Tuesday, September 1, 2020

मी दिल्लीच्या ताज पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये...

'अगं अगं म्हशी अन् मला कुठे नेशी' असं दूधदुभत्या गायीम्हशीबाबत जे बोलले जाते ते व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसायामुळे सुद्धा कधी कुठे जायचा योग येईल काही सांगता येत नाही. वर्षातून एकदा तरी आमच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्र सभा (मीटिंग) व्हायची. आम्ही सर्व त्या सभेची उत्सुकतेने वाट पाहायचो, कारण त्यामध्ये आम्हाला कंपनीच्या पुढील कार्यक्रमांची माहिती मिळायची. यंदाचे चर्चासत्र (सेमिनार) दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये असल्याचे त्या सभेमध्ये समजले. ताज पॅलेससारख्या पंच तारांकित हॉटेलमध्ये जायला मिळणार हे समजल्यावर आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी उत्सुकतेने त्याविषयी आपआपसात चर्चा करायला लागलो. दिल्लीच्या ताज पॅलेसमध्ये कंपनीने नोव्हेंबरचे १५,१६,१७ असे तीन दिवस चर्चासत्रासाठी निश्चित केले होते. मुंबई, ठाणे, बेंगळुरू इथून कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या चर्चासत्रासाठी येणार होते. या आधी मी स्वतःहून कधीही कुठल्याही ताजसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सहज म्हणून जाण्याची शक्यता नव्हती, कारण एक तर खिशात तेवढा पैसा नव्हता व त्याचबरोबर मला त्यासाठी वेळ मिळणे सुद्धा शक्य नव्हते. परंतु यावेळी दिल्लीला चर्चासत्र असल्याचे समजल्यावर आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी दिल्लीला जाण्याच्या तयारीला लागलो.


ज्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आर्थिकदृष्ट्या परवडणार होते ते विमानाने दिल्लीला जाणार होते. आम्ही काहीजणांनी रेल्वेने जायचे ठरवले. कल्याण स्थानकावरून मंगला एक्सप्रेस गाडीची तिकीटे काढली. एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन (दिल्ली) या रेल्वे मार्गावर मंगला एक्सप्रेस या गाडीने सन १९९८ पासून धावायला सुरूवात केली होती. केरळच्या एर्नाकुलम इथून निघालेली ही गाडी कोकण रेल्वेमार्गाने कल्याणला येऊन मग दिल्लीला जात असे. या गाडीचे तिकीट स्वस्त होते. सोमवार, दिनांक १५ रोजी चर्चासत्राला सुरूवात होणार होती. आम्ही रविवारी म्हणजे एक दिवस आधी पोहचण्यासाठी शुक्रवारचे तिकीट काढले. मी सातत्याने कंपनीच्या कामासाठी बाहेर जात असल्याने आता सुमनला त्याची सवय झाली होती. तिला दिल्ली दौर्‍याबाबत सांगितल्यावर नाईलाजाने होकार देत तिने प्रवासाची सर्व तयारी करून दिली.

मागे बेंगळुरूला जाताना मी एकट्याने रेल्वे प्रवास केला होता. परंतु यावेळी गाडीमध्ये माझ्या बरोबर कंपनीचे बरेच सहकारी असल्याने कंटाळा येण्याचा प्रश्नच नव्हता. उलट मजाच येणार होती. कल्याण ते दिल्ली हा तसा खूप मोठ्या अंतराचा प्रवास होता. त्यात मंगला एक्स्प्रेस मधल्या बर्‍याच स्थानकांवर थांबणार होती. कार्यालयीन कामकाज तथा व्यवसायाविषयी कोणतीही चर्चा प्रवासादरम्यान करायची नाही असे आम्ही सर्वांनी गाडी निघाली तेव्हाच ठरवले होते. दिवसभर कार्यालयात तेच तेच ऐकून, बोलून कंटाळा आला होता, त्यामुळे दिल्लीला पोहचेपर्यंत फक्त मजा आणि मस्ती करण्यावर सर्वांचे एकमत झाले होते. कल्याणहून गाडी सुटल्यावर काही वेळाने गाण्याच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. आम्ही बरेच जण असल्यामुळे खूप मजा येत होती. नंतर थोड्या वेळाने काही जणांनी लबाडी (चीटिंग) करायला सुरुवात केली. त्यात मी सुद्धा होतो. आधीच्याच गाण्यांची टेप परत परत वाजवायला सुरुवात केली. भेंड्या खेळून खेळून कंटाळा यायला लागल्यावर मग काही जणांनी विनोद (जोक्स) सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला मजा येत होती. काही वेळाने त्याचा सुद्धा कंटाळा आला. 'आता आपण जेवून घेऊ या, मग नंतर पत्ते खेळू या', ही सूचना मी केल्यावर सर्वांनी त्या गोष्टीला होकार दर्शविला...

लहानपणी शिवप्रसाद इमारतीमध्ये रहात असताना पावसाळ्यात बाहेर खेळायला मिळायचे नाही. मग फक्त दोनच पर्याय उपलब्ध असायचे. एक म्हणजे कोणाच्या तरी घरात बसून कॅरम खेळणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे पत्ते खेळणे. दोन्ही खेळ मला आवडायचे. कॅरम खेळताना कधी कधी जेवणाची सुद्धा आठवण रहायची नाही. घरून बोलावणे आले की मग खेळ मधेच सोडून निघताना वाईट वाटायचे. बाहेर धो धो पाऊस पडत असताना घरात बसून कॅरम खेळण्याची मजा काही औरच. दुसरा उपलब्ध पर्याय म्हणजे पत्ते खेळणे. पत्त्यांच्या खेळात विविध प्रकार होते. फक्त दोन खेळाडू असताना रम्मी, तीन जण असल्यास 'पाच-तीन-दोन' नावाचा खेळ, जर चौघेजण असतील तर मेंढी कोट, पाच सहा खेळाडू जमले की बदाम सत्ती हे सर्व ठरलेले होते. परंतु हे सर्व खेळ थोडा वेळ खेळायला ठीक होते. नंतर त्याचा सुद्धा कंटाळा यायला लागला. मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर जुलै महिन्यात आमच्या इमारतीतल्या एकाने मला 'जजमेंट' नावाचा पत्त्यांचा एक नविन खेळ शिकवला. या खेळाने आमच्या इमारतीतल्या सर्वांना वेडच लावले... 

जजमेंट हा पत्त्यांचा खेळ चार खेळाडूपासून ते बारा खेळाडूपर्यंत सर्वजण एकत्र खेळू शकतात. या खेळात समजा सहाजण असतील तर पहिल्या डावात प्रत्येकाला एक एक करून आठ पत्ते वाटले जातात. उरलेले चार पत्ते बाजूला काढून ठेवतात. सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या चार डावात 'हुकूम' (ट्रम्प) हा इस्पिक, चौकट, किल्वर, बदाम या अनुक्रमाने ठरलेला असतो. मग पाचव्या डावात हुकूम नसतो म्हणजे नो ट्रम्प असते. नंतरच्या चार डावात परत त्याच अनुक्रमाने हुकुम व पाचव्या डावात हुकूम नाही. तसेच प्रत्येक डावात एक एक पत्ता कमी करत पत्ते वाटायचे व उरलेले पत्ते बाजूला काढून ठेवायचे. जो खेळाडू पत्ते पिसून वाटतो त्याच्या पुढच्या खेळाडूला स्वतःचे पत्ते बघून तो किती हात करु शकेल हे जाहीर करावे लागते. मग अनुक्रमाने प्रत्येकाने स्वतःच्या पत्त्यानुसार आपण किती हात करू शकतो हे घोषित करायचे. ते एका कागदावर प्रत्येकाच्या नावापुढे लिहून ठेवायचे. ज्याने जेवढे हात सांगितले आहेत फक्त तेवढेच हात करायचे. एक सुद्धा कमी किंवा जास्त हात होता कामा नये. तसे झाल्यास त्याला शुन्य गुण मिळाल्याची नोंद त्याच्या नावापुढे कागदावर करून ठेवली जाते. आपण शुन्य हात करू शकतो असे सुद्धा डावाच्या सुरूवातीला जाहीर करता येते. जेवढे हात सांगितले असतील बरोबर तेवढेच हात केले तर त्या खेळाडूला दहा गुण मिळतात. कमी किंवा जास्त हात झाले तर शून्य गुण मिळणार. एखाद्या डावात सर्वांनाच शुन्य गुण मिळण्याची सुद्धा शक्यता असते किंवा एकाच डावात दोघा तिघांना हातबोली अचूकपणे पुर्ण केल्याबद्दल दहा गुण सुद्धा मिळू शकतात. जसजसे डावागणिक पत्ते कमी होत जातात तसतसे सांगितलेले हात करताना खेळ अधिकाधिक कठीण होत असल्याचे लक्षात येऊ लागते. ज्या ज्या डावात नो ट्रम्प म्हणजे हुकूम नसतो तेव्हा आणि शेवटच्या डावात जेव्हा हातात एकच पत्ता असतो तेव्हा सांगितलेले हात करताना खूप धमाल येते. आपण सांगितलेले हात होणार नाही हे लक्षात आले की मग इतरांचे सुद्धा सांगितलेले हात होऊ न देण्याचा अपशकुनी प्रयत्न करणे हा या खेळात धमाल आणणारा आणखी एक शकुनी पराक्रम. खेळातील शेवटच्या डावात ज्यावेळी प्रत्येकाकडे फक्त एकच पत्ता असतो तो डाव संपला की ज्याला सर्वात जास्त गुण मिळाले आहेत त्याला 'जज' (विजेता) घोषित केले जाते. दोघा तिघांचे समान व जास्त गुण झाले असतील तर ते सर्व जज म्हणून घोषित केले जातात. प्रत्येकाला 'जज' बनण्याची इच्छा असल्यामुळे हा गेम चार पाच तास चालला तरी अजिबात कंटाळा येत नसे. 


जजमेंट या खेळात खूप मजा येत असल्याने मी बर्‍याच ठिकाणी हा खेळ इतरांना शिकवला होता. दुपारी जेवणानंतर गाडीमध्ये मी या खेळाची सर्वांना कल्पना दिली. मी नवीन विकत घेतलेला पत्त्यांचा संच (कॅट) सोबत आणला होता. आमच्या डब्यातील सहा जणांनी मिळून या खेळाला सुरुवात केली. मजामस्करी करत करत खेळणे चालू असताना मध्येच कोणा तरी चहा कॉफी किंवा त्या बरोबर खाण्याचे पदार्थ घेऊन आला की त्याचा सुद्धा आस्वाद चेष्टामस्करी बरोबर घेत होतो. संपुर्ण डब्यात फक्त आमचाच गोंगाट चालू होता. मैत्रीपूर्ण वातावरण असताना माझ्यासारखी मस्ती कोणाला करावीशी वाटणार नाही? जजमेंट खेळ सर्वांना आवडला. खेळ खेळता खेळता दिवस कसा संपला ते कळलेच नाही. मस्तीखोर मित्र बरोबर असल्यामुळे प्रवासात मजा आली.


मंगला एक्सप्रेस शनिवारी संध्याकाळी दिल्लीला पोहचली. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आम्ही प्रवेश केला होता. एरवी पुस्तकात किंवा चित्रपटात दिल्ली पहायचो. दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरून केलेल्या टॅक्सीने थेट हॉटेल ताज पॅलेसच्या समोर येऊन सोडले. हॉटेल ताज पॅलेस ही खूप मोठी सुंदर इमारत होती. बाहेर मोठा बगीचा, त्यात निरनिराळ्या प्रकारची कारंजी, बागेतील सर्व झाडांवर रंगीबेरंगी फुले, असे अत्यंत रमणीय दृश्य बाहेरून बघायला मिळाले. बाहेरून दिसणारे हे विलोभनीय दृश्य बघत असताना हॉटेल आतमध्ये कसे असेल याचा विचार करत होतो. बाहेर प्रवेशद्वारावर दोन उंच तगडे सरदार स्वागतासाठी उभे होते. ताज पॅलेसमध्ये पाऊल टाकल्यावर एखाद्या राजवाड्यात आल्यासारखे वाटले. मखमली गालिचा, निरनिराळ्या प्रकारचे दिवे, संपूर्ण परिसर वातानुकूलित होता. हॉटेल ताज पॅलेसमध्ये कंपनीने स्वतःच्या नावावर आगोदरच आमच्यासाठी खोल्या राखून ठेवल्या होत्या. आमच्या कंपनीचे नांव सांगताच तिकडचे कर्मचारी खोलीपर्यंत सोडायला आले. प्रत्येक खोलीमध्ये चार जणांची सोय केली होती. ताज पॅलेसमधील त्या खोल्या आलिशान घरासारख्या होत्या. दुरदर्शन संच, पलंग, बाथरूम, सर्व प्रकारच्या शितपेयांनी भरलेला एक छोटासा फ्रीज, पडदे उघडले की बाहेरचे सुंदर दृश्य हे सर्व चित्रमय वाटत होते. आपण स्वप्न बघत आहोत की काय असेच वाटत होते. सर्वसामान्य माणसाला हे आलिशान हॉटेल परवडण्यासारखे नव्हतेच आणि अश्या स्वर्गीय वातावरणात आम्ही तीन दिवस राहणार या विचाराने माझा उर भरून आला. त्यामुळे मला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता.....


3 comments:

  1. दिन दुगनी, रात चौगुनी... Very good !!

    ReplyDelete
  2. दिन दुगनी तो रात पाचगुनी (पंचतारांकित)

    ReplyDelete