'मागणी तसा पुरवठा' हा फक्त बाजाराचा नियम नसून तो मानव व नियती यांच्यामध्ये सुद्धा कर्माच्या सिद्धांतानुसार कार्यरत असलेला नियम आहे. मागणी म्हणजे गरज. गरज ही इच्छेतून निर्माण होते. पुरवठा हा गरजेची पुर्तता करतो म्हणजेच पर्यायाने इच्छापूर्ती करत असतो. जर इच्छा उदात्त, विशुद्ध व पारदर्शक असेल तर नियती संपुर्ण ब्रह्मांडात त्या इच्छेच्या पुर्ततेसाठी आवश्यक त्या घटना घडवून आणते. अश्या विशुद्ध इच्छातून ज्या गरजा निर्माण होतात त्यांच्या पुर्ततेसाठी नियती गरजांची पुर्तता करणार्या घटनांचा वेळच्यावेळी पुरवठा करते. मलाही तसा अनुभव आला. वाचनालयाचा पुढचा दोन फुट भाग रस्ता रुंदीकरणात मागे घ्यावा लागला होता. वाचनालयाच्या त्या तोडफोड झालेल्या भागात नवीन बांधकाम करून घेणे अनिवार्य झाले होते. सदर बांधकाम कसे व कोणाकडून करून घ्यायचे याचा मी विचार करत होतो. जेव्हा कधी आपले व्यवसायातील उत्पन्न वाढेल तेव्हा वाचनालय सुंदर व सुसज्ज करायचे हे माझे स्वप्नं व उद्दिष्ट होते. आता ती वेळ आली होती. वाचनालयाच्या सभासदांची संख्या वाढत होती. पुस्तके सुद्धा दहा हजाराच्या आसपास जमा झाली होती. जपान लाईफच्या ठाणे कार्यालयातून मला दोन लाख रुपये येणे होते. त्याच रकमेत वाचनालयाचे नूतनीकरण करायचे मी निश्चित केले.
सन २००० चा तो मार्च महिना मी माझ्या आयुष्यात कधीच विसरु शकत नाही. कंपनीच्या ठाणे कार्यालयात माझा संपुर्ण दिवस जात असे. वाचनालयाचे नुतनीकरण करण्यासाठी मला त्या कामात जातीने लक्ष घालणे गरजेचे होते व त्यासाठी मला काम पुर्ण होईस्तोवर पुर्ण वेळ वाचनालयात थांबणे सुद्धा आवश्यक झाले होते. कंपनीतील माझ्या चमूतील (टीममधील) सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना माझी अडचण सांगितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना एक आठवडा सांभाळून घ्यायची विनंती केली. काही झाले तरी वाचनालय हा माझा मुख्य व्यवसाय होता. वाचनालयाच्या सभासदांना चांगल्या सेवा, सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे आद्यकर्तव्य असल्याची मला जाणीव होती. माझी अडचण समजताच कार्यालयातील इतर सर्वजण माझी कामे व जवाबदार्या सांभाळायला तयार झाले. काहीजणांनी तर डोंबिवलीत येऊन वाचनालयासाठी काही मदत हवी असल्यास ती करण्याची सुद्धा तयारी दर्शविली.
वाचनालयाचे काम होईस्तोवर संपूर्ण वेळ वाचनालयासाठीच द्यायचा असं मी ठरवले होते. माझ्या घराचे काम ज्यांनी केले होते त्या श्री. मंजुनाथ भट यांना तात्काळ बोलावून घेतले. त्यांनी माझ्या काही ओळखीच्या लोकांच्या घरी सुद्धा काम केले होते. कमी खर्चात ते चांगले काम करत असत. लोकांना त्यांचे काम पसंत पडत असे. मला वाचनालयात फर्निचर, इलेक्ट्रिक, रंगरंगोटी इत्यादी सर्व कामे एकदाच काय ती करून घ्यायची होती. ही सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करायची होती कारण वाचनालय खूप दिवस बंद ठेवून चालणार नव्हते. सभासदांची गैरसोय मला अजिबात परवडणार नव्हती. श्री. मंजुनाथ भट यांनी वाचनालयाची पाहणी केली. त्यांनी एक चांगली सूचना केली. आधीची सर्व लोखंडी फडताळी (रॅक) बदलून मार्बलचे कप्पे बनवायची कल्पना त्यांनी मांडली. मार्बलचे कप्पे असलेले वाचनालय मी आतापर्यंत कधी पाहिले किंवा ऐकले नव्हते. श्री. मंजुनाथ भट यांना मी यासाठी किती पैसे लागतील? काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? इत्यादी सर्व तपशिलवार माहिती आजच्या आज मला द्यायला सांगितली. नाही तरी मला काहीतरी वेगळे करायचेच होते, त्यात त्यांनी एक चांगली कल्पना दिल्यामुळे मला बरं वाटले होते.
मला खूप दिवस वाचनालय बंद ठेवता येणार नव्हते. सर्व काम लवकरात लवकर संपवायचे होते. कमी खर्चात परंतु दिसायला सुंदर व सभासदांना सोयीस्कर होईल असे काहीतरी करण्याचा माझा मानस होता. त्याच दिवशी संध्याकाळी श्री. भट यांनी संपुर्ण मार्बल व टाईल्स कामाचा एकंदरीत खर्च दीड लाखापर्यंत येणार असल्याचे आणि हे सर्व काम करण्याकरिता सहा ते आठ दिवस लागणार असल्याचे सांगितले. भिंतीला टाईल्स व मार्बलचे कप्पे ही कल्पना भन्नाट होती. पुस्तकांना वाळवी न लागण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर टाईल्स व मार्बल हा एक उत्तम पर्याय ठरत होता. तसेच दिसायला सुंदर, साफसफाईला सोयीस्कर व पुस्तकांची निगा राखणे या सर्व बाबी लक्षात घेऊन पैश्यांचा विचार न करता उद्यापासून काम सुरू करण्यास मी श्री. भट यांना सांगितले.
सन १९८६ यावर्षी जेव्हा वाचनालय सुरु झाले तेव्हा फक्त शंभर पुस्तकं वाचनालयात होती. परंतु गेल्या चौदा वर्षात पुस्तकांची संख्या वाढत जाऊन ती आता अंदाजे दहा हजारपर्यंत झाली होती. आता काम सुरू होण्यापूर्वी ही सर्व पुस्तके वाचनालयातून अन्यत्र हलवायला लागणार होती. आठ दिवसांसाठी पुस्तक ठेवण्यासाठी मी जागा शोधत होतो. रामकृपा इमारतीत पहिल्या मजल्यावर माझ्या मित्राचे घर होते. त्यांनी नुकतेच ते घर रिकाम केले होते. त्यांच्याकडून आठ दिवसांसाठी घराची चावी मागवून घेतली. पुस्तके हलवायला अजय, मामा, शुभांगी असे तीन कर्मचारी तर होतेच परंतु त्यांच्या बरोबरीने माझे काही मित्र आणि सभासद सुद्धा पुस्तकं हलवण्याच्या कामात मदतीला आले. आम्ही सर्वांनी मिळून दिवसभरात सर्व पुस्तके मित्राच्या घरी नेऊन ठेवली. पुस्तके हलवाताना ती नीट हाताळणे हे सर्वात महत्वाचे होते व त्यादृष्टीने सर्वात मोठे काम झाले होते. वाचनालयात आता लोखंडी फडताळ (रॅक) व किरकोळ समान बाकी होते. मार्बलचे कप्पे बनवणार असल्याने लोखंडी फडताळ्याचा (रॅकचा) आता काही उपयोग होणार नव्हता. दुसऱ्या दिवशी ती सर्व लोखंडी फडताळं विकून टाकली. अश्या प्रकारे वाचनालयाची संपूर्ण जागा मोकळी केल्यावर श्री. भट यांना कामाचे काही पैसे आगाऊ दिले व ताबडतोब काम सुरू करण्यास सांगितले. एव्हाना जपान लाईफच्या ठाणे कार्यालयातून माझ्या खात्यात दोन लाख रुपये जमा झाले होते. नियतीने एकदा मागणी तसा पुरवठा करायचे ठरवले की मग सर्व गोष्टी वेळच्यावेळी आपोआप घडत जातात याची मी त्यावेळी अनुभूती घेतली. माझ्यासाठी ते एक उत्तम व संस्मरणीय उदाहरण बनले.
श्री. भट यांनी कामाला सुरुवात केली. आपल्या वाचनालयाची उंची आठ फूट होती. वरती सिमेंटचे पत्रे असल्याने वाचनालयामध्ये खूप उकडत असे. कर्मचार्यांना आणि सभासदांना उन्हाळ्यात गर्मीमुळे खूप त्रास होत असे. आता यावेळी नुतनीकरण करणार असल्याने यावर सुद्धा काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक होते. उंची वाढवता येत नव्हती कारण पालिकेच्या नियमात ते बसत नव्हते. त्यांनी वाढीव बांधकाम तोडून टाकले असते. मला एक कल्पना सुचली. उंची न वाढवता एक फूट खाली खणून खाली मार्बल बसवले तर वाचनालयाची उंची एक फुटांनी वाढणार होती.
श्री. भट यांच्या माणसांनी कामाला सुरुवात केली. एक फूट खोल खणायचे होते. जेव्हा खणायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढले. अरे सर्व जण उंची वाढवतात, खड्डा खणल्याने पावसात पाणी शिरेल वगैरे सूचना, सल्ले कानावर पडू लागले. कोणाला काही उत्तर न देता काम सुरू ठेवले. पहिल्या दिवशी खणण्याचे काम संपले. दुसऱ्या दिवशी कोबा, लादी बसवली. आता मार्बलचा रंग निवडायचा होता. मी हिरवा रंग सुचवला व त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या टाईल्स बसवायचे ठरले. सदर काम जेव्हा सुरू होते तेव्हा ते कधी एकदाचे संपते असे मला झाले होते. रेती, सिमेंट, धूळ या सर्वांमुळे खूप वैताग येत होता. तो मार्बल कापताना (कटिंग) होणारा कर्कश्य आवाज सहन होत नसे. कधी कधी मनात विचार यायचा हे कर्णकर्कश्य आवाज करणारे काम ही लोकं कशी काय करतात? हे सगळं ते नेहमी कसं काय सहन करत असतील? त्यांना किती त्रास होत असेल? परंतु त्याच कामावर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पोट होते याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने होत असे.
कामाला सुरुवात करून दोन दिवस झाले होते. दोन दिवसांत फक्त फरशी बसवून झाली होती. दहा टक्के सुद्धा काम झालेले नव्हते. आठ दिवसात काम संपेल की नाही याची मला शंका वाटू लागली होती. सदर काम आटोपल्यावर परत पुस्तकं लावायला सुरुवात करायची होती. पुस्तक लावण्यासाठी आम्ही फक्त चार पाच लोकं होतो. सभासद सारखे विचारत होते काम कधी संपेल? कधीपासून पुस्तकं मिळतील? सर्वांना आठ दिवसांची मुदत दिली होती. माझी ही अडचण लक्षात आल्यावर तिसऱ्या दिवसांपासून श्री. भट यांनी माणसे वाढवली व काम जोरात सुरू केले. जसजसे हिरव्या रंगाचे मार्बल व त्याच्या मागे पांढऱ्या रंगाच्या टाईल्स बसवत गेले तसतशी जागेची शोभा वाढत गेली. आठ ट्यूबलाईट, चार पंखे, एक नवीन मेज (टेबल) खरेदी केले. बरोबर आठव्या दिवशी एका छोट्याश्या सुंदर मंदिरासारखी जागा सभासदांसाठी उपलब्ध झाली. रस्त्यावरून जाणारी येणारी माणसे कौतुकाने जागा पाहायला लागली. या जागेवर सुसज्ज व सुंदर असे वाचनालय उभे राहणार आहे असं आधी कोणाला सांगितले तर त्यांचा त्या गोष्टीवर विश्वासच बसत नसे. आता झालेल्या अमुलाग्र बदलाने ती जागा आश्चर्य वाटावे इतकी सुंदर दिसायला लागली होती.
नूतनीकरणा नंतरची फ्रेंड्स लायब्ररी |
आम्ही सर्वांनी मिळून मित्राच्या घरी ठेवलेली पुस्तकं वाचनालयात आणायला सुरुवात केली. इंग्रजी, मराठी व लहान मुलांची पुस्तके वेगवेगळी करून त्यांचे नवीन कप्पे निश्चित केले. दहा हजार पुस्तके योग्य त्या जागेवर लावण्यासाठी दोन दिवस लागले. सर्व पुस्तकं योग्य जागी लागल्यावर माझ्या मनातील सुंदर व सुसज्ज वाचनालयाची कल्पना मुर्तरूपात साकार झाली होती. नुतनीकरण करण्याच्या निर्णयामुळे मला खूपच समाधान लाभले...
खरोखरच वाचनालय सुरेख झाले आहे
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुपच मस्त. 👌👌👌💐💐💐👍👍
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteइच्छा तिथे मार्ग.जबरदस्त !!
ReplyDeleteधन्यवाद
Delete