Thursday, April 16, 2020

सख्खे शेजारी... VPM मुलुंड शाळेचा पहिला दिवस!

ताप उतरला होता हॉस्पिटलमध्ये मस्ती करता येत नव्हती. कधी एकदाचं घरी पोचतो असं झालं होतं. राव डॉक्टरांच्या औषधांनी मी एकदम ठणठणीत झालो होतो. 'शिवप्रसाद' मधल्या दुसऱ्या मजल्यावरील आमच्या घरी पोचलो. खूप बरं वाटलं. शेजारच्यांशी ओळख करून घ्यायची होती.

आमच्या शेजारी दोन घरं होती. पहिल्या घरी रमेश भाई, जया बेन, त्यांची तीन मुले, जगदीश, रूपा (गुल्ली), प्रकाश (गुल्ला). दुसऱ्या घरात हर्षदभाई, जयाबेन त्यांची मुलं हीना, सिद्धार्थ (मुन्ना), रुपेश (रुप्ला). मी जास्त वेळ मुन्नाच्या घरी असायचो. अण्णा आणि ताईने त्यांच्याबरोबर चांगली मैत्री केली होती. आम्हाला खरोखरच चांगले शेजारी लाभले होते. त्यांचा स्वभाव, वागणं एकमेकांच्या बाबतीतला आपलेपणा, खाऊची देवाण-घेवाण. अामच्याकडचा इडली सांबर, डोसा, लोणचं त्यांना आवडायचं. आम्हाला त्यांच्याकडचा मोरांबा, खाकरा, ढोकला, वगैरे. क्रिकेटची मॅच असली की मी मुन्नाकडे जायचो. त्यांच्याकडे रेडिओ होता. मॅच ऐकताना खायला मिळायचं.

मी सातवीत नापास झालो होतो. आता परत सातवीसाठी शाळेत अॅडमिशन घ्यायची होती. घरी चर्चा सुरू होती. तेव्हा डोंबिवलीत कन्नड माध्यमाची शाळा नव्हती. मराठी माध्यमात दाखला मिळणार नव्हता. इंग्लिश आणि माझं वाकडं होतं. सगळीकडे चौकशी केल्यानंतर समजलं की मुलुंडला विद्या प्रसारक मंडळाची कन्नड माध्यमाची शाळा आहे, ती पण दहावीपर्यंत. फक्त आता जाण्यायेण्याकरता ट्रेनचा प्रवास बघायचा होता. आम्ही डोंबिवलीत यायच्या आधीच चौकशी केली होती. फक्त आता निर्णय घ्यायचा होता. सर्वांचं ठरलं की VPM मुलुंडला अॅडमिशन घ्यायची. 'अण्णा' मुलुंडमधे 'भारत बुक डेपो' ह्या दुकानात कामाला होते. VPM शाळेचे सर्व विद्यार्थी 'भारत बुक डेपो' मधून पुस्तके घ्यायची. अण्णांनी माझ्यासाठी सर्व पुस्तके आणून ठेवली होती. त्यात फक्त कन्नड पुस्तक मी चाळलं होतं. छोट्या ताईने सर्व पुस्तकांना कव्हर्स घातली होती. ताईने माझ्यासाठी नवीन दप्तर, चपला आणि कंपास पेटी आणली होती.

शाळा १३ जूनला सुरू झाली होती. माझ्या आजारपणामुळे उशीर झाला होता. २० जून, १९७७ ला मी आणि मुरलीधर भट— अाता माझे जिजाजी, शाळेत जायला निघालो. १२.४० ची शाळा होती. आम्ही १०.३० च्या सुमारास घरून निघालो. नवीन पांढरा शर्ट, निळी हाफ पॅन्ट, नवीन चपला, नवीन दप्तर, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, खोड रबर, वह्या पाहून मला आनंद झाला होता. डोंबिवलीतून पहिल्यांदा शाळेत जायला निघालो होतो. घरातले आणि शेजारी सर्व गॅलरीत उभे राहून मला टाटा करत होते. आम्ही चालत चालत मानपाडा रस्त्यावरून डोंबिवली स्टेशनला पोचलो. छोटंसं तिकीट घर होतं. जिजाजींनी दोन तिकिटं काढली. पिवळ्या रंगाचं पुठ्याच तिकीट होतं. जिजाजींनी कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला जायचं ते सांगितलं, "हा चार नंबर प्लॅटफॉर्म; तिकडे फक्त VTकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन येतात.. तिकडे जायचं नाही. अापल्याला दोन नंबरला जायचंय.. तिकडून VTकडे जाण्याऱ्या slow गाड्या येतात. या गाड्या मुलुंड स्थानकावर थांबतात. आपल्याला मुलुंडला जायचंय". मला काहीच समजंत नव्हतं. काही गाड्या इकडून येत होत्या, तर काही तिकडून. मी जिजाजींच्या मागे मागे जात राहिलो. अकरा वाजले होते. ११.१०ची गाडी होती. थोड्यावेळाने गाडी आली. गाडीत आधीपासून गर्दी होती. त्यांनी मला आधी चढायला सांगितले. माझ्यामागे तेही चढले गाडीमधे. आम्ही आत गेलो. बसायला जागा नव्हती, उभेचं राहिलो. पहिलं स्टेशन आलं. जिजाजी बोलले, हे 'दिवा' स्टेशन आहे. अजून तीन स्टेशन आहेत. मग आपलं 'मुलुंड' येईल. माझं लक्ष बाहेर होतं. बाहेर नदी दिसत होती. बाजूला सर्व हिरवंगार होतं. एक लोखंडी ब्रिज आला. बरेचसे लोक आपल्याकडच्या पिशवीतून निर्माल्य टाकायला लागले. नंतर 'मुंब्रा' आलं. तिकडून निघताच बोगदा आला. त्यातून गाडी जाताना मस्त वाटत होतं. असे दोन बोगदे होते. बाजूला मोठा डोंगर होता. त्या डोंगरावर बरेचशी घरं होती. मी विचार करत होतो. लोकं या घरात कसे राहत असतील? यांना जायला रस्ता कुठून असेल? पुढे उजव्या बाजूला कंपनी होती. इतक्यात तिसरं स्टेशन आलं 'कळवा'. बरेचसे लोक चढले. जिजाजी बोलले आता गर्दी होईल, आपण बाहेर जाऊन उभे राहू. थोड्यावेळाने चौथं स्टेशन आलं 'ठाणे'. बरेचसे लोक उतरले.. तेवढीच लोकं चढली. गर्दी तशीच होती. आम्ही पुढच्याला विचारलं, तुम्हाला उतरायचं आहे का? तसे पुढे सरकलो. मुलुंड स्टेशन आलं, आम्ही उतरलो. आम्ही दोघे  जिना चढून खाली उतरलो. डाव्या बाजूला बाहेर पडलो. उजव्या बाजूला मोठ-मोठ्या पिवळ्या रंगाच्या इमारती होत्या. रेल्वे कर्मचाऱ्यांची घरं होती. तिकडून सरळ चालत गेलो. दहा मिनिटांनी एक वळण आलं. जिजाजी म्हणाले, "हा मिठाघर रोड आहे, या रस्त्याच्या शेवटी शाळा आहे". आम्ही चालत गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिंचेची झाडं होती. दुपारचं ऊन होतं. पण झाडांच्या सावलीमुळे एवढं जाणवलं नाही. सुमारे पंधरा मिनिटांनी समोर शाळा दिसली. शाळेच्या आजूबाजूला पण झाडं होती. समोर महामार्ग दिसत होता. शाळेची दोन मजली इमारत होती.  सकाळची शाळा सुटली नव्हती. दुपारच्या शाळेची मुलं बाहेर उभी होती. आम्ही आत गेलो. मी बाहेर  बाकड्यावर बसलो. जिजाजी ऑफिसमध्ये गेले. कागदपत्रे दाखवली, समोर कॅश काउंटर होतं तिकडे जाऊन पैसे भरले. माझी अॅडमिशन झालं होती. सातवी 'ब' कक्ष होता. तिकडच्या कर्मचाऱ्यांनी मला वर्ग दाखवला. 20 जून 1977 शाळेचा पहिला दिवस होता माझा.

14 comments:

  1. शाळेचा पहिला दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात संस्मरणीय असतो त्याप्रमाणे आपण भावना व्यक्त केल्या लेखात बोलकेपणा आहे. छान लहिले

    ReplyDelete
  2. सर्वाना आपल्या शाळेबद्दल खूप अभिमान असतोच. तुमच्या लिखाणातून तुमचं शालेय जीवन वाचायची उत्सुकता वाढतेय.शिवाय ट्रेनचा प्रवास वर्णनं असेलच. खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. वाचताना मस्त वाटलं
    काही आठवणी जाग्या झाल्या
    मी मुलुंडची आहे पुरंदरे शाळेत शिकले
    भारत बुक डेपो मधूनच शाळा आणि कॉलेजची पुस्तक खरेदी करीत होते
    काही वर्षांपूर्वी भारत बुक देपोक्सच्या इमारतीचे नूतनीकरण केले आणि बुक डेपो बनद झाला तेव्हा वाईट वाटले होते ते आठवले

    ReplyDelete
    Replies
    1. भारत बुक डेपो मुलुंड मधील उत्कृष्ट पुस्तकांचं दुकान होतं आणि मला आनंद आहे कि माझे अण्णा तिथे कमला होते...

      Delete
  4. शाळेचा पहिला दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात अविस्मरणीय असतो.
    तुमचे लेखन वाचताना मि स्वतः माझा पहिला दिवस पहात होतो.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  5. लहान मुलानी ट्रेन मधून कसा प्रवास केला असेल ह्याची उत्सुकता आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मी ७वी ते १०वी पर्यंत डोंबिवली ते मुलुंड रोज प्रवास करत होतो त्यातले काही किमतीदार आठवणी पुढील भागात तुम्हाला वाचायला मिळतील.

      Delete
  6. शाळेचा पहिला च प्रवास एवढा लांब शाळेत जाण्यासाठी आजच्या सारख्या सोयी त्या वेळी उपलब्ध न होत्या आम्ही लोकलची गर्दी अनुभव त होतो आता तर चढणे ऊतरणे शक्य च होणार नाही

    ReplyDelete
    Replies
    1. हो त्या काळी लोकल-ला गर्दी कमी असायची शाळेचा प्रवास सुखकर होता....

      Delete