'कर्तव्याने घडतो माणुस...' हे फक्त गाण्यापुरते नसून सर्वप्रकारच्या कर्तव्यपुर्तीतूनच माणसाची ओळख तयार होत असते. ईश्वर सुद्धा अश्याच व्यक्तींना संकटकाळी व सदैव मदत करत असतो. सर्वप्रकारची कर्तव्ये म्हणजे आद्यकर्तव्य, आप्तकर्तव्य, आर्तकर्तव्य ही तीन मुलभूत कर्तव्ये. जेवण, प्रकृती सांभाळणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे ही आद्यकर्तव्ये. नातेवाईक, मित्रांना मदत करणे, व्यवहार सांभाळणे वगैरे आप्तकर्तव्ये. कोणीतरी जीवाच्या कराराने ओरडून आर्तसाद घातल्यावर मागचा पुढचा विचार न करता मदतीसाठी धावून जाणे हे आर्तकर्तव्य. आप्तकर्तव्या निमित्ताने म्हणजेच कंपनीच्या कामानिमित्ताने मी निरनिराळ्या नविन ठिकाणी जात होतो. इतकी वर्षे डोंबिवली सोडून क्वचितच बाहेर पडणारा मी अनेक वेगवेगळ्या गावाशहरात भ्रमंती करू लागलो होतो. कंपनी, वाचनालय इत्यादी व्यवहारातील आप्तकर्तव्यांच्या व्याप्तीमुळे मी कुटुंबासाठी जास्त वेळ देऊ शकत नसलो तरी त्या कौटुंबिक आद्यकर्तव्याची मला व्यवस्थित जाणीव होती. माझ्या जपान लाईफच्या व्यवसायाचे स्वरूपच तसे असल्याने सुमन सुद्धा मला समजून घेत होती. डिसेंबर महिना संपून नवीन वर्षाच्या प्रारंभी येणारा पहिला दिवस एक जानेवारी घरच्यांसाठी म्हणजे सुमन व संतोषसाठी राखून ठेवणे हा माझ्या आद्यकर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग होता. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा एक जानेवारीला कार्यालयीन सुट्टी होती. या वर्षी सुमन व संतोष सोबत कुठे जायचे याचा मी विचार करत होतो. सुमनला देवळात जायला खूप आवडत असे. देवळात जाऊ या म्हटले की स्वारी खुश व्हायची. संतोषला बाहेर फिरायला जायला खूप आवडत असे.
सकाळी लवकर निघायचे, मुंबादेवी देवळात जायचे, देवीदर्शन घेऊन संतोषसाठी जुहू चौपाटीवर फिरून मग परत यायचे असा एकूण बेत मी मनात आखला होता. माझा एक जानेवारीचा बेत मी सुमनला सांगितला. मुंबादेवी दर्शनाला जायचे व ते सुद्धा वर्षाच्या पहिल्या दिवशी ही कल्पना तिला खूप आवडली. देवीदर्शनानंतर संतोषला जुहू चौपाटीवर फिरायला घेऊन जायचे सुद्धा तिने लगेच मान्य केले. दिनांक ३१ डिसेंबरला ठाण्याच्या कार्यालयातून आप्तकर्तव्ये आटपून लवकर घरी आलो. नेहमीप्रमाणे नाष्टा करून वाचनालयात गेलो. वर्षाचा शेवटचा दिवस होता. सर्वत्र उत्सवी मानसिकतेचे (पार्टीचा मूड) वातावरण असल्याने वाचनालयात गर्दी कमी होती. आलेल्या काही मोजक्याच सभासदांबरोबर गाठीभेटी व गप्पागोष्टी झाल्या. मी नऊ वाजता वाचनालय बंद करून घरी आलो. घरी सुमनने तोपर्यंत खाण्यापिण्याची चांगली तयारी करून ठेवली होती. जेवण करून बारा वाजेपर्यंत दुरदर्शन संचासमोर बसून एकतर्फी संवाद साधण्याचा कार्यक्रम पार पाडला. बारा वाजल्याबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छांसाठी लोकांचे दूरध्वनीवरून कॉल यायला सुरुवात झाली. खरं तर सकाळी लवकर उठायचे होते तरी सुद्धा झोपताना साडेबारा वाजलेच.
सकाळी नऊ वाजता निघायचे होते. मी लवकर उठून सकाळची कामे उरकून नेहमीप्रमाणे वाचनालयात फेरफटका मारून आलो. मी परत घरी येईपर्यंत सुमन आणि संतोष तयार झाले होते. मग नाष्टा करून घराबाहेर पडलो. आज सन २००१ या वर्षाचा पहिलाच दिवस होता. रेल्वेच्या उपनगरीय गाडीमध्ये फिरायला जाणाऱ्यांची गर्दी अधिक दिसत होती. मुंबादेवी मंदिराला जाण्यासाठी खर तर चर्नीरोडला जावे लागणार होते. परंतु मी विचार केला दोनवेळा उपनगरीय गाडी बदलण्यापेक्षा मशीद बंदरला उतरून मुंबादेवी मंदिरात चालत जायचे कारण तिथून मुंबादेवी मंदिर जवळ आहे असे मी ऐकले होते. त्यानुसार गाडीतून उतरून मशीद बंदर रेल्वे स्थानकच्या पश्चिमेला आलो. तिथे खूपच गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुकामेव्याची घाऊक विक्री करणारी दुकाने होती. इथून किरकोळ विक्रेते आपल्या दुकानासाठी सुकामेवा घेऊन जात होते. मशीद बंदर ते भुलेश्वर हे अंतर तसे कमी होते. गर्दीतून वाट काढत चालत चालत भुलेश्वरला पोहचायला वीस मिनिटे लागली. मंदिराच्या पायथ्याशी बरीच दुकाने थाटलेली होती. देवीला पूजेसाठी फुले नारळ असलेली थाळी घेतली. गर्दीतून वाट काढत मंदिराजवळ पोहोचलो.
मी ऐकले होते की मुंबादेवी मंदिर ४०० वर्ष जूने आहे व याच मुंबादेवी नावावरून या शहराला मुंबई हे नांव पडले आहे. मुंबई म्हणजे मुंबा आई. संपुर्ण भारताच्या विविध प्रांतातून आलेली लोकं नोकरी व व्यवसाय करता करता या मुंबई नगरीत स्थायिक झाले. एक जानेवारी असल्याने मुंबादेवीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. इथे जातपात, गरीब, श्रीमंत असा काही भेदभाव नव्हता. सर्वजण एकाच रांगेत देवीदर्शनासाठी उभे होते. स्थानिक लोकांच्या व्यतिरिक्त देशातल्या विविध प्रांतातून देवीच्या दर्शनासाठी भक्तगण जमा झाले होते. मंदिर फुलांनी सुंदर पद्धतीने सजवलेले होते. देवीची मूर्ती प्रसन्न दिसत होती. मला, सुमनला व संतोषला अगदी जवळून देवीचे दर्शन करायला मिळाले परंतु खूप गर्दी असल्याने जास्त वेळ तिथे थांबता येणार नव्हते. भाविक मंडळी हळूहळू पुढे सरकत होती. आम्ही देवीचे दर्शन घेऊन खाली उतरत होतो. इतक्यात बाजूच्या वर जाणाऱ्या रांगेतून एक माणूस उलट्या दिशेने खाली उतरताना दिसला. पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरे बुट, कपाळाला गुलालाचा टीका असा त्याचा पेहराव होता. तो गर्दीतून वाट काढत आमच्या अगदी जवळून उतरत होता. भक्तगण गोविंदाच नांव घेऊ लागले. परंतु तो खरोखरच हिंदी चित्रपटातला नायक गोविंदा होता. संतोषचा तो आवडता कलाकार. कदाचित नवीन वर्षाच्या शुभारंभासाठी देवीच्या दर्शनाला आला असावा. आम्ही तिघांनी त्याला अगदी जवळून पाहिले. तो एकटाच होता. चित्रपट कलाकाराला देवीच्या दर्शनाला आलेले पाहून मला खूप बरे वाटले.
देवीदर्शन घेऊन मंदिराबाहेर पडता पडता दुपारचा एक वाजला होता. सकाळी घरातून नाष्टा करून निघालो होतो त्यामुळे भूक लागली नव्हती. जुहू चौपाटीवर भेळ खाण्याचा कार्यक्रम आधीच ठरला होता. जेवण केले असते तर भेळेचा यथेच्छ आस्वाद घेता येणार नाही हे माहित होते. जुहूला जाण्यासाठी टॅक्सी करायची की रेल्वेने जायचे याचा विचार करत होतो. शेवटी आम्ही तिघांनी चालतच चर्नीरोड रेल्वे स्थानक गाठले. उपनगरीय गाडी पकडून अंधेरी स्थानकात उतरलो. अंधेरी पश्चिमेला येऊन जुहू चौपाटीसाठी टॅक्सी केली. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होती. वीस मिनिटांतच जुहू चौपाटीवर पोहोचलो.
सर्वसाधारणतः संध्याकाळी लोकं चौपाटीवर मोठ्या संख्येने जमा होतात. परंतु आम्हाला मात्र संध्याकाळपर्यंत घरी परत पोहचायचे होते त्यामुळे भर दुपारी आम्ही चौपाटीवर आलो होतो. एक जानेवारी असल्याने लोकांची गर्दी होतीच. आमच्यासारखे बरेच लोकं नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी आले होते. चौपाटी बघायला जायचा विचार मी बऱ्याच वेळा केला होता परंतु तो योग आज आला होता आणि आज तर मी चक्क सुमन आणि संतोषसह चौपाटीवर आलो होतो. त्यामुळे माझ्यासाठी तो मणीकांचन योग होता. जानेवारीचा महिना असल्याने कडक उन्हात गर्मी जाणवत नव्हती. पाणी पुरी, भेळपुरी, आईस्क्रीमच्या दुकानात लोकं गर्दी करून होते. संतोष, सुमन आणि माझ्यासाठी भेळपुरी घेतली. 'चौपाटी जायेंगे, भेळपुरी खायेंगे' या गाण्यातील ओळी त्यावेळी आठवल्या. तिघांनी समुद्र किनाऱ्यावरील चौपाटीवर बसून भेळपुरीचा मनसोक्त आनंद लुटला. मी त्या समुद्राच्या लाटांकडे मन लावून बघत होतो. सुमन पण तिच्या विचारात मग्न होती. संतोष आमच्या डोळ्यासमोर वाळूत खेळत होता.
नंतर सुमन आणि मी पुन्हा भेळपुरी खात गप्पा मारत होतो. इतकावेळ समोर खेळत बागडत असलेला संतोष अचानक कुठे दिसेना. आम्ही दोघे संतोषला शोधायला सुरुवात केली. हाका मारल्या. परंतु त्या जनसमूहात छोटासा संतोष कुठे दिसत नव्हता. मला काय करायचे समजेनासे झाले. आम्ही दोघे घाबरलो. माझ्या डोळ्यात पाणी आले. नको ते विचार मनात यायला लागले. एक एक करून चौपाटीवरील सर्व दुकाने शोधायला सुरुवात केली. एका भेळपुरी दुकानासमोर संतोष उभा असलेला मला लांबूनच दिसला. आम्ही दोघे धावत गेलो. संतोषला मी उचलून घट्ट उरी कवटाळले. संतोष भेटल्याचे खूप समाधान वाटले. मी जीवाच्या कराराने घातलेल्या आर्तसादेला मुंबादेवीने आर्तकर्तव्य समजून प्रतिसाद दिला. मुंबादेवीच्या कृपेमुळेच हरवलेला संतोष काही वेळातच आम्हाला सापडला. शिवाजी-अफझलखान भेटीत महाराजांच्या जीवावरील संकट जीवा महलमुळे टळले होते. त्यातूनच 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' अशी म्हण आपल्याकडे प्रचारात आली. त्याच धर्तीवर 'भेटला संतोष म्हणून राहीला संतोष' असं मनातील संतोषाला साक्षी ठेवून सांगावेसे वाटते.
कार्यक्रम आयोजित करण्यात तुम्ही खरंच तरबेज आहात.आणि ते सगळं खूप छान शब्दात वर्णन करता! खूप सुंदर!!
ReplyDeleteकर्तव्याचे प्रकार पहिल्यांदाच कळले. खूप छान !!
ReplyDeleteआता त्यातील एक तरी फार पाडा म्हणजे झाले...
Deleteजीवाची मुंबई करणे,,खरेच
ReplyDeleteछान वर्णन
,,Subhash kapote
छान
ReplyDeleteजीवाची मुंबई करणे,,खरेच
ReplyDeleteछान वर्णन
,,Subhash kapote