Thursday, April 30, 2020

आठ इडली आणि शेजारच्या बरोबर "हाजी मलंग गड" सहल ....

(1979) मी आठवीची परीक्षा दिली होती. गणित हा माझा सर्वात आवडता विषय होता. त्यातल्या त्यात भूमितीपेक्षा बीजगणित. मी गणितातले प्रश्न फटाफट सोडवायचो. कुठलाही क्लास लावला नव्हता. क्लासची फी परवडत नव्हती. आमच्या मजल्यावर विश्वेकर राहायचे. ते मराठी शिकवायचे. ताई म्हणाली होती की पुंडाला मराठी क्लास लावूया. पण मी नको म्हणायचो. त्यांचं मराठी मला जमत नव्हतं. शाळेत जे शिकवायचे ते मी लक्ष देऊन ऐकायचो, घरी येऊन पाठ करायचो. मी चांगली तयारी करून आठवीची परीक्षा दिली. एप्रिल मध्ये निकाल लागला. आठवीत मी वर्गात सातवा आलो होतो. तसं घरी कोणाला माझ्या अभ्यासाची चिंता नव्हती. मे महिना सुट्टीचा होता. बरेचसे मित्र गावाला गेले होते. माझ्याबरोबर खेळायला कोणी नव्हतं. एका दिवशी बाजूच्या जया बेन यांनी विचारलं, "पुंडा हमारे साथ पिकनिक चलोगे क्या?" मी म्हटलं, "कोण कोण येतंय? मला घरी विचारावं लागेल." ते बोलले विचार. आमच्या घरचे आणि मुन्नाच्या घरचे सर्वजणं जाणार आहोत. मी घरी आईला आणि अण्णांना विचारलं, 'मी जाऊ का जयाबेन बरोबर पिकनिकला?' अण्णाने परवानगी दिली बाजूच्या दोघांनीही सर्व तयारी केली होती. कसं जायचं, किती वाजता निघायचं सर्व ठरलं. माझा मित्र मुन्ना, रुपेश आणि हीना पण येणार होते. पहिल्यांदा मी एकटा पिकनिकला जाणार होतो. माझ्या बरोबर घरातले कोणीच नव्हते. पिकनिकचं ठरल्यावर दोन दिवस आम्ही सर्व त्यावरच चर्चा करत होतो. तिकडे मोठा डोंगर आहे माकडं आहेत. मोठं मोठी झाडं आहेत वगैरे. मी झोपेत पण तेच विचार करत होतो. आईने आधीच सांगितलं होतं, तू एकटा जातो आहेस, तिकडे मस्ती करायची नाही, झाडावर चढायचं नाही. मी सर्व मान्य केलं. मला कधी एकदा पिकनिकला निघतो असं झालं होतं. सोमवारचा दिवस होता. पहाटे सातच्या ट्रेन ने कल्याणला जायचं होतं. जयाबेन आणि मुन्नाची ताई हीनाने सर्व तयारी केली होती. ढोकळा, पुरी, भाजी, मोरब्बा, खाखरा, भेळसाठी पुरी फरसाण, खारे शेंगदाणे, खारे चणे, असे भरपूर पदार्थ घेतले होते. मला आई आणि वहिनीने आठ इडल्या शाळेच्या डब्यात घालून दिल्या होत्या. चटणी खराब होणार म्हणून थोडंसं लोणचं दिलं होतं. मी माझा डबा जयाबेनकडे दिला. माझ्याकडे काहीच नव्हतं. सर्व पैसे मुन्नाची आई जयाबेनच करणार होती. तसं आमची तिन्ही घरं एका परिवारासारखीचं होती


ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण सातच्या सुमारास घर सोडलं. चालत डोंबिवली स्टेशनला पोचलो. सोमवार असल्यामुळे स्टेशनला कामावर जाणाऱ्यांची गर्दी होती. रमेशभाई आणि हर्षदभाईंनी आमच्या सर्वांचं तिकीट काढलं. नऊ फुल आणि दोन हाफ. रूपा आणि प्रकाश लहान होते. सर्वजण ब्रिज चढून एक नंबर प्लॅटफॉर्मवर पोचलो. मी पहिल्यांदा कल्याणच्या दिशेने जाणार होतो. थोड्या वेळात कल्याण लोकल आली. आम्ही सर्व ट्रेन पकडून आत जाऊन बसलो. एरवी मी नेहमी शाळेत जाताना ट्रेनमधे दारावर उभा राहायचो. कल्याण लोकल असल्यामुळे रिकामी होती. ठाकुर्ली नंतर कल्याण स्टेशन आलं. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला खूप घाण होती. आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर उतरलो. स्टेशनच्या बाहेरुन दोन टांगा केल्या. तेव्हा कल्याण पश्चिमेला रस्त्याचं काम सुरू होतं. मुन्नाच्या नातेवाईकांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला आंब्याचं सरबत दिलं. सरबत पिऊन त्याच्या घरचे दोघे आणि आम्ही अकरा असे तेरा जण. तीन टांगा केल्या आणि 'हाजी मलंग'साठी निघालो.

कल्याण शहर सोडून थोडं पुढे गेलो. रस्स्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ होती. काही जण शेतीपण करीत होते. समोर मोठे डोंगर दिसायला लागले. डोंगर आभाळाला टेकले होते. मोठमोठी झाडं दिसायला लागली. दुपारचे अकरा वाजले असतील, डोक्यावर रणरणीत ऊन होतं. गरम हवा चेहऱ्याला स्पर्श करत होती. एवढं ऊन असून घाम मात्र येत नव्हता. रस्त्यावरून टांगा जातानाचा तो आवाज मस्त वाटत होता. थोड्याच वेळात आम्ही 'हाजी मलंग'च्या पायथ्याशी पोचलो. रमेशभाईंनी दोन्ही टांग्यांचे पैसे चुकते केले.

आम्ही जिथे उतरलो तिथे समोर काही दुकानं आणि हॉटेलं होती. जाणारे येणारे लोक तिकडे विश्रांती घेत होते. तिकडे खायला प्यायलाही मिळत होतं. आम्ही सर्वांनी एका दुकानातून थंड सरबत घेतलं. जयाबेनने हर्षदभाईंना दोन डझन केळी घ्यायला सांगितली. आम्ही सर्वांनी डोंगर चढायला सुरुवात केली. भरपूर पायऱ्या होत्या. आजूबाजूला झाडी असल्यामुळे थंड वातावरण होतं. थोडं पुढे पायऱ्या चढल्यावर काही माकडं झाडावरून खाली उतरताना दिसली. तेव्हा मला समजलं जयाबेनने केळी का घेतली ते. आम्ही त्या माकडांना केळी दिली. काही माकडं हातातून केळी घेऊन गेली. आमच्या सारखे अजून बरेचसे लोक होते. माकडं केळी खाताना मजा येत होती. पायऱ्या चढत थोडं पुढे गेलो, वाटेवर एक छोटंसं मंदिर लागलं. तिकडे पाया पडून परत पायऱ्या चढायला सुरुवात केली. खूप पायऱ्या होत्या, मी सरळ चढत होतो. बाकीच्यांना दम लागायला लागला. थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो. आजूबाजूचं दृश्य बघण्यासारखं होतं. थोड्या वेळात 'हाजी मलंग दर्गा' आला. आमच्यासारखे बरेच लोक होते. दर्ग्यामध्ये संपूर्ण शांतता होती. हिरव्या मखमली कापडाची आणि फुलांची सुंदर सजावट होती. तिकडे थोडावेळ थांबलो आणि सर्वजण पुढे निघालो. थोड्याच अंतरावर हिरव्यागार गवताने भरलेलं एक छोटंसं मैदान होतं. छोटी मोठी झाडं होती. सर्वांनी आपलं आणलेलं सामान खाली ठेवलं आणि थोडी विश्रांती घेतली. सर्वांना भूक लागली होती. हीना आणि दोन्ही जयाबेन भेळ बनवण्याच्या तयारीला लागल्या. सर्वजण जेवायला  बसलो. भरपूर जेवण आणल्यामुळे सर्वजणांना व्यवस्थित जेवण मिळालं. जेवण झाल्यावर खेळ खेळायला सुरुवात केली. गाण्यांच्या भेंड्यांपासून सुरुवात झाली. मग डोळ्यांना पट्टी बांधून पकडा पकडी, लंगडी, वगैरे. तसे खेळ आम्ही शिवप्रसादमधेही खेळायचो पण इकडची मजा वेगळीच होती. त्या मैदानातून समोर आजूबाजूचं दृश्य खूप छान दिसत होतं. चारही बाजूने डोंगराला आभाळ टेकल्यासारखं दिसत होतं. डोंगरावर फळा-फुलांची झाडं होती. मे महिना असल्याने फुलांच्या झाडांना रंगीबेरंगी फुलं आली होती. पक्ष्यांचा मधुर आवाज येत होता. आमचे खेळ संपेपर्यंत संध्याकाळचे चार वाजायला आले होते. रमेशभाई म्हणाले, 'आता आपल्याला निघायला हवं.. डोंबिवलीला आपण सहा-साडेसहापर्यंत पोचू'. काही वेळातच आम्ही उरलेलं सामान घेऊन निघालो. सर्वजण दमलेले होते. येतांना जो उत्साह चेहऱ्यावर होता तो नाहीसा झाला होता. खाली उतरताना परत ती माकडं दिसली. उरलेल्या वस्तू माकडांना दिल्या. अर्ध्या तासात आम्ही सर्व हाजी मलंगच्या पायथ्याशी आलो. तिकडच्या एका दुकानातून पक्ष्यांच्या चार-पाच रंगीबेरंगी टोप्या घेतल्या. त्याचबरोबर पिवळा, हिरवा, लाल रंग लावलेल्या दोन काठ्यासुद्धा घेतल्या. ती 'मलंग गड'ची निशाणी होती. ती काठी हातात आहे म्हटल्यावर ते 'मलंग गड'ला जाऊन आलेत, असं लोकं ओळखायचे!! परत टांगा करून कल्याणला आलो. तिकडून ट्रेनने डोंबिवली स्टेशनला उतरलो आणि चालत-चालत 'शिवप्रसाद बिल्डिंग' गाठली. पुढच्या आठवडाभर फक्त आणि फक्त "हाजी मलंगगड" हाच विषय होता.

Tuesday, April 28, 2020

शिवप्रसाद बिल्डिंग मधील क्रिकेट आणि लतिका टाईल्स मधील पेरू

(1978) शिवप्रसाद बिल्डिंगमधल्या सर्वांशी ओळख झाली होती. कुंदापूरपेक्षा जास्त मित्र जमवले होते. 'मुन्ना' माझा खास मित्र होता. शेजारी रमेशभाई पटेल, त्यांची बायको जया बेन, त्यांची मुलं जगदीश, रूपा आणि प्रकाश. 'रमेश भाई' स्टेशनजवळ कलर पेंट व हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते. दुसरे शेजारी हर्षदभाई शाह, त्यांची बायको जया बेन, त्यांची मुलं हीना, मुन्ना, रुपेश राहायचे. मुन्ना'चे वडील हर्षदभाई टेम्पो चालवायचे. बाकी इमारतीतले, संतोष ओक त्याचा भाऊ समीर. संतोषच्या वडिलांची मानपाडा रोडवर 'श्री टायपिंग इन्स्टिट्यूट' होती. ते टायपिंग आणि शॉर्टहॅन्ड शिकवायचे. अशोक मालदे, मनसुख, शशी पाटणकर, बंटी असे बरेचसे मित्र होते. आम्ही रविवारी क्रिकेट खेळायचो. इमारतीच्या दोन्ही बाजूला जागा होती. मला बॅटिंग जमत नव्हती, मी स्पिन बॉलिंग करायचो. एका बाजूला क्रिकेट खेळतांना चेंडू दूधवाल्याच्या घरात जायचा. 'रामलखन यादव' त्यांचं नाव होतं. त्यांचं समोर दुकान होतं, त्यामागे ते राहायचे. त्यांच्या घरात, ते दह्यासाठी दूध ठेवायचे. आम्ही क्रिकेट खेळतांना त्यांचं दार उघडं असलं की चेंडू नेमका दूधात पडायचा!! ते बाहेर येऊन ओरडायचे. कधी कधी आतून सूरी आणून चेंडू कापून फेकायचे. असे आमचे बरेचसे चेंडू त्यांनी कापले होते. त्यांचंपण नुकसान होत होतं.. आम्ही खेळणार तरी कुठे? एकदा आम्ही गंमत  करायची ठरवली!! नेहमी रबराच्या चेंडूने खेळायचो. त्यावेळेला आम्ही सिजनचा कडक चेंडू वापरायचं ठरवलं. खेळायला सुरुवात केली आणि चेंडू नेमका त्यांच्या घरात गेला. रामलखन चेंडू घेऊन बाहेर आले. रागाने सूरीने चेंडू कापायला लागले. चेंडू कडक होता, कापता येईना!! त्यांना जाम राग आला. तो चेंडू त्यांनी तसाच धरून मारला. कोणालातरी तो चेंडू जोरात लागला. मग आम्ही सर्वांनी तिकडून पळ काढला. त्यानंतर बरेचसे दिवस आमचं क्रिकेट खेळणं बंद होतं.

कुंदापूरमधे कन्नड शिक्षण आणि घरी कोंकणी बोलत असल्यामुळे मला फारसं मराठी बोलायला येत नव्हतं. मराठी बोलताना बरेचसे हिंदी, कोंकणी शब्द असायचे. सर्व मित्र मस्करी करायचे. मी, मुन्ना, संतोष, समीर, रुपेश 'काकी स्मृती'मधला बंटी असे बरेचसे मित्र एकत्र असायचो. मी झाडावर चढतो हे सर्वांनाच माहिती होतं. माझे कुंदापूरचे किस्से त्यांना माहीत होते. आमच्या बिल्डिंगच्यामागे टाटा पॉवर लेनच्या पलीकडे एक टाईल्सची कंपनी होती. 'लतिका टाईल्स' असं त्या कंपनीचं नाव होतं. त्या  कंपनीच्या जागेचे मालक बाजूच्याच इमारतीत राहायचे. 'लतिका टाईल्स' कंपनीचे मालक भांडुपला राहायचे. ते कधी कधी  सकाळी कंपनीत येऊन संध्याकाळी परत जायचे. 'पंडित' म्हणून एक कामगार दिवसभर तिकडे असायचा. त्याला आम्ही बाबू म्हणायचो. माझी छोटी ताई प्रेमक्का 'लतिका टाईल्स' कंपनीत अकाउंटंट म्हणून कामाला लागली होती. तिने बारावी कॉमर्स करून पुढचं अकाउंटस्'चं शिक्षण केलं होतं. अण्णांनी तिला जाड जाड शुक्ला अगरवाल, बाटलीबॉयसारखी  अकाउंटस्'ची पुस्तके आणून दिली होती. अकाउंटस्'मधे ती हुशार होती. ती रोज सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सहावाजेपर्यंत कंपनीत कामावर असायची. कंपनीत तिला रविवारी सुट्टी असायची. लतिका टाईल्स कंपनीचं सात-आठ जण बसू शकतील असं छोटसं ऑफिस होतं. बाहेर खूप मोठी जागा होती. वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स पाण्यात भिजवून ठेवलेल्या असायच्या. त्यांचा कारभार मोठा होता. टाईल्सच्या भरपूर ऑर्डर्स असायच्या. कंपनीच्या आजूबाजूला भरपूर झाडं होती. आंबा, फणस, चिकू, पेरु अशी मोठमोठी झाडं होती. मी आणि माझे मित्र कधी कधी प्रेमक्काला भेटायला कंपनीत जायचो. चिकूच्या झाडाला भरपूर चिकू असायचे आणि पेरूच्या झाडाला पेरू! फळं कोणी काढली नव्हती. माझे मित्र म्हणायचे, "पुंडा, तेरेकु झाड पे चढनेको आता है ना.. चल.. चढ के दिखा!!" मी म्हणायचो, "मार खायचा आहे का? ती आपली जागा नाही, ते आपल्याला ओळखंत नाहीत". प्रेमक्का नुकतीच कामाला लागली होती. मित्र मागेच लागले होते, आपण चिकू किंवा पेरू काढून खाऊया! मी म्हटलं, ठीक आहे.. आपण प्लॅन करूया. आधी बघितलं कुठल्या झाडांवर फळं आहेत. एकदा जाऊन निरीक्षण केलं. चिकूच्या झाडावर भरपूर चिकू होते.. पण ते कच्चे होते.. अजून कच्चे होते म्हणून काही उपयोग नव्हता.. काढून खाता येणार नव्हते. पेरुच्या झाडावर मस्त पेरू होते!! त्यात काही पेरू पिकायलापण आले होते. थोडे  पिवळे व्हायला आले होते. पेरू थोडेसे पिवळे झाले की खायला गोड असतात. म्हटलं पेरू काढले तर खाता येतील. रविवारी कंपनीचं ऑफिस बंद असायचं. पण तो बाबू असायचा. मग जेव्हा तो झोपतो तेव्हा दुपारच्या वेळेला जायचं ठरलं. त्यादिवशी माझ्या बरोबर कोण कोण होतं लक्षात येत नाही. रविवारी दुपारी आम्ही सगळे हळूच कंपनीचं गेट उघडून आत गेलो. बाबू गाढ झोपला होता. मी आत जाऊन पेरुचं झाड गाठलं. बाकीचे माझ्या मागे होते. सर्वांना आवाज करायचा नाही आणि शांत राहायला सांगितलं. मी झाडावर चढलो. पेरुचं झाड मजबूत असतं. बारीक फांदी जरी असली तरी ती सहज तुटत नाही. बऱ्याच फांद्या असल्यामुळे आरामात चढता येतं. तसंच उतरताही येतं. पेरुच्या फांद्या गुळगुळीत असतात. बरेच पेरू होते, त्यातल्या त्यात पिकलेले आणि लगेच खाता येतील असे पेरू तोडून खाली उभ्या असलेल्या मित्रांच्या हातात टाकत गेलो. खाली उभे असलेले मित्र हाताने कॅच पकडत होते. खाली पडले असते तर आवाजाने तो बाबू आला असता. अजून एक-दोन पेरू राहिले होते. त्यातला एक काढून खाली टाकायला गेलो तर खाली कोणीचं नव्हतं!.. पेरू पण नव्हते.. सर्व मित्रही पळाले होते.. मी घाबरलो.. काही तरी गडबड आहे!.. हातातला पेरू तिकडेच टाकला आणि झाडावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने सपकन खाली उतरलो. शेवटच्या फांदीवरून खाली उडी मारली. नशीब माझ्या हातात पेरू नव्हते. मी गेट उघडून बाहेर पडायच्या आधीच मागून कोणीतरी माझा शर्ट धरला. मागे वळून बघतो तर बाबू!! मी घाबरलो होतो.. त्यानी मला ओळखलं नाही. तो ओरडायला लागला. कंपनीत घुसून चोरी करतोस?.. काय काय काढलं सांग.. तुझे बाकीचे मित्र कुठे गेले सांग?.. मी घाबरलो.. मित्र पळाले होते. मी एकटाच पकडला गेलो. मग मी माझं अस्त्र वापरलं. ढसाढसा रडायला सुरुवात केली. माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून मी चढलो.. मी पेरू खाल्ला नाही.. तुमच्याकडे कामाला आहे ना.. त्या प्रेमक्काचा मी छोटा भाऊ आहे.. परत नाही करणार.. वगैरे. पण त्याने मला सोडलं नाही. बाजूच्या इमारतीत कंपनीच्या जागेचे मालक राहत होते. माझा कान पकडून त्यांच्या बिल्डिंगखाली घेऊन गेला. खालून त्यांना हाक मारली.. तसे ते बाहेर आले.. त्यांनी विचारलं काय झालं?.. बाबू बोलला, "ह्याने  पेरूच्या झाडावर चढून पेरू काढले आणि सर्व मित्रांना दिले. ह्याचे मित्र पळाले, हा फक्त माझ्या तावडीत सापडला". मालकाने मला विचारले काय केलं सांग.. मी बोललो.. मी कंपनीत काम करणाऱ्या प्रेमक्काचा भाऊ आहे. माझ्या बरोबर मित्र होते. मला झाडावर चढता येतं म्हणून मी सर्वांना पेरू काढून दिले पण ते पळाले. त्यांनी मला समजावून सांगितलं, असं नाही करायचं.. जर फळं काढायची असतील तर विचारलं पाहिजे.. परत असं करायचं नाही. मग बाबूला म्हणाले तो प्रेमाचा भाऊ आहे जाऊ दे त्याला. बाबूने माझा पकडलेला कान सोडला. बाबूने सोडताच मी पळत सरळ बिल्डिंगमध्ये आलो. सर्व मित्र लपून पेरू खात बसले होते. त्यांना विचारलं, 'मी तुम्हाला पेरू काढून दिले आणि तुम्ही मला एकट्याला सोडून पळून आलात? तसे ते बोलले, 'तुझी बहीण तिकडे कामाला आहे म्हणून तुला सोडलं. अाम्हाला पकडलं असतं तर बाबूने आम्हाला बेदम मारलं असतं!'

Sunday, April 26, 2020

आठवीत असताना (1978) शाळेतून आल्यावरचे कार्यक्रम आणि संघाच्या शाखेतील माणुसकीची "कोजागिरी''

मी नियमीतपणे शाळेत जायचो. कधी शाळेला दांडी मारली नाही. मला शाळेला जायला आवडायचं. शाळेतून घरी आल्यावर नियमितपणे  अभ्यास करायचो. घरी सर्व आपापल्या कामांत असायचे. मी काय करतो, अभ्यास करतो का नाही? कधीच कोणी विचारलं नाही. कोणाचंच लक्ष नसायचं. अभ्यास झाला की खेळायला मोकळा. कधी कधी भावाच्या मदतीला जायचो.

भाऊ पांडुरंगअण्णा मानपाडा रोडवर 'कामत पेन' विकायला बसायचा. अण्णांचे मित्र 'लक्ष्मण कामत' यांची पेन्सची कंपनी होती. सुरुवातीला रामनगर पोलीस स्टेशनच्या समोर फॅक्टरी होती. व्यवसाय वाढल्यावर त्यांनी फॅक्टरी उल्हासनगरला हलवली. मुंबई, सांगली, मिरज, कोल्हापूर अश्या बऱ्याच ठिकाणी कामत पेन्सचा खप होता. बरेच दुकानदार कामत पेन ठेवायचे. कमी किमतीचे, टिकाऊ आणि दिसायलाही सुंदर 'कामत पेन'. त्याकाळी बॉलपेनपेक्षा शाईचे पेन जास्त चालायचे. त्याबरोबर शाई, नीब-जीभ सुद्धा भरपूर प्रमाणात खपायची. मानपाडा रोडवर शिवाजी पुतळ्याच्या बाजूच्या फूटपाथवर खाली दोन रिकामे डबे त्यावर चौकोनी लाकूड ठेवून त्याच्यावर पेनांचे बॉक्स ठेवून माझा भाऊ पांडुरंगअण्णा पेन विकायला बसायचा. कधी कधी मी पण मदतीला जायचो. दिवसाला पाच ते दहा रुपयांचा गल्ला असायचा. यादरम्यान, मी पेन दुरुस्ती करायला शिकलो. आठ वाजता धंदा बंद करून घरी यायचो.

आठवीत असताना आमच्या इमारतीमधे फक्त तीन TV होते. आमच्या दुसऱ्या मजल्यावर अन्वेकर म्हणून राहायचे त्यांच्याकडे. दुसरा TV पहिल्या मजल्यावर आणि तिसरा TV तळमजल्यावर श्रुषा ताईकडे. दर रविवारी सिनेमा असायचा. पुढच्या रविवारचा चित्रपट आदल्या रविवारीच सांगायचे!! आम्ही रविवारची वाट बघत असायचो. चित्रपट बघून झाल्यावर सोमवारी, शाळेत त्याच चित्रपटावर चर्चा.. नायक कसा होता.. चित्रपटतील गाणी, मारामारी, कॉमेडी सीन्स, वगैरे चर्चा असायची. खूप मज्जा यायची. आमच्या दुसऱ्या मजल्यावर अन्वेकर राहायचे त्यांच्या घरी जो TV होता तो त्यांनी त्यांच्याकडच्या गोदरेज कपाटावर ठेवला होता. आम्ही खाली बसून TV बघतांना मान वर करून बघायला लागायचं. मान दुखली तरी TV कडे मन लावून बघायचो. मी त्यांच्या घरी रविवारचे पुष्कळ चित्रपट पाहिले. ते घरी नसले की पहिल्या मजल्यावर (त्यांचं नाव आठवत नाही). संध्याकाळी 'चार्ली चॅप्लिन'चे शो असायचे. मला खूप आवडायचा "चार्ली चॅप्लिन". तो, त्याची नायिका आणि जाडासा खलनायक!! हसून हसून पोट दुखायचे. पहिल्या मजल्यावरचे नसतील तर मग तळमजल्यावर श्रुषा ताईकडे जायचो. आधी  ताईचे वडील आहेत का ते बघायचो!! ते वकील होते. त्यांना मी घाबरायचो. मी श्रुषा ताईकडेपण पुष्कळ चित्रपट पाहिले.

आमची 'शिवप्रसाद बिल्डिंग' एका चाळी सारखी होती. हिंदी, मराठी, गुजराथी, मल्याळी, पंजाबी, कन्नड सर्वप्रांतीय लोक राहायचे. सर्व मध्यमवर्गीय होते. सर्वांची बोली, भाषा वेगळी, पोशाख वेगळा, जेवण खाणं वेगळं होतं. तरीही सर्व सण आम्ही एकत्रच साजरे करायचो. आमच्यामधे कधी पाण्यावरून तर कधी लहान मुलांवरून भांडणं होत होती. एवढं असून सुद्धा आम्हा मुलांना कधीही TV बघायला कोणीही नाही म्हटलं नाही. कोणीही अाम्हाला बघून दार लावलं नाही!! आम्हा मुलांना खाऊही मिळायचा!!!

"कोजागिरी पौर्णिमा"

मी कुंदापूरमधे असतांनाच संघाच्या शाखेत जायचो. मला शाखा खूप आवडायची. मी कितीही मस्ती करत असलो तरी शाखेत गेलो की तिकडची शिस्त पाळायचो. शाखेतील ती प्रार्थना "नमस्ते सदा वत्सले मातृभूमी" त्यानंतर सूर्यनमस्कार, विविध खेळ. यातून व्यायामही होत होता आणि मज्जा यायची. महिन्यातून एकदा पटांगणाची साफसफाईही करायचो. संघाची लायब्ररीपण होती. लायब्ररीमधे भारत-भारती प्रकाशनाची भारतातील थोर महापुरुषांवरील चरित्रांची छोटी छोटी पुस्तके असायची. त्यातले महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, तात्याटोपे, कित्तूरची राणी चेन्नमा, वीर सावरकर, महात्मा गांधी, वगैरे पुस्तकं मी वाचली होती. आमच्या घरचे सगळेच म्हणजे अण्णा, वेंकटेश भाऊ, पांडुरंग भाऊ आणि मी शाखेत जायचो. आईची शिकवण आणि शाखेतील शिस्तीमुळेच आमच्यावर चांगले संस्कार घडलेत!! कुठल्याही सामाजिक कार्यक्रमासाठी आम्ही पुढाकार घेतो. डोंबिवलीत आल्यावर आठवीपासून मी संघाच्या शाखेत जायला लागलो. टिळकनगर शाळेत 'चंद्रगुप्त शाखा' होती. लहान मुलांची, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आणि प्रौढांची. मला शाळेतून येतांना उशीर व्हायचा म्हणून मी फक्त शनिवार आणि रविवारी शाखेत जायचो. सूर्यनमस्कार, खो खो, कबड्डी, लंगडी, वगैरे खेळायचो. सर्व कपडे धुळीने मळलेले असायचे!! शाखेत गेलो होतो म्हटल्यावर आई आणि प्रेमक्का काहीच बोलायचे नाहीत. ते म्हणायचे, सांभाळून खेळ, कुठे धडपडू नकोस!! शाखेत बरेचसे मित्रही जमवले होते. 'गुंजन'मधला फणसाळकर, 'साफल्य'चा रेगे, अमोल फाटक वगैरे. त्यावर्षी शाखेत 'कोजागिरी पौर्णिमा' होती.. 'चांदण्याचा दिवस'. सर्वांना खाऊचे डबे आणायला सांगितले होते. त्यादिवशी संध्याकाळी आईला सांगितलं की डबा हवाय शाखेत आज कोजागिरी आहे बरीचशी मुलं डबा आणणार आहेत. संध्याकाळी आमच्याकडे खायला काहीच नव्हतं. वहिनी गावाला गेली होती. प्रेमक्का क्लासला गेली होती. आई म्हणाली जेवण बनवायला उशीर होणार. डबा तयार नव्हता. आता काय करायचं? दुकानात गेलो. दुकान उघडून काहीच दिवसंच झाले होते. अण्णा होते. त्यांना सांगितलं की मी शाखेत जातोय, तर ते जा बोलले.! अण्णांनी मला कधीच अडवलं नाही उलट तेच मला शाखेत जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. त्यांना कोजागिरीचं सांगितलं, "खायला डबा हवाय" असं म्हटल्याबरोबर त्यांनी पटकन, विचार न करता, काचेच्या बरणीतून बन्स काढून मला दिले. मी जाम खुष झालो!! माझ्या नेहमीच्या पद्धतीने एक पाय पुढे, एक पाय मागे अश्या उड्या मारत निघालो!!! टिळकनगर शाळा जवळच होती. शाखा सुरू झाली होती. प्रार्थना सुरू होती. थोडेसे खेळ खेळलो. थोड्यावेळात सर्वांनी आपापले डबे आणले. बारा ते पंधरा मुलं होती. आम्ही रिंगण करून बसलो. सर्वांनी वेगवेगळ्या भाज्या, पोळी, वगैरे आणले होते. मला थोडीसी लाज वाटत होती.  सर्वांनी चांगला खाऊ आणला होता. मी माझ्याकडचे बन्स काढले आणि एका  कागदावर ठेवले. मी म्हणालो, 'मी डबा आणला नाहीये.. माझ्याकडे फक्त बन्स आहेत', तसे सर्वजण बोलले 'काळजी करू नकोस, आम्ही डबे आणले आहेत'. मग आम्ही सर्वजण आपापसांत आणलेले पदार्थ वाटून घेतले. माझ्याकडचे बन्स घेऊन सर्वांनी मला भरपूर खायला दिलं!! माझे डोळे भरून आले. इथे जातपात, भेदभाव असं काहीच नव्हतं तर फक्त माणुसकी होती!!!

Friday, April 24, 2020

डोंबिवलीत टिळकनगर येथे 'फ्रेंड्स स्टोअर्स'ची स्थापना.

माणसं नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात गावं सोडून शहरात येतात. या शोधात काही माणसं त्यांना मदत करतात. त्यांच्या मदतीमुळे यश मिळतं आणि ते जीवनात स्थिर होतात.
आमचंही असंच झालं. अण्णा कुंदापूर सोडून मुंबईत आले.. कामालाही लागले!! हे सर्व एका माणसामुळे.. "श्रीधर अण्णा"!! होय, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त श्रीधर अण्णांमुळेच!! हे आम्ही कधीच विसरू शकत नाही! आमचं आणि त्यांचं काहीच नातं नव्हतं, फक्त गावं एक होतं 'कुंदापूर'!! सुरुवातीला श्रीधर अण्णा मुंबईत आले होते ते फोर्टमध्ये V.T. स्टेशनच्या बाहेर कॅपिटल सिनेमागृहात तिकिट देण्याचे काम संभाळत होते. त्यांनी आपले भाऊ-बहीण सर्वांना मुंबईत आणलं होतं. मुलुंडच्या एका छोट्या घरात ते राहायचे.
त्यांनीच अण्णांना मुंबईला आणलं, राहायला घर, नोकरी मिळवून दिली. हल्लीच्या काळात अशी माणसं मिळणं कठीण!!
अण्णांची मेहनत, गरीबी काय असते? हे आम्ही जवळून बघितलं होतं. सहा लोकांचं पोट त्यांच्या कमाईवर अवलंबून होतं. कुठलंही काम करायची तयारी अण्णांची होती. पुस्तकाच्या दुकानात काम केल्यामुळे पुस्तकांचा अनुभव होताच त्यासोबत मुंबईतल्या बऱ्याच घाऊक पुस्तक विक्रेत्यांशी चांगले संबंध होते. अण्णा स्वतः जाऊन घाऊक विक्रेत्यांकडून पुस्तकं आणायचे. एका वेळी दोन-दोन मोठ्या कापडी पिशवीतून पुस्तके भरून ट्रेनमधून घेऊन यायचे.

वडिलांपासून व्यवसाय हा आमच्या रक्तातच होता! अण्णा जिथे कामाला होते, त्या 'भारत बुक डेपो'मधे त्यांचं थोडंसं बिनसलं होतं. अण्णा सरळ स्वभावाचे होते. स्वतःच पुस्तकांचं दुकान टाकायचं असं अण्णांनी ठरवलं. आम्ही ज्या इमारतीत राहायचो त्याच शिवप्रसाद बिल्डिंगमधे एक दुकान भाड्याने देणं होतं. अण्णांनी चौकशी केली. पूर्वी "आगे दुकान पिछे मकान" असे. समोर दुकान आणि मागे मालक राहायचे. आमच्या इमारतीत एक चपलांचं दुकान होतं. मालक मागे राहत होते. त्यांना फक्त दुकान भाड्याने द्यायचं होतं. तीन हजार रुपये डिपॉझिट आणि दोनशे रुपये भाडं. तेवढे पैसे नव्हते. अण्णांच्या एक मित्राने पार्टनरशिपची ऑफर दिली. पण अण्णांना ते नको होतं. चांगली संधी चालून आली होती. पैसे जमवायला सुरुवात केली. बऱ्याचश्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी मदत केली. त्यातून डिपॉझिटचे पैसे जमले. सर्व मित्रांनी मदत केली होती म्हणून अण्णांनी दुकानाचं नावं "फ्रेंड्स स्टोअर्स" ठेवायचं ठरवलं. श्रीधर अण्णा आणि अण्णांनी मिळून कागदपत्रे तयार केलीे आणि मालकाला तीन हजार रुपये रोख दिले. त्याने दुकानातले चपलांचे सामान काढून दुकान मोकळे केले त्याच बरोबर त्यांनी एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे त्यांच्याकडचे लाकडी कपाट आम्हाला दिले. ज्याच्यामुळे आमचा थोडा खर्च वाचला. आता पुस्तकं आणि इतर सामान लागणार होते. मुंबईतले एक घाऊक विक्रेते 'धनलाल ब्रदर्स'च्या "बाबूभाईं'नी विक्री झाली तर पैसे!! या तत्वावर 'नवनीत प्रकाशन'ची पुस्तके दिली. एका विक्रेत्याने वह्या दिल्या. अण्णाने शाईचे पेन, बॉलपेन, रिफिल, पाटी, पेन्सिल, खोड रबर, पॅड, कंपास बॉक्स, फूटपट्टी, गोटी पेपर, फुलस्केप पेपर, रंगीत पेपर, खडू, चेंडू, तसेच काही प्रमाणांत व्यापार, चेस, लुडो, गोट्या, वगैरे खेळणी जमवली. पार्ले आणि रावळगावची चॉकलेटस् मागवली. चॉकलेटसाठी बरण्या आणि समोर एक टेबल आणलं. आता तारीख ठरवायची होती. अकरा तारखेला दसरा होता, मुहूर्त बघायची गरज नव्हती. मग तारीख ठरली. बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर १९७८  रोजी सुरुवात करायची. दुकानाच्या एका बाजूला 'किरण हेअर कटिंग सलून', दुसऱ्या बाजूला 'लक्ष्मी पॉवर लॉण्ड्री' आणि इमारतीत मनसुखलाल हिरजी शाह यांचं किराण्याचं दुकान, श्रीकृष्ण दुग्धालय, दिलीप मेन्स वेअर, जय कानिफनाथ रसवंती गृह आणि एक छोटंसं हॉटेल होतं. तेव्हा आम्हाला छोटाच उदघाटन समारंभ करायचा होता. कोणाला बोलावून त्यांच्या हस्ते उदघाटन करण्याइतकं मोठं दुकान नव्हतं. तेवढा पैसा खर्च करण्याची ताकदही नव्हती. दसऱ्याचा दिवस होता. चांगल्या मुहूर्तावर सकाळी नऊच्या सुमारास आराध्य दैवत 'गणपती'च्या फोटोची पूजा करून "फ्रेंड्स स्टोअर्स" दुकानाचा उदघाटन समारंभ पार पडला. अण्णाचे मित्र, इमारतीतले काहीजण, आजूबाजूचे दुकानदार असे बरेचसे लोक जमले होते. त्यातल्या काही लोकांनी सामान खरेदी पण केली. बरं झालं टिळकनगरला पुस्तकांचं दुकान नव्हतं.. आम्हाला खूप जवळ पडेल.. समोर टिळकनगर शाळापण आहे.. इकडे चांगला प्रतिसाद मिळेल तुम्हाला.. वगैरे लोकं बोलू लागले. त्याकाळी डोंबिवलीत फडके रोडवर गद्रे बंधू, मानपाडा रोडवर बागडे स्टोअर, मॅजेस्टिक स्टोअर, भारतीय स्टोअर अशी खूप मोठी दुकान होती. त्याकाळी, टिळकनगर हा राजेंद्र प्रसाद रोडवरील थोडासा आतील भाग वाटायचा. आधीपासूनच गद्रे आणि बागडेमधे पुस्तकं जास्त प्रमाणात खपायची. लोकांची गर्दीही खूप असायची. अण्णाकडे अनुभव होता, जिद्द होती, मेहनत करायची तयारीही होती. अण्णांबरोबर आम्ही सर्वजण होतोच. आमचं सर्वांचं भविष्य 'फ्रेंड्स स्टोअर्स'वर अवलंबून होतं. उदघाटनाच्या दिवशीच टिळकनगरमधील रहिवाश्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. समोरच्या मानस, गुंजन, गुलमोहर, अर्चना रजत मेघदूत राधानिवास मंजुनाथ आणि इतर सोसायटी, बाजूच्या काकी स्मृती, वृंदावन,राजहंस मधून लोकं अाली होती. गुलमोहोर सोसायटीमधून श्रीरंग तुळपुळेच्या आईने पहिली खरेदी केली होती. पेन, पेन्सिल, वह्या असं बरचसं सामान त्यांनी घेतलं होतं. त्यादिवसापासून त्या रोज दुकानात यायच्या अण्णांना त्या भाऊ मानायला लागल्या होत्या. कालांतराने 'फ्रेंड्स स्टोअर्स' टिळकनगर आणि डोंबिवलीतल्या रहिवासीयांना परिचित झाले.

Wednesday, April 22, 2020

अंधेरी via पवई lake आणि सिनेमाचे चित्रीकरण चालू असताना भेटलेले नट !!

मला डोंबिवली भावली होती. कुंदापूरप्रमाणे इथेही चांगले मित्र जमवले. इमारतीत सर्वजण ओळखायला लागले. अण्णा आणि ताईच्या लग्नानंतर अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागलो. सातवीची परीक्षा दिली. सातवीत मला सातशे पैकी चारशे सत्तर गुण मिळाले!! मी वर्गात दहावा आलो होतो!! सुट्टी लागली होती. सुट्टीत, मला आणि आईला अंधेरीच्या वेंकटेश मामाकडे जायची संधी मिळाली. मामांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. आम्हाला सोडायला वेंकटेश अण्णा येण्याचं ठरलं. तो घाटकोपरला झुनझूनवाला कॉलेजला जायचा. रविवारची सुट्टी होती.

रविवारी सकाळी डोंबिवलीहून ट्रेनने मुलुंडला पोचलो. मुलुंड पश्चिमेला अंधेरीसाठी बस मिळायची. मुलुंड पश्चिमेला स्टेशनजवळच अंधेरी बसस्टॉप होता. आम्ही बसस्टॉपवर पोचताच बस आली. रांगेत उभे राहून बसमधे चढलो. भावाने तीन तिकिटं काढली. नेहमीप्रमाणे मी खिडकी जवळची सीट पकडली. बस निघाली. भाऊ ह्याच्या आधी एक दोन वेळा अंधेरीला मामांच्या घरी जाऊन आल्यामुळे मला सर्व दाखवत होता. बस पाच रस्ता क्रॉस करून पुढे निघाली. डाव्या बाजूला मोठी कंपनी होती. बाहेर खूप मोठी बाग होती. हिरवळीवर त्या कंपनीचं नाव रेखाटलं होतं.. Johnson & Johnson. हिरवं गवत, त्यामध्ये कंपनीचं नावं मी बघतच राहिलो!! भाऊ सर्व मला दाखवत होता. आई मागच्या सीटवर बसली होती. आता बस डोंगरावर चढत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं होती. उजव्या बाजूला तलाव दिसत होता. तळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. पाण्यात कमळ फुललं होतं. दृश्य बघण्यासारखं होतं. तेवढ्यात सर्व लोक बाहेर बघायला लागले.. टाळ्या वाजवायला लागले!! बघतो तर मोर नाचत होता. आयुष्यात पहिल्यांदा असं दृश्य बघायला मिळालं. पुढे बऱ्याच कंपन्या होत्या. थोड्यावेळाने अंधेरी बसस्थानकावर उतरलो. आम्हाला अंधेरीत सात बंगला भागात जायचं होतं. अंधेरी पश्चिमेला थोडं चालल्यावर वर्सोवा बसस्थानकावरून बस पकडली. सात बंगला स्थानकावर उतरलो. समोरच मोठमोठ्या इमारती होत्या. गेटजवळ आलो तर वॉचमनने अडवलं.. "कुठून आलात.. कुणाकडे चाललात?" भावाने सांगितलं की, "आम्ही डोंबिवलीहून आलो आहे.. व्ही. एल. प्रभूंकडे जायचंय". त्यांनी लगेच आत सोडलं. समोरचीच इमारत होती. सातव्या मजल्यावर मामाचं घर होतं. लिफ्टचं दार उघडलं.. मी, आई, भाऊ आत गेलो. भावाने लिफ्टचं दार बंद केलं. सात नंबरचं बटन दाबलं आणि लिफ्ट वर जायला लागली. मी लिफ्टचा पहिल्यांदाच अनुभव घेत होतो. लिफ्ट वर जाताना कोणीतरी उचलल्यासारखं वाटत होतं. मनांत वेगवेगळे विचार यायला लागले होते. समजा लिफ्ट मधेच बंद पडली तर.. शेवटी आम्ही पोचलो एकदाचे.. सातव्या मजल्यावर! लिफ्टचं दार उघडून बाहेर पडलो. भावाने लिफ्टचा दरवाजा बंद केला. समोरच मामाचं घर होतं.. मोठं दार.. दारावर इंग्लिशमधे व्ही. एल. प्रभू लिहीलं होतं. बेल वाजवली.. मावशीच्या मुलीने चंद्रकला आक्काने दार उघडलं. मला बघून घट्ट पकडलं. तेवढ्यात मावशी, दादा, छोटी ताई, मामी सर्व बाहेर आले आणि आम्हाला आत घेऊन गेले. माझ्या आजीची बहीण (रमा पाची), मावशी, तिचा मुलगा, आमचा मामा वेंकटेश प्रभू. आम्ही त्यांना वेंकटेशमामा म्हणायचो. त्यांचा टेलिफोन इंटरकॉमचा बिझिनेस होता. 'सुप्रीम टेलिकम्युनिकेशन्स' हे त्यांच्या कंपनीचं नाव होतं. त्यांनी कुंदापूर सोडून मुंबईला येऊन शिक्षण पूर्ण करून स्वतःचा बिझिनेस सुरू केला होता. त्यांचं खूप नाव होतं. त्यांच्या मुलाचा 'विनीत'चा पहिला वाढदिवस होता. आम्ही चार दिवस आधीच पोचलो होतो. घर मोठं होतं. घरात टीव्ही, फ्रीज, प्रत्येक रूममधे टेलिफोन होता. आठ दिवस मजेत जाणार होते. खाण्यापिण्यात आणि घर बघण्यातच पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी आणि दिनेश दादा (मावशीच्या मुलीचा मुलगा), लहानपणापासून त्यांच्याकडेच मोठा झाला होता; आम्ही दोघं बस पकडून अंधेरी स्टेशनला गेलो. भाजी, फळं, आणि इतर सामान घेऊन आलो. सकाळी अकराच्या सुमारास दिनेशदादा आतून केळी घेऊन आला. आमच्या दोघांत पैज लागली! कोण जास्त केळी खातोय? मी त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान, तरी मी हो बोललो. छोटी छोटी केळं होती. खायला सुरुवात केली. मी पाच सहा केळं खाल्ली.. त्याने माझ्यापेक्षा दोन केळी जास्त खाल्ली.. त्याने पैज जिंकली !!! दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इमारतीच्या बाहेर पडलो तर समोर रस्त्यावर चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. बसस्टॉपवरून बस निघताना चोर एका माणसाचा खिसा कापून पर्स चोरी करतो.. एवढाच सीन होता, कमीतकमी दहाएक वेळा सारखं हेच सुरू होतं. शेवटी शूटिंग संपतं आणि दोन जण गेट समोरच्या खुर्च्यांवर येऊन बसतात. दादा म्हणाला, "हे जे शूटिंग चालू आहेना ते, 'दो लडके दोनो कडके' चित्रपटाचे आहे. आणि समोर जे येऊन बसलेत ना त्यात एक हिरो 'अमोल पालेकर' आणि दुसरा 'असराणी' आहे". मला कुठे माहित होतं.. मी त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नव्हता. तेवढ्यात दादा बोलला थांब. मी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतो!! मला खरं वाटत नव्हतं. जास्त गर्दी नव्हती तरी पण काही लोक त्यांच्या अवतीभवती जमा झाले होते. दादा त्यांच्याजवळ गेला आणि अमोल पालेकर यांच्याशी गप्पा मारायला लागला. दादाला चांगलं इंग्लिश बोलता येत होतं. त्याचं हिंदी बोलणं पण चांगलं होतं. कुठल्याही फिल्मस्टार समोर उभं राहणं.. त्यांच्याशी गप्पा मारताना बघणं.. सर्व माझ्यासाठी पहिल्यांदा होत होतं. ज्याचा वाढदिवस होता तो मामांचा मुलगा 'विनीत' दिसायला सुंदर होता. गोल हसरा चेहरा.. तब्येतीने चांगला होता. मी आणि दादा त्याला खेळायला घेऊन जायचो. वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी इमारतीच्या व्हरांड्यात संगीताचा-ऑर्केस्ट्राचा खूप मोठा कार्यक्रम होता. एका म्युझिक कंपनीला बोलावलं होतं. हिंदी-मराठी चित्रपटातील गाणी, जोक्स, वगैरे. कार्यक्रम संपल्यावर बुफे जेवण होतं. ताट घेऊन रांगेत उभे राहून स्वतः पाहिजे ते वाढून घ्यायचं!! जेवण झाल्यावर आईसक्रीम! वाढदिवस झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी आणि आई डोंबिवलीला निघालो आम्हाला घ्यायला भाऊ आला होता. अंधेरी आणि डोंबिवलीच्या राहाणीमानामधे खूपच अंतर होतं.

Monday, April 20, 2020

"साठी सोयरीक', रम्य "मरवंते बीच, मिरज मधला विनोद खन्ना चा "इन्कार'.

वडील वारल्यानंतर मोठे भाऊ मंजुनाथ (अण्णा) नोकरीसाठी मुंबईला आले. सुरुवातीला एका हॉटेलात कामाला लागले. नंतर काही वर्षे माहीमला 'मॉर्निंग स्टोअर' या पुस्तकाच्या दुकानात कामाला होते. तिकडून मुलुंडला 'भारत बुक डेपो'त कामाला लागले. दरम्यान, ताईपण मुंबईला आली. तिला फोर्टमधे एका ऑफिसमधे क्लार्कचं काम मिळालं होतं. आधी दोघेही मुलुंडला श्रीधर अण्णांच्या घरी राहायला होते. एका खोलीत नऊ लोकं एकत्र राहायचे. श्रीधर अण्णा आणि भाऊ हे दोघे कुंदापूरपासून खास मित्र होते. श्रीधर अण्णा फोर्टच्या कॅपिटल सिनेमागृहात तिकीट काउंटर सांभाळायचे. अण्णाने डोंबिवलीत टिळकनगर येथे 'शिवप्रसाद बिल्डिंग'मधे पागडी तत्वावर सिंगल रूम किचनचं घर घेतलं. ताई, अण्णा, वेंकटेश अण्णाने मिळून आम्हा सर्वांना मुंबईला बोलावण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्हाला मुंबईला यायची संधी मिळाली. आम्ही मुंबईला यायच्या आधीच अण्णा आणि ताईचं लग्न ठरलं होतं. "साठी सोयरीक" होती. अण्णा आणि ताई, जीजू आणि त्यांची बहीण. जीजू डोंबिवलीत एका कंपनीत अकाउंटंटचं काम करत होते. अण्णाचं लग्न जीजूच्या बहीण बरोबर आणि ताईचं जीजू बरोबर! दोन्ही लग्न २७ नोव्हेंबर, १९७७ ला एकत्र करायचं  ठरलं. गावाला जायची संधी मिळाली. लग्नाची जोरदार तयारी चालली होती. दादरच्या 'बाबूभाई भवानजी'मधे अण्णाची ओळख होती. बाबूभाई भवानजीमधून साड्या आणल्या. बाकीची खरेदी डोंबिवलीतून केली. लग्नाकरता तीन दिवस आधी निघालो. लग्न कुंदापूरजवळ "हेमाडी" या जीजूच्या गावाला करायचं ठरलं होतं.

बॉम्बे सेंट्रलवरून KSRTCची बस होती. दुपारी "हेमाडी" ला पोचलो. संध्याकाळी कुंदापूरला निघालो. 'हेमाडी'वरून कुंदापूर जवळ होतं. आधी वेंकटरमण देवस्थानात गेलो.. तिथे दर्शन घेऊन सर्वजण काकांकडे गेले. मी मात्र माझ्या मित्रांना भेटायला गेलो. आम्ही जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या. मग मी काकांकडे निघालो. आम्ही सर्वजण हेमाडी ला निघालो ,आठ वाजले होते. जेवण तयार होतं. जेवणं झाल्यावर सर्व गप्पा मारायला लागले. ताई आणि होणारी वहिनी, पलंगावर झोपून गप्पा मारत होते. त्या खोलीत फक्त त्या दोघीच होत्या. मी हळूच आत गेलो आणि त्यांच्या पलंगाखाली लपलो. वहिनी आणि ताई दोघींच्या साडीचा पदर पलंगाखाली आला होता. दोघी छान गप्पा मारत होत्या. मला त्यांच्या गप्पांशी काहीच घेणं देणं नव्हतं!!.. मी हळूच दोघांच्या साडीचा पदर एकत्र करून घट्ट गाठ मारली. ते गप्पा मारण्यात मग्न असतांना पलंगाखालून सरकत-सरकत दरवाजाच्या बाहेर येऊन लपलो. थोड्यावेळाने  त्यांच्या गप्पा संपल्या. ताई-वहिनी दोघींनी पलंगावरून उठायचा प्रयत्न केला; पण साडीचा पदर बांधल्यामुळे त्यांना उठायला जमेना!! ताईने बघितलं, त्यांच्या दोघींच्या साडीचा पदर पलंगाखाली बांधलेला आहे. ताईने गाठ सोडवली. मला जाम हसायला येत होतं. हसू अावरेनासं झालं होतं.. तेवढ्यात ताई बाहेर आली आणि माझा कान पकडला. तिच्या मागून वहिनी बाहेर आली आणि तिने मला ताईच्या तावडीतून सोडवलं. दोघीही हसत होत्या. ताई वहिनीला सांगत होती— हा खूप मस्तीखोर आहे. त्यादिवशी वहिनीमुळे मी वाचलो!! दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याउठल्या मला काम आलं होतं. माझं आवडतं काम होतं. कैऱ्या आणि भाजीसाठी कच्चा फणस काढायचं. मी कैऱ्या आणि फणस काढून दिले. त्याच दिवशी संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर जायचं ठरलं.

'हेमाडी'वरून वीस किलोमीटर अंतरावर "मरवंते" बीच आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा जगातील एकमेव बीच असेल जिथे एका बाजूला नदी, एका बाजूला समुद्र आणि मधून NH17चा ब्रिज आहे. रस्त्याच्या एका बाजूला गोड पाणी आणि दुसऱ्या बाजूला खारट पाणी. बसने आम्ही सर्व बीचला निघालो. दोन तीन ब्रिज ओलांडून बसने बीचवर पोचलो. संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्त बघण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. सूर्यास्त होत होता. समुद्राच्या लाटा, त्यांचा मधुर आवाज, समुद्रावरुन येणारा गार वारा.. एक वेगळाच अनुभव होता. सर्वांना माझी काळजी होती. भावाने माझा हात घट्ट पकडला होता. आम्ही पाण्याच्या जवळ गेलो.. पायाखालून रेती सरकत होती. पाण्याच्या स्पर्शाने पायाला गुदगुल्या होत होत्या. थोड्यावेळात अंधार पडायला लागला सूर्य मावळला. आम्ही सर्व घराकडे निघालो. समोर सोड्या'ची गाडी होती. आमच्याकडे गोटी सोडा मिळतो. सोड्याच्या बाटलीच्या टोकाला एक गोटी असते. तिला लाकडाच्या ओपनरने दाबायचं की गोटी आत सरकते मग सोडा पिता येतो. सोडा पिऊन 'हेमाडी'साठी बस पकडली. 'हेमाडी' हा खूप छोटा गाव. जीजूचे वडील गावाचे पाटील. ते पोस्टऑफिसमधे कामाला होते. हनुमान मंदिराच्या बाजूला त्यांचं घर होतं. मंदिरात लग्न होतं. माझं लक्ष लग्नाकडे अजिबात नव्हतं, मी माझ्या वयाच्या मुलांबरोबर खेळत होतो. लग्न उरकलं. बाहेर अंगणात जेवणाची तयारी चालली होती. त्याच दिवशी आम्हाला निघायचं होतं. अण्णा-वहिनी जीजू आणि ताई तिकडेच राहणार होते.

मी, पांडुरंग (भाऊ), छोटी ताई प्रेमाक्का. आम्ही तिघे मिरजला निघालो. मिरजेला माझी मावशी-आईची बहीण राहायची. पहाटे आठ वाजता मिरजेला पोचलो. बाहेर खूप थंडी होती. आम्ही मिरजेला एकच दिवस राहणार होतो. दादा आणि मंगला अक्काने आमच्या खाण्या-पिण्याची तयारी केली होती. त्यांच्याकडे दोन सायकली होत्या. एक जेन्ट्स आणि एक लेडीज. लेडीज सायकल मी पहिल्यांदाच पाहिली. घरात काही वस्तू लागल्यातर ते सायकल वापरायचे. संध्याकाळी सिनेमाला जायचं ठरलं. आम्ही सहा जण टांगा करून थिएटरला पोचलो. थिएटरच्या बाहेर खूप सायकली उभ्या होत्या. मिरजेला प्रत्येक घरी एक तरी सायकल असायचीच. नवीनच रिलीज झालेला विनोद खन्ना'चा 'इन्कार' सिनेमा हाऊसफूल होता. चित्रपटाच्या सुरुवातीला पार्टी असते त्यातून खलनायक मुलाला उचलून घेऊन जातो. मला अजूनही आठवतंय की, या चित्रपटात सारखं एका काळे बूट घातलेला माणसाचे फक्त पाय दाखवयाचे. चित्रपट सस्पेन्स असतो. एक कलरची बॅग असते, ती भट्टीत जाळतात व त्याचा धूर त्या मुलाला दिसतो आणि खलनायक पकडला जातो. चित्रपटात "मुंगडा" गाण्याची सुरवात झाली की सर्वजण शिट्ट्या वाजवत.. काही लोकांनी तर पैसेही फेकले होते. चित्रपट संपल्यावर दादांनी सर्वांना मिरजची भेळ घेऊन दिली. भेळ खाऊन आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून आम्ही कल्याणला आलो. कल्याणहून लोकल ट्रेन मधून डोंबिवलीला पोचलो.

Saturday, April 18, 2020

डोंबिवलीत आल्यावर पहिल्यांदा साजरे केलेले सण आणि किंग सर्कलचा GSB सार्वजनिक गणेशोत्सव

शाळेला आषाढी एकादशीची पहिली सुट्टी होती. त्यानंतर एक-एका सणाला सुरुवात झाली. नागपंचमीला शाळेला सुट्टी नव्हती. मी शाळेला निघालो होतो, इमारतीच्या खालीच एक माणूस साप (नाग) घेऊन आला होता. मी काय थांबलो नाही. स्टेशनजवळ पोचलो, कामत मेडिकल समोर दोघे तिघे टोपलीत साप घेऊन उभे होते. ते पुंगी वाजवत होते पुंगीच्या आवाजाला तो नाग मान डोलवत होता. लोक पैसे देत होते. काही लोकं दूधपण पाजत होते. माझी अकरा दहाची गाडी होती. मी घाईत निघालो स्टेशनला.

रक्षा बंधन म्हणजे "राखी पौर्णिमा"

आमच्या कुंदापूरला हा सण नव्हता. 'रक्षा बंधन' माझ्यासाठी पहिल्यांदाच होत होता. दोन्ही ताईंनी मला राखी बांधली, खायला लाडू दिला. मी काहीच नाही दिलं त्यांना. मी शाळेत जात होतो ना.. माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हाची राखी म्हणजे स्पंजचे गोलाकारचे तुकडे त्यावर रंगीत कागद आणि मणी असायचे. हातापेक्षा राखी मोठी असायची. राखी बांधली की शेजारच्यांना दाखवायला जायचो. रेडिओवर दिवसभर 'रक्षा बंधन'ची गाणी असायची "बेहनाने भाईकी कलाईपर प्यार बांधा है".

कृष्ण जन्माष्टमी

अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची पूजा असायची. रात्री अकराच्या सुमारास भटजी यायचे. तुळस आणि फुलं मुबईच्या मार्केटमधून आणलेली असायची. श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून तुळस वहायची. भटजी सहस्त्रनाम म्हणायचे. ठीक बारा वाजता पूजा असायची. चार पाच प्रकारचे लाडू, पोहा आणि लाह्यांचा प्रसाद असायचा. आमच्या बाजूच्या रमेशभाईंकडे रात्रभर पत्ते खेळायला लोकं जमायची. पूजा संपली की आम्ही त्यांना प्रसाद द्यायला जायचो. प्रसाद वाटून झाला की जेवण. पंधरा ते वीस प्रकारच्या भाजी मिक्स करून स्पेशल भाजी असायची. त्याला आम्ही "गजभजी आंबट" म्हणायचो. शेवटी खीर असायची. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदा. बाजूच्या इमारतीत 'मिलन सोसायटी'त "गोविंदा" दही हंडी होती. गावाला गोविंदा हा प्रकार नव्हता. मी हा प्रकार पहिल्यांदा बघत होतो. मोठी दोरी बांधली होती. तिच्या मध्यभागी एक मडकं बांधलं होती. फुगे बांधले होते. आजूबाजूची मुलं जमली होती. जास्त कोणाची ओळख नव्हती आणि घरून बंधन होतं. अण्णाने बजावलं होतं, 'पुंडाला खाली जाऊ द्यायचं नाही'. स्पीकरवर गोविंदाची गाणी लागली होती. पहिला थराला मोठी माणसं उभी राहिली. दुसऱ्या थरावर मुलं चढली. तिसऱ्या थरावर एक मुलगा चढत असतांना सर्वजण खाली कोसळले. लोकं बादल्याभरून पाणी त्यांच्या अंगावर टाकत होते. हे सगळं बघून मला जाम मजा वाटत होती. एकदा मला सोडलं असतं तर... मी भराभर चढून हंडी फोडली असती. दोन तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर दही हंडी फुटली.

GSB किंग्स सर्कलचा सार्वजनिक गणपती उत्सव.

काकाकडे गणपती असल्यामुळे आमच्याकडे गणपती नव्हता. आमचा GSB सार्वजनिक गणपती मुंबईला किंग्स सर्कलला होता. तिकडे पाच दिवसांचा गणेशोत्सव असायचा. आम्ही मुंबई आलो त्यावर्षी रविवारी किंग्स सर्कल गणपती बाप्पाला जायची संधी मिळाली. रविवारी मावशीचा मुलगा, वेंकटेश मामा यांच्याकडून पूजा होती. अण्णा-ताईला सुट्टी होती. मला पण सुट्टी होती.

अण्णा, ताई, छोटी ताई, आई, भाऊ आणि मी, आम्ही सर्व गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो. माटुंग्याला जायचं होतं. अण्णाने सर्वांची रिटर्न तिकीटं काढली. VTची स्लो ट्रेन पकडली. सर्वजण आत सीटवर जाऊन बसलो. एरवी मी शाळेत जाताना बाहेरच उभा राहायचो. ट्रेन सुरू झाल्याशिवाय चढायचो नाही. आज सर्वांबरोबर गुपचूप आत बसलो होतो. माटुंगा स्टेशनवर उतरलो. जिना चढून खाली आलो. सर्व मद्रासी लोकांची दुकानं होती. उजव्या बाजूला सर्कल होतं. असंख्य प्रमाणात कबुतरं होती. मी एवढी कबुतरं कधीच पाहिली नव्हती. काही लोकं कबुतरांना दाणे खायला घालत होते. मग समजलं की त्याला 'कबुतर खाना' म्हणतात. त्याच रस्त्याने पुढे गेलो.. 'सायन सर्कल' आलं. डाव्याबाजूला वळलो, समोर एक सिनेमाघर होतं. थोड्याच वेळात किडवाई रोडवर पोचलो. समोर SNDT कॉलेजच्या बाजूला एक मोठी कमान होती. त्यावर 'GSB सेवा मंडळ सार्वजनिक गणपती उत्सव' असं लिहीलेलं होतं. समोर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती दिसली. पुष्कळ गर्दी होती. आम्ही आत गेलो. दहा वाजले होते, नाश्ता तयार होता. नाश्त्याला उपमा, म्हैसूर पाक, शेव होते. पोटभरून नाश्ता केला,  कॉफी प्यायलो आणि बाहेर जाऊन बसलो. गणपती बाप्पाची मोठी, सुंदर, सुबक मूर्ती बघून प्रसन्न वाटत होतं. मूर्ती खूप मोठी होती. मी ऐकलं होतं की लालबागच्या गणपती बाप्पाची मूर्ती ह्याच्याहून मोठी असते. थोड्यावेळात मावशीच्या घरातले सर्वजण अंधेरीहून कार करून पोचले होते. मावशीने मला घट्ट पकडले. मामाने विचारले, 'अजून हा झाडावर चढतो का?, मस्ती कमी झाली का नाही'. आई, ताई, मावशी गप्पा मारायला लागल्या आणि मग मी हळूच तिकडून सटकलो. बाप्पाच्या समोर येऊन उभा राहिलो. आताच्या मानाने गर्दी खूप कमी होती. तरी पण लोकं रांगेत येऊन गणपती बाप्पाचे दर्शन व प्रसाद घेऊन बाहेर पडत होते. माइकवरून मामांचं नाव घेण्यात आलं. सर्वजण बाप्पाच्यासमोर उभे राहिलो. मंगल आरती झाली. सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. बाजूला GSB सेवा मंडळाचं ऑफिस होतं. तिकडे कठड्यावर जाऊन बसलो. दहा मिनिटांत पाऊस थांबला. जेवणाची तयारी चालली होती. पंक्तीत जेवण होतं. आम्ही सर्व एकत्र रांगेत बसलो. सर्वांना केळीचं पान ठेवण्यात आलं. जेवणात सुकी भाजी, गरमगरम भात आणि सांबर, शेवटी पायसम होतं. जेवण झाल्यावर थोडावेळ बसलो आणि निघण्याची तयारी. सर्वांनी बाप्पाला नमस्कार केला. मावशीच्या घरातल्यांचा निरोप घेतला आणि निघालो. वाटेत आईने विचारलं, 'पुंडा बाप्पाकडे तू काय मागितलं?' मी निरुत्तर. मला मजा आणि मस्ती शिवाय काहीच सुचत नव्हतं.

Thursday, April 16, 2020

सख्खे शेजारी... VPM मुलुंड शाळेचा पहिला दिवस!

ताप उतरला होता हॉस्पिटलमध्ये मस्ती करता येत नव्हती. कधी एकदाचं घरी पोचतो असं झालं होतं. राव डॉक्टरांच्या औषधांनी मी एकदम ठणठणीत झालो होतो. 'शिवप्रसाद' मधल्या दुसऱ्या मजल्यावरील आमच्या घरी पोचलो. खूप बरं वाटलं. शेजारच्यांशी ओळख करून घ्यायची होती.

आमच्या शेजारी दोन घरं होती. पहिल्या घरी रमेश भाई, जया बेन, त्यांची तीन मुले, जगदीश, रूपा (गुल्ली), प्रकाश (गुल्ला). दुसऱ्या घरात हर्षदभाई, जयाबेन त्यांची मुलं हीना, सिद्धार्थ (मुन्ना), रुपेश (रुप्ला). मी जास्त वेळ मुन्नाच्या घरी असायचो. अण्णा आणि ताईने त्यांच्याबरोबर चांगली मैत्री केली होती. आम्हाला खरोखरच चांगले शेजारी लाभले होते. त्यांचा स्वभाव, वागणं एकमेकांच्या बाबतीतला आपलेपणा, खाऊची देवाण-घेवाण. अामच्याकडचा इडली सांबर, डोसा, लोणचं त्यांना आवडायचं. आम्हाला त्यांच्याकडचा मोरांबा, खाकरा, ढोकला, वगैरे. क्रिकेटची मॅच असली की मी मुन्नाकडे जायचो. त्यांच्याकडे रेडिओ होता. मॅच ऐकताना खायला मिळायचं.

मी सातवीत नापास झालो होतो. आता परत सातवीसाठी शाळेत अॅडमिशन घ्यायची होती. घरी चर्चा सुरू होती. तेव्हा डोंबिवलीत कन्नड माध्यमाची शाळा नव्हती. मराठी माध्यमात दाखला मिळणार नव्हता. इंग्लिश आणि माझं वाकडं होतं. सगळीकडे चौकशी केल्यानंतर समजलं की मुलुंडला विद्या प्रसारक मंडळाची कन्नड माध्यमाची शाळा आहे, ती पण दहावीपर्यंत. फक्त आता जाण्यायेण्याकरता ट्रेनचा प्रवास बघायचा होता. आम्ही डोंबिवलीत यायच्या आधीच चौकशी केली होती. फक्त आता निर्णय घ्यायचा होता. सर्वांचं ठरलं की VPM मुलुंडला अॅडमिशन घ्यायची. 'अण्णा' मुलुंडमधे 'भारत बुक डेपो' ह्या दुकानात कामाला होते. VPM शाळेचे सर्व विद्यार्थी 'भारत बुक डेपो' मधून पुस्तके घ्यायची. अण्णांनी माझ्यासाठी सर्व पुस्तके आणून ठेवली होती. त्यात फक्त कन्नड पुस्तक मी चाळलं होतं. छोट्या ताईने सर्व पुस्तकांना कव्हर्स घातली होती. ताईने माझ्यासाठी नवीन दप्तर, चपला आणि कंपास पेटी आणली होती.

शाळा १३ जूनला सुरू झाली होती. माझ्या आजारपणामुळे उशीर झाला होता. २० जून, १९७७ ला मी आणि मुरलीधर भट— अाता माझे जिजाजी, शाळेत जायला निघालो. १२.४० ची शाळा होती. आम्ही १०.३० च्या सुमारास घरून निघालो. नवीन पांढरा शर्ट, निळी हाफ पॅन्ट, नवीन चपला, नवीन दप्तर, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, खोड रबर, वह्या पाहून मला आनंद झाला होता. डोंबिवलीतून पहिल्यांदा शाळेत जायला निघालो होतो. घरातले आणि शेजारी सर्व गॅलरीत उभे राहून मला टाटा करत होते. आम्ही चालत चालत मानपाडा रस्त्यावरून डोंबिवली स्टेशनला पोचलो. छोटंसं तिकीट घर होतं. जिजाजींनी दोन तिकिटं काढली. पिवळ्या रंगाचं पुठ्याच तिकीट होतं. जिजाजींनी कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला जायचं ते सांगितलं, "हा चार नंबर प्लॅटफॉर्म; तिकडे फक्त VTकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन येतात.. तिकडे जायचं नाही. अापल्याला दोन नंबरला जायचंय.. तिकडून VTकडे जाण्याऱ्या slow गाड्या येतात. या गाड्या मुलुंड स्थानकावर थांबतात. आपल्याला मुलुंडला जायचंय". मला काहीच समजंत नव्हतं. काही गाड्या इकडून येत होत्या, तर काही तिकडून. मी जिजाजींच्या मागे मागे जात राहिलो. अकरा वाजले होते. ११.१०ची गाडी होती. थोड्यावेळाने गाडी आली. गाडीत आधीपासून गर्दी होती. त्यांनी मला आधी चढायला सांगितले. माझ्यामागे तेही चढले गाडीमधे. आम्ही आत गेलो. बसायला जागा नव्हती, उभेचं राहिलो. पहिलं स्टेशन आलं. जिजाजी बोलले, हे 'दिवा' स्टेशन आहे. अजून तीन स्टेशन आहेत. मग आपलं 'मुलुंड' येईल. माझं लक्ष बाहेर होतं. बाहेर नदी दिसत होती. बाजूला सर्व हिरवंगार होतं. एक लोखंडी ब्रिज आला. बरेचसे लोक आपल्याकडच्या पिशवीतून निर्माल्य टाकायला लागले. नंतर 'मुंब्रा' आलं. तिकडून निघताच बोगदा आला. त्यातून गाडी जाताना मस्त वाटत होतं. असे दोन बोगदे होते. बाजूला मोठा डोंगर होता. त्या डोंगरावर बरेचशी घरं होती. मी विचार करत होतो. लोकं या घरात कसे राहत असतील? यांना जायला रस्ता कुठून असेल? पुढे उजव्या बाजूला कंपनी होती. इतक्यात तिसरं स्टेशन आलं 'कळवा'. बरेचसे लोक चढले. जिजाजी बोलले आता गर्दी होईल, आपण बाहेर जाऊन उभे राहू. थोड्यावेळाने चौथं स्टेशन आलं 'ठाणे'. बरेचसे लोक उतरले.. तेवढीच लोकं चढली. गर्दी तशीच होती. आम्ही पुढच्याला विचारलं, तुम्हाला उतरायचं आहे का? तसे पुढे सरकलो. मुलुंड स्टेशन आलं, आम्ही उतरलो. आम्ही दोघे  जिना चढून खाली उतरलो. डाव्या बाजूला बाहेर पडलो. उजव्या बाजूला मोठ-मोठ्या पिवळ्या रंगाच्या इमारती होत्या. रेल्वे कर्मचाऱ्यांची घरं होती. तिकडून सरळ चालत गेलो. दहा मिनिटांनी एक वळण आलं. जिजाजी म्हणाले, "हा मिठाघर रोड आहे, या रस्त्याच्या शेवटी शाळा आहे". आम्ही चालत गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिंचेची झाडं होती. दुपारचं ऊन होतं. पण झाडांच्या सावलीमुळे एवढं जाणवलं नाही. सुमारे पंधरा मिनिटांनी समोर शाळा दिसली. शाळेच्या आजूबाजूला पण झाडं होती. समोर महामार्ग दिसत होता. शाळेची दोन मजली इमारत होती.  सकाळची शाळा सुटली नव्हती. दुपारच्या शाळेची मुलं बाहेर उभी होती. आम्ही आत गेलो. मी बाहेर  बाकड्यावर बसलो. जिजाजी ऑफिसमध्ये गेले. कागदपत्रे दाखवली, समोर कॅश काउंटर होतं तिकडे जाऊन पैसे भरले. माझी अॅडमिशन झालं होती. सातवी 'ब' कक्ष होता. तिकडच्या कर्मचाऱ्यांनी मला वर्ग दाखवला. 20 जून 1977 शाळेचा पहिला दिवस होता माझा.

Tuesday, April 14, 2020

डोंबिवलीला डॉक्टरांच्यारूपात लाभलेला देव माणूस! Dr. U. Prabhakar Rao

२७ मे, १९७७ ला डोंबिवली स्थानकावर उतरलो. आम्ही पाचजण. मी, आई, भाऊ, बहीण, ताई आणि जिजाजी आम्हाला घरापर्यंत सोडायला आले होते. डोंबिवली स्टेशनवरून जिना चढून खाली उतरलो. समोर तिकीट घर होतं. थोडं पुढे टांगा उभा होता. आम्ही दोन टांगे केले. एका टांग्यात जिजाजी आणि एकात ताई आमच्या सोबत होते. टांग्यात बसलो.. पहिल्यांदाच टांग्यात बसलो होतो. घोड्यांच्या टापांचा आवाज. रस्त्यावर लोकांची गर्दी, टांगा आलेला बघून माणसं सरकत होती. भाजी मार्केटमधून टांगा निघाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर भाज्या होत्या. पहिल्यांदा एवढ्या भाज्या बघितल्या. लाल लाल टोमॅटो, मोठी काकडी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, हिरव्या भाज्या, शेंगा, मसाले, मिरची, आलं, कोथिंबीर, कडीपत्ता, वगैरे. पुढे फळं पण होती. चिकू, संत्री, आंबा, डाळिंब, वगैरे. लोक भरपूर खरेदी करत होते. टांगा पुढे जात होता. सिमेंटचा रस्ता होता. पुढे एक उंच इमारत होती. एक वळण आलं, थोडंस पुढे येऊन टांगा थांबला. ताई बोलली आपलं घर आलं. दोन मजली इमारत होती.

आमच्या घराचा पत्ता..
दुसरा मजला, शिवप्रसाद बिल्डिंग, डॉ.राजेंद्रप्रसाद रोड, टिळक नगर, डोंबिवली पूर्व.

दुसऱ्या मजल्यावर पोचलो. शेवटचं घर होतं. बाजूला दोन घरं होती. सर्व बाहेर आले होते. त्यांना आम्हाला बघायचं होतं. जास्त करून मला; माझी कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली होती. हा कसा दिसतो.. हा कशी मस्ती करत असेल.. झाडावर कसा चढत असेल? एकीने तर मला पकडलं.. "यही है न पुंडा" पण मी तिच्या तावडीतून सुटलो आणि धावत घरी आलो. छोटंसं घर होतं. बाहेर एक खोली एक पलंग होता. पलंगावर अण्णा झोपले होते. त्यांना कावीळ झाली होती. डोळे पिवळे पडले होते. आई अण्णांना बघून रडायला लागली. आमचे अण्णा दिसायला सुंदर क्रिकेटपटू बॉब विलिस सारखे. पण कावीळीमुळे तब्येत खराब झाली होती.

घर छोटं होतं. एक खोली आणि छोटसं स्वयंपाक घर. नवीन शेजारी असल्यामुळे  कोणाची ओळख नव्हती. काही दिवसांत मी आजारी पडलो. रोज संध्याकाळी मला ताप यायचा. भावाबरोबर डॉक्टरकडे गेलो. घरापासून जवळ मानपाडा रोडवर डॉक्टर ठोसर यांचा दवाखाना होता. कोण आजारी पडलं की ताई-अण्णा डॉक्टर ठोसरांकडे जायचे. त्यांचं औषध घेऊन पण ताप कमी नाही झाला. रक्त तपासणी झाली. टायफॉईडचं निदान झालं. मला ऍडमिट करायला सांगितलं. भावाचे मित्र श्रीधर अण्णा यांनी डॉक्टर राव यांच्याकडे मला घेऊन जायला सांगितलं. डॉक्टर रावांकडे जायचं ठरवलं. रिक्षा करून स्टेशनला आलो. समोर कामत मेडिकल होतं. तिकडे उतरलो. डाव्याबाजूला जी इमारत होती  त्यात दुसऱ्या मजल्यावर श्रीनिवास हॉस्पिटल होतं. अंगात त्राण नव्हतं. कसाबसा दोन मजले चढलो. हॉस्पिटलच्या आत आलो. बरेचसे आजारी माणसं बसली होती.


'श्रीनिवास हॉस्पिटल' खूप मोठं होत. एका टेबलवर बाई बसली होती. बाजूला बंद दरवाजा. ती सारखं आत-बाहेर ये-जा करत होती. दरवाज्यावर इंग्लिशमध्ये Dr U Prabhakar Rao लिहीलं होत. समोरच्या टेबलवरची बाई एक-एक करून रुग्णांना आत पाठवत होती. बाजूला काचेचं छोटं केबिन होतं. त्यात सिस्टर्स  बसल्या होत्या. बेल वाजली की त्या रूममधे जात होत्या. केबिनच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती. समोर महाभारताचं पोर्ट्रेट होतं. माझा नंबर आला.. आम्ही आत गेलो. डॉक्टरांनी मला पाहिलं.. भाऊ बोलला याला सारखा ताप येतोय, उतरत नाही. ब्लड रिपोर्ट दाखविले. त्यांनी विचारलं काय होतंय तुला? मला बाजूच्या पलंगावर झोपायला सांगितलं. मला तपासण्यासाठी माझा हात त्यांच्या हातात घेतला.
'राव'डॉक्टर दिसायला सुंदर होते. गोल हसरा चेहरा, काळे केस, पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस, त्यांचं बोलणं प्रसन्न वाटत होतं. माझा हात धरून बोलले काही दिवस थांबावे लागेल. एकदम ठणठणीत होशील. बाहेरच्या बाईला आणि सिस्टर्सना बोलवून मला ऍडमिट करून घ्यायला सांगितलं. उजव्याबाजूला तिसऱ्या रूममध्ये माझा कॉट होता. माझ्या बाजूला एक छोटंसं बाळ होतं. ताप आणि उलट्यांमुळे पोटात काही जात  नव्हतं. खूप अशक्तपणा आला होता. मी कॉटवर झोपलो. इतक्यात सिस्टर्स आल्या आणि मला सलाईन दिलं. घरून पेज आणि लोणचं आलं होतं. जेवून झाल्यावर, गोळ्या घेऊन झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा आया, सिस्टर्स धावपळ करत होते. एका सिस्टरने थर्मामीटर ने ताप चेक केला. घरून नाश्ता आला. इडली होती.. खाऊन घेतलं. अकराच्या सुमारास सर्व ठिकाणी शांतता होती. मी विचार करत होतो.. एव्हढा आवाज अचानक कसा बंद झाला. बघतो तर राव डॉक्टर रुग्णांना बघायला आले होते. माज्या खोलीत आले. आधी समोरच्या कॉटवरच्या मुलाला तपासलं. त्याच्या घरच्यांना धीर दिला. सिस्टर्सना औषध बदलायला सांगितलं. माझ्याकडे वळले. मला विचारलं "कशी असा तूं?" 'म्हणजे तू कसा आहेस' मी बोललो कालच्यापेक्षा बरा आहे. काळजी नको करू.. सर्व ठीक होईल.. लवकर बरा होशील. जेमतेम एक मिनिट उभे असतील लगेच दुसऱ्या वॉर्डमधे निघून गेले. ते आत जाईपर्यंत शांतता होती. मला खूप अशक्तपणा आला होता. मी दिवसभर पलंगावर पडून असायचो. सलाईन सुरूच होती. गोळ्या होत्या. ताई-अण्णा कामावर जायचे. संध्याकाळी बघायला यायचे. माझं हे रूप त्यांनी पाहिलं नव्हतं. एक मिनिट गप्प न बसणारा आज झोपून होता! अण्णा रोज येताना पार्ले बिस्कीट आणायचे. घरून सकाळी इडली, दुपारी जेवणाला पेज आणि लोणचं असायचं. चार दिवसांनी मला बरं वाटायला लागलं, ताप उतरला होता. थंडी वाजत नव्हती. घाम यायला लागला. मग, मी कुठे बसतोय?सलाईन असतांना कॉटवर.. ते संपलं की बाहेर रिसेप्शनपर्यंत फिरायचो. बाजूला वॉशरूम होतं. तांब्यातलं पाणी ओतायचो आणि बेल वाजवायचो. लगेच आया यायच्या. त्यांना प्यायचं पाणी आणायला सांगायचो. पाचव्या दिवशी ब्लड टेस्ट झाली. राव डाक्टरांनी तपासले. रिपोर्ट बघून  कोंकणीत बोलले "रिपोर्ट नॉर्मल असं तुवां फायी घरकडे वचैत".. 'तुझा रिपोर्ट नॉर्मल आहे, तू उद्या घरी जाऊ शकतोस. संध्याकाळी डिस्चार्ज होता. राव डॉक्टर आले श्रीधरअण्णा आणि भाऊ केबिनमधे गेले पेपर्स घेऊन बाहेर आले. मी ठणठणीत झालो होतो. गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि हॉस्पिटलमधून खाली उतरलो. भावाने समोरच्या कामत मेडिकलमधे राव डॉक्टरांनी दिलेली चिट्टी दाखवून औषधं घेतली. रिक्षा पकडून घरी पोचलो. नंतर मला समजलं आमच्याकडे पैसे कमी होते. आधीच अण्णा पण राव डॉक्टरांकडे ऍडमिट होते; आता माझा खर्च! ते म्हणाले "आता नसतील तर पुढे कधी दिले तरी चालेल!!". त्यांचा साधेपणा, ट्रीटमेंट, त्यांचं बोलणं, व्यक्तिमत्व असे आपल्या डोंबिवलीला डॉक्टरांच्यारूपात लाभलेला देव माणूस!
Doctor U Prabhakar Rao

Sunday, April 12, 2020

जन्मभूमी "कुंदापूर" ते कर्मभूमी "डोंबिवली"चा प्रवास

२५ मे ला माझ्या भावाचा— 'पांडुरंग'चा दहावीचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही 'बॉम्बे'ला निघालो. २६ मे १९७७ ला सकाळी नऊच्या सुमारास बस निघाली 'बॉम्बे'साठी. मी खिडकीच्या बाजूची सीट पकडली होती. कुंदापूरच्या शास्त्रीकट्टेवरून बस वळली, थेट राष्ट्रीय महामार्ग NH17 गाठला. या मार्गावरून बस जाताना हवा जोरात चेहऱ्यावर येत होती. केस उडत होते. बाहेर एक नदी, ब्रिज, नारळाची झाडं, शेतात काम करणारी माणसे दिसत होती. दुपारी बारापर्यंत आम्ही 'भटकळ'ला पोचलो. बस अर्धातास थांबणार होती. ताईने खायला आणलं होतं ते आम्ही खाऊन घेतलं; परत प्रवासाला सुरुवात. दुपारी सर्व झोपले पण मी मात्र जागाचं होतो.. बाहेरचं दृश्य बघत होतो. संध्याकाळी एका हॉटेलसमोर बस थांबली. तिकडे चहा घेतला. मला ताईने बिस्कीटं दिली ती खाऊन मी माझ्या जागेवर जाऊन बसलो.


बसमधे हिंदी चित्रपटातली गाणी लावली होती. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. माझे डोळे बंद होत होते. नकळत मी झोपी गेलो. काहीवेळाने ताई मला उठवत होती.. बस थांबलेली.. समोर हॉटेल होतं. आम्ही 'धारवाड'ला पोचलो होतो. ताईने जेवणाची ऑर्डर दिली. सर्वांची जेवणं झाली. सर्वजण बसमधे चढले की सर्वात शेवटी मी चढायचो. बसचा कंडक्टर माणसं मोजायचा. सर्वजण चढले आहेत का ते बघायचा. मग बसचा प्रवास पुन्हा सुरू व्हायचा. सकाळी मला जाग आली.. बाहेर सकाळची सूर्याची किरणे, गार हवा, शेतातली उसाची-ज्वारीची पीकं मागे सरकत होती. मी ताईला विचारलं, हे कुठलं गाव आहे? ताई म्हणाली "कराड"!.. मी परत बाहेरचं दृश्य बघायला लागलो. शेतकरी डोक्यावर गवत घेऊन समोर गायी हाकत पुढे चालले होते. माझ्या चेहऱ्यावर गार वारा लागत होता. सकाळचे आठ वाजले होते. आम्ही पुण्याला पोहोचलो. एका हॉटेलसमोर बस उभी राहिली. हात-पाय-तोंड धुवून घेतलं. चेहऱ्यावर काळं-काळं लागलेलं होतं म्हणून साबणाने चेहरा परत धुवून घेतला. हॉटेलात गेलो.. ताईने सर्वांकरता पुरी-भाजीची ऑर्डर दिली होती. पहिल्यांदा पुरी-भाजी खात होतो. पोट भरलं. ताई म्हणाली, "दुपारपर्यंत आपण 'बॉम्बे'ला पोहचू. मला 'बॉम्बे' बघायचं होतं. आतापर्यंत शेती आणि झाडं दिसत होती. मला इमारती आणि ट्रेन बघायची उत्सुकता होती. सर्वजण बसमधे चढले आणि बस निघाली. बसमधे हिंदी गाणी लागली होती. मी 'बिनाका गीत माला' ऐकायचो त्यामुळे बरीचशी गाणी मला माहिती होती. आता बस घाटावरून उतरत होती. ताईला विचारलं.. हा कुठला गाव?.. ताई म्हणाली "खंडाळा"! खालचं दृश्य छान दिसत होतं. बस वळणावरून वळताना भीती वाटत होती. एका बोगद्यातून बस बाहेर पडली. घाटाच्या पायथ्याशी आलो. आता मात्र बस सरळ जात होती. पनवेलच्या पुढे आलो तशी ताई म्हणाली.. 'एक दीड तासात पोहचू आपण'. आता इमारती दिसायला लागल्या होत्या. खरोखरंच झाडं कमी होत गेली.. कावळे पण कमी होते.. कबुतरे दिसायला लागली. बाराच्या दरम्यान 'बॉम्बे'ला पोचलो. 'सायन सर्कल'ला आलो.मुरलीधर भट जिजाजी बस ची वाट बघत होते .त्यांनी तिथून मुलुंडसाठी दोन टॅक्सी केल्या. दुपारी एक वाजता मुलुंडच्या 'नवघर रोड'वरील श्रीधर अण्णांच्या घरी पोचलो. बसमधे बसून पाय आखडले होते.. पाय मोकळे केले. हात-पाय-तोंड धुवून घेतलं.. घर छोटं होतं.. सिंगल रूम. एका बाजूला पडदा लावलेला.. तिथे बाथरूम होतं. बाहेर कॉमन वॉशरूम होती. घरी जेवण तयार होतं.निरुपमक्का श्रीधरं अण्णांची बहीण आम्ही पोचायच्या आधीच जेवण बनवलं होत. तोंडली-बटाटा भाजी, डाळ, पांढरा भात. आमच्याकडे उकडा तांदूळ असायचा. भूक लागलेली होती. जेवण उरकल्यानंतर सर्वांनी आराम केला. आम्हाला डोंबिवलीला पोचायचं होतं. अण्णा आजारी होते. कावीळ झाली होती त्यांना. आईसारखी म्हणायची 'आपण डोंबिवलीला कधी पोचणार?' चारच्या सुमारास श्रीधर अण्णांच्या घरुन चालत मुलुंड स्टेशनवर आलो. पहिल्यांदाच रेल्वे स्टेशन पाहात होतो. कोणीतरी तिकीट काढलं आणि आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर आलो. काही गाड्या उजव्याबाजूने तर काही डाव्याबाजूने जात होत्या. मला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात एक गाडी आली ताई म्हणाली, 'ही आपली गाडी नाही'. लोकं एकमेकांना ढकलत होते. जणू काही शर्यत लागली होती. उतरणारी माणसं पण घाई करत होती. लाऊडस्पीकरवरून हिंदी, इंग्लिश, मराठीमधे सूचना देत होते. मला काहीच समजंत नव्हतं. थोड्यावेळात दुसरी ट्रेन आली. ताईने ह्या गाडीमधे चढायला सांगितले. मी पटकन मधला खांब पकडून ट्रेनमधे चढलो. बाकीचे पण चढले, फक्त आईला उशीर झाला. ताईने तिला हात धरून चढविले. मग ती स्वतःपण चढली. पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास. ट्रेनमधली ती धक्का-बुक्की.. एकमेकांशी बोलण्याचा आवाज.. ट्रेनच्या पटरीचा आवाज.. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. आम्ही सर्व एका बाजूला उभे होतो. आतमधे बरीच लोकं बसलेली होती. तेवढ्यात काही लोकं आम्हाला धक्का देऊन बाहेर यायला लागली.. कुठलं तरी स्टेशन आलं होतं.. काही लोक उतरली.. काही चढली.. गर्दी अजून वाढली होती. पुढचं स्टेशन आलं. बरेचसे लोक उतरले. तेवढ्यात एक संत्रा विकणारा ट्रेनमधे चढला. लोकं त्याच्याकडून संत्री विकत घेत होते. गाडी पुढे जात होती. आई खाली बसली तेवढ्यात मागची लोकं ओरडायला लागली. काही मराठीत तर काही हिंदी बोलत होते. ताईने आईला उठवलं.. उठून उभे राहायला सांगितलं. पुढचं स्टेशन आलं. कमी लोकं उतरली. ताई म्हणाली, 'पुढच्या स्टेशनवर आपल्याला उतरायचं आहे'. गाडी स्टेशनवर अाली तशी लोकं मागून धक्का मारायला लागले. कसंबसं आम्ही सर्वजण आपापल्या बॅगा घेऊन खाली उतरलो.

                               "हे माझं पहिलं पाऊल होतं डोंबिवली स्टेशनवर दि. २७ मे १९७७!"



Friday, April 10, 2020

कुंदापूर वरून बॉम्बे ला निघायची तयारी

पूर्वी आमच्याकडे मुंबईला बॉम्बे म्हणायचो. कुंदापूरवरून मुंबईसाठी एकच बस असायची. आमच्या घरापासून जवळच एक किलोमीटरच्या अंतरावर छोटासा बस स्टॉप होता. जेमतेम पाच बस थांबू शकतील एवढा. मोठा भाऊ मंजुनाथ आम्ही त्यांना 'अण्णा' म्हणायचो ते मी लहान असतानाच नोकरीसाठी मुंबईला आले होते. नंतर ताई "मुक्ता" तिचं नांव. आम्ही तिला 'मुक्ताक्का' म्हणायचो. मग मधला भाऊ "वेंकटेश"— 'वेंकटेश अण्णा'. मी कधीतरी बस स्टॉपवर गेलो की विचार करायचो मला बॉम्बेला जायला कधी मिळेल. तिकडे बस स्टॉपवर बबल गम चॉकलेट मिळायचं ते घेऊन गुपचूप खायचो.. घरुन परवानगी नसायची.

मी सहावी पास होऊन सातवीत गेलो. आमच्याकडे सातवीत बोर्डाची परीक्षा असायची. मी अभ्यास मन लावून करायचो. त्यावर्षी जानेवारी महिन्यात ताईच पत्र आलं की सर्वांनी परीक्षा संपली की मे महिन्यात बॉम्बेला यायचंय. मी मनातल्या मनात जाम खुष झालो होतो. सर्व मित्रांना सांगितलं मी जाणार ते. मित्र थोडे नाराज झाले. तुझ्याशिवाय कसं होईल, आम्ही कोणाबरोबर खेळायचं. माझा खास मित्र 'खाजा' तर रडायला लागला. मी त्याला म्हटलं, मी पत्र लिहीन तुला; तू पण पत्र लिहीत राहा. कसंतरी मित्रांची समजूत घातली. माझं अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं. सारखे बॉम्बेला जायची स्वप्ने. तिकडे कसं असेल. मी ऐकलं होतं बॉम्बेला झाडं कमी आहेत इमारती जास्त आहेत. त्या  पण मोठं-मोठ्या उंच इमारती. गावात कसं उंच इमारती नव्हत्या पण घर मोठं असायचं बॉम्बेमधे उंच इमारती आणि खोल्या छोट्या. छोट्या घरात खेळायला जागा नाही. अभ्यासही खूप असतो. ट्रेनचा प्रवास करावा लागतो. मी अजून ट्रेन पहिली नव्हती.


कुंदापूर सोडून जावं लागत होतं. मी आनंदात होतो.. मला बॉम्बेला जायला मिळत होतं! कुंदापूरची आठवण— आमच्या घराच्या थोडा पुढे अरबी समुद्र.. तिथून मासे पकडून आणल्यानंतर मासे ठेवण्यासाठी एक स्टोअर रूम होती. रूमच्या आत मोठमोठे अल्युमिनियमचे डबे ठेवले होते. त्यात ताजी मच्छी ठेवलेली असायची. बाहेरून बर्फाचे मोठमोठे तुकडे असायचे दार उघडले की थंड हवा.. तो मच्छीचा वास.. आमच्याकडून ही मच्छी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात येत होती.

आमच्याकडे गंगोळी नदी आहे. नदीच्या बाजूला घराची कौलं बनवायची फॅक्टरी होती. त्याचे मालक "तोलार' आमच्या इकडेच राहायचे. ते खूप श्रीमंत होते त्यांच्याकडे पांढऱ्या शुभ्र रंगाची अँबॅसेडर कार होती. ती जातांना दिसली की.. आम्ही सर्व कारच्या मागे धावायचो. त्यांच्या कारखान्यामधे जवळपासच्या सर्व गावांसाठी लागणारी "कौलं' तयार व्हायची. पुष्कळ कामगार होते. कारखान्याच्या बाहेर खूप मोठा मातीचा ढीग असायचा. वेगळीच माती होती ती. एका मशीनमध्ये ही माती आत जायची. माती आत गेली की त्यावर काहीतरी तेलासारखा पदार्थ टाकून मिक्सरने मिक्स करायचे. मग एका भट्टीत जात होती. त्या भट्टीमधे आग लागलेली असायची. मग तिकडून कौलं निघायची. तयार झालेली कौलं बाहेर रचून ठेवायचे. एक-एक ट्रक येऊन कौलं घेऊन जात होते. हे सर्व बघतांना नवल वाटायचं!मज्जाही यायची.

तिकडचा समुद्र, नदी, पांढरी शुभ्र वाळू, लाल माती, नारळाची झाडं,आजी च घर,वेंकटरमण देवस्थान,शाळा, हे सर्व सोडून बॉम्बेला जायचं होतं.

सातवीची बोर्डाची परीक्षा होती. तशी मी पुष्कळ तयारी केलेली. परीक्षा दिली. पास होणार अपेक्षा होती. मे महिन्यामधे निकाल लागला आणि मी नेमका इंग्रजीत नापास झालो.. ते पण फक्त पाच गुणांनी. घरी कोणीच काही बोलले नाही. ताई मुंबईला होती. आई काहीच बोलायची नाही. मला खूप रडायला आलं. पहिल्यांदा मला जाणवलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे— मी नापास झालो. या दरम्यान, आम्हांसर्वांना बॉम्बेला घेऊन जाण्यासाठी ताई येणार असं पत्र आलं होतं. मनात नापास झाल्याची भीती होती.  बॉम्बेला जायचं स्वप्नही होतं. सकाळी मी बाहेर अंगणात खेळत होतो. बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. मी बाहेर धावत आलो तर रिक्षा चक्क आमच्याच दाराजवळ थांबली होती.  आमच्याकडे कोणी रिक्षाने येत नव्हते. आम्ही चालत जायचो.. चालत यायचो. त्या रिक्षातून एक बाई खाली उतरत होती... बघतो तर.. ताईच होती. सुन्दर साडी.. रंग आठवत नाही.. पायांत चपला.. डोळ्यावर काळा रंगाचा चष्मा. सुंदर दिसत होती. चित्रपटातील नायिकेसारखी. तिने खाली उतरून नवीन पर्स काढली. त्यातले सुटे पैसे रिक्षावाल्याला दिले. मी धावत गेलो.. तिची बॅग उचलली आणि घरात आलो. ताई ओरडली मला,  "ऐकलं की नापास झालास!.. तुला कळत कसं नाही बॉम्बेला परत सातवीत बसावं लागेल.. एक वर्ष वाया घालवलंस"!

आम्ही तयारीला लागलो. काही सामान बांधून घेतलं. २६ मे ला सकाळी आमची बस होती आजूबाजूचे सगळे लोकं जमले होते.. माझे मित्रपण होतेच.. सर्वांचा निरोप घेतला. मी, ताई, आई, भाऊ आणि बहीण आम्ही पाच जणं दोन रिक्षाकरून बस स्टॉपला पोचलो. बस आधीच उभी होती. बस मोठी होती. आतमधे 2x2 च्या सीट्स होत्या. मी खिडकीच्या बाजूची सीट पकडली. बस सुरू झाली आणि बॉम्बेसाठी निघाली.....


Wednesday, April 8, 2020

आमच्या घरचा गणपती आणि देवळातील गणेशोत्सव

गणपती बाप्पा सर्वांचा लाडका. गणेश चतुर्थी जवळ आली की  सगळीकडे आनंदोत्सव. कुंदापूरमधे सार्वजनिक गणेशोत्सव खूप कमी. मोजक्याच लोकांच्या घरी एक दिवस, पाच दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे अकरा दिवसांचे गणपती, ते पण खूप कमी.

आमच्या वेंकटरमण देवस्थानात पाच दिवस गणपती उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस निर-निराळे कार्यक्रम.. खूप मजा यायची. पहिला दिवस सोडला की बाकी चारही दिवस देवळात. देऊळ छानपैकी सजवायचे. देवळाच्या दारावर दोन केळीची झाडं. आंब्याच्या पानांचे तोरण त्याला मधे झेंडूची फुलं. रंगीत दिव्यांचे तोरण. वेगवेगळ्या फुलांच्या माळा. गणपती बाप्पासाठी वेगळी जागा असायची. तिकडे सुद्धा सुंदर सजावट बाप्पाच्या मागे फिरणारे चक्र, निरनिराळ्या रंगाच्या दिव्यांची आकर्षक आरास असायची. सगळं मंगलमय वातावरण. सकाळी अांघोळ करून गेलो की दुपारी जेवण करून घरी. मग दुपारी निघालो की संध्याकाळचा कार्यक्रम मग रात्रीचं जेवण करून घरी. दिवसभर लाऊड स्पीकरवर मराठी आणि काही कन्नड गाणी. "अमृताहूनी गोड नाम तुझे देवा", "केशवाऽ माधवाऽ", "सुखकर्ता दुःख हर्ता" अशी बरीचशी गाणी लागायची. दुपारची पूजा, मग जेवण. संध्याकाळच्या कार्यक्रमात नाटक, प्रवचन, हिंदी आणि कन्नड गाण्यांचा ऑर्केस्ट्रा "बॉम्बे आठा" म्हणजे पपेट शो, वगैरे. चार दिवस कसे निघून जायचे हे कळत नसायचं.

आमच्या घराचा गणपती

आमच्याकडे गणपती फक्त मोठ्या भावाकडे असतो. माझ्या वडिलांचे मोठे भाऊ- काकांकडे आमचा गणपती असतो. बाकी सर्वांकडे फक्त गौरी पूजन असतं. गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी कमीत कमी अकरा नारळ साेलून शेंडी काढून त्याला दोन डोळे, काजळ चंदन व हळद लावून छान पैकी सजवतात. गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी सर्व नारळ टोपलीत ठेवून त्यावर पणतीचा दिवा लावून पूजा करतात.

काकांकडचा गणपती


गणेश चतुर्थीच्या एक महिना आधी गणपतीची मूर्ती करायला सुरुवात व्हायची. आम्ही शाळेत जात होतो त्याच रस्त्यावर तो कारखाना होता. कुंदापूरचे बरेचसे गणपती तिकडेच तयार होत होते. गणपतीसाठी ते वेगळी माती वापरायचे. ती माती थोडी चिकट असायची. मूर्ती बनवत असतांना तीन चार वेळा आम्ही ते बघायला जायचो. मजा वाटायची. ते मूर्ती बनवणारे मला बजावून सांगायचे कुठेही हात लावू नकोस नाहीतर तुला आत येऊ देणार नाही. मी त्यांचा ब्रश घ्यायचो, मातीला हात लावायचो. त्यामुळे ते मला ओरडायचे. गणेशोत्सवाच्या दोन तीन दिवस आधी मूर्ती तयार असायची. गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचो. आठ वाजता तयार होऊन काकांच्या घरी गेल्यावर लगेच नाश्ता असायचा. साडेआठच्या दरम्यान आम्ही गणपती बाप्पाला आणायला जायचो. काका किंवा काकांच्या मोठ्या मुलाच्या हातात गणपतीबाप्पा असायचे. आम्ही काही मुलं, बँडबाजासकट बाप्पाला घरी घेऊन यायचो. येताना दिसलेले सर्व गणपतीबाप्पा मोजायचो. कोण जास्त गणपती पाहतो याची स्पर्धा असायची. घरी आलो की स्थापनेची पूजा भटजींच्या हस्ते असायची. काकांकडे त्यांचा स्वतःच ट्रक होता. किराण्याचं दुकान होतं. खूप पैसे होते. घर मोठं होतं. कुंदापूरच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला घर. मोठा लांबलचक हॉल, देवघराच्या बाजूला आजीची खोली, आत मोठं स्वयंपाक घर. याच्या व्यतिरिक्त तीन खोल्या होत्या. बाहेर एक छोटंसं अंगण, चार नारळाची झाडं, आंब्याची दोन झाडं, एक फणसाचं झाड आणि विहीर. मोठं कुटुंब. बारा लोकं राहत होती. स्वयंपाकघरात सर्व आपापल्या कामात व्यस्त असायचे. काका वेळेच्या बाबतीत एकदम कडक होते. त्यांना शुगर (मधुमेह) होती. जेवण वेळेवर लागायचं. गणपतीबाप्पाच्या  पूजेसाठी कित्येक वर्षांपासून एकच भटजी यायचे. त्यांचं नाव 'गणपती नागा भट'. आमच्या घराण्याचे भटजी होते ते. बरोबर साडेअकरापर्यंत यायचे. तो पर्यंत आम्ही मुलं लपाछपी खेळायचो. बाहेर रस्त्यावरुन जाणारे गणपतीबाप्पा मोजायचो. काकांकडे रेडिओ होता. त्यावर गाणी लावायचो. हे सर्व काका येईपर्यंत चालायचं. एकदा का काका आले की सर्व गप्प. अगदी मी पण! ते दिसले की माझी पण मान खाली असायची त्यांना खूप घाबरायचो. साडेअकराला भटजी आले की पूजेला सुरुवात. ते सोवळं नेसायचे. बाप्पासमोर "नैवैद्य" एकवीस पक्वान्न ठेवायचे. कोणालाही बाप्पाजवळ जायला परवानगी नसायची. शंख, घंटानादासह आरती व्हायची. खूप प्रसन्न वातावरण असायचं. साडेबारापर्यंत पूजा अाटपायची. नंतर जेवणाची तयारी. केळीच्या पानावर जेवण वाढायचे. घरातल्या सर्व बायका वाढायला असायच्या. आधी सर्व लहान मुलं आणि आमच्याबरोबर काका. त्यांच्यामुळे कोणाचा आवाज नसायचा सर्व गपचूप जेवायचे. भात, सुकी भाजी, डाळ रस्सम, पापड, मोदक, खीर पायसम. वर्षातून एकदाच असं जेवण मिळायचं. काका नेहमी म्हणायचे कमी घ्या पण पानावर सोडू नका. जेवणं झाली की सर्व अाराम करायचे. आम्ही मुलं खेळत बसायचो. संध्याकाळी मोठी मंडळी भजन म्हणायचे. आम्हीपण त्यांना सात द्यायचो. आठ वाजता परत भटजी यायचे.. बाप्पाची पूजा करायचे.. साडेआठ वाजता आरती. मग जेवण उरकायचो. त्यानंतर रात्री नऊ वाजता गणपतीबाप्पाचं विसर्जन. काकांच्या वाड्यात मागे विहीर आहे त्यात बाप्पाचं विसर्जन असायचं. "गणपती बाप्पा मोरया" म्हणत विसर्जन करताना सर्वांच्या डोळ्यात पाणी यायचं. दिवस कसा गेला कळायचं नाही. फक्त बारा तास सकाळी नऊ ते रात्री नऊ. परत पुढच्या वर्षाची वाट बघायचो.


Monday, April 6, 2020

कुंदापूरमधे मी पाहिलेले चित्रपट. माझ्या आयुष्यातला पहिला हिंदी चित्रपट "दुश्मन'.

चित्रपट, नट-नटी हा बहुतांश लोकांचा आवडता विषय! आमच्या कुंदापूरमधे दोन सिनेमागृह होते. गीता टॉकीज आणि पूर्णिमा टॉकीज. गीता टॉकीज मावशीच्या घराजवळ होतं व पूर्णिमा टॉकीज थोडं लांब.. मुख्य रस्त्यावर होतं. मी सातवीपर्यंत कुंदापूरला होतो. यादरम्यान बरेचसे चित्रपट पाहिले. मला वाटतं.. मी पाचवीपासून चित्रपट पाहायला सुरुवात केली. मी पाचवीत असतांना पहिला "दुश्मन" हा हिंदी चित्रपट बघितला. त्यानंतर बरेचसे चित्रपट पाहिले. "बंगारदा मनुष्य" कन्नड मधला सर्वात गाजलेला चित्रपट; जसा हिंदीमधला "शोले". "बंगारदा मनुष्य" मधला नायक डॉ.राजकुमार! ज्याला कर्नाटकात देव मानतात जसा क्रिकेटमधे सचिन तेंडुलकर. डॉ.राजकुमारचे बरेचसे चित्रपट गाजलेत. सर्व चित्रपटांत त्यांनी फक्त नायकाचीच भूमिका बजावली आहे. गाणीपण त्याने स्वतःच गायली आहेत. "बंगारदा मनुष्य" म्हणजे सोन्यासारखा माणूस. या चित्रपटात तो राज्यात हरितक्रांती आणायचा विचार करतो. शेतकऱ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो. त्याला खलनायक विरोध करतो. पण नायिका त्याला साथ देते. शेवटी नायक जिंकतो. त्यानंतरचा चित्रपट "गन्धदा गुडी"! 'गंध' म्हणजे चंदन. 'गुडी'चा अर्थ देऊळ. 'चंदनाच देऊळ' या चित्रपटातसुद्धा नायकाची भूमिका डॉ.राजकुमार यांचीच. राज्यात चंदनाची तस्करी होत असते. नायक त्याला थांबवतो. या चित्रपटात घनदाट जंगल, चंदनाची झाडं, जंगली प्राणी खूप छान चित्रिकरण केलेलं आहे. "नागरहावू' म्हणजे नाग सर्प. या चित्रपटात विष्णू वर्धन नायक असतो. त्याचं नांव रामाचारी असतं. शाळेत परीक्षा सुरू असतांना नक्कल करण्यासाठी दोन्ही पायाला चिठ्या लावून आलेला असतो आणि हळूच पॅन्ट वर करून नक्कल करायचा प्रयत्न करतो. मास्तर पकडतात आणि पॅन्ट उतरवायला लावतात सर्वांसमोर त्याची इज्जत जाते. तो खूप मस्तीखोर असतो. पण मनाने चांगला, कोणाचे ऐकत नसतो. तो सारखा डोंगरावर भटकत असतो. चित्रदुर्ग नावाच्या डोंगरावर चित्रीकरण केलंय. मोठे मोठे दगड त्यातून रस्ता.. दृश्य छान दिसतं. चित्रपटाच्या शेवटी नायक आणि नायिका दोघे जीव देताना वाईट वाटतं.



"भक्त कुंभारा" हा कन्नड मधला डॉ.राजकुमार यांचा एक गाजलेला चित्रपट. याचं मराठीत पण रूपांतर झालं आहे. देवावरची भक्ती-श्रद्धेमुळे, शेवटी त्याला देव प्रकट होऊन वर देतो. हा चित्रपट बघतांना लोकं खूप भावनिक होतात. नायक कुंभार असतो मातीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवत असतो. तो हे काम करत असताना देवाची प्रार्थना करत असतो. मातीच्या गोळ्यावर उभा राहून तुडवत असतो. तेवढ्यात त्याचं बाळ त्याच्या पायाखाली येते आणि मरण पावते. माझ्यापण डोळ्यात पाणी आलं होतं. त्याचं दुसरं लग्न होतं. स्वतःचे दोन्ही हात कापून घेतो. त्याची भक्ती-श्रद्धा पाहून स्वतः देव त्याच्याकडे मदतनीस म्हणून कामाला येतो. शेवटचं गाणं "विठ्ठलाऽऽ पांडुरंगाऽऽ" "विठ्ठलाऽऽ एल्ली मरेयादे एके दुरादे".. कुठे लपलास तू पांडुरंगा.. का माझ्या पासून दूर गेलास?.. शेवटी त्याला देव प्रसन्न होतो.. त्याला त्याचे दोन्ही हात परत मिळतात.. त्याचं बाळ पण मिळतं.


"मुरूवरे वज्रगलू', 'राजदुर्गदा रहस्य', 'एम्मे थमन्ना, 'शरपंजरा' असे अनेक चित्रपट पाहिले. मी जास्त करून डॉ.राजकुमार नायक असायचा असेच चित्रपट पाहायचो. पाहून आल्यावर मित्रांसोबत चर्चा असायची. चित्रपटातलं दृश्य, मारामारी, गाणी, अमुक-तमुक, खूप गम्मत वाटायची. नुकताच 'शोले' सिनेमा लागला होता, मी पाहिला नाही. मुंबईत सिनेमा लागल्यानंतर पाच-सहा महिन्यांनी हिंदी चित्रपट आमच्या गावाला यायचे. आम्ही चर्चा करायचो समजा, राजकुमार आणि धर्मेंद्रची फाईट झाली तर कोण जिंकेल? आमचा राजकुमार धर्मेंद्रपेक्षा स्ट्राँग आहे वगैरे. 'बॉबी' चित्रपट लागला होता. पण त्याचं पोस्टर बघून मला जायला दिलं नाही.


ताई आणि ताईच्या मैत्रिणी हिंदी सिनेमाला जाणार होत्या. सिनेमा हिंदी होता. आम्हाला फक्त कन्नड सिनेमा बघायची परवानगी होती. हिंदी सिनेमात मारामारी आणि वेगळं असायचं. पाचवीपासून अभ्यासात हिन्दी व बाजूला सर्व मुस्लिम असल्याकारणाने आम्हाला थोडंफार हिंदी बोलताही येत होतं आणि समजायचंही. "दुश्मन" हा माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात राजेश खन्ना नायक आणि मुमताज नायिका. मला कोणीच माहीत नव्हतं. मला सिनेमापेक्षा आईसकँडी, शेंगदाणे, चिक्की खाण्यात मजा यायची. तीनचा शो होता. पंधरा मिनिटं आधी गेलो तर तिकीट मिळायचं. मी, ताई अाणि ताईच्या मैत्रिणी होत्या दुपारची वेळ होती. पायाला चटके लागत होते. पायाला चपला नव्हत्या, अनवाणीच फिरायचो. आम्ही लवकरच पोचलो. सर्वांनी पैसे काढले.. माझे आणि ताईचे पैसे दिले. तिकिटं काढली. पंधरा मिनिटं आधी गेट उघडायचं. आम्ही आत गेलो गाणी सुरू होती थोड्यावेळात सिनेमा सुरू झाला. मला काहीच कळत नव्हतं. मी ताईला सारखं विचारायचो हे काय आहे? हा कोण आहे? काय करतो?, वगैरे. राजेश खन्ना दारू पिऊन ट्रक चालवत असतो. त्याच्या ट्रकखाली एक माणूस येतो आणि मरतो. मग त्याला कोर्टात नेतात. मला अजूनही ते दृश्य आठवतंय.. बरेचसे जज लोकं बसलेले.. त्याला शिक्षा सुनावली जाते.. ज्याला तू मारलं आहेस त्याच्या घरी तुला मजुरी करावी लागेल. मागे बसलेले सर्व प्रेक्षक त्याला तसंच पाहिजे असं म्हणत होते. एक जाडासा पोलीस त्याला त्यांच्या घरी घेऊन जातो. एक माणूस ज्याचा एक पाय तुटलेला असतो. त्याला बघून मला मित्राच्या वडिलांची आठवण आली होती. 'खाजा' म्हणून जो मित्र माझा होता त्याच्या वडिलांचापण एक पाय तुटलेला होता. ते पण दोन्ही काखेत लाकडाच्या साहाय्याने चालायचे. त्यांच्या घरी काम करायला लागतो. तो चांगलं काम करून सुद्धा घरातले त्याला "दुश्मन" असं नाव ठेवतात. तो झाडाच्या खाली झोपलेला असतो, सर्वांना वाटतं की तो मेला. सर्वांना दुःख होतं. जेव्हा तो झाडाच्या खालून बाहेर येतो सर्वजण खुष होतात.. तेव्हाचं गाणं "दुश्मन जो जान से भी प्यारा है". नायक त्यांच्या घरी राहून बदललेला असतो. पण त्या घरातले लोकं त्याला माफ करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो. शेवटची मारामारी.. नंतर त्याला घरातले सर्व माफ करतात. हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणीही चित्रपटाविषयी बोलत असेल तर मी सांगायचो मी "दुश्मन" पाहिलाय. ज्याचा अर्थ मुंबईत आल्यावर मला समजला.


Saturday, April 4, 2020

आईची माया कुंदापूर मधली मस्ती आणि नारळाचं झाड

माझी आई कपडे धूत होती. माझे कपडे होते. अचानक तिच्या हाताला काहीतरी लागलं आणि रक्त यायला लागलं. चड्डीच्या खिशात ब्लेड होतं. आजूबाजूचे रस्त्यावर जाणारे गोळा झाले. तुमच्या पुंडाला कळत नाही खूप मस्ती करतो त्याला चांगलीच शिक्षा द्या.. वगैरे, आईने जखमेवर हळद लावली, आणि कापड बांधून घेतलं. दुपारी मी घरी आलो तेव्हा कळलं मला, थोडसं रडायला आलं. आईला म्हटलं ताईला सांगू नको. नाहीतर बेदम मारलं असतं. आईला माझ्यावर खूप प्रेम होतं. खूप प्रेमळ होती ती. तिने कधीच मला किंवा कोणालाही मारलं नव्हतं. ती कधी ओरडायची पण नाही. आमच्यासाठी खूप कष्ट केले तिने. मस्तीखोर असल्यामुळे सर्वात जास्त मीच त्रास द्यायचो.



श्री वेंकटरमण देवस्थानाच्या समोर आमच्या काकांचं किराण्याचं दुकान होतं. मी पाचवीनंतर तिकडे जायला लागलो. दुपारी काकांचा मधला मुलगा सूर्या दुकानात असायचा, आम्ही त्याला सूर्याअण्णा म्हणायचो. काका आणि मोठा भाऊ कडक होते. मी हळूच बघायचो.. दुकानात कोण आहे?काका किंवा मोठा भाऊ असतील तर लांबूनच कल्टी मारायचो. सूर्या असेल तर मजा असायची. तो काहीतरी खायला द्यायचा. मस्करी करायचा मस्त वाटायचं. समोरच देऊळ होतं. बाहेर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लोकांना बसायला जागा होती. रोज दुपारी एक माणूस तिकडे झोपायचा. तो हॉटेलात जेवण बनवायचा. त्याच पोट खूप मोठं होतं. तो गाढ झोपला की सारखा घोरायचा. श्वास घेताना पोट वर खाली व्हायचं.आम्हाला मजा यायची. आमचा भाऊ सांगायचा त्याला तू उठवलंस तर तुला एक गुळाचा तुकडा आणि पोटाला हात लावला तर गुळाचे दोन तुकडे!! मला तर गम्मत वाटायची. मी कधीच दुसऱ्याचा विचार केला नाही. एक दिवशी दुपारी मी गेलो त्याच्या पोटाला हात लावायला; मला दोन गुळाचे तुकडे मिळणार होते. तेवढ्यात त्याला जाग आली. तो उठला आणि माझ्या अंगावर धावून आला मी कसला त्याच्या हातात येतोय? मी पळत सरळ काकांच्या दुकानात!! भाऊ बोलला मानला तुला, हे घे. त्यांनी एक गुळाचा तुकडा दिला.

आजीचं घर जवळ होतं. मधे चार मुस्लिम लोकांची घरं होती. चार घरं सोडली की आजीचं घर. आईची आई. आजी खूप हुशार होती. आजोबा कित्येक वर्षांपूर्वी घर सोडून गेले होते. आजी खूप कष्टाळू होती. ती स्वतः कमवत होती. कोणावर अवलंबून नव्हती. ती आंबा, चिकू, नारळ, नारळाच्या झाडांच्या पानातून झाडू, देवासाठी लागणारी कापसाची वात सर्व विकून पैसे कमवायची. आजीला तीन मुलं. माझी आई, मावशी जी मिरजला राहते आणि मामा. आजीकडे मामा-मामी त्यांची लहान मुलं राहायची. आमच्यापेक्षा आजीचं घर खूप मोठं होतं. जागा पण मोठी होती. जवळपास वीस नारळाची झाडं, दोन आंब्याची झाडं, एक चिकू आणि एक पेरुचं झाड होत. छोटंसं तळ आणि विहीर होती. मी विहिरीतून झाडांना पाणी घालायचो तळं सुंदर होतं. त्यात अांघोळ करायचो. कागदाची होडी सोडायचो. तळ्याच्या पाण्यावर दगड मारायचो. तीन-चार बेडूक बऱ्याच वेळेस पाण्यावर तरंगत जायचे. बघायला गम्मत वाटायची. एप्रिल-मे मधे भरपूर आंबे यायचे. माझी गँग होतीच कैऱ्या तोडायला. आजी ओरडायची कैऱ्या तोडू नका, मोठी होऊ दे, आंबा पिकला की सर्वाना खायला मिळेल. नारळाची वीस एक झाडं होती. नारळ काढायला आजी नारायणला बोलवायची. एक-दोन पाहिजे असेल तर मी चढायचो. एरवी मी नारळ काढताना दिसलो की माझी तक्रार ताईकडे! एक दिवस दुपारच्या वेळेला मी आजीकडे गेलो. सर्व झोपले होते. त्यातल्या त्यात छोटं नारळाचे झाड निवडलं. वरती पाहिलं बरेचसे नारळ होते. एक तरी नारळ काढायचाच!! विचार केला, हळूच चढायला सुरुवात केली. नारायण हाताला आणि पायाला दोरी घेऊन चढायचा. मी असाच चढायचो. मी कुठलाही झाड सरळ चढायचो. मी लहान होतो, बारीक होतो, वजन कमी होतं, शरीर पण हलकं होत. त्यामुळे इतरांपेक्षा भराभर चढायचो. नारळाच्या झाडाच्या फांदीजवळ पोचलो. बरेचसे नारळ होते. एक नारळ निवडला. तो मला खाली टाकायचा नव्हता. एक हात झाडाला घट्ट पकडून दुसऱ्या हातानी नारळ फिरवायला सुरुवात केली. तेवढ्यात ज्या हाताने झाडाला घट्ट पकडलं होत त्या हाताला मोठी मुंगी चावली, हात सुटला आणि मी झाडावरून खाली पडलो. झाड एवढं उंच नव्हतं तरी पण वीस फूट असेल. जसा मी पडलो तसा बेशुद्ध... जेव्हा थोड्यावेळाने शुद्धीवर आलो तेव्हा मला उठायला जमत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं कोणीचं नव्हतं. तसाच थोडावेळ पडून राहिलो. नंतर उठलो. मला नीट उभं राहता येत नव्हतं. मला वाटलं आता डॉक्टरकडे जावं लागेल. कुठे जखम झाली नव्हती, मी कसा पडलो मलाच कळल नव्हतं. एवढ्या झाडांवर चढलो होतो, पण काहीच झालं नव्हतं. पहिल्यांदा पडलो. घरची आठवण येत होती. ताईला कळलं तर बेदम मार पडला असता. घरी गेलो तर सर्व झोपले होते. ताई आणि आईच्यामध्ये गुपचूप झोपलो. घरी काहीच सांगितलं नाही. एवढं होऊनसुद्धा मी झाडावर चढायचं सोडलं नाही.


Thursday, April 2, 2020

आजारातून बरा करणारा गणपती बाप्पा .... माझा पहिला कळसा चा प्रवास....

मी आजारी पडलो की, ताई मला आमच्याकडच्या डॉक्टर एस.आर.हेगडे यांच्याकडे घेऊन जायची. ते मला तपासून एका बाटलीमध्ये लाल औषध आणि एका पुडीत काही गोळ्या द्यायचे. एका दिवसात मी ठीक व्हायचो. बऱ्याच वेळा मी सायकल वरून पडलो होतो. मी तिसरीत असतानाच सायकल शिकलो. उंची कमी असल्यामुळे मला सीटवर बसून सायकल चालवता येत नव्हती. मी दोन्ही हँडल धरून अंडर पेडल सायकल चालवायचो. बऱ्याच वेळेस मी सायकलवरून घरी सामान आणून द्यायचो. या दरम्यान बरेच वेळा सायकल वरून पडलो ही. अजूनही पायांना त्या खुणा आहेत. सहावीत असताना मला ताप आला औषध घेतलं पण बरं नाही वाटलं. मग मी रमपाची (मावशी)कडे गेलो. तिकडे त्यांच्या डॉक्टरांनी औषध दिलं पण ताप उतरला नाही. एक दिवशी मावशीचे घरातले सर्व अनेगुडे महागणपती मंदिरात जाणार होते. जसं आपल्याकडे टिटवाळा गणपती मंदिर आहे ना तसं मंदिर आहे ते. त्यांना सांगितलं मी पण येतो. ते बोलले तुला ताप आहे ना तुला नाही नेणार तू घरी राहा. मी ऐकलं नाही हट्ट धरला. माझ्या हट्टामुळे ते सर्व तयार झाले. मी पण त्यांच्याबरोबर मंदिरात निघालो. आमच्याकडे रस्त्यावर उभा राहून हात दाखवला की बस थांबायची. त्यादिशेने जाणारी बस थांबवली. आम्ही चार जण होतो. मला ताप होता बस अर्ध्या रस्त्यावर जाताच आभाळ भरून आलं विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस जोरात पडायला लागला. बस स्टॉप आला. आमच्याकडे छत्री नव्हती आणि देऊळ डोंगरावर होतं पायऱ्या चढायच्या होत्या. दोघी बहिणी पुढे गेल्या मी आणि मावशी एका पडक्या दुकानाच्या शेडच्या खाली उभे राहिलो. मला थंडी वाजायला लागली मी थर थर कापायला लागलो. मावशीने मला जवळ घेतलं आणि पदराने माझं डोकं पुसलं, चेहरा पुसला मला घट्ट धरून म्हणाली अरे तू एवढा मस्तीखोर कोणाला न घाबरणारा देवाचं नाव घे. सर्व ठीक होईल, आपण पायरी चढून देवाचं दर्शन घेऊया, महागणपती सर्वांचं रक्षण करेल. मला थोडासा धीर आला, मी मावशीला म्हटलं चल आपण निघुया. आजूबाजूला न बघता पायऱ्या चढत होतो. एरवी तिकडे खूप माकडं असायची. मी त्या माकडांना दगड मारायचो जीभ बाहेर काढून काखेत हात घालून तोंड वाकडे करून चिडवायचो. तिकडच्या लोकांकडून मारपण खाल्ला आहे. खूप मस्ती करायचो. आज शांत होतो. अंगात ताप होता. मंदिर गाठलं, थंडी भरून हात पाय कापत होते. मंदिरात पाच प्रदक्षिणा घातल्या. बाप्पाला नमस्कार केला, तीर्थ प्रसाद घेतला. थोडावेळ बसलो मग आम्ही खिडकीजवळ येऊन प्रसादाच पाकीट घेतलं आणि निघालो. पायऱ्या उतरून खाली आलो तोपर्यंत पाऊस थांबला होता. बस पकडून घरी पोचलो. मावशीने ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं. सतत आठ दिवस ताप होता आणि आज भरपूर भिजलो होतो.. डाक्टर आले. मावशीने आपण देवळात गेलेलो आणि पावसात भिजलो हे सांगायचं नाही असं बजावलं होतं, मी गप्प राहिलो. त्यांनी तपासलं, थर्मामीटरने चेक केलं. ताप चक्क कमी झाला होता. डॉक्टर बोलले ह्याला आता ताप नाहीये. खरंच हा चमत्कार होता आठ दिवस औषधं घेऊन बरा न झालेला  ताप एका दिवसात आटोक्यात आला होता. फक्त मावशीची श्रद्धा आणि माझ्यावरचं प्रेम होतं.



घरी ताई आणि भाऊ मोठ्या बहिणीकडे जाणार असं चर्चा सुरू होती. मी ऐकलं.. मी पण येणार हट्ट असा धरला. मला नाही नेलं तर विहिरीत उडी मारणार.. आणि मी जोरात रडायला लागलो. रडताना कान नखांनी खाजवायचो, रक्त यायचं.. शेवटी ताई तयार झाली. दोघांना नेण्याइतके पैसे नव्हते. भावाला सोडून मला नेण्याचा निर्णय झाला. तो बिचारा साधा होता. माझ्यासाठी एक नवीन शर्ट आणि चड्डी आणली, कपडे वगैरे घेतले कापडी पिशवीत आणि आम्ही निघालो. मोठ्या बहिणीचं नाव 'इंदिरा'. तिकडचं आडनाव शेनॉय. तिचं गाव कळसा श्रींगेरी जवळ चिकमंगळूर जिल्हा. जिथे इंदिरा गांधी इलेक्शनला उभ्या राहून जिंकल्या होत्या. कुंदापूरवरून चार बस बदलायला लागायच्या. आम्ही पहाटे निघालो पहिली बस 'कुंदापूर' ते 'सोमेश्वर'. दहाच्या सुमारास सोमेश्वरला पोचलो. तिकडे एका हॉटेलात बन्स खाल्ले. बन्स हे मैदाचं पीठ,  साखर, पिकलेली केळी मिक्स करून एक रात्र ठेवतात. दुसऱ्या दिवशी रोटीसारखं लाटून तेलात तळतात. दोन तीन खाल्लेतरी पोट भरून जातं. आम्ही बस स्टॉपवर थांबलो. तिकडून आम्हाला छोटी बस मिळणार होती. पुढचा स्टॉप 'आगुंभे' होता. बस स्टॉपवरून बसेस घाटावरून  जाताना दिसत होत्या. बस आली, आम्ही बसमध्ये चढलो.. बस निघाली. सर्व शांत झाले होते. रस्ता अरुंद होता. अनेक वळणं होती, जस-जशी बस पुढे जात होती तस-तशी खाली खोल दरी  दिसायला लागली. जे सर्व पहिल्यांदा आले होते ते सर्व जीव मुठीत धरून बसले होते. पुढचं स्टॉप आला 'आगुंभे'. तिकडून दुपारी तिसरी बस पकडून आम्ही 'कोपा'ला पोचलो. शेवटची बस पकडून रात्री 'कळसा'ला पोचलो. बहिणीचं घर डोंगरावर होतं. आम्ही येणार म्हणून घरच्यांना माहीत होतं. त्यांना बसची वेळ माहीत होती. ते कंदील घेऊन आले होते. त्यांना रोजची सवय होती, ते सरळ चालत होते. आम्ही त्यांच्यामागून चालत होतो. अंधार होता काहीच दिसत नव्हतं. थोड्यावेळाने घरी पोचलो. खूप थंडी होती. प्रवास आणि डोंगर चालून दमलो होतो, जेवण करून झोपलो. घर खूप मोठं होतं. एकूण बत्तीस लोक राहत होते. सकाळी उठलो, नाश्ता केला. समोर डोस्याचा ढीग होता. एक एक करून नाश्ता करत होते. सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत नाश्त्याची जबाबदारी बहिणीकडे होती. नाश्ता झाला. तिकडची मुलं मला बागेत घेऊन गेली. त्यांची सुपारी, वेलची आणि कॉफीची बागायत होती. छोट्या बागेत पेरू, संत्रा, चिकू, पपई, आंबा, केळी फळांची भरपूर झाडं. खूप आनंद झाला मी बघतंच राहिलो. तिकडे सर्वजण झाडांवर चढायला पटाईत होते. आज मी त्यांच्याबरोबर होतो. ती झाडं, त्यांच्यावरची फळं बघून कुठल्या झाडावर चढायचं, कुठली फळं खायची.. समजेनास झालं. बगीच्यात फुलं पण पुष्कळ होती गुलाब, शेवंती, डेलिया, दासवंती, गोंडा. सिनेमात दाखवतात तशी. दुपारी आम्ही सर्व घरी पोचलो. जेवण तयार होतं. थंड वातावरणामुळे भूक जास्त लागत होती. घरच्या ताज्या भाज्यांचं जेवण पोटभर जेवलो. दुपारी कधी न झोपणारा मी आज गाढ झोपी गेलो. संध्याकाळी मोठी माणसं पत्ते खेळायला लागले. आम्ही लहान मुलं लंगडी आणि कबड्डी खेळत होतो. रात्री जेवण करून गप्पा मारत होतो. मला कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठून निघायची तयारी. खाली उतरलो. रस्त्यात एक आंब्याचं झाड होतं. त्याला छोटे छोटे भरपूर आंबे लागले होते. मी जवळपास बघितलं काठी दिसली, फेकून मारली सात आठ छोटे छोटे आंबे पडले. एक आंबा ठेवून बाकीचे ताईकडे दिले आणि आंबा खात खात परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.