Tuesday, September 15, 2020

कुलदेवीच्या दर्शनासाठी मी जिद्दीने केलेला एक प्रवास...

'मन शांत होता पुन्हा लागे ओढ, पाऊले चालती पंढरीची वाट' या भक्तीगीतातील ओळी प्रत्यक्ष जगण्याची वेळ माझ्यावर सुद्धा कधी येईल याची मी कल्पनाच केली नव्हती. 'भेटी लागी जीवा लागलीसे आस' अशी माझ्या मनाची स्थिती झाल्यावर माझ्या 'मनातील पंढरीच्या वारीचा' एक प्रवास अचानक घडून आला. आमच्या जपान लाईफ कंपनीने ऑक्टोबर महिन्यात बेळगाव व कोल्हापूर या दोन शहरात नवीन शाखा सुरू करण्याचे जाहीर केले व त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात दोन्ही ठिकाणी कार्यालये चालू केली. बेळगाव व कोल्हापूरमध्ये राहणार्‍यांसाठी ही खुशखबर होती कारण याआधी व्यवसायासाठी तेथील लोकांना मुंबई किंवा ठाण्याला यावे लागायचे. आता त्यांचा वेळ, श्रम व पैसा खर्च न होता वाचणार होता. एखाद्या शहरात नवीन कार्यालय जेव्हा सुरू होते तेव्हा कंपनीची व स्लीपिंग सिस्टीमची लोकांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी काही वरिष्ठ अधिकार्‍याचे त्या कार्यालयात असणे हे गरजेचे होते. मला कन्नड येत होते. माझा अनुभव लक्षात घेऊन ठाण्याच्या कार्यालयातून मला बेळगावला जाण्याची विनंती करण्यात आली. मी सुद्धा जाण्यास तयार झालो.

माझ्या अधूनमधून बाहेरगावी जाण्याची सुमनला आता सवय झाली होती. कुठे बाहेरगावी जायचे म्हटले की माझी बॅग तयारच असायची, फक्त किती दिवस राहणार त्यानुसार त्यातील कपडे कमी जास्त करायला लागायचे. बेळगावला जायच्या आधी एकदा वाटेत थांबून कुलदेवीचे दर्शन घेण्याचा मी विचार करत होतो. गोव्याला म्हारदोळ येथे आमची कुलदेवी म्हाळसा नारायणीचे मंदिर आहे. तिथे मंदिरात जाऊन देवीचे थोडावेळ दर्शन घ्यायचे व मग तिथुन पुढे बेळगावला जायचे असे मी ठरवले होते. सुमनला माझा देवीदर्शनाचा विचार सांगितल्यावर तिला खूप बरे वाटले. तिने बेळगावला जाण्यासाठी आनंदाने होकार दिला. संतोषच्या शाळेमुळे तिला माझ्यासोबत नेणे शक्य नव्हते अन्यथा आम्ही तिघे एकत्र देवीदर्शनाला गेलो असतो.

शनिवारी निघून रविवारी देवळात पोहचायचे होते. कुलदेवीचे दर्शन झाल्यावर मग दुपारी तिथून बेळगावला निघायचा संकल्प केला होता. शनिवारी रात्री नऊ वाजता गोव्याला जाणार्‍या गाडीचे तिकिट काढले. शनिवार असल्याने प्रतिक्षा यादीतील (वेटिंग) तिकिट मिळाले. मी एकटाच असल्याने प्रवासामध्येच तिकीट बदल (अ‍ॅडजस्ट) सहजपणे करून घेता येईल असा विश्वास मनात बाळगून रात्री आठ वाजता घरून निघालो. नऊच्या आधी ठाण्याला पोहोचलो. बरोबर नऊ वाजता गाडी आली. गाडीत चढलो तेव्हा आतमध्ये पुष्कळ गर्दी होती. बरेच प्रवासी माझ्यासारखे प्रतिक्षा यादीतील (वेटिंग) होते. गाडीच्या बर्थ मधल्या जागेत बसून प्रवास करावा लागणार होता. एक रात्र कशी तरी काढायची मनाची तयारी केली होती. गाडी ठाण्याहून सुटल्यावर फक्त दहा मिनिटे झाले असतील तर तेवढ्यात तिकीट तपासनीस (टि. सी.) आला. त्याने सर्वांची तिकीटे तपासली. त्याला तिकीट बदलासाठी (अ‍ॅडजेस्ट साठी) विनंती करायचा मी विचार करत होतो. परंतु तो खूपच खडूस व कडक होता. त्याने पनवेल आल्यावर माझ्यासकट सर्वांना सक्तीने गाडीतून खाली उतरवले. मी नाईलाजाने पनवेल स्थानकावर उतरलो.

रात्रीचे दहा वाजले असतील. पनवेल स्थानकावर वर्दळ कमी होती. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर येऊन तिथून पनवेलच्या बस स्थानकासाठी रिक्षा केली. बस स्थानकावर पोहचल्यावर समजले की सकाळपर्यंत गोव्याच्या दिशेनी जाणारी एक सुद्धा बस नाही. डोंबिवलीला परत जायचे का? की सकाळपर्यंत पनवेल बस स्थानकावर थांबायचे? या दोन प्रश्नांमुळे माझी द्विधा मनःस्थिती झाली. भगवंताने आपल्याला फक्त निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते परिणाम हा त्याचा विषय असतो. 'इच्छा तिथे मार्ग' तो तयार करत असतो याची खात्री असल्याने देवीआईच्या दर्शनाची आस मनात जोर पकडू लागली. शेवटी कसेही करून गोव्याला जायचेच असा वज्रनिर्धार केला. पनवेल बस स्थानकाच्या बाहेर येऊन रस्त्याच्या बाजूला उभा राहिलो. शनिवार असल्याने पेण, अलिबागच्या बाजूला जाणारी माझ्यासारखी बरीच मंडळी तिथे उभी होती. एक रूग्णवाहिका (अ‍ॅम्ब्युलन्स) वडखळ नाक्यावर जाणार होती. त्याने प्रत्येकी वीस रुपये सांगितले. पुढे दोघे व मागे सात असे नऊ प्रवासी अगोदरच आतमध्ये बसले होते. मी पण त्या रूग्णवाहिनीमध्ये जाऊन बसलो. आतमध्ये औषधांचा वास येत होता. आतील प्रवासी एकमेकांना चिटकून बसले होते. सर्वजण शांत बसले होते व आपआपल्या विचारविश्वात मग्न झाले होते.

पनवेल एस. टी. डेपो 

पनवेल ते वडखळ नाका जवळपास ३५ कि.मी. एवढे अंतर होते. एक तास कसा तरी काढायचा होता. माझ्याकडे कपड्यासहीत इतर वस्तूंनी भरलेली एकच मोठी बॅग होती. ती बॅग मांडीवर घेतली व त्यावर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. डुलकी लागली की तोल जाऊन बाजूच्या प्रवाश्याच्या अंगावर सर्व शरीराचा भार जायचा. नंतर कधी गाढ झोप लागली कळलेच नाही. वडखळ नाका आल्यावर बाकीच्या लोकांनी मला उठवले. रूग्णवाहिनीच्या चालकाला झोपेच्या झिंगेतच पैसे दिले आणि खाली उतरलो. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. वडखळ नाक्यावरून दोन रस्ते जात होते. तिकडच्या लोकांना विचारले असता समजले की इथून गोव्याला जाणारी बस मिळणार नाही. नाक्यावरच खेडला जाणारी पांढऱ्या रंगाची एक सुमो गाडी प्रवासी प्रतिक्षेत उभी होती. मग विचार न करता सुमो गाडीत जाऊन बसलो.

वडखळ नाक्यावरून खेड हे जवळपास १३० कि.मी. लांब होते. कमीतकमी तीन तासांचा प्रवास म्हटले तरी तिकडे पोहचेस्तोवर रात्रीचे अडीच-तीन वाजणार होते. सुमो गाडी नवीन वाटत होती. बसायला जागा सुद्धा व्यवस्थित आरामदायी होती. मी प्रथमच असा प्रवास करत होतो. सोबतच्या प्रवाश्यांना कदाचित त्याची सवय असावी. काही प्रवासी गाडीच्या चालकाला ओळखत होते. मी परत झोपण्याचा प्रयत्न करत होतो. गाडीच्या चालकाबरोबर गप्पा मारणार्‍यां प्रवाश्यांच्या आवाजाचा माझ्या झोपेवर काही परिणाम झाला नाही. परंतु एकाने खिडकी उघडी ठेवली होती. थंड हवा आत येत असल्यामुळे मी थंडीने कुडकुडायला लागलो. त्याला विनंती करून खिडकी बंद करायला लावली. नंतर मात्र मला छान झोप लागली.

सुमो गाडी रात्री तीन वाजता खेडला पोहचली. आतापर्यंत माझ्या झोपेचा अर्धा कोटा पुर्ण झाला होता. बाहेर खूप थंडी होती. मी बरोबर स्वेटर आणले नव्हते. अंगातील थंडी घालवण्यासाठी पोटात काहीतरी गरम जाणे आवश्यक होते. खेडच्या नाक्यावर एकच चहावाला होता. तिथे बरेच लोकं घोळका करून उभे होते. त्यांच्या बाजूला काही लाकडे जळत होती. ते लोकं चहा पीत पीत शेकोटी घेत होते. मग मी सुद्धा चहाबरोबर शेकोटी घेऊ लागलो. रात्रीच्या या अश्या प्रवासाचा मी खूप आनंद लुटत होतो. रात्रीच्या तीन वाजताची थंडी, हवेतला अल्हाद, सर्वत्र पसरलेला अंधार, रस्त्यावर धावणारी वाहने, हातात गरम गरम चहा आणि ती शेकोटी खरोखरच माझ्यासाठी तो एक वेगळाच अनुभव होता. 

खेडवरून रत्नागिरीला जायला थेट सकाळी बस होती. तिकडच्या लोकांनी चिपळूणला जायला सांगितले. खेडवरून चिपळूण एका तासाच्या अंतरावर होते. चिपळूणला जायचे ठरवले. त्यासाठी बस किंवा कुठले इतर वाहन येते का याची वाट पाहत होतो. समोरून एक कार जात होती. मी हात केल्यावर थोडे पुढे जाऊन कार थांबली. कारमध्ये चालक आणि एक माणूस मागे बसला होता. त्यांनी विचारलं, "कुठे जायचे आहे?" त्यांना चिपळूणपर्यंत सोडायला सांगितले. त्यांनी मला आत घेतले. थोडा वेळ आम्ही एकमेकांशी संवाद साधला. नंतर आम्ही दोघेही झोपी गेलो. पहाटे साडेचार वाजता चिपळूण आले. कारने मला चिपळूण नाक्यावर सोडले. कारचालकांचे आभार मानल्यावर ते पुढे निघून गेले. मी एकटाच रत्नागिरीला जाण्यासाठी गाडीच्या शोधात नाक्यावर उभा होतो. रस्त्यावर कोणीच नव्हते. काही वेळात एक जीप आली. मला बघून जीप थांबली. ती गाडी रत्नागिरीला जाणारी होती. माझ्या जीवात जीव आला. माझी बॅग उचलली आणि रत्नागिरीला निघालो. वैयक्तिक इच्छांचे आस, हव्यास व ध्यास असे तीन प्रकार असतात. 'आस' म्हणजे एखादी गोष्ट फक्त हवी असं वाटणे. मग ती मिळो किंवा न मिळो. 'हव्यास' म्हणजे गरज नसताना सुद्धा तीच गोष्ट हवी व त्यासाठी विनाकारण दुःखी होणे. 'ध्यास' म्हणजे फक्त तीच आणि तीच गोष्ट मिळवण्याची ध्यानीमनी सतत इच्छा करणे. माझी आस व हव्यास इच्छा आता ध्यासात बदलली होती. बेळगावला जाण्याआधी कुठल्याही परिस्थितीत रविवारी गोव्याला मंदिरात जाऊन आमच्या कुलदेवी म्हाळसा नारायणीचे दर्शन घ्यायचा मला ध्यास लागला होता.....

2 comments:

  1. भेटी लागे जीवा हे तुम्ही तुमच्या प्रवासातून सिध्द केलंत! तुमच्या लिखाणात ‌‌‌छोट्या छोट्या गोष्टींच डिटेलींग वाचायला छान वाटतं!!

    ReplyDelete
  2. आस, हव्यास, ध्यास... मस्त philosophy मांडलीत...

    ReplyDelete