कुपीतला मंतरलेला दिवस... याच एकमात्र दिवसासाठी गेल्या काही महिन्यांपासून मी चंग बांधला होता आणि त्याच्या पूर्ततेचा सुंदर क्षण आता अगदी समीप येऊन पोहोचला होता. २ तारखेला मी वगळता घरातले सगळेजण कुंदापूरला काकांच्या घरी थांबले होते. ते सकाळी लवकर चेम्पिला विवाहस्थळी येणार होते. सुमनला भेटायचं होतं, म्हणून मी लग्नाच्या आदल्या दिवशीच चेम्पिला मुक्कामासाठी पोहोचलो.
माझ्याबरोबर योगेश आणि मावसभाऊ बाळूअण्णा होते. रात्री, जेवणं झाल्यावर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मी आडवा झालो. पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हती. दुसऱ्या दिवशी दिवसभर ताजातवाना राहण्यासाठी थोडीतरी झोप आवश्यक होती. रात्री उशिरा एकच्या सुमारास झोप लागली असेल. सकाळी सहा वाजता तयार व्हायचं होतं.
३ सप्टेंबरला एकाच दिवशी दोन विवाह समारंभ संपन्न होणार होते. आधी मी आणि सुमन व त्यानंतर सुमनचा भाऊ सुखानंद आणि स्वर्णलता हेही विवाहबद्ध होणार होते. मी आणि सुमन मोठे असल्यानं आमचा मुहूर्त होता, सकाळी साडेदहाचा. त्यानंतर सुखानंद आणि स्वर्णलताचा मुहूर्त दुपारी साडेबाराचा. लग्नाच्या विधींची सुरुवात होणार होती, सकाळी सातला. पण सगळं आवरून सकाळी साडेसहा वाजताच नवरदेव बाशिंग बांधून तयार होते ! ताई, प्रेमाक्का आणि वहिनी माझ्यावर बारीक नजर ठेवून होत्या.
एरवी इतरांच्या विवाहकार्यात विधींकडे मी फारसं लक्ष देत नसे. पण माझं लग्न असल्यानं आजची गोष्टच निराळी होती ! लग्नाच्या प्रत्येक विधीचं शास्त्रशुद्ध प्रयोजन भटजी मला नीट समजावून सांगत होते. आपल्या पूर्वजांनी सखोल अभ्यास करून या सगळ्या विधींची आखणी केली असणार. कालांतरानं जागा आणि वेळेनुसार त्यात थोडे थोडे बदल होत गेले असतील, असं भटजी सांगत होते आणि मी मान डोलवत होतो.
बरोबर सकाळी सात वाजता विधींना सुरुवात झाली. सुरुवातीला वधू पक्षाकडून माझ्या हातात श्रीफळ म्हणजेच नारळ देऊन आणि फुलांचा हार घालून माझं स्वागत करण्यात आलं. उभय पक्षांच्या स्त्रियांनी सामोरं येत एकमेकांना हळदी कुंकू लावून स्वागत केलं. आमच्याकडे या कार्यक्रमाला 'एदुरु काणसुचे' असं म्हणतात. म्हणजे, एकमेकांना सामोरं जाऊन स्वागत करणं. नंतर सुमनचे वडील माझा हात घेऊन मला लग्न मंडपात घेऊन गेले. मंडपात मी आणि माझ्या सोबत भावाचा मुलगा संकेत ज्याला आम्ही देडडो म्हणतो, अशा दोघांची पूजा केली. गणपती आणि कुलदेवतेची पूजा करून माझ्या तिन्ही बहिणींनी मिळून उडीद दळायला सुरुवात केली. भटजी मंत्रपठण करीत असताना माझं लक्ष मात्र सुमनच्या आगमनाकडे होतं. सुमन कधी येते, आज नववधूच्या पेहरावात ती कशी दिसत असेल, याची मला उत्सुकता होती. तेवढयात माझ्या तिन्ही बहिणींनी मला काजळ लावलं. एकीकडे वधूकडचे विधी सुरू होणार होते. मला चहापान करून दुसरा पोशाख घालून यायला सांगण्यात आलं. आमच्याकडे लग्नात नाश्त्याला जास्त करून उपमा, पोहे, बारीक शेव आणि म्हैसूरपाक असतो. तो खाण्याची मजा वेगळीच. मी थोडासा नाश्ता केला आणि वेगळा पोशाख परिधान करून मांडवाता आलो.
थोड्या वेळात मला एक काठी आणि तांब्या घेऊन काशी यात्रेला निघण्याची सूचना झाली. तेवढयात वधूपिता आले आणि मला अडवून 'माझ्या कन्येशी विवाह करणार का' ? असं त्यांनी विचारलं. त्यांना मी 'होकारार्थी' उत्तर दिलं. या आश्वासनानंतर ते मला मंडपात घेऊन आले.
मंडपात वधूपूजा करून नंतर वरपूजा होते. त्याप्रमाणे माझी पूजा झाली. मला कन्यादानाचं साहित्य देण्यात आलं. मग आंतरपाट धरून बरोबर साडेदहाच्या मुहूर्तावर मंगलाष्टकांच्या गजरात कन्यादान झालं. आपल्याकडे कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान गणलं जातं. कन्यादान करून सुमनला माझ्या स्वाधीन करण्यात आलं. त्यानंतर मंत्रोच्चारांच्या गजरात होमहवनाला सुरुवात झाली. होम संपल्यावर माझ्या तिन्ही बहिणी समोर बसल्या. बहिणी एक अट घालतात, 'आम्हाला मुलगा झाला तर त्यांच्या मुलीशी त्याचं लग्न लावायचं. आमचा होकार आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही', असं बहिणी बजावतात. आम्ही 'होकार' दिल्यावर त्या आम्हा दोघांना स्वीकार करतात.
नंतर आमच्यासमोर एका पातेल्यात पाणी भरून त्यात सोन्याची अंगठी ठेवणार असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. मग आम्हा दोघांना हात घालून ती अंगठी शोधण्याची सूचना झाली. भटजींच्या हाती अंगठी आणि काही पैशांची नाणी होती. मी त्यांच्या हाताकडे बघत होतो. दुसरीकडे सुमनकडेही लक्ष होतंच. पहिल्यांदा त्यांनी टाकलेलं नाणं सुमननं बरोबर शोधलं. दुसऱ्यांदाही अंगठी न टाकता परत टाकलेलं नाणं सुमनच्या हाती अचूक लागलं. तिसऱ्यांदा त्यांनी खरोखरच अंगठी टाकली. ती मी शोधून माझ्या मुठीत पकडली. सुमन अंगठी शोधत राहिली. गंमत म्हणजे मी हात बाहेर काढलाच नाही. थोडक्यात मी 'चिटिंग' केली. अर्थात अंगठी मी शोधली तरीही ती सुमनकडेच जाणार होती. सगळाच गंमतीचा मामला ! मात्र. आम्ही दोघांनीही त्या क्षणाचा आनंद लुटला, असं म्हणायला हरकत नाही.
दुसरीकडे सुमनच्या भावाच्या, सुखानंदच्या लग्नाची तयारी सुरू होती. आम्हा दोघांना वेगळे कपडे घालायला पाठवलं. वहिनी, ताई सगळेजण त्या लग्नात गुंतले होते. एकाच दिवशी एकाच मंडपात दोन लग्न समारंभ असल्यानं सर्वांची धावपळ होत होती. योगेश माझी काळजी घेत होता. आज तिसऱ्यांदा कपडे बदलण्याची येण्याची वाट बघत होतो.
सुखानंदच्या लग्नाचे विधी सुरू झाल्यानंतर मला बोलावणं आलं. मी त्याचा मामा असल्यानं काही विधीँसाठी मला बोलावलं. नंतर त्याचं लग्न लागताना मी लक्ष देऊन बघत होतो. बरोबर साडेबाराच्या मुहूर्तावर सुखानंद आणि स्वर्णलता विवाहबद्ध झाले. दुपारी एक वाजला. सगळी वऱ्हाडी मंडळी एक एक करून जेवण करायला गेली. काहीजण आम्हाला भेटायलाही आले. तिकडून फोटोच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. फोटोग्राफर जिजाजीच असल्यानं त्यांचं आज्ञापालन करावं लागत होतं. फोटोचा कार्यक्रम तासभर तरी चालला असेल. लग्नाला २०० लोक आले होते. सर्वांचं जेवण होईपर्यंत दोन वाजले. मला भूक लागली होती.
पंगती सुरू झाल्या. बाकीचे सगळेजण जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवले. आमच्यासाठी मात्र वेगळं टेबल मांडलं होतं. मी ,आई, सुमन सुखानंद, स्वर्णलता जेवायला बसलो. पहिल्यांदाच आम्ही असे एकत्र जेवायला बसलो. भटजीनी एकमेकांना एक एक घास भरवायला सांगितलं. माझ्यासाठी तो सर्वोच्च आनंदाचा उत्कट क्षण होता...
लग्न सोहळ्याचे सुंदर वर्णन डोळ्यासमोर उभे केले, असे वाटले आम्ही तेथे उपस्थित आहोत. उत्तम
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteअगदी डोळ्यांसमोर आला सर्व सोहळा!छान वर्णन!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteअगदी डोळ्यांसमोर आला सर्व सोहळा!छान वर्णन!
ReplyDeleteअगदी डोळ्यांसमोर आला सर्व सोहळा!छान वर्णन!
ReplyDeleteशुभमंगल झाले. 💐💐👏🏻👏🏻
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteलेक लाडकी त्या घरची....
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteलग्न सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद घेतला.काही नवीन रीती-परंपरा कळल्या. कथा अगदी रंगतेय...
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुंदर सुंदर
ReplyDeleteधन्यवाद.
Delete