मी दरवर्षी नवीन सायकल घेत असे. याचं कारण, सायकल जुनी झाली की सारखी बिघडायची आणि ती दुरुस्त करायला एक/दोन दिवस लागत होते. मग त्यावर खर्चही जास्त. त्यापेक्षा जुनी विकली की तिला चांगली किंमतही मिळायची. नवीन सायकल दिसायलाही सुंदर आणि ती चालवण्याची मजा वेगळीच.
आधी माझ्याकडे जुन्या गाड्या होत्या. मी त्यासाठी १९८६ मध्येच ड्रायव्हिंग लायसन्सही काढलं. सुरुवातीला बजाज कंपनीची 'एम-फिफ्टी' मग छोटी 'सन्नी' गाडी काही काळ माझ्याकडे होती. जुनी गाडी असल्यानं वाढीव पेट्रोलसह दुरुस्तीचा खर्चही खूप असे. त्यामुळे गाड्या विकून स्वस्त आणि मस्त सायकल वापरायला लागलो.
आता एल.आय. सी.ची कामं वाढली होती. रोज एम. आय. डी.सी. च्या ऑफिसला जात असे. डोंगरेकाका नेहमी सांगायचे, 'नवीन गाडी घे, धंदा वाढेल. जास्त कामं करु शकशील'. आता कुठली गाडी घ्यायची, हा प्रश्न पडला. मित्रांना विचारलं तर ते मोटारसायकल घ्यायला सांगत होते. त्यापेक्षा मला स्कूटर घ्यायची होती. त्यात सामानही नेता येत होतं. लायब्ररीसमोरच्या मेघदूत सोसायटीत रहाणारे सचिन जोशी यांच्याशी माझी चांगली ओळख होती. त्यांच्याकडे LML Vespa गाडी होती. त्यांच्याकडून या गाडीची माहिती घेतली. उल्हासनगरमध्ये त्या गाडीचं शोरूम असल्याचं त्यांच्याकडून समजलं. जोशी यांच्याबरोबरच त्या शोरूमला गेलो. आम्ही हिरव्या रंगाची गाडी निवडली. 'दोन दिवसांत गाडी तयार करून ठेवतो', असं शोरूमच्या मालकांनी सांगितलं.
गाडी बघून आल्याचं सुमनला सांगितलं. शो रुममधून गाडी घेऊन येण्यासठी सुमनला कसं तरी तयार केलं. संतोषला कोणाकडे ठेवायचं, हा प्रश्न ताईनं सोडवला. ठरल्याप्रमाणे मी आणि सुमन सकाळी ११ च्या सुमारास शोरूमला पोहोचलो. गाडी तयार होती. काही कागदपत्रं सही करून दिली आणि गाडी ताब्यात घेतली. मी आणि सुमन पहिल्यांदा गाडीवरून डोंबिवलीला निघालो. रस्त्यात श्रीराम टॉकीजच्या वळणावर एक कार आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली. जाताना सुमनच्या पायाला कारच्या मागचं चाक लागलं, माझाही तोल जरा सुटला. तरी कशीबशी गाडी सावरून घेतली. सुमनच्या पायाच्या बोटांना थोडंसं लागलं. आम्ही दोघे थोडक्यात वाचलो. गाडी घेऊन घरी आलो. हार घालून, नारळ फोडून गाडीची पूजा केली.
माझी आई माझ्याकडे राहत होती. आईनं आमच्यासाठी खूप कष्ट झेलले. कुंदापूरला असताना पापड, लोणची, मसाले बनवून ते बाजारात विकून आईनं आम्हाला वाढवलं होतं.तिनं स्वतःचा कधीच विचार केला नाही.आपली मुलं, नातवंडं यांच्याकडेच तिचं जास्त लक्ष. कोणी आजारी पडलं की आई लगोलग तिथं हजर असायची. अण्णा, ताई, भाऊ, बहीण, अशा सगळ्यांच्या घरी ती एकटीच चालत जायची. तिला मराठी बोलता येत नसलं तरी बोललेलं समजायचं. वाटेत कोणी काही विचारलं की ती कोकणीतून बोलायची.आम्हा सर्वांना आईचा आधार होता. त्या काळात तिसरीपर्यंत शिकलेली आमची अनुभवसंपन्न आई तिच्या बालपणाच्या असंख्य गोष्टी सांगत असे. तिला कन्नडमधून सही करता येत होती. कमी शिकलेली असली तरी गणितात हुशार होती. पैसे नीट मोजून हिशेबही नीट ठेवत असे. कमीत कमी खर्चात अत्यंत चविष्ट जेवण बनवण्यात तर तिचा हातखंडा. आपल्याकडे जे काही असेल, त्यात समाधान मानायची तिची वृत्ती. घरी पैशांची कमतरता असली, तरी आईनं कधी आम्हाला उपाशी राहून दिलं नाही. आम्हा भावंडांना चांगली शिकवण दिली, आमच्यावर सुसंस्कार केले. यामुळे आता आईला सांभाळणं, हे आम्हा सगळ्यांचं कर्तव्य होतं.
तिथीनुसार, अनंत चतुर्थीला आमच्या आईचा वाढदिवस. तिचा जन्म १९२७ या वर्षातला. गेल्याच वर्षी संतोषचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर यंदा आईचा वाढदिवस साजरा करायचा विचार मनात आला. एवढी वर्षं कष्ट करून आता कुठेतरी तिला सुख मिळालं होतं. मी जबाबदारी घेतो, म्हटल्यावर बाकीचे सगळे तयार झालेच असते. सुमनलाही ही कल्पना आवडली. आईला कळलं असत तर तिनं नकार दिला असता. वाढदिवस फक्त लहान मुलांचे साजरा करतात, असं तिचं मत. म्हणून आईच्या नकळत तयारीला लागलो.
अण्णा आणि ताईला सांगितलं. दोघे खुश झाले. मग प्रेमाक्का वेंकटेश अण्णा, पांडुरंग अण्णा यांना वाढदिवसाच्या दिवशी माझ्याकडे यायला सांगितलं. सगळेजण मनापासून तयार झाले. फक्त आईची मुलं आणि नातवंड यांनाच बोलावलं होतं.
प्रत्येकाला आपापल्या घरून एक डिश तयार करून आणायची होती. अण्णांच्या घरून वहिनीनं गुलाबजाम, ताईनं दहीवडा, प्रेमाक्कानं पुलाव, वेंकटेश अण्णा आणि पांडुरंग अण्णांकडून एक एक भाजी आणायचं ठरलं. आमच्याकडे अनंत चतुर्थीला विशिष्ट प्रकारची आळूची भाजी बनवतात. ती आईला खूप आवडत असे. ती भाजी बनवायची जवाबदारी सुमनकडे होती.
आम्ही आधी ठरवल्याप्रमाणे आईला एवढंच सांगितलं, 'आज तुला सगळे जण भेटायला येणार आहेत'. आईला आमच्या कार्यक्रमाचा पत्ता लागू दिला नाही. सगळी मुलं, नातवंड भेटायला येणार म्हणून आई चांगली साडी नेसून तयार झाली. रात्री नऊच्या सुमारास एक एकजण येऊ लागले. मी लायब्ररी बंद करून येताना छोटासा केक घेऊन आलो. आईला नकळत आत घेऊन गेलो. नंतर एका टेबलवर चादर अंथरली. टेबलामागे खुर्चीवर आईला स्थानापन्न केलं. आणलेला केक समोर ठेवला. तेव्हा आईला समजलं की तिचा वाढदिवस साजरा होतोय! तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया बघण्यासारखा होत्या. ' बर्थ डे साजरा करायला मी काय लहान आहे का'? हे तेव्हाचं तिचं वाक्य. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. सगळी मुलं, नातवंडं मिळून आईनं केक कापला.आम्ही मिळून 'बर्थडे' चं गाणं म्हटलं.जेवणाची तयारी करून प्रत्येकानं आणलेले पदार्थ टेबलवर ठेवले, आपल्या आवडीचे पदार्थ वाढूनही घेतले. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. सगळे घरी जायला निघाले. मी त्यांना थांबवलं. मी एक गंमत केली होती. कोणाला न कळत आदल्या दिवशी सर्वांसाठी रंगीत कागदात गुंडाळून भेटवस्तू आणून ठेवल्या होत्या. आईच्या हातून प्रत्येकाला एक एक वस्तू भेट म्हणून दिली. त्यावर्षीपासून दरवर्षी अनंत चतुर्थीला न चुकता आम्ही सगळे मिळून आईचा वाढदिवस साजरा करत आलो...