'यश हे यशासारखे नसते' हे वाक्य बहुआयामी असून त्यावर लिहावे तेवढे थोडेच आहे. व्यवसायिक यश हे कधी कधी आपण कल्पना केलेल्या यशापेक्षा सुद्धा अधिक चांगले असू शकते. परंतु अलभ्य लाभासारखे वाट्याला आलेले हे अकल्पित व्यवसायिक यश केवळ आपले एकट्याचे नसून त्यात आपले विश्वासू, कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक असलेले कर्मचारी यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे याची मला नेहमी जाणीव असायची. फ्रेंड्स लायब्ररीची पहिली शाखा उघडल्यावर लोकं खूप कौतुक करायला लागले. डोंबिवलीच्या औद्योगिक विभागातील वाचकांना वाचनालयाची ती शाखा खूपच सोयीस्कर झाली होती. या दरम्यान मी जपान लाईफ कंपनीच्या ठाणे कार्यालयातील कामकाजात व्यस्त होतो. सौ. रचना नाईक औद्योगिक विभागातील नविन शाखेची सूत्रे सांभाळत होत्या त्यामुळे मला त्या शाखेकडे जास्त लक्ष द्यावे लागत नव्हते. इकडे टिळकनगरमध्ये असलेल्या वाचनालयातील सभासदांची संख्या सुद्धा वाढत होती. श्री. अजय व श्री. सुनील वडके उर्फ मामा टिळकनगर वाचनालय उत्तम प्रकारे सांभाळत होते. मामांना रोज मासिकं आणायला मुंबईला जावे लागायचे. मामा मुंबईला खरेदीला गेले की वाचनालयात श्री. अजय हे एकटे असायचे. त्यांच्या बरोबर एक मुलगी कामाला होती, परंतु तीने नोकरी सोडली होती. तिच्या रिकाम्या जागेवर दुसर्या व्यक्तीला नेमणे आवश्यक होते. काही मित्र व ओळखीच्या लोकांना मी त्या रिक्त जागेबाबत सांगून सुद्धा ठेवले होते.
जपान लाईफ कंपनीच्या ठाणे कार्यालयामध्ये व्यवसाय व स्लीपिंग सिस्टीमच्या चर्चासत्रासाठी आतापर्यंत मी बर्याच नातेवाईक व मित्रांना घेऊन गेलो होतो. केवळ माझ्यावरील विश्वासापोटी त्यातील काही जण माझ्या गटामध्ये (टीममध्ये) सभासद (जॉईन) बनून सहभागी झाले होते. एकदा श्री. सचिन गोडबोले नावाच्या माझ्या एका मित्राला मी ठाणे कार्यालयात चर्चासत्राचा अनुभव मिळावा म्हणून घेऊन गेलो. सचिन आणि मी डोंबिवलीतल्या पेंढरकर कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होतो. तो अभ्यासात खूप हुशार होता. सचिनने चर्चासत्राचा सर्व कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला. त्याला कंपनीचे स्लीपिंग सिस्टीम हे उत्पादन (प्रॉडक्ट) पसंत पडले होते. परंतु त्याला पैशांची अडचण जाणवत होती. चर्चासत्र संपल्यावर आम्ही दोघे एकत्र डोंबिवलीला यायला निघालो. रेल्वे गाडीतून येत असताना सचिनने त्याचा मोठा भाऊ सध्या कामाच्या शोधात असल्याचे मला सांगितले. त्यांची कंपनी बंद पडल्याने ते घरीच आहेत असं त्याने सांगितले. मला सुद्धा वाचनालयासाठी एका माणसाची गरज होती. मी सचिनला नंतर कळवतो असे सांगितले. आम्ही गप्पा मारता मारता डोंबिवलीला गाडीतून उतरलो. त्याने भावाच्या नोकरीबाबात मला जे सांगितले होते ते मी नंतर विसरून गेलो.
काही दिवसांनी मी वाचनालयात असताना सचिनने मला पाहिले. 'मी भावाला आत्ताच घेऊन येतो. आपण समोरासमोर बसून बोलू या' असं सचिन म्हणाला. मी होकार दिला. थोड्याच वेळात दोघे एकत्र वाचनालयात आले. समोरासमोर बसून बोलायचे ठरले होते. परंतु वाचनालयात बसायला जागाच नव्हती. उभे राहूनच आमचे बोलणे झाले. पुस्तकं क्रमवारीत लावणे, पुस्तकांची साफसफाई करणे, पुस्तकं बदलायला आलेल्या सभासदांना त्यांच्या मागणीनुसार पुस्तकं शोधून देणे इत्यादी सर्व कामे करावी लागणार असल्याचे मी त्यांना सांगितले. सकाळी साडेसात ते दुपारी एक आणि संध्याकाळी साडेचार ते नऊच्या दरम्यान वाचनालय सुरू असते. सोमवारी फक्त सकाळी सुट्टी असल्याचेही सांगितले. मी जास्त पगार देऊ शकत नसलो तरी सुद्धा पगाराचा आकडा सांगून, विचार करून काही दिवसात कळविण्याचे त्यांना सांगितले.
तेव्हा वाचनालयात जागा खूप कमी होती. विविध विषयांवरील जवळपास पंधरा हजार पुस्तकांनी जागा व्यापली होती. बसण्यासाठी फक्त दोन टेबल-खुर्च्या होत्या. तिसरी व्यक्ती कोणी आली तर तीला उभे राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सकाळी दहा ते साडेबारा आणि संध्याकाळी सहा ते साडेआठ या कालावधीत वाचनालयात सभासदांची वर्दळ असायची. आलेल्या वर्गणीची पावती बनविणे, पैसे घेणे, पुस्तकांची नोंद करणे या कामांसाठी एक माणूस टेबलावर तत्पर असावा लागायचा, तर आलेली पुस्तकं जागेवर लावणे, सभासदांना पुस्तकं शोधून देणे यासाठी एक माणूस हवाच होता. सचिनचे मोठे भाऊ वाचनालयातील नोकरीसाठी रूजु झाले तर ते मला हवेच होते. फक्त त्यांना मी जास्त पगार देऊ शकत नव्हतो व तसे मी अगोदरच सचिनला कळवले होते.
श्री. शेखर गोडबोले हे टिळकनगर शाळेनजीकच्या मातृश्रद्धा इमारतीत चौथ्या मजल्यावर रहायचे. ते ठाण्याच्या एका खाजगी कंपनीत कामाला होते. परंतु काही कारणास्तव कंपनी बंद पडल्याने आता ते घरीच होते. त्यांचे वडील भारतीय लष्कराची सेवा करून निवृत्त झाले होते. आई चिन्मय मिशन संस्थेमध्ये कार्यकर्त्या म्हणून सक्रीय होत्या. त्यांच्या पत्नी कस्तुरी प्लाझा येथे एका वकिलांकडे कामाला होत्या. त्या मराठी टंकलेखनामध्ये (टायपिंगमध्ये) माहिर होत्या. श्री. शेखर गोडबोले यांना सचिन व शैलेश असे दोघे भाऊ होते. दोघेही मोठ्या कंपनीत कामाला होते. आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्यांना जास्त पगाराची अपेक्षा नव्हती.
श्री. शेखर गोडबोले मला भेटायला येऊन दोनच दिवस झाले होते. तिसऱ्याच दिवशी ते वाचनालयात नोकरीसाठी रुजु झाले. ते कामावर येऊ लागल्याने मला खूप आनंद झाला. त्यांचे वाचन चांगले होते. ते श्री. परांजपे यांच्या 'ज्ञानविकास' वाचनालयाचे सभासद असल्यामुळे त्यांनी बरीच पुस्तके वाचलेली होती. त्यांना अनेक लेखकांची माहिती सुद्धा होती. त्यांच्या वाचनाच्या अनुभवामुळे वाचनालयात आलेल्या सभासदांना पुस्तकं निवडून देणे हे काम सोपे झाले होते. ते टिळकनगर विभागात अनेक वर्ष राहत असल्यामुळे वाचनालयात येणारे बरेच सभासद त्यांना ओळखत होते. श्री. शेखर गोडबोले यांनी आल्या दिवसापासूनच वाचनालयातील सर्व मराठी पुस्तकं हाताळायला सुरुवात केली.
मला नक्की तारीख आठवत नाही परंतु सन २००२च्या फेब्रुवारी महिन्यात श्री. शेखर गोडबोले यांनी फ्रेंड्स लायब्ररीत कामाला सुरुवात केली होती. मी ठाण्याच्या कार्यालयामध्ये व्यस्त असल्याने श्री. अजय व श्री. सुनील वडके उर्फ मामा हे दोघे माझ्या पश्चात वाचनालय खूप चांगल्या पद्धतीने हाताळायचे. आता या जोडगोळीमध्ये श्री. शेखर गोडबोले हे सुद्धा सामिल झाले होते. मुंबईहुन मासिकं आणणे, पुस्तकं शिवणे, पुस्तकांची साफसफाई करणे, ही सर्व कामे मामा सांभाळायचे. श्री. अजय पुस्तकं लावणे, सभासदांच्या मागणीनुसार नसलेली पुस्तकं मागवून घेणे व इतर कामे सांभाळायचा. आता श्री. गोडबोले त्यांच्या मदतीला आले होते, त्यामुळे श्री. गोडबोलेंना मराठी पुस्तकांची जवाबदारी दिली गेली.
श्री. शेखर गोडबोले यांनी फ्रेंड्स लायब्ररीत रूजु झाल्यापासून एका महिन्याच्या आत सर्व प्रकारची कामे शिकून घेतली. सकाळी बरोबर साडेसात वाजता वाचनालय उघडायची ते वाट पाहत असायचे. वेळेच्या बाबतीत ते एकदम पक्के होते. येणाऱ्या प्रत्येक सभासदांशी ते उत्तम संवाद साधू लागले. वाचकाला हवी ती पुस्तकं शोधून देण्यात ते माहीर झाले. कॉर्पोरेशन बँकेत फ्रेंड्स लायब्ररीच खातं होते. बँकेत जाऊन रोख रक्कम व चेक भरणे ही सर्व बँकेची कामे श्री. गोडबोले सांभाळू लागले होते. एका माणसांमुळे मला खूप मदत होऊ लागली होती.
'अपयश नेहमी पोरकं असते, परंतु यशाला अनेक बाप असतात' या विचारातील मानवी नकारात्मकता वजा केली तर सत्य हेच असते की यश-अपयश या दोघांना नेहमीच अनेक बाप असतात. परंतु व्यवहारी मानवाला त्यांना एकपितृत्व बहाल करण्याची दांडगी हौस असते. मुळातच यश-अपयश हे सापेक्षतावादावर आधारित असल्याने ते एकटे कधीच नसतात. कुठलाही व्यवसाय एकट्याच्या जोरावर चालत नसतो. त्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी माणसांची गरज लागतेच. त्यात चांगल्या विचारांची, प्रामाणिक, मेहनती, कर्तव्यनिष्ठ माणसे लाभण्यासाठी नशीब लागते. मी खरोखरच नशिबवान असेन म्हणून मला अजय, मामा, गोडबोले यांच्यासारखी कर्तव्य कर्मप्रिय माणसे भेटली. परिणामतः वाचनालयाची भरभराट वेगाने झाली. मला कधीच मागे वळून पहावे लागले नाही. या तिघांच्या सहकार्यामुळे मी वाचनालयाचा व्यवसाय भराभरा वाढवू शकलो. आज फ्रेंड्स लायब्ररीची जी काही प्रगती झाली आहे ती अजय, मामा आणि गोडबोले यांच्यामुळेच हे अभिमानाने सांगताना मला नेहमीपेक्षा अधिक मोठे झाल्याचा आनंद मिळतो.
सुंदर वर्णन,,,चांगले मित्र नशीबवान माणसालाच भेटतात,,,सुभाष
ReplyDeleteगोडबोले काका लायब्ररीचे बिन्नी चे शिलेदार आहेत.
ReplyDeleteटीमवर्कचं महत्व उत्तम अधोरेखित केलं आहे तुम्ही.
ReplyDelete