Monday, September 7, 2020

हॉटेल ताज पॅलेसमध्ये दुसर्‍या दिवशी मला भेटलेले देव...

'आनंद पोटात माझ्या मावेना हो मावेना' या भक्तीगीतामध्ये विविध देवांच्या दर्शनाला नुसते जायचे म्हटल्यावर होणार्‍या आनंदमय मनःस्थितीचे वर्णन भाविक करत आहे. परंतु जर आपल्या मनातील देव स्वतःहूनच आपल्याजवळ चालत आले तर मग त्या भाविकाच्या आनंदाला काही सिमाच शिल्लक रहाणार नाही हे सुज्ञांस सांगणे न लगे. दिल्लीच्या हॉटेल ताज पॅलेसमध्ये पोहोचल्यापासून दररोज संध्याकाळी मी सुमनला फोन करून वाचनालयाच्या कामकाजाचा चौकशीवजा आढावा घ्यायचो. पैसे किती जमा झाले? दिवसभरात किती सभासद आले? नवीन पुस्तकं आली आहेत का? वगैरे इत्थंभूत विचारपूस करायचो. तसेच आमच्या कंपनीच्या चर्चासत्राची सर्व माहिती मी सुमनला द्यायचो. फक्त रुपये २०००/- खर्च करून साडी घेतल्याची माहिती तिला दिली नव्हती. ती साडी थेट डोंबिवलीला पोहचल्यावरच सुमनला दाखवायची असं मी ठरवले होते. दिल्लीला येऊ न शकलेल्या माझ्या चमूतील (टीममधील) काही सभासदांना मी दूरध्वनीवरून दररोजच्या चर्चासत्राचा तपशीलवार वृत्तांत देत असे. व्यवसायवृद्धीसाठी मी नेहमी त्यांच्या संपर्कात रहाणे आवश्यक असल्याने या सर्व व्यवसायिक शिष्टाचारांचे मी नियमितपणे पालन करत होतो.

मंगळवारी दुसऱ्या दिवशीच्या चर्चासत्राला सुरुवात झाली. त्या दिवशी सर्वजण वेळेच्या आधीच सभागृहामध्ये हजर झाले होते. 'पुढल्यास ठेच अन् मागचा शहाणा' या उक्तीनुसार उशीरा पोहचल्यामुळे पहिल्या दिवशी जो फटका काहीजणांना बसला होता त्यामुळे आता सर्वांनाच वेळ पाळण्याचे महत्व समजले होते. त्या दिवशी श्री. वसंत पंडित काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः सहा महिन्यात विविध हर्बल उत्पादने (प्रॉडक्ट्स) उपलब्ध होणार होती. दिवसभरातील चर्चासत्रामध्ये आमच्या कंपनीच्या नवीन येणाऱ्या हर्बल उत्पादनांची माहिती देण्यात आली. शँपू, फेस पावडर, फेस वॉश सारख्या बर्‍याच हर्बल उत्पादनांची आम्हाला माहिती देण्यात आली. विक्रीच्या दृष्टीने ही माहिती खूप उपयुक्त होती.

दुसऱ्या दिवशीचे चर्चासत्र संपल्यावर आम्ही आमच्या निवासकक्षात (रूमवर) पोहचलो. चर्चासत्रामध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. मी विचार करत होतो या चर्चासत्रासाठी कधीपासून तयारी केली गेली असेल? जागा निवडण्यापासून आमच्या सर्वांचे राहणे, सकाळचा नाष्टा, जेवण, सभागृहाची व्यवस्था सर्वकाही योजनाबद्ध होते. या मागची यंत्रणा कशी कार्यवाही करत असेल याचा मी विचार करत होतो. त्यातून खूप काही शिकण्यासारखे होते. त्या दिवशी सुद्धा आमचे पोहायला जायचे ठरले. आम्ही सर्वजण स्वीमिंग पूलावर जाण्यासाठी निवासकक्षातून (रूममधून) बाहेर पडलो. उद्-वाहनाने (लिफ्टने) खाली उतरून दरवाजाच्या दिशेने निघालो. बाहेर बघतो तर ताज पॅलेस हॉटेलच्या बाहेर पुष्कळ गर्दी जमलेली दिसत होती. त्या गर्दीमध्ये महाविद्यालयीन मुलींची संख्या जास्त दिसत होती. मला वाटले कोणीतरी नट-नटी आले असतील त्यांना बघण्यासाठी एवढी गर्दी जमली असेल. उत्सुकता म्हणून आमच्यापैकी एकाने स्वागतकक्षाकडे (रिसेप्शन कौऊंटर) जाऊन चौकशी केली. उद्या दिल्लीत होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यासाठी भारत व न्यूझीलंडचे संघ हॉटेलमध्ये उतरले आहेत अशी माहिती मिळाली. नट-नट्यांना नव्हे तर क्रिकेटपटूंना बघण्यासाठी एवढी गर्दी जमली होती हे तेव्हा लक्षात आले.

सन १९९९ साली न्यूझीलंडचा क्रिकेट संघ भारत दौर्‍यावर आला होता. दिल्लीमध्ये मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना होणार होता. दिनांक १७ नोव्हेंबरला म्हणजे उद्याच तो सामना दिल्लीत खेळला जाणार होता. जो संघ तो सामना जिंकेल तो संघ मालिका व चषक दोन्ही खिशात घालणार होता. सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. कपिल देव भारतीय संघाचे प्रशिक्षक (कोच) होते. सौरव गांगुली, अजय जडेजा आणि सचिन यांच्या खेळाची कारकिर्द ऐन भरात (फुल फॉर्मात) आली होती त्यामुळे आपण जिंकण्याची शक्यता मला जास्त वाटत होती. भारतीय संघाने सामना जिंकावा जेणेकरून मालिका सुद्धा आपण जिंकू अशी मला तीव्र इच्छा होत होती.

आज आम्ही सर्वजण पोहून झाल्यावर लगबगीने निवासकक्षाकडे (रूमवर) निघालो कारण आम्हाला क्रिकेटपटूंना बघण्याची उत्सुकता होतीच. क्रिकेट संघ आणि आम्ही एकाच हॉटेलमध्ये म्हणजे ताज पॅलेसमध्ये असल्याने त्या क्रिकेटपटुंना पाहण्याची आयती संधी आमच्याकडे चालून आली होती. आमचे देव आमच्याकडे चालून आले होते. निवासकक्षात जाऊन घाईघाईने कपडे बदलून खालच्या सभागृहाकडे जाण्यासाठी निघालो. उद्-वाहनातून (लिफ्टमधून) बाहेर पडताच समोर न्यूझीलंडचे दोन क्रिकेटपटू दिसले. कदाचित ते दोघे फलंदाज (बॅट्समन) असावेत कारण त्यांच्या दोघांच्या हातात बॅट होती. ते नुकतेच सराव करून हॉटेलमध्ये परतले होते. ते दोघे वयाने खूप लहान वाटत होते. ते इतके गोरे होते की त्यांचे केस सुद्धा पिंगट रंगाचे होते. उंची जवळपास सहा सव्वासहा फूट असावी. त्यांना बघायला मला मान वर करावी लागत होती.आमच्यापैकी एकाने त्यांच्याशी इंग्रजीमधून बोलण्यास सुरुवात केली. ते दोघे न्युझिलँडर्स जलद गतीने इंग्रजीत बोलत असल्याने त्यांचे उच्चार व ते काय बोलत आहेत ते मला काही कळत नव्हते. त्यांची परवानगी घेऊन आम्ही त्यांच्या सोबत काही छायाचित्रे (फोटो) काढली. त्यांना बघण्यासाठी बाहेरच्या बाजूला गर्दी जमली होती.

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू बरोबर छायाचित्र (फोटो) काढत असताना भारतीय संघाचे काहीजण आपल्या निवासकक्षातून बाहेर पडून खाली आले तेव्हा एक गंमत झाली. हॉटेलबाहेर जी महाविद्यालयीन तरूण मुले व मुली ताटकळत उभी होती ती दरवाज्यावर उभ्या असलेल्या दोघांची परवानगी घेऊन आत शिरली. त्यात जास्ती करून मुलीच होत्या. आम्ही मागे वळून पाहीले तर अजय जडेजा तिथे आला होता. अजय जडेजा प्रत्यक्षात दिसायला देखणा होता व त्याची केशरचना (हेअर स्टाईल) तर मस्त भन्नाट होती. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तो मैदानात असताना खूप करमणूक करायचा. आपल्या क्रिकेट संघात सचिन तेंडुलकर सर्वात लोकप्रिय होता. पण इथे सर्व अजय जडेजाचे चाहते होते. त्याच्या चाहत्यांमध्ये जास्त करून मुली होत्या. त्यांना तो अधिक आवडत असे. तो बाहेर येताच मुलींची त्याच्याभोवती झुंबड उडाली. कोणी त्याच्या बरोबर छायाचित्र (फोटो) काढतोय तर कोणी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तर कोणी त्याची सही घेतोय असं दृश्य त्यावेळी पहायला मिळाले. सर्वजण त्याला पाहण्यात मग्न होते. प्रवास करून आल्यामुळे तो जास्त वेळ न थांबता निवासकक्षाकडे (रूमवर) निघून गेला.

मी लहानपणापासून क्रिकेटचा चाहता होतो. मला क्रिकेट खेळायला व बघायला दोन्ही आवडत असे. मला भारतीय संघाचा अभिमान वाटायचा. नेहमी आपणच जिंकावे असं वाटायचे. पण खेळाच्या नियमाप्रमाणे दोन संघापैकी एक संघ जिंकणार तर एक संघ हरणार हे नक्की होते. उत्तम कामगिरी करून हरलो तर काही वाटत नसे. सामना वरच्या दर्जाचा व बरोबरीचा झाला पाहिजे असं नेहमी वाटत असे. अन्यथा निराश व्हायचो. जेव्हापासून कपिल देवने भारतीय संघात प्रवेश केला तेव्हापासून आपण जिंकण्याची शक्यता जास्त वाटू लागली होती. कपिल देव यांनी भारतीय संघाला खूप मोठे नाव मिळवून दिले होते. त्यांनी कुठल्याही कारणास्तव एकही सामना न चुकवता सलग सर्व सामने खेळले होते. त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटायचा. आता तर कपिल देव निवृत्त होऊन भारतीय संघाचे प्रशिक्षक (कोच) म्हणून जवाबदारी सांभाळत होते. आपण कपिल देव यांना प्रत्यक्ष कधी भेटु शकतो याचा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. आज ती संधी माझ्याकडे चालून आली होती. मग आनंद पोटात कसा मावेल? 


कपिल देव आणि त्यांच्याबरोबर काही लोकं त्याच्या निवासकक्षातून (रूममधून) बाहेर पडले. उद्-वाहनाने (लिफ्टमधून) खाली येऊन एका कोपऱ्यात दोघांशी बोलत होते. मला विश्वासच बसत नव्हता की मला सर्वात जास्त प्रिय असलेल्या क्रिकेटपटूला मी प्रत्यक्ष 'चक्षुर्वै सत्यम्' असे पाहत होतो. आम्ही सर्वजण त्याच्या अगदी बाजूला जाऊन उभे राहिलो. कपिल देव यांनी अगदी साधे कपडे परिधान केले होते. त्यांचे बोलणे, हसणे, चेहऱ्यावरचा हावभाव सर्वांकडे माझे बारीक लक्ष होते. अगदी सर्वसामान्य माणसांसारखे ते वागत होते. त्यांचे बोलणे संपल्यावर त्यांचे आमच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी आम्हाला बोलावून घेतले. आम्ही सर्वजण काही मिनिटे त्यांच्याशी संवाद साधला. उद्याच्या सामन्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. नंतर आम्ही त्यांच्या बरोबर छायाचित्रे (फोटो) सुद्धा काढली. हा सोनेरी क्षण माझ्या आयुष्यातील असा एक अविस्मरणीय क्षण होता की त्या एका सोनेरी क्षणात मी खूप मोठे आयुष्य जगल्याचा मला आनंद मिळाला. हा आनंद पोटातच काय संपुर्ण आसमंतात कुठेच मावत नव्हता.

6 comments:

  1. अरे वाह ! पामोलाईव का जवाब नही !!

    ReplyDelete
  2. अजून किती बाकी आहे,,ह्याचे एक पुस्तक काढा व वाचनालयात ठेवा,,एकत्र वाचायला फार आवडेल

    ReplyDelete