'एक शहेनशाहने हसीन ताजमहल बनवा के सारी दुनिया में हम गरीबों के मोहब्बत का मजाक उडाया है।' असं साहीर लुधियानवी जे म्हणतो ते कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. आम्ही शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या हॉटेल ताज पॅलेसमध्ये पोहचलो. सोमवारपासून तीन दिवसाच्या चर्चसत्राला प्रारंभ होणार होता. आम्ही सर्वजण रविवारी सुट्टीच्या दिवशी काय करायचे याचा विचार करत होतो. हॉटेलवर पोहचल्यावर सर्वात प्रथम आंघोळ करून ताजेतवाने झालो. खाली असलेल्या भोजनकक्षामध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. जेवून परत खोलीवर आलो. आमच्यापैकी एकाने रविवारी आग्र्याला ताज महाल पाहायला जाण्याचा विचार मांडला. 'सकाळी लवकर निघायचे व ताज महाल पाहून झाल्यावर मग आग्रा शहरात थोडे फिरून संध्याकाळी परत यायचे' या त्यांच्या कल्पनेला सर्वांनी सहमती दर्शवली. तसाही सर्वांकडे पुरेसा वेळ होता व परत कधी अशी संधी मिळेल की नाही याची खात्री नसल्याने आम्ही सर्वजण तयार झालो.
हॉटेल ताज पॅलेस खूप मोठ्या जागेवर पसरले होते. जिम, स्विमिंग पूल, सोनाबाथ, बॅडमिंटन कोर्ट अश्या अनेक सुखसोयी व सुविधा तेथे उपलब्ध होत्या. हॉटेलात उतरलेले काही लोकं सकाळी लवकर उठून बगीच्यामध्ये फेरफटका मारत होते. आम्ही सर्वजण लवकर उठलो. सर्वांनी सोनाबाथ (स्टीमबाथ) घ्यायचे ठरवले. अर्धा तास तरी सोनाबाथचा आनंद लुटण्यात आम्ही सर्वजण मग्न होतो. मग खोलीवर येऊन आग्र्याला निघायच्या तयारीला लागलो. मी सर्वांसाठी चहा बनवला. चहा पिऊन आठच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडलो.
आम्ही सहा जण होतो त्यामुळे दोन टॅक्सी करायला लागल्या. टॅक्सी करून दिल्ली रेल्वे स्थानक गाठले. रेल्वे स्थानकाच्या बाहेर छोट्याशा उपहारगृहात सर्वांनी पुरी व छोलेबटुरेचा आस्वाद घेतला. छोलेबटुरे म्हणजे काबुलीचण्याची भाजी जी पुरी बरोबर मस्त लागत होती. नाष्टा झाल्यावर आग्र्यासाठी सहा तिकीटे काढली. सकाळी नऊ वाजता आग्र्याला जाणारी पॅसेंजर गाडी आली. आम्ही सर्वजण गाडीमध्ये चढत असताना मी सर्वात मागे होतो. मुंबईच्या उपनगरीय लोकलसारखी गाडीमध्ये गर्दी नव्हती. परंतु गाडीत चढत असताना माझा एका माणसाला चुकून धक्का लागला. तो माणूस हिंदीमध्ये खेकसला, "दिखता नहीं है क्या? पहिली बार गाडी से सफर कर रहे हो क्या?" मग मी कशाला गप्प बसतोय? माझ्याबरोबर अजून पाच जण होते म्हणून मी सुद्धा आवाज चढवत म्हणालो, "आप को दिखता नहीं क्या?" नंतर बघतो तर काय! गाडीमधील सर्व प्रवासी त्याच्या ओळखीचे होते. बहुधा ते सर्व नियमितपणे दिल्ली-आग्रा प्रवास करणारे असावेत. ते सर्वजण माझ्याविरोधात आरडाओरडा करू लागले. आमच्यापैकी एकाने मला सांभाळले आणि त्या बाकीच्या सर्वांना शांत केले. सर्व शांत झाले म्हणून ठीक अन्यथा ती एवढी माणसे आणि आम्ही फक्त सहाजण. सर्वांनी मार खाल्ला असता. गाडीमध्ये त्यांच्याबरोबर आग्रा येईपर्यंत म्हणजे कमीत कमी दोन तीन तास काढायचे होते. मग आम्ही सहाजणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. नंतर ते प्रवासी सुद्धा शांत झाले. दुपारी बाराच्या सुमारास आग्रा स्थानकावर उतरलो. स्थानकाबाहेरून दोन रिक्षा केल्या व ताज महालच्या दिशेने रवाना झालो.
आग्रा स्थानकापासून ते ताज महालपर्यंत रिक्षाने पोहचायला अर्धा तास लागला. ताज महाल पाहण्याची सर्वांना खूप उत्सुकता होती. आतापर्यंत ताज महाल छायाचित्रात व चित्रपटात पाहिला होता. तसेच ताज महालबद्दल अनेक गोष्टी वाचल्या व ऐकल्या सुद्धा होत्या. परंतु आज प्रत्यक्ष ताज महाल पाहणार होतो. अर्ध्या तासाने रिक्षा ताजमहालाच्या बाहेर असलेल्या तिकिटगृहासमोर थांबली. आम्ही रिक्षातून उतरलो व तिकीटगृहातून ताजमहाल पाहण्यासाठी सहा तिकीटे काढली. प्रत्येकी वीस रुपये असा काहीतरी तिकीटाचा दर त्यावेळी होता. ताज महालची सर्व माहिती घेण्यासाठी मार्गदर्शक (गाईड) करायचा का यावर चर्चा करून सर्वसंमतीने आम्ही मार्गदर्शक बरोबर घ्यायचा निर्णय घेतला. आम्ही सर्वजण ताज महालच्या प्रांगणात पोहचलो आणि समोरील दृश्याने डोळे दिपून गेले. जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेला ताज महाल प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर होता. जगातल्या सात पैकी एक अद्-भूत, अद्वितीय, विलोभनीय वास्तू ताज महल ही आपल्या देशात आहे म्हणून मला माझ्या देशाचा अभिमान वाटला.
ताज महालचा तो संपुर्ण परिसर देशी व परदेशी पर्यटकांनी भरलेला होता. भारताच्या विविध प्रांतातील पर्यटक त्यांच्या पोशाखावरून आणि त्यांच्या बोलण्यावरून समजत होते. विदेशी पर्यटकांनी त्यांच्या बरोबर मार्गदर्शकाला (गाईडला) घेतले होते. ते मार्गदर्शक त्यांना संपुर्ण माहिती देत होते. सर्वजण फोटो काढण्यात मग्न होते. संपूर्ण वातावरण उल्हासमय दिसत होते. आम्ही बरोबर घेतलेला मार्गदर्शक ताज महालची आम्हाला संपूर्ण माहिती देत होता. परंतु माझे लक्ष मात्र ताज महालकडे होते. संपुर्ण परिसर स्वच्छ होता. कचऱ्याचा एक कण सुद्धा दिसत नव्हता. पांढर्या शुभ्र रंगाचा चबुतरा व बाजूला ते चार खांब हे दृश्य समोरून लांबून सुंदर दिसत होते. वरती निळे आकाश व त्याच्या मध्ये ताज महालचा चबुतरा जणू काय गगनाला स्पर्श करतोय असे वाटत होते. ताजमहालाच्या प्रांगणातील प्रवेशमार्गावर मधल्या भागी कारंजी व दोन्ही कडेला रांगेत सुंदर झाडे लावली होती. त्यामधून आत जाण्याचा रस्ता. जसजसे जवळ गेलो समोर संगमरवराने बनवलेला रत्नजडीत ताज महाल अप्रतिम दिसू लागला. एवढ्या मोठ्या आकाराच्या घुमटला मध्ये कुठलाही आधार नव्हता. घुमटाच्या मध्यभागी खाली असलेल्या समाधीमुळे संपुर्ण वास्तुला कमालीचे सौंदर्य प्राप्त झाले होते. पर्यटक शांतपणे त्या कलाकृतीचा आनंद लुटत होते. भिंतीवरील नक्षीकाम जवळून पहिल्यावर निरनिराळ्या रंगाची रत्ने दिसून येत होती. हे सर्व पाहताना माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. या वास्तूचा कोणी विचार केला असेल? कोणाच्या विचारांनी ते स्वप्नं साकार झाले असेल? ते संगमरवराचे दगड जमा करून इथपर्यंत कसे आणले असतील? किती कारागीरांनी याला हातभार लावला असेल? किती पैसे लागले असतील? हे पूर्ण करायला किती दिवस लागले असतील? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात येत होते. मी प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत होतो. त्याकाळी आता सारखे तंत्रज्ञान नव्हते. एवढी यंत्रसामुग्री सुद्धा नव्हती. असं असूनही ज्या पद्धतीने ताज महाल बांधला होता ते खरोखरच कौतुकास्पद व आश्चर्यचकीत करणारे होते.
ताज महाल बघण्यासाठी दोन तीन तास लागले असतील. सर्वांना भूक लागली होती. जेवण करायचे होते तसेच थोडावेळ विश्रांती घेऊन तिकडच्या बाजारातून आठवण म्हणून स्थानिक वस्तूंची खरेदी करायची असल्याने फक्त दोन तासांसाठी जवळच उपलब्ध असलेली एक खोली आरक्षित (रूम बुक) केली. मग जवळच्याच एका उपहारगृहामध्ये जेवण करून दोन तास आराम केला. नंतर तिकडच्या बाजारात गेलो. मला सुमनसाठी साडी आणि संतोषसाठी खेळणं घ्यायचे होते. साडीच्या दुकानात शिरलो. तिकडच्या साड्या बघून हैराण झालो. माझे मित्र म्हणाले की आग्र्याची बांबू साडी जगप्रसिद्ध आहे. मग विचार केला बांबू साडी बघू या. माझ्यासाठी हा नवीनच प्रकार होता. दुकानदारांकडे त्याची चौकशी केल्यावर त्यांनी काही बांबू साड्या दाखवल्या. त्यातील मी निवडलेली पिवळ्या रंगाची साडी दुकानदाराने बाजूला ठेवलेल्या पोकळ बांबूमध्ये एका बाजूने टाकली आणि त्या बांबूच्या दुसऱ्या बाजूने काढून दाखवली. इतकी पातळ असलेली ती साडी दिसायला खूप सुंदर होती. आम्ही हे सर्व बघतच राहिलो. तिची किंमत रुपये २०००/- इतकी होती. मला ती खूप आवडली. किंमतीचा मी जास्त विचार न करता सुमनसाठी ती महागडी साडी विकत घेतली.
संतोषसाठी दोन खेळणी घेतली. माझ्या बरोबर असलेल्या बाकीच्यांनी सुद्धा स्थानिक वस्तू विकत घेतल्या. संध्याकाळी पाचच्या सुमारास आग्र्याहून निघून रात्री नऊपर्यंत दिल्लीचे हॉटेल ताज पॅलेस गाठले. पुढचे तीन दिवस चर्चासत्रात जाणार होते. रात्री झोपताना ताज महाल आणि सुमनसाठी घेतलेली बांबूची साडी सारखी डोळ्यासमोर येत होती. एक राजप्रेम पत्नीसाठी ताजमहाल बांधते त्याला लोकं अमुल्य व संस्मरणीय ठरवतात. परंतु एक सामान्य प्रेमवीर पत्नीसाठी साडी घेतो तीला लोकं स्वस्त किंवा महागडी का ठरवतात? त्या भेटीमागील सामान्य माणसाचे प्रेम सुद्धा राजाच्या प्रेमा इतकेच अमुल्य व चिरस्मरणीय नसते का? हेच बहुधा साहिर लुधियानावी लोकांना विचारत असावा...
ताजमहाल बघणं हा प्रत्येकाचं स्वप्न असतं....
ReplyDeleteतुम्ही ते पूर्ण केलं आणि आम्हालाही तो आनंद दिलाय,🙏
धन्यवाद
Deleteकाहीजण ताजमहाल बांधायची स्वप्नं सुद्धा बघतात परंतु मनात. त्यांना त्याची आवश्यकता नाही हे लेख वाचून समजते.
Deleteअरे वाह ! खूपच सुंदर वर्णन !!
ReplyDeleteधन्यवाद
Delete