Friday, April 24, 2020

डोंबिवलीत टिळकनगर येथे 'फ्रेंड्स स्टोअर्स'ची स्थापना.

माणसं नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात गावं सोडून शहरात येतात. या शोधात काही माणसं त्यांना मदत करतात. त्यांच्या मदतीमुळे यश मिळतं आणि ते जीवनात स्थिर होतात.
आमचंही असंच झालं. अण्णा कुंदापूर सोडून मुंबईत आले.. कामालाही लागले!! हे सर्व एका माणसामुळे.. "श्रीधर अण्णा"!! होय, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त श्रीधर अण्णांमुळेच!! हे आम्ही कधीच विसरू शकत नाही! आमचं आणि त्यांचं काहीच नातं नव्हतं, फक्त गावं एक होतं 'कुंदापूर'!! सुरुवातीला श्रीधर अण्णा मुंबईत आले होते ते फोर्टमध्ये V.T. स्टेशनच्या बाहेर कॅपिटल सिनेमागृहात तिकिट देण्याचे काम संभाळत होते. त्यांनी आपले भाऊ-बहीण सर्वांना मुंबईत आणलं होतं. मुलुंडच्या एका छोट्या घरात ते राहायचे.
त्यांनीच अण्णांना मुंबईला आणलं, राहायला घर, नोकरी मिळवून दिली. हल्लीच्या काळात अशी माणसं मिळणं कठीण!!
अण्णांची मेहनत, गरीबी काय असते? हे आम्ही जवळून बघितलं होतं. सहा लोकांचं पोट त्यांच्या कमाईवर अवलंबून होतं. कुठलंही काम करायची तयारी अण्णांची होती. पुस्तकाच्या दुकानात काम केल्यामुळे पुस्तकांचा अनुभव होताच त्यासोबत मुंबईतल्या बऱ्याच घाऊक पुस्तक विक्रेत्यांशी चांगले संबंध होते. अण्णा स्वतः जाऊन घाऊक विक्रेत्यांकडून पुस्तकं आणायचे. एका वेळी दोन-दोन मोठ्या कापडी पिशवीतून पुस्तके भरून ट्रेनमधून घेऊन यायचे.

वडिलांपासून व्यवसाय हा आमच्या रक्तातच होता! अण्णा जिथे कामाला होते, त्या 'भारत बुक डेपो'मधे त्यांचं थोडंसं बिनसलं होतं. अण्णा सरळ स्वभावाचे होते. स्वतःच पुस्तकांचं दुकान टाकायचं असं अण्णांनी ठरवलं. आम्ही ज्या इमारतीत राहायचो त्याच शिवप्रसाद बिल्डिंगमधे एक दुकान भाड्याने देणं होतं. अण्णांनी चौकशी केली. पूर्वी "आगे दुकान पिछे मकान" असे. समोर दुकान आणि मागे मालक राहायचे. आमच्या इमारतीत एक चपलांचं दुकान होतं. मालक मागे राहत होते. त्यांना फक्त दुकान भाड्याने द्यायचं होतं. तीन हजार रुपये डिपॉझिट आणि दोनशे रुपये भाडं. तेवढे पैसे नव्हते. अण्णांच्या एक मित्राने पार्टनरशिपची ऑफर दिली. पण अण्णांना ते नको होतं. चांगली संधी चालून आली होती. पैसे जमवायला सुरुवात केली. बऱ्याचश्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी मदत केली. त्यातून डिपॉझिटचे पैसे जमले. सर्व मित्रांनी मदत केली होती म्हणून अण्णांनी दुकानाचं नावं "फ्रेंड्स स्टोअर्स" ठेवायचं ठरवलं. श्रीधर अण्णा आणि अण्णांनी मिळून कागदपत्रे तयार केलीे आणि मालकाला तीन हजार रुपये रोख दिले. त्याने दुकानातले चपलांचे सामान काढून दुकान मोकळे केले त्याच बरोबर त्यांनी एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे त्यांच्याकडचे लाकडी कपाट आम्हाला दिले. ज्याच्यामुळे आमचा थोडा खर्च वाचला. आता पुस्तकं आणि इतर सामान लागणार होते. मुंबईतले एक घाऊक विक्रेते 'धनलाल ब्रदर्स'च्या "बाबूभाईं'नी विक्री झाली तर पैसे!! या तत्वावर 'नवनीत प्रकाशन'ची पुस्तके दिली. एका विक्रेत्याने वह्या दिल्या. अण्णाने शाईचे पेन, बॉलपेन, रिफिल, पाटी, पेन्सिल, खोड रबर, पॅड, कंपास बॉक्स, फूटपट्टी, गोटी पेपर, फुलस्केप पेपर, रंगीत पेपर, खडू, चेंडू, तसेच काही प्रमाणांत व्यापार, चेस, लुडो, गोट्या, वगैरे खेळणी जमवली. पार्ले आणि रावळगावची चॉकलेटस् मागवली. चॉकलेटसाठी बरण्या आणि समोर एक टेबल आणलं. आता तारीख ठरवायची होती. अकरा तारखेला दसरा होता, मुहूर्त बघायची गरज नव्हती. मग तारीख ठरली. बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर १९७८  रोजी सुरुवात करायची. दुकानाच्या एका बाजूला 'किरण हेअर कटिंग सलून', दुसऱ्या बाजूला 'लक्ष्मी पॉवर लॉण्ड्री' आणि इमारतीत मनसुखलाल हिरजी शाह यांचं किराण्याचं दुकान, श्रीकृष्ण दुग्धालय, दिलीप मेन्स वेअर, जय कानिफनाथ रसवंती गृह आणि एक छोटंसं हॉटेल होतं. तेव्हा आम्हाला छोटाच उदघाटन समारंभ करायचा होता. कोणाला बोलावून त्यांच्या हस्ते उदघाटन करण्याइतकं मोठं दुकान नव्हतं. तेवढा पैसा खर्च करण्याची ताकदही नव्हती. दसऱ्याचा दिवस होता. चांगल्या मुहूर्तावर सकाळी नऊच्या सुमारास आराध्य दैवत 'गणपती'च्या फोटोची पूजा करून "फ्रेंड्स स्टोअर्स" दुकानाचा उदघाटन समारंभ पार पडला. अण्णाचे मित्र, इमारतीतले काहीजण, आजूबाजूचे दुकानदार असे बरेचसे लोक जमले होते. त्यातल्या काही लोकांनी सामान खरेदी पण केली. बरं झालं टिळकनगरला पुस्तकांचं दुकान नव्हतं.. आम्हाला खूप जवळ पडेल.. समोर टिळकनगर शाळापण आहे.. इकडे चांगला प्रतिसाद मिळेल तुम्हाला.. वगैरे लोकं बोलू लागले. त्याकाळी डोंबिवलीत फडके रोडवर गद्रे बंधू, मानपाडा रोडवर बागडे स्टोअर, मॅजेस्टिक स्टोअर, भारतीय स्टोअर अशी खूप मोठी दुकान होती. त्याकाळी, टिळकनगर हा राजेंद्र प्रसाद रोडवरील थोडासा आतील भाग वाटायचा. आधीपासूनच गद्रे आणि बागडेमधे पुस्तकं जास्त प्रमाणात खपायची. लोकांची गर्दीही खूप असायची. अण्णाकडे अनुभव होता, जिद्द होती, मेहनत करायची तयारीही होती. अण्णांबरोबर आम्ही सर्वजण होतोच. आमचं सर्वांचं भविष्य 'फ्रेंड्स स्टोअर्स'वर अवलंबून होतं. उदघाटनाच्या दिवशीच टिळकनगरमधील रहिवाश्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. समोरच्या मानस, गुंजन, गुलमोहर, अर्चना रजत मेघदूत राधानिवास मंजुनाथ आणि इतर सोसायटी, बाजूच्या काकी स्मृती, वृंदावन,राजहंस मधून लोकं अाली होती. गुलमोहोर सोसायटीमधून श्रीरंग तुळपुळेच्या आईने पहिली खरेदी केली होती. पेन, पेन्सिल, वह्या असं बरचसं सामान त्यांनी घेतलं होतं. त्यादिवसापासून त्या रोज दुकानात यायच्या अण्णांना त्या भाऊ मानायला लागल्या होत्या. कालांतराने 'फ्रेंड्स स्टोअर्स' टिळकनगर आणि डोंबिवलीतल्या रहिवासीयांना परिचित झाले.

18 comments:

  1. फ्रेन्डस पुस्तकाचे दुकान याविषयी माहिती मिळाली. आण्णांचे कष्ट, मेहनत त्याला माझा नमस्कार. आजही दुकानातून वस्तू आणल्या जातात

    ReplyDelete
  2. वा,वा,सर ह्या निमित्ताने माझ्या मनातील एक गोष्ट आपसूक समजली, ति म्हणजे वाचनालयाला फ्रेंन्ड नाव का?

    ReplyDelete
    Replies
    1. हो, मित्रांच्या सहकार्यामुळेच फ्रेंड्स हे नांव ठेवण्यात आलं.

      Delete
  3. तुम्हा सर्व पै बंधूंची धावपळ,व्यवसायावरील निष्ठा हे बघतच आम्ही लहानाचे मोठे झालो.व्यवसायात एवढी वर्ष काढल्यावर सुद्धा आपणात असलेला विनय अनुकरणीय आहे.

    ReplyDelete
  4. आमची शाळा टिळकनगर आणि 78 ते 82 मी शाळेत होत मला चांगलं आठवतंय की फ्रेंड्स स्टोर मधून आम्ही आवळा सुपारी पेंस पेन्सिल रबर घेत होतो. त्यावेळी सुद्धा पै अण्णा लहानमुलांशी छान बोलायचे जावसं वाटायचं

    ReplyDelete
  5. फ्रेंड्स स्टोअर्स डोळ्यासमोर उभे राहिले
    छान वाटलं वाचून.

    ReplyDelete
  6. सर, तुमच्या दुकानाचं फ्रेण्डस् नांव का ठेवलं ते कळल्यावर तुमच्या भावाबद्दल खूप कौतुक वाटलं... तुम्ही पण अशीच माणसं जोडली आहेत.

    ReplyDelete
  7. टिळकनगर मधील landmark बद्दल वाचायला मिळालं. सुंदर !!

    ReplyDelete
  8. Very good article !!
    I still clearly remember when the name ' friends stores' was being written in red colour as me and my friend were watching it being painted. We kids were fascinated because of the very different and attractive style of the alphabet ' F ' of the word friends.
    Since that day we have been happy customers of the store and yes, Tilak Nagar was blessed due to this store!!
    Thanks pundalik Mitra for the history of everyone's favourite shop !!

    ReplyDelete