Wednesday, April 22, 2020

अंधेरी via पवई lake आणि सिनेमाचे चित्रीकरण चालू असताना भेटलेले नट !!

मला डोंबिवली भावली होती. कुंदापूरप्रमाणे इथेही चांगले मित्र जमवले. इमारतीत सर्वजण ओळखायला लागले. अण्णा आणि ताईच्या लग्नानंतर अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागलो. सातवीची परीक्षा दिली. सातवीत मला सातशे पैकी चारशे सत्तर गुण मिळाले!! मी वर्गात दहावा आलो होतो!! सुट्टी लागली होती. सुट्टीत, मला आणि आईला अंधेरीच्या वेंकटेश मामाकडे जायची संधी मिळाली. मामांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. आम्हाला सोडायला वेंकटेश अण्णा येण्याचं ठरलं. तो घाटकोपरला झुनझूनवाला कॉलेजला जायचा. रविवारची सुट्टी होती.

रविवारी सकाळी डोंबिवलीहून ट्रेनने मुलुंडला पोचलो. मुलुंड पश्चिमेला अंधेरीसाठी बस मिळायची. मुलुंड पश्चिमेला स्टेशनजवळच अंधेरी बसस्टॉप होता. आम्ही बसस्टॉपवर पोचताच बस आली. रांगेत उभे राहून बसमधे चढलो. भावाने तीन तिकिटं काढली. नेहमीप्रमाणे मी खिडकी जवळची सीट पकडली. बस निघाली. भाऊ ह्याच्या आधी एक दोन वेळा अंधेरीला मामांच्या घरी जाऊन आल्यामुळे मला सर्व दाखवत होता. बस पाच रस्ता क्रॉस करून पुढे निघाली. डाव्या बाजूला मोठी कंपनी होती. बाहेर खूप मोठी बाग होती. हिरवळीवर त्या कंपनीचं नाव रेखाटलं होतं.. Johnson & Johnson. हिरवं गवत, त्यामध्ये कंपनीचं नावं मी बघतच राहिलो!! भाऊ सर्व मला दाखवत होता. आई मागच्या सीटवर बसली होती. आता बस डोंगरावर चढत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं होती. उजव्या बाजूला तलाव दिसत होता. तळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. पाण्यात कमळ फुललं होतं. दृश्य बघण्यासारखं होतं. तेवढ्यात सर्व लोक बाहेर बघायला लागले.. टाळ्या वाजवायला लागले!! बघतो तर मोर नाचत होता. आयुष्यात पहिल्यांदा असं दृश्य बघायला मिळालं. पुढे बऱ्याच कंपन्या होत्या. थोड्यावेळाने अंधेरी बसस्थानकावर उतरलो. आम्हाला अंधेरीत सात बंगला भागात जायचं होतं. अंधेरी पश्चिमेला थोडं चालल्यावर वर्सोवा बसस्थानकावरून बस पकडली. सात बंगला स्थानकावर उतरलो. समोरच मोठमोठ्या इमारती होत्या. गेटजवळ आलो तर वॉचमनने अडवलं.. "कुठून आलात.. कुणाकडे चाललात?" भावाने सांगितलं की, "आम्ही डोंबिवलीहून आलो आहे.. व्ही. एल. प्रभूंकडे जायचंय". त्यांनी लगेच आत सोडलं. समोरचीच इमारत होती. सातव्या मजल्यावर मामाचं घर होतं. लिफ्टचं दार उघडलं.. मी, आई, भाऊ आत गेलो. भावाने लिफ्टचं दार बंद केलं. सात नंबरचं बटन दाबलं आणि लिफ्ट वर जायला लागली. मी लिफ्टचा पहिल्यांदाच अनुभव घेत होतो. लिफ्ट वर जाताना कोणीतरी उचलल्यासारखं वाटत होतं. मनांत वेगवेगळे विचार यायला लागले होते. समजा लिफ्ट मधेच बंद पडली तर.. शेवटी आम्ही पोचलो एकदाचे.. सातव्या मजल्यावर! लिफ्टचं दार उघडून बाहेर पडलो. भावाने लिफ्टचा दरवाजा बंद केला. समोरच मामाचं घर होतं.. मोठं दार.. दारावर इंग्लिशमधे व्ही. एल. प्रभू लिहीलं होतं. बेल वाजवली.. मावशीच्या मुलीने चंद्रकला आक्काने दार उघडलं. मला बघून घट्ट पकडलं. तेवढ्यात मावशी, दादा, छोटी ताई, मामी सर्व बाहेर आले आणि आम्हाला आत घेऊन गेले. माझ्या आजीची बहीण (रमा पाची), मावशी, तिचा मुलगा, आमचा मामा वेंकटेश प्रभू. आम्ही त्यांना वेंकटेशमामा म्हणायचो. त्यांचा टेलिफोन इंटरकॉमचा बिझिनेस होता. 'सुप्रीम टेलिकम्युनिकेशन्स' हे त्यांच्या कंपनीचं नाव होतं. त्यांनी कुंदापूर सोडून मुंबईला येऊन शिक्षण पूर्ण करून स्वतःचा बिझिनेस सुरू केला होता. त्यांचं खूप नाव होतं. त्यांच्या मुलाचा 'विनीत'चा पहिला वाढदिवस होता. आम्ही चार दिवस आधीच पोचलो होतो. घर मोठं होतं. घरात टीव्ही, फ्रीज, प्रत्येक रूममधे टेलिफोन होता. आठ दिवस मजेत जाणार होते. खाण्यापिण्यात आणि घर बघण्यातच पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी आणि दिनेश दादा (मावशीच्या मुलीचा मुलगा), लहानपणापासून त्यांच्याकडेच मोठा झाला होता; आम्ही दोघं बस पकडून अंधेरी स्टेशनला गेलो. भाजी, फळं, आणि इतर सामान घेऊन आलो. सकाळी अकराच्या सुमारास दिनेशदादा आतून केळी घेऊन आला. आमच्या दोघांत पैज लागली! कोण जास्त केळी खातोय? मी त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान, तरी मी हो बोललो. छोटी छोटी केळं होती. खायला सुरुवात केली. मी पाच सहा केळं खाल्ली.. त्याने माझ्यापेक्षा दोन केळी जास्त खाल्ली.. त्याने पैज जिंकली !!! दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इमारतीच्या बाहेर पडलो तर समोर रस्त्यावर चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. बसस्टॉपवरून बस निघताना चोर एका माणसाचा खिसा कापून पर्स चोरी करतो.. एवढाच सीन होता, कमीतकमी दहाएक वेळा सारखं हेच सुरू होतं. शेवटी शूटिंग संपतं आणि दोन जण गेट समोरच्या खुर्च्यांवर येऊन बसतात. दादा म्हणाला, "हे जे शूटिंग चालू आहेना ते, 'दो लडके दोनो कडके' चित्रपटाचे आहे. आणि समोर जे येऊन बसलेत ना त्यात एक हिरो 'अमोल पालेकर' आणि दुसरा 'असराणी' आहे". मला कुठे माहित होतं.. मी त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नव्हता. तेवढ्यात दादा बोलला थांब. मी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतो!! मला खरं वाटत नव्हतं. जास्त गर्दी नव्हती तरी पण काही लोक त्यांच्या अवतीभवती जमा झाले होते. दादा त्यांच्याजवळ गेला आणि अमोल पालेकर यांच्याशी गप्पा मारायला लागला. दादाला चांगलं इंग्लिश बोलता येत होतं. त्याचं हिंदी बोलणं पण चांगलं होतं. कुठल्याही फिल्मस्टार समोर उभं राहणं.. त्यांच्याशी गप्पा मारताना बघणं.. सर्व माझ्यासाठी पहिल्यांदा होत होतं. ज्याचा वाढदिवस होता तो मामांचा मुलगा 'विनीत' दिसायला सुंदर होता. गोल हसरा चेहरा.. तब्येतीने चांगला होता. मी आणि दादा त्याला खेळायला घेऊन जायचो. वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी इमारतीच्या व्हरांड्यात संगीताचा-ऑर्केस्ट्राचा खूप मोठा कार्यक्रम होता. एका म्युझिक कंपनीला बोलावलं होतं. हिंदी-मराठी चित्रपटातील गाणी, जोक्स, वगैरे. कार्यक्रम संपल्यावर बुफे जेवण होतं. ताट घेऊन रांगेत उभे राहून स्वतः पाहिजे ते वाढून घ्यायचं!! जेवण झाल्यावर आईसक्रीम! वाढदिवस झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी आणि आई डोंबिवलीला निघालो आम्हाला घ्यायला भाऊ आला होता. अंधेरी आणि डोंबिवलीच्या राहाणीमानामधे खूपच अंतर होतं.

14 comments:

  1. सगळा प्रवास आणि शहरी वातावरण याचे वर्णन सविस्तर केले.वाढदिवसाचे वातावरण निर्मिती छान वाटते तसेच प्रत्यक्ष भेटलेले कलाकार फारच छान

    ReplyDelete
  2. दृश्यात्मक वर्णन करण्याची आपली हातोटी लाजवाब आहे.
    नकळत सगळे डोळ्यासमोर येते.अतिसुंदर! छायाचित्र देखील समर्पक

    ReplyDelete
  3. तुमच्या स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे. छोट्या छोट्या प्रसंगाचं उत्तम वर्णन,त्यातले बारकावे छान लिहिताय!

    ReplyDelete
  4. प्रसन्न आठवलेApril 22, 2020 at 8:20 PM

    खूप विस्ताराने वर्णन केल्यामुळे तुमच्या सोबतच फिरतो।आहोत असं वाटलं, त्यामुळे सर्व घटना प्रत्यक्ष समोर घडत आहेत असच वाटतं. वर्णन करण्याची स्टाईल खूप छान आहे. आवडलं

    ReplyDelete
  5. very nice sir, after your reading post i seen this picture when i was in young age. thanku

    ReplyDelete
  6. अनुभव छान प्रकारे रंगवलात तुम्ही !!

    ReplyDelete
  7. खूपच जिवंत वर्णन आह !

    ReplyDelete