Sunday, April 12, 2020

जन्मभूमी "कुंदापूर" ते कर्मभूमी "डोंबिवली"चा प्रवास

२५ मे ला माझ्या भावाचा— 'पांडुरंग'चा दहावीचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही 'बॉम्बे'ला निघालो. २६ मे १९७७ ला सकाळी नऊच्या सुमारास बस निघाली 'बॉम्बे'साठी. मी खिडकीच्या बाजूची सीट पकडली होती. कुंदापूरच्या शास्त्रीकट्टेवरून बस वळली, थेट राष्ट्रीय महामार्ग NH17 गाठला. या मार्गावरून बस जाताना हवा जोरात चेहऱ्यावर येत होती. केस उडत होते. बाहेर एक नदी, ब्रिज, नारळाची झाडं, शेतात काम करणारी माणसे दिसत होती. दुपारी बारापर्यंत आम्ही 'भटकळ'ला पोचलो. बस अर्धातास थांबणार होती. ताईने खायला आणलं होतं ते आम्ही खाऊन घेतलं; परत प्रवासाला सुरुवात. दुपारी सर्व झोपले पण मी मात्र जागाचं होतो.. बाहेरचं दृश्य बघत होतो. संध्याकाळी एका हॉटेलसमोर बस थांबली. तिकडे चहा घेतला. मला ताईने बिस्कीटं दिली ती खाऊन मी माझ्या जागेवर जाऊन बसलो.


बसमधे हिंदी चित्रपटातली गाणी लावली होती. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. माझे डोळे बंद होत होते. नकळत मी झोपी गेलो. काहीवेळाने ताई मला उठवत होती.. बस थांबलेली.. समोर हॉटेल होतं. आम्ही 'धारवाड'ला पोचलो होतो. ताईने जेवणाची ऑर्डर दिली. सर्वांची जेवणं झाली. सर्वजण बसमधे चढले की सर्वात शेवटी मी चढायचो. बसचा कंडक्टर माणसं मोजायचा. सर्वजण चढले आहेत का ते बघायचा. मग बसचा प्रवास पुन्हा सुरू व्हायचा. सकाळी मला जाग आली.. बाहेर सकाळची सूर्याची किरणे, गार हवा, शेतातली उसाची-ज्वारीची पीकं मागे सरकत होती. मी ताईला विचारलं, हे कुठलं गाव आहे? ताई म्हणाली "कराड"!.. मी परत बाहेरचं दृश्य बघायला लागलो. शेतकरी डोक्यावर गवत घेऊन समोर गायी हाकत पुढे चालले होते. माझ्या चेहऱ्यावर गार वारा लागत होता. सकाळचे आठ वाजले होते. आम्ही पुण्याला पोहोचलो. एका हॉटेलसमोर बस उभी राहिली. हात-पाय-तोंड धुवून घेतलं. चेहऱ्यावर काळं-काळं लागलेलं होतं म्हणून साबणाने चेहरा परत धुवून घेतला. हॉटेलात गेलो.. ताईने सर्वांकरता पुरी-भाजीची ऑर्डर दिली होती. पहिल्यांदा पुरी-भाजी खात होतो. पोट भरलं. ताई म्हणाली, "दुपारपर्यंत आपण 'बॉम्बे'ला पोहचू. मला 'बॉम्बे' बघायचं होतं. आतापर्यंत शेती आणि झाडं दिसत होती. मला इमारती आणि ट्रेन बघायची उत्सुकता होती. सर्वजण बसमधे चढले आणि बस निघाली. बसमधे हिंदी गाणी लागली होती. मी 'बिनाका गीत माला' ऐकायचो त्यामुळे बरीचशी गाणी मला माहिती होती. आता बस घाटावरून उतरत होती. ताईला विचारलं.. हा कुठला गाव?.. ताई म्हणाली "खंडाळा"! खालचं दृश्य छान दिसत होतं. बस वळणावरून वळताना भीती वाटत होती. एका बोगद्यातून बस बाहेर पडली. घाटाच्या पायथ्याशी आलो. आता मात्र बस सरळ जात होती. पनवेलच्या पुढे आलो तशी ताई म्हणाली.. 'एक दीड तासात पोहचू आपण'. आता इमारती दिसायला लागल्या होत्या. खरोखरंच झाडं कमी होत गेली.. कावळे पण कमी होते.. कबुतरे दिसायला लागली. बाराच्या दरम्यान 'बॉम्बे'ला पोचलो. 'सायन सर्कल'ला आलो.मुरलीधर भट जिजाजी बस ची वाट बघत होते .त्यांनी तिथून मुलुंडसाठी दोन टॅक्सी केल्या. दुपारी एक वाजता मुलुंडच्या 'नवघर रोड'वरील श्रीधर अण्णांच्या घरी पोचलो. बसमधे बसून पाय आखडले होते.. पाय मोकळे केले. हात-पाय-तोंड धुवून घेतलं.. घर छोटं होतं.. सिंगल रूम. एका बाजूला पडदा लावलेला.. तिथे बाथरूम होतं. बाहेर कॉमन वॉशरूम होती. घरी जेवण तयार होतं.निरुपमक्का श्रीधरं अण्णांची बहीण आम्ही पोचायच्या आधीच जेवण बनवलं होत. तोंडली-बटाटा भाजी, डाळ, पांढरा भात. आमच्याकडे उकडा तांदूळ असायचा. भूक लागलेली होती. जेवण उरकल्यानंतर सर्वांनी आराम केला. आम्हाला डोंबिवलीला पोचायचं होतं. अण्णा आजारी होते. कावीळ झाली होती त्यांना. आईसारखी म्हणायची 'आपण डोंबिवलीला कधी पोचणार?' चारच्या सुमारास श्रीधर अण्णांच्या घरुन चालत मुलुंड स्टेशनवर आलो. पहिल्यांदाच रेल्वे स्टेशन पाहात होतो. कोणीतरी तिकीट काढलं आणि आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर आलो. काही गाड्या उजव्याबाजूने तर काही डाव्याबाजूने जात होत्या. मला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात एक गाडी आली ताई म्हणाली, 'ही आपली गाडी नाही'. लोकं एकमेकांना ढकलत होते. जणू काही शर्यत लागली होती. उतरणारी माणसं पण घाई करत होती. लाऊडस्पीकरवरून हिंदी, इंग्लिश, मराठीमधे सूचना देत होते. मला काहीच समजंत नव्हतं. थोड्यावेळात दुसरी ट्रेन आली. ताईने ह्या गाडीमधे चढायला सांगितले. मी पटकन मधला खांब पकडून ट्रेनमधे चढलो. बाकीचे पण चढले, फक्त आईला उशीर झाला. ताईने तिला हात धरून चढविले. मग ती स्वतःपण चढली. पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास. ट्रेनमधली ती धक्का-बुक्की.. एकमेकांशी बोलण्याचा आवाज.. ट्रेनच्या पटरीचा आवाज.. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. आम्ही सर्व एका बाजूला उभे होतो. आतमधे बरीच लोकं बसलेली होती. तेवढ्यात काही लोकं आम्हाला धक्का देऊन बाहेर यायला लागली.. कुठलं तरी स्टेशन आलं होतं.. काही लोक उतरली.. काही चढली.. गर्दी अजून वाढली होती. पुढचं स्टेशन आलं. बरेचसे लोक उतरले. तेवढ्यात एक संत्रा विकणारा ट्रेनमधे चढला. लोकं त्याच्याकडून संत्री विकत घेत होते. गाडी पुढे जात होती. आई खाली बसली तेवढ्यात मागची लोकं ओरडायला लागली. काही मराठीत तर काही हिंदी बोलत होते. ताईने आईला उठवलं.. उठून उभे राहायला सांगितलं. पुढचं स्टेशन आलं. कमी लोकं उतरली. ताई म्हणाली, 'पुढच्या स्टेशनवर आपल्याला उतरायचं आहे'. गाडी स्टेशनवर अाली तशी लोकं मागून धक्का मारायला लागले. कसंबसं आम्ही सर्वजण आपापल्या बॅगा घेऊन खाली उतरलो.

                               "हे माझं पहिलं पाऊल होतं डोंबिवली स्टेशनवर दि. २७ मे १९७७!"



18 comments:

  1. लिखते रहो भाई, सुंदर

    ReplyDelete
  2. डोंबिवलीच्या चांद्रभूमीवर आर्मस्ट्राँगचे (बाहुबलीचे) पहीले पाऊल कधी पडले त्याची तारीख, वर्ष दिले असते तर चांगले झाले असते. बारी लेख चांगला.

    ReplyDelete
    Replies
    1. २७ मे १९७७, धन्यवाद.

      Delete
  3. जन्म भूमीला सोडून कर्मभूमीत पदापर्ण हा प्रवास अतिशय उत्तम रितीने वर्णन केला आहे. लिखाण छान

    ReplyDelete
  4. प्रवासाचे धावते वर्णन डोळ्यापुढे तंतोतंत उभे राहिले.खूप छान वाटले.

    ReplyDelete
  5. वा,सर आज तुम्ही मला पण पहिल्या ट्रेन ची सफर घडवली,
    खूप छान वर्णन.
    आठवणी लिहित रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. जरूर लिहीत राहणार, धन्यवाद.

      Delete
  6. तुमचा सगळा प्रवास डोळ्यासमोर ऊभा राहिला वाचनालयांपर्यंत कसे आलात हे हि वाचायला आवडेल मागचेहि ब्लॉग पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. https://paikaka.blogspot.com/
      हा वरचा Link उघडून पहा तुम्हाला मागचे सर्व ब्लॉग वाचायला मिळतील.
      आणि मी पुढे हि लिहीत राहणार.... धन्यवाद.

      Delete
  7. अनुभव छान जिवंत केलात काका

    ReplyDelete
  8. काय सुंदर लिहीता हो सर तुम्ही मरवंते बीच छान आहे अजूनही तो बीच तसाच आहे का काळाच्या ओघात बरेच काही बदलत असते

    ReplyDelete
    Replies
    1. मरवंते बीच अजूनही तसाच पर्यटनासाठी सुंदर स्थळ आहे.

      Delete