'A Rolling Stone gathers no Moss' म्हणजे पाण्याच्या प्रवाहात सतत हलत रहाणार्या दगडाला शेवाळे लागत नाही. जीवन प्रवाहात जो थांबतो तो संपतो. 'गणपत वाणी विडी चघळता चघळता एक दिवशी मरून गेला' असं कवीवर्य बा. सी. मर्ढेकर हे जीवन प्रवाहात थांबून राहण्यातच धन्यता मानणार्यांना उद्देशून म्हणतात. 'आम्ही पन्नास वर्षापासून व्यवसाय करतो. आमची कुठेही शाखा नाही' यात अभिमान व भूषण मानण्यासारखे काय आहे? मुंबईच्या नरिमन पेरिमन गल्लीत फक्त एका टेबलखुर्चीवर बसून चालू केलेल्या आपल्या व्यवसायाचे पन्नास वर्षात जगभर साम्राज्य निर्माण करणारे धिरूभाई अंबानी कुठे तर पन्नास वर्ष व्यवसायाला होऊन सुद्धा आमची कुठेही शाखा नाही म्हणून अभिमान बाळगणारे थांबलेले व्यवसायिक कुठे? गाढवाच्या पाठीवरून माती वाहीली काय कींवा सोन्याच्या विटा वाहील्या काय त्याला त्याच्याशी काही देणेघेणे नसते. तो मुकाट्याने आपले आझे वाहून नेण्याचे काम करत रहातो. त्याप्रमाणे आमची कुठेही शाखा नाही असं सांगणारे पन्नास वर्षापासून फक्त गल्ल्यावर बसून नोटा मोजण्याचे काम दोन-तीन पिढ्यांपासून गुमानपणे करत आलेले असतात. अर्थात माझ्या व्यवसायाच्या सुरूवातीच्या काळात मी जेव्हा 'आमची कुठेही शाखा नाही' असे फलक काही दुकानांवर लावलेले पहायचो तेव्हा या मागचे कारण काय ते मला त्यावेळी माहित नव्हते. एखाद्या व्यवसायाची शाखा का असू नये याचा मी त्यावेळी नेहमी विचार करत असे. फ्रेंड्स लायब्ररीची शाखा सुरू होऊ शकते का यावर मी अद्याप विचार केला नव्हता. एक मोठे भव्य दिव्य वाचनालय असावे असे स्वप्न मी नेहमी उराशी बाळगले होते. सभासदांना अधिकाधिक उत्तम सेवा कशी देता येईल, दर्जेदार पुस्तकं नेहमी उपलब्ध असतील, सोयीस्कर जागा असेल, पुस्तक व वाचन संस्कृती संबंधित विविध उपक्रम राबवणे इत्यादी व्यवसाय निगडीत बाबींवर मी विचार करायचो. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असायची. परंतु भविष्यकाळात पै फ्रेंड्स लायब्ररीची शाखा सुरू होईल याचा मी कधी विचार केलेला नव्हता.
जपान लाईफ कंपनीत माझ्या गटामध्ये (टीममध्ये) श्री. अमोद नाईक सभासद (जॉईन) झाले. ते टिळकनगर मधील त्रिमूर्ती सोसायटीमध्ये राहायचे. श्री अमोद नाईक इलेक्ट्रीक व इन्व्हर्टर संबंधित छोटे मोठे व्यवसाय करायचे. ते फ्रेंड्स लायब्ररीचे सुद्धा सभासद होते. त्यांची पत्नी सौ. रचना नाईक पट्टीच्या वाचक होत्या. श्री. अमोद, सौ. रचना आणि त्यांचा मुलगा नेहमी वाचनालयात पुस्तकं बदलायला यायचे. त्यांच्या मुलाला कार, मोटार यांच्या नवीन नवीन मॉडेलची माहिती देणारी मासिकं वाचायला खूप आवडायचे. अश्या प्रकारची मासिकं नेहमी वाचत असल्याने त्याच्याजवळ जगातील बहुतेक कार, मोटार मॉडेलची माहिती असायची. श्री. अमोद नियमितपणे वाचनालयात येत असल्यामुळे माझी त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती.
श्री. अमोद व त्यांची पत्नी सौ. रचना एकदिवशी वाचनालयात पुस्तक बदलायला आले होते. नेहमीप्रमाणे जपान लाईफ व्यवहारासंबंधी आम्ही गप्पा मारत होतो. डोंबिवलीत एम.आय.डी.सी. परिसरात पै फ्रेंड्स लायब्ररीची शाखा उघण्याची कल्पना दोघांनी माझ्यासमोर मांडली. "आता फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवलीतील वाचकांमध्ये बहूचर्चित झाली आहे. एम.आय.डी.सी. परिसरात एकही वाचनालय नाही. तिथल्या वाचकांना इथे लांबवर यावे लागते. तेव्हा आपण दोघांनी भागीदारी तत्वावर वाचनालयाची शाखा सुरु करू या का?" असं त्या दोघांनी विचारले. मी यावर कधी विचार केला नव्हता. ''शाखा सुरु करण्याबाबत विचार करावा लागेल. मला थोडा वेळ द्या. मी विचार करून कळवतो", असं मी त्यांना म्हणालो.
श्री. अमोद यांच्या पत्नी सौ. रचना या स्वतः एक उत्तम वाचक असल्याने श्री. अमोद यांच्यापेक्षा त्यांना वाचनालय चालवण्यात जास्त अभिरूची होती. त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर मी गंभीरपणे सखोल विचार करू लागलो. फ्रेंड्स लायब्ररीत पंधरा हजाराहून अधिक पुस्तके जमा झाली होती. सभासद संख्या सुद्धा वाढत होती. श्री. अजय आणि मामा चांगल्या पद्धतीने वाचनालय सांभाळत होते. मी जपान लाईफच्या ठाणे कार्यालयामध्ये जात असल्याने वाचनालयासाठी मला जास्त वेळ देता येत नव्हता. एम.आय.डी.सी. परिसरात लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत होती. त्या परिसरात एकही वाचनालय नसल्याने वाचकांना लांबवर हेलपाटा पडत आहे हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे त्या परिसरात वाचनालय चांगले चालु शकेल या निष्कर्षाप्रत मी आलो होतो. या विषयावर सविस्तर चर्चा करण्याचा निरोप मी श्री. अमोद यांना पाठवला.
नवीन शाखा उघण्यासाठी बर्याच प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार होती. वाचनालयाची जागा कशी असेल? ती कशी शोधणार? पुस्तके खरेदी कशी करणार? तिकडे कोण लक्ष देणार? वगैरे प्रश्नांबरोबर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे भांडवल कसे उभे करणार? व भागीदारीचे स्वरूप कसे असेल? याआधी मी कोणताही व्यवसाय भागीदारीमध्ये केला नव्हता. पैशांच्या व्यवहारामुळे संबंध तुटू नये असे माझे ठाम मत होते. माझे श्री. अमोद यांच्याशी खूप चांगले संबंध होते. भागीदारीमुळे अनेक लोकांचे संबंध तुटलेले मी पाहिले व ऐकले होते. माझ्याबाबतीत तसे होणे मला बिलकुल मान्य नव्हते. पुष्कळ विचार व चर्चा झाल्यावर भांडवल व नफा-तोटा बरोबरीने वाटून घ्यायचे आम्ही ठरवले.
वाचनालयासाठी जागा शोधण्याची जवाबदारी सौ. रचना यांनी घेतली. डोंबिवली रेल्वेस्थानका नजीकच्या भागात गर्दी वाढत चालली होती. एम.आय.डी.सी.परिसरात मोकळी व हवेशीर अशी चांगली जागा स्वस्त दरात मिळत असल्याने आता लोकं तिकडे स्थलांतरीत होऊ लागले होते. परिणामतः एम.आय.डी.सी. परिसरात लोकसंख्या वाढत चालली होती. मिलापनगरच्या मागच्या बाजूला दोनशे चौरस फूट जागा भाड्याने मिळत होती. श्री. अमोद व सौ. रचना यांच्याबरोबर मी जागा पहायला गेलो. मला जागा खूप आवडली नव्हती परंतु स्वस्तात मिळत असल्याने मी होकार दिला. आमच्यामध्ये लिखीत स्वरूपात भागीदारी झाली नव्हती. जे काही ठरले होते ते सर्व तोंडी ठरले होते. दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. जागा नक्की झाल्यावर मग मी पुढच्या तयारीला लागलो.
जागा मालकाला अनामत रक्कम (डिपॉझिट) देऊन जागा ताब्यात घेतली. जागा छोटी होती. त्या जागेसाठी आवश्यक असलेल्या फर्निचरचे काम सुरू केले. नवीन वाचनालय सुरू करण्यासाठी कमीत कमी दोन हजार पुस्तकांची जमवाजमव करायला लागणार होती. टिळकनगर येथील वाचनालयातील दोन प्रती असलेली सर्व पुस्तकं बाजूला काढली. तसेच खासकरून नवीन शाखेसाठी सुप्रसिद्ध लेखकांची काही पुस्तक विकत घेतली. त्या सर्व पुस्तकांना क्रमांक देण्यात आले व एकदिवस ठरवून ती सर्व पुस्तके नविन वाचनालयाच्या कप्प्यांमध्ये व्यवस्थित लावून ठेवली.
एम.आय.डी.सी. मधील नवीन शाखा थोडीशी आतील भागात असल्या कारणाने थोडीफार जाहिरात करणे गरजेचे होते. त्याआधी उद्-घाटन कोणाच्या हस्ते करायचे याचा प्रश्न होता. डोंबिवलीतील सुप्रसिद्द साहित्यिक श्री. श.ना. नवरे यांना बोलवण्याचे ठरविले. त्यासाठी शुभ दिनांक नक्की करणे गरजेचे होते. श्री. अमोद, सौ. रचना आणि मी आम्ही तिघांनी मिळून रामनवमीचा मुहूर्त ठरवला. कुठलेही मंगल कार्य पार पाडण्यासाठी यापेक्षा चांगला मुहूर्त मिळणे कठीण होते. श्री. श.ना. नवरे यांना पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण दिले. आमंत्रणाचा मान राखून त्यांनी उद्-घाटनाला येण्याचे मान्य केले.
सोमवार दिनांक २ एप्रिल रोजी फ्रेंड्स लायब्ररीच्या पहिल्या शाखेचे उद्-घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. श. ना. नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याचे सर्वात मोठे श्रेय माझा मित्र श्री. अमोद नाईक यांची पत्नी सौ. रचना नाईक यांना जाते. मी ठाण्याच्या कार्यालयातील कामात व्यस्त असल्याने मला वेळ काढता येणे कठीण होते. त्यामुळे सौ. रचना नाईक यांनी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या सल्ल्यानुसार फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखेची स्थापना केली होती. उद्-घाटनाच्या पहिल्याच दिवशी तीन सभासदांनी आपले नाव नोंदवले होते. मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की एखाद्या वाचनालयाची शाखा असू शकते. 'आमची कुठेही शाखा नाही' या प्रगतीशील जीवन प्रवाहाला थांबवून ठेवणार्या विचाराला मी मुठमाती दिली होती......
कदम कदम बढाये जा...
ReplyDeleteज्योत से ज्योत जलाते चलो
ReplyDelete,,,,सुभाष