Wednesday, September 9, 2020

मार्च २००० साली डोंबिवलीतील रस्ता रुंदीकरण मोहीम.....

'जीवनात ही घडी अशीच राहू दे' असं सर्व काही सुरळीत चालू असताना प्रत्येकालाच वाटते. परंतु परिवर्तन हा सृष्टीचा केवळ नियम नसून परिवर्तन हेच जीवन आहे हे व्यवसायिकाला पक्के ठाऊक असते. तो परिवर्तनातच जीवनाच्या प्रगतीची घडी बसवत असतो. परंतु दोलायमान जीवनात कधी एखादी घडी विस्कटू लागली तर तिला नव्या घडीत बसवून नव्या जीवनाची सुरूवात करायची हिंमत व्यवसायिकाला दाखवावी लागते. माझ्याही आयुष्यातील संसार व व्यवसायवृद्धीची घडी छान बसत असताना दुसरीकडे एक घडी विस्कटत आहे की काय असं वाटणारा एक प्रसंग घडला. आग्र्याहून आणलेल्या बांबूच्या साडीची घडी न विस्कटता सुमनला दाखवली. तिला ती साडी खूप आवडली. परंतु साडीची किंमत समजल्यावर ती म्हणाली, "एवढी महागडी साडी आणायची काय गरज होती? एवढ्या पैशात मी अजून पाच साड्या घेतल्या असत्या". तेव्हा तिची कशीतरी समजूत घातली. तिला साडीचा रंग व नक्षीकाम (डिझाईन) खूप आवडले. डिसेंबर महिन्यात आमच्या चमूने (टीमने) खूप मेहनत घेतली होती. ठाणे कार्यालयात येऊन खूप लोकांनी चर्चासत्राचा (सेमिनारचा) अनुभव घेतला होता. त्या लोकांपैकी काहीजण जपान लाईफ कंपनीचे सभासद (जॉईन) होण्यास इच्छुक होते. परंतु त्यासाठी भरावे लागणारे पैसे गोळा करून त्यांना सभासद करण्यासाठी वेळ लागत होता. जानेवारी महिन्यात खूप लोक पैसे भरून जपान लाईफचे सभासद (जॉईन) झाले. जानेवारी महिन्याचे माझे उत्पन्न जवळपास दोन लाख रुपये इतके होते. एवढी मोठी कमाई मी याआधी कधीच केली नव्हती. कंपनीची हर्बल उत्पादने (प्रॉडक्ट्स) लवकरच उपलब्ध होणार असल्याने अनेक लोकं उत्सुक होते. सर्वांना कमाईचा एक वेगळा मार्ग मिळणार होता.


सन २००० च्या फेब्रुवारीमध्ये टिळकनगर विद्यामंदिर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल असं मला मित्रांकडून अगोदरच समजले. आपले वाचनालय रस्त्याच्या वळणावर असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी वाचनालयाची किती जागा अधिग्रहीत केली जाईल याची चिंता मला भेडसावत होती. त्यावेळी डोंबिवलीतल्या काही रस्त्यांचे रुंदीकरण त्यांच्याकडेला असलेली दुकाने पाडून करण्यात आले होते. अनधिकृत बांधकामांमुळे लोकांना रस्त्यावर चालणे कठीण झाले होते. त्यात दिवसागणिक वाढत जाणार्‍या वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावर वारंवार रहदारीचा खोळंबा होत होता. त्यामुळे रस्ता रुंदीकरण अत्यंत गरजेचे व अनिवार्य झाले होते. भविष्यातील वाढीव लोकसंख्या व वाहनसंख्या यांचा विचार करून रस्ता रुंदीकरण केल्याने एकूणच रहदारीला श्वास घ्यायला थोडी मोकळी जागा मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे डोंबिवलीत रस्ता रुंदीकरणाची मोहीम जोरात राबविण्यात येत होती.


फ्रेंड्स लायब्ररी टिळकनगरच्या आतील मध्यवर्ती भागात होती. टिळकनगर हा डोंबिवलीतील उच्चभ्रू व सुशिक्षितांची वस्ती असलेला विभाग म्हणून गणला जातो. सुशिक्षित व प्रतिष्ठित लोकं मोठ्या संख्येने या विभागात राहत असल्याने तशी टिळकनगरची ख्याती झाली होती. टिळकनगर विभागाच्या मध्यभागी टिळकनगर विद्यामंदिर शाळा असून शाळेच्या समोर असलेल्या रामकृपा इमारतीत फ्रेंड्स लायब्ररी होती. आपल्या वाचनालयाच्या एका बाजूला पिठाची गिरणी दुसऱ्या बाजूला इस्त्रीचे दुकान व त्या व्यतिरिक्त अजून दोन दुकाने होती. रामकृपा इमारतीच्या मालकीणबाई मुरडेश्वर आजी होत्या. रस्ता रुंदीकरणात सर्व दुकानाचा थोडा थोडा भाग अधिग्रहित केला जाणारा होता. आम्हा सर्व दुकानदारांना ते मान्य होते.



फेब्रुवारी महिन्यात पालिका अधिकारी आपल्या वाचनालयासमोरील रस्त्याचे मोजमाप घेण्यास आले. त्यांनी रूंदीकरणासाठी निशाणी म्हणून लाल रंगाची रेषा आखली. लाल निशाणीपर्यंत भिंत तोडायला रविवारी येणार असल्याचे जाताना पालिका अधिकारी सांगून गेले. तेव्हा मी वाचनालयात नव्हतो. मला वाचनालयातून यासंदर्भात दूरध्वनी आला. त्यादिवशी मी संध्याकाळी घरी न जाता ठाणे कार्यालयातून थेट वाचनालयात गेलो. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली लाल रंगाची निशाणी पहिली. महापालिकेच्या नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरणासाठी वाचनालयाची दोन फूट जागा अधिग्रहित केली जाणार होती. पालिकेने ठरवलेले मला मान्य होते कारण त्याचा फायदा सर्व समाजाला होणार होता. रविवारी पालिकेचे कर्मचारी भिंत तोडायला येणार होते परंतु नेमके त्याच रविवारी मला खूप कामे होती. परंतु वाचनालयाची भिंत तोडली जाणार असल्याने मी त्या दिवशी बाहेर कुठेही न जाता वाचनालयातच थांबायचा निर्णय घेतला.


रविवार उजाडला. काही लोकांना भेटण्याचा कार्यक्रम होता त्या सर्वांना दूरध्वनीकरून कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. त्यादिवशी मी माझे इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. रविवारी सकाळी जास्त करून आमच्या घरी इडली सांबार असायचा. सुमनने बनवलेल्या सांबारची चव निराळीच. मी सात ते आठ इडल्या खायचो. गरम गरम इडली बरोबर मला लोणी सुद्धा लागायचे. लोण्यासाठी सुमनला जास्त दूध आणायला लागे. मला इडली असली की लोणी हवेच. त्या रविवारी इडली खाऊन मी वाचनालयात पोहचलो.


वाचनालयामध्ये अजय, मामा व शुभांगी तिघे होते. थोडावेळ त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या. मग बाहेर जाऊन अशोक प्लंबर, पिठाची गिरणीवाला, इस्त्रीवाला या बाजूला असलेल्या सर्व व्यवसायिकांना भेटलो. त्यांच्याशी बरेच दिवस संपर्क नव्हता. आज मी वाचनालयातच थांबणार असल्याचे त्यांना कळल्यावर त्यांना सुद्धा थोडा धीर आला. आम्ही सर्वजण पालिकेच्या लोकांची प्रतीक्षा करत होतो. दुपारचे बारा वाजले तरी कुणाचा पत्ता नव्हता. मला शंका आली की पालिकेचे अधिकारी आज येतील की नाही? कारण दुपारचे १२ म्हणजे अर्धा दिवस तर हो़ऊन गेला होता. सोमवारपासून मला ठाणे कार्यालयात जावे लागणार होते. मला रोज वाचनालयात येऊन पालिका अधिकाऱ्यांची वाट पहात बसणे शक्य नव्हते. तेव्हा आता काय करायचे समजेना. यावरच विचार करत असताना साडेबाराच्या सुमारास पालिकेची यंत्रणा गुंजन सोसायटीच्या जवळ आली असे समजले. त्यावेळी मला खूप बरं वाटले. जे काही आहे ते आज एकदाचे होऊन गेले की मी मोकळा होणार होतो. पालिकेचे कर्मचारी गुंजन सोसायटीपासून लाल निशाणी असलेल्या सर्व भिंती पाडत पाडत आमच्या इथपर्यंत आले.


महापालिकेच्या पथकामध्ये बराच लवाजमा होता. एक अधिकारी, पाच सहा कर्मचारी, भिंत तोडणारी माणसे, एक मोठी गाडी, पोलिसांची गाडी, दहा बारा पोलीस त्यात दोन महिला पोलीस असे एकूण तीस एक लोकांचे मोठे पथक होते. टिळकनगरमध्ये आमच्या इथून कोणीही विरोध करणारे नव्हते. तरी सुद्धा त्यांना संरक्षणासाठी एवढी मोठी यंत्रणा बरोबर घेऊन येणे गरजेचे होते. गंमत म्हणजे पालिका पथकापेक्षा तोडफोड बघण्यार्‍यांची संख्या जास्त होती. कोणाची किती जागा जात आहे? ते कसे तोडतात?कोण विरोध करतो का? हे सर्व बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गुंजन सोसायटीवरून तोडफोड करत पालिका कर्मचारी आमच्या इमारतीपर्यंत पोहचले. आधी त्यांनी अशोक प्लंबरच्या समोरची जागा तोडली. मग समोर मेघदूत सोसायटी होती तिची भिंत तोडली. नंतर वाचनालयाच्या बाजूला असलेल्या पिठाच्या गिरणीची समोरची भिंत तोडून मग ते वाचनालयाकडे ते वळले.


दोन फूटापर्यंत त्यांनी लाल रंगाची निशाणी केली होती परंतु बाजूच्या इस्त्रीवाल्याने ते निशाणी असलेले लाकूड काढून टाकले होते. मग पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामगारांना पाच सहा फूट आतपर्यंत तोडायची आज्ञा दिली. मी खूप अस्वस्थ झालो होतो. अधिकाऱ्यांना विरोध करणे हा मोठा गुन्हा होता. तसे केले असते तर त्यांनी मला अटक केली असती. मला काय करायचे सुचेना. सर्वांना कामाला लावून ते लाल रंगाची निशाणी असलेले लाकूड शोधायला सांगितले. तोपर्यंत मी अधिकाऱ्यांना कसंतरी करून थांबवून ठेवले. त्यांनी पाच फूट आतपर्यंत तोडले असते तर वाचनालयाची बरीच जागा अधिग्रहणात जाऊन खूप कमी जागा शिल्लक राहिली असती. शेवटी इस्त्रीवाल्याने ते लाकूड शोधून काढले आणि त्या जागेवर ठेवून दाखवले. तेव्हा कुठे ते अधिकारी फक्त दोन फूटापर्यंतच तोडायला तयार झाले. त्यांना सर्व दुकाने सारखीच होती. मग ते वाचनालय असो किंवा अन्य कोणतेही दुकान असो त्यांना काही फरक पडणार नव्हता. त्या दिवशी मी स्वतः तिथे उभा राहिलो आणि ते लाल निशाणी असलेले लाकूड शोधून काढण्याचा खंबीरपणा दाखवल्याने वाचनालयाची बरीचशी जागा वाचली. आलेल्या प्रसंगाला मी धीरोदात्तपणे व हिंमतीने सामोरा गेल्याने जीवनातील एक घडी विस्कटत असताना नवी घडी मात्र नीट बसवल्याचे समाधान माझ्या वाट्याला आले.

2 comments:

  1. तुमचा खंबीर निर्धार प्रेरणादायी आहे. वाह !!

    ReplyDelete