Sunday, September 13, 2020

माझा एक अनोखा व संस्मरणीय वाढदिवस...

'करायलो गेलो एक आणि झालं भलतंच' या वाक्यातील 'भलतंच' या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणत: 'भलत्याच' नकारात्मक पद्धतीने घेतला जातो. परंतु प्रत्येकवेळी तो तसा असेलच असं जरूरी नाही. घटनेचा परिणाम जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा तो परिणाम म्हणजे भगवंताने आपल्याला दिलेले आपल्या पुर्वकर्मांचे फळ असते. एखादे फळ अचानक ध्यानीमनी नसताना पदरात पडू शकते. अनेकांना आपला वाढदिवस थाटामाटात साजरा व्हावा अशी इच्छा असते. वास्तविक पाहता सर्व दिवस एकसारखेच असतात. वाढदिवसाला विशेष दिवस म्हटले किंवा उतारवयात 'काढदिवस' असे म्हटले तरी सुर्य सकाळी न चुकता ठरलेल्या वेळी उगवतो व संध्याकाळी मावळतो. रात्री चंद्र सूर्याची जागा घेतो. फक्त सतत बदलत रहातात ते मानवाच्या दिनदर्शिकेतील दिनांक, वार, महिने आणि वर्ष. अनेकजण आपल्या वाढदिवसाची वाट उत्सुकतेने पाहात असतात. त्या दिवशी आपल्याला अंतर्बाह्य एक वेगळंच वातावरण निर्माण झाल्याचे जाणवते. कधी कधी आपल्या नकळतपणे ते वातावरण आपल्या भोवती निर्माण केले जाते. वाढदिवसाला आपल्या परिवरातली आप्तजन, जिवलग मित्र, नातेवाईक सर्व एकत्र आल्यावर त्यांच्याबरोबर केक कापण्यातील मजा काही औरच असते. सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच असल्याने दिवसभर आपण आनंदात असतो. शेवटी दिवस कसा गेला ते कळतच नाही.

लहानपणी मी खूप मस्ती करायचो. माझ्या मस्तीखोरपणामुळे मी चार वर्षाचा असतानाच ताईने शाळेत माझे नाव नोंदवले. तेव्हा बालवाडी हा प्रकार नव्हताच. थेट इयत्ता पहिलीपासून सुरुवात होत असे. इयत्ता पहिलीत नांव नोंदवायचे तर त्यासाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक होते. त्याकाळी जन्माचा दाखला सादर करणे वगैरे काही भानगड नसल्याने पालक जो जन्मदिनांक सांगतील तो गृहीत धरला जायचा. शाळेत माझा जन्म दिनांक १५ जुलै १९६४ असा वेगळाच दिला गेला. मला एक वर्षांनी मोठे करून लहानवयातच माझ्या आयुष्यातील एका वाढदिवसाला काढदिवस ठरवून वजा करण्यात आले. आईने सांगितल्याप्रमाणे माझा खरा जन्मदिनांक १५ सप्टेंबर १९६५ असा होता. त्याकाळी आमच्याकडे कोणाचाही वाढदिवस साजरा केला जात नसे. वाढदिवस साजरा करणे हा प्रकार फक्त चित्रपटात पाहिला होता. कुंदापूरहून डोंबिवलीला आल्यावर प्रथमच मी इमारतीतल्या काही लोकांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी जाऊ लागलो. नंतरच्या काळात मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या परिवारातील लहान मुलांचे वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली.

आमच्या जपान लाईफ कंपनीचे ठाण्याच्या देव प्रयाग येथील कार्यालय आता छोटे पडू लागले होते. चर्चासत्रास येणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असल्याने कंपनीने ते कार्यालय ठाण्याच्या कापुरबावडी जवळील नवनीत मोटर्सच्या समोरील इमारतीत स्थलांतरित केेले होते. या कार्यालयाची जागा खूप मोठी होती. संध्याकाळी चर्चासत्र संपल्यावर कार्यालयात बाहेरून आलेली सर्व लोकं निघून गेल्यावर आम्ही कंपनीचे सर्व सभासद मात्र कार्यालयातच काही वेळ थांबायचो व दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यायचो. कोणाचा वाढदिवस असेल तर केक व काही खाद्यपदार्थ आणून त्या सभासदाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचो.

जपान लाईफ कंपनीची उलाढाल खूप मोठी व दिवसेंदिवस वाढतच जाणारी होती. व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनी निरनिराळ्या पद्धतीने प्रयत्न करत होती. त्याचाच एक भाग म्हणून सभासदांसाठी 'पदोन्नती समारंभ' (प्रमोशन सेरेमनि) हा एक प्रकार होता. दर महिन्यात बरेच लोकं कंपनीचे सभासद (जॉईन) व्हायचे. जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीची सभासद होत असे तेव्हा ती व्यक्ती BD म्हणजे 'बिझनेस डिस्ट्रीब्युटर' असायची. त्या व्यक्तीने आणखी तीन नवीन सभासद जोडले (जॉईन) की ती व्यक्ती मग AD म्हणजे 'अ‍ॅडव्हायसरी डिस्ट्रीब्युटर' बनायची. अश्या पद्धतीने पुढे MCD, DD, MD अशी विविध बढतीची पदं असायची. दर महिन्यामध्ये ज्यांना बढती मिळाली असेल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी 'पदोन्नती समारंभ' हा एक कार्यक्रम आयोजित करायची. कंपनीच्या ठाणे कार्यालयाच्या पदोन्नती समारंभाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे केले जायचे. अश्या दोन कार्यक्रमांमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो. तिथे खूप मजा यायची. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला वाटायचे की आपल्याला बढती मिळाली पाहिजे जेणेकरून सगळ्यांशी व्यासपीठावरून (स्टेजवरून) संवाद साधायची संधी सुद्धा मिळेल.

मध्यंतरी काही महिने पदोन्नती समारंभ हा कार्यक्रम झालाच नव्हता कारण त्याच्या आयोजनाची जवाबदारी घेणारे कोणी नव्हते. मी नियमितपणे कार्यालयात जायचो. कार्यालयातील सर्वांना मला जेवढी जमेल तेवढी मी मदत करायचो. सर्वांना सहकार्य करण्याची माझी कार्यपद्धत पाहून मला ठाणे कार्यालयात मार्शल बनवले गेले. काही दिवसातच मार्शलरावांना लोकांचे लीडर बनवले गेले. मी मार्शल लीडरची भूमिका स्वीकारल्यावर माझ्याकडून सर्वांना अधिकाधिक मदत करू लागलो. एके दिवशी कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी (मॅनेजरनी) पदोन्नती समारंभाच्या आयोजनाची जवाबदारी माझ्यावर टाकली. मी दिलेली कुठलीही कामे आनंदाने स्वीकारायचो त्यामुळे हे जवाबदारीचे काम सुद्धा मी तेवढ्याच खुशीने स्वीकारले. 

कंपनी पदोन्नती समारंभाच्या आयोजनासाठी ठराविक रक्कम द्यायची. त्याच रकमेतून सभागृह आरक्षित (हॉल बुक) करण्यापासून ते कार्यक्रमाच्या इतर सर्व छोट्या मोठ्या खर्चांची पुर्तता करायला लागायची. मला त्यातील काहीच माहीत नव्हते. मी पहिल्यांदा कार्यालयातून पत्र घेऊन गडकरी रंगायतन नाट्यगृह आरक्षित करायला गेलो. तेथील कर्मचाऱ्यांना कंपनीचे नांव माहीत असल्याने त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आम्ही त्यांना सुचवलेल्या तीन तारखांपैकी एक तारीख ते आमच्यासाठी निश्चित करायचे. मग कंपनीच्या सूचना फलकावर (नोटीस बोर्डवर) ती तारीख पदोन्नती समारंभाच्या कार्यक्रमासाठी जाहीर केली जायची. त्यानंतर मग खूप कामे करायला लागायची. पदोन्नती समारंभ हा जवळपास दोन तासांचा कार्यक्रम असायचा. ज्यांना आधीच्या महिन्यात बढती मिळाली असेल त्या सर्वांचा सत्कार त्यात केला जायचा. या कार्यक्रमासाठी दुसऱ्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रणं द्यायला लागायची. त्यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात येत असे. या सत्कार सोहळ्यादरम्यान कार्यालयातील काहीजण विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करायचे. त्यामध्ये एखादे छोटसं नाटक, चित्रपटातील गाणी, जादूचे प्रयोग, विनोदी एकांकिका, नृत्य वगैरे कार्यक्रमांचा समावेश असायचा. या सर्वांची निवड करायचे काम माझ्याकडे होते. 

गडकरी रंगायतनमध्ये मी आतापर्यंत दोन पदोन्नती समारंभाच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते. त्यानंतरच्या कार्यक्रमांसाठी मात्र आम्हाला हवी असलेली तारीख गडकरी रंगायतनकडून उपलब्ध होत नव्हती. त्याच बरोबर त्यांनी भाडे सुद्धा खूप वाढवले होते. कंपनीने दिलेल्या ठराविक रकमेतच सर्व कार्यक्रम बसवणे त्यामुळे कठीण झाले होते. मी त्यासाठी पर्याय शोधत होतो. एकदा मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात जाऊन चौकशी केली. गडकरी रंगायतन नाट्यगृह व त्याचा आजूबाजूचा परिसर दोन्ही खूप छान व सुंदर होते. त्यामानाने कालिदास नाट्यमंदिर दिसायला तेवढे सुंदर वाटेना. तिथे एका वेळी ६०० लोकं बसू शकतील एवढी जागा होती. भाडं कमी लागणार होते व आम्हाला पाहिजे ती तारीख सुद्धा कालीदासमध्ये मिळत होती. अखेर कार्यक्रम मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात घ्यायचा ठरवले.

दिनांक १५ सप्टेंबर २००० रोजी कालिदास नाट्यगृहात कार्यक्रम होता. मी कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती. संपूर्ण दोन तासांचा कार्यक्रम होता. बर्‍याच लोकांचा बढती सत्कार सोहळा होता. त्यांचे सत्कार करण्यासाठी माहीमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधीकारी आले होते. कालिदास सभागृह पूर्णपणे भरलेले होते. बरोबर सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. नेहमी प्रमाणे माझा मित्र मिनास मोझेस सूत्र संचालन करत होता. सुरुवातीला आमच्या कंपनीचे शिर्षक गीत म्हणण्यात आले. मी व्यासपीठाच्या (स्टेजच्या) मागे राहून पुढच्या कार्यक्रमांची क्रमवारी पाहत होतो. इतक्यात मोझेसच्या इशार्‍यावरून सर्व दिवे मालविण्यात आले. मला आश्चर्य वाटले. हे माझ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेत (स्क्रिप्टमधे) नव्हते. मला व्यासपीठावर बोलावण्यात आले. मी मंचवर जाताच माझ्या चमूतील (टीममधील) काहीजणांनी मंचवर येऊन मला उचलून धरले. बाकीचे वीस एक लोकं मेणबत्ती घेऊन आले. त्या मेणबत्तींच्या रोषणाईने संपुर्ण कालिदास सभागृह उजळून निघालेले दिसत होते. ध्वनिक्षेपकावरून 'हॅपी बर्थडे' हे स्वरगीत कानी पडू लागले. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. अर्थात ते आनंदाश्रू होते. माझा वाढदिवस नेमका कार्यक्रमाच्या दिवशी आला होता. मी कोणालाही आज माझा वाढदिवस आहे हे सांगितले नव्हते. माझा वाढदिवस ही सर्व मंडळी अश्या अनोख्या व नाट्यमय पद्धतीने साजरा करणार आहेत याची मला कल्पनाच नव्हती. करायला गेलो एक आणि झालं ते भलतंच सुखदायी, आनंददायी, धक्कादायक. ध्यानीमनी नसताना घटनेचे परिणामस्वरूप फळ विधात्याने अचानक माझ्या पदरात टाकले होते. दिनांक १५ सप्टेंबर २००० हा दिवस केवळ माझा वाढदिवस आहे म्हणून नव्हे तर तो ज्या अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला त्यामुळे मी तो दिवस आजपर्यंत विसरलेलो नाही....



7 comments:

  1. आपण जे पेरतो ते उगवतं हे अनुभवास आले. 💐💐👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्यासाठी अनपेक्षित होतं...

      Delete
  2. २९ फेब्रुवारी हा दिवस चार वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे त्यादिवशी जन्मलेल्या मोरारजी देसाई सारख्या अनेकांना चार वर्षातून एकदाच वाढदिवस साजरा करायला मिळतो. पै सरांना मात्र ताई व आईच्या कृपेने वर्षातून दोन दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात. सर मजा आहे तुमची...

    ReplyDelete
  3. तुमच्या लिखाणात कमालीची सफाई आली आहे.खूप छान वर्णनात्मक लिहीलं आहेत.साजर्‍या झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

    ReplyDelete