Saturday, September 5, 2020

ताज पॅलेस हॉटेलमधील आमच्या कंपनीच्या चर्चासत्राचा पहीला दिवस...

'एक दिन बीत जाएगा माटी के मोल, जग में रह जाऐंगे प्यारे तेरे बोल' असं गीतकार म्हणत असला तरी व्यवसायिक मात्र दिवसाचे सोने कसे करायचे याचाच विचार करत असतो. सर्वच दिवसांची माती होत नसते. काही मोजके दिवस आपल्या आयुष्यात सोन्यासारखे उगवतात व आजपर्यंत आपण सोने केलेल्या इतर दिवसांची सुद्धा ते आठवण करून देतात. सोमवारी सकाळी ठीक दहा वाजता दिल्लीच्या ताज पॅलेसमध्ये आमच्या कंपनीच्या चर्चासत्राच्या पहील्या दिवसाच्या कार्यवाहीला सुरूवात होणार होती. हॉटेल ताज पॅलेसच्या एका खोलीमध्ये माझ्यासह चौघेजण होते. किमान अर्धा तास तरी आधी सर्व तयारीनिशी सभागृहात (हॉलवर) पोहोचायचे असं आम्ही ठरवले होते. आमच्या खोलीमध्ये बाथ टब होता. प्रत्येकाने जास्तीत जास्त अर्धा तास बाथ टब वापरायचा असे आम्ही ठरवले होते. बाथ टब गरम पाण्याने भरायला दहा मिनिटे लागत असत. थंडीचे दिवस असल्याने गरम पाण्याने भरलेल्या टबमध्ये एकदा उतरलो की परत बाहेर यावेसे वाटत नसे. मी आदल्या दिवशीच ठरवले होते की लवकर उठायचे आणि एक तास तरी बाथ टबमध्ये डुंबून रहायचे. तिकडे ठेवलेले चार निरनिराळे सुगंधाचे शँम्पू वापरायचे. एक तास टबमध्ये शांतचित्ताने घालवायचा, कारण परत अशी संधी मिळणार नव्हती.


मी पहाटे पाच वाजताच उठलो. बाकीचे सर्व सहकारी गाढ झोपेत होते. टबमध्ये गरम पाणी सोडले. दहा मिनिटात टब गरम पाण्याने भरल्यावर टबमध्ये उतरलो. परंतु पाणी थोडे जास्त गरम झाले असल्यामुळे थोडासा चटका बसत होता म्हणून त्यात थोडेसे थंड पाणी सोडून ते सुसह्य केले. नंतर एक तास तरी टबमध्येच होतो. शँपूच्या सुगंधानी मन प्रसन्न झाले होते. मी स्नान करून बाहेर आल्यावर बाकीची मंडळी टबचा आनंद लुटायला तयार होणारच होती. माझे स्नान आटपल्यावर बाहेर येऊन मी चहा तयार करायला घेतल्यावर एक एक जण उठायला लागला. त्या दिवशी आम्ही सर्व जण आठ वाजताच तयार झालो. साडेआठ वाजता भोजनकक्षात नाष्टा होता. रोज निरनिराळ्या भोजनकक्षात नाष्टा असायचा. रोजच्या वेळापत्रकात नाष्टा, जेवण, चर्चासत्राचे ठिकाण आणि वेळ दिलेली असायची. ताज पॅलेस एवढे विस्तीर्ण होते की नाष्ट्याचे ठिकाण शोधायला पाच दहा मिनिटे लागत असत. मी माझ्या चमूतील (टिममधील) सर्वांना साडेनऊच्या आधीच सभागृहाच्या ठिकाणी जमायला सांगितले होते.

आम्ही सर्वजण साडेनऊ वाजता सभागृहाच्या ठिकाणी पोहचलो. भारतातील जपान लाईफ कंपनीचे गेल्या तीन वर्षातील हे तिसरे चर्चासत्र होते. सभागृह खूप मोठे होते. सभागृहातील मंचावर (स्टेजवर) छान पैकी सजावट केली होती. मंचावर दहा लोकांना बसण्याची सोय केली होती. आम्हां सर्वांना बसण्यासाठी सोफासदृश आरामदायी खुर्च्या होत्या. सभागृहात दिल्ली, मुंबई, ठाणे, बेंगळुरू इथून येणाऱ्या जवळपास दोनशे लोकांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती. वेळेच्या बाबतीत आमच्या कंपनीचे मालक श्री. वसंत पंडित हे खूप कडक होते. त्या दिवशी दहाला पाच मिनिटे असताना ते मंचवर येऊन बसले. त्यांच्या आधीच मंचवरची इतर मान्यवर मंडळी हजर झाली होती. बरोबर दहा वाजता त्यांनी सभागृहाचा दरवाजा बंद करायला सांगितला. अजून काहीजण यायचे बाकी होते. श्री. वसंत पंडीत यांचा इशारा मिळताच सभागृहाचा दरवाजा बंद करण्यात आला. प्रारंभी आम्ही सर्वांनी मिळून आमच्या कंपनीचे ठरलेले शिर्षक गीत म्हटले. मग सभेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. श्री. वसंत पंडित यांनी ध्वनिक्षेपक हातात घेतला व बंद केलेला दरवाजा उघडायला सांगितला. उशीरा आलेले सभासद जे बाहेर उभे होते त्यांची नावे नोंदवून घ्यायला श्री. वसंत पंडीत यांनी सांगितले. उशिरा आल्यामुळे त्यांचा या महिन्याचा संपूर्ण धनादेश (चेक) दान करण्यात येईल अशी पुस्ती सुद्धा त्यांनी पुढे जोडली.


चर्चासत्राच्या सुरुवातीला मुंबई, दिल्ली, ठाणे आणि बेंगळुरू कार्यालयांच्या व्यवस्थापकांची (मॅनेजर्सची) प्रास्ताविकं झाली. जपान लाईफ हा व्यवसाय कार्यालयात दररोज किती नवीन माणसे चर्चासत्राचा (सेमिनारचा) अनुभव घ्यायला येतात, तसेच त्यातील किती लोकं कंपनीचे सभासद (जॉईन) होतात यावर अवलंबून होता. यामुळे सर्व व्यवस्थापक आपआपल्या कार्यालयातील उलाढाल व व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या कार्यालयीन उपाय योजना व उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देत होते. अर्थात आम्हा सर्वांना त्याचा फायदा मिळणार होताच. आपली सभासदसंख्या (टीम) आणि उत्पन्न वाढवण्यासाठी खूप काही नविन गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या. विविध व्यवस्थापकांनी सांगितलेल्या सर्व उपयुक्त गोष्टी मी माझ्या नोंदवहीत (डायरीत) लिहून घेतल्या. आपण आज जे काही सुख उपभोगतोय ते सर्व या व्यवसायात यशस्वी झाल्यामुळेच याची मला पूर्ण जाणीव होती. मी सर्वांची भाषणे नीट लक्षपूर्वक ऐकत होतो. ठीक एक वाजता चर्चासत्राचा पाहिला भाग संपला. एक तास जेवणासाठी राखून ठेवला होता. चर्चासत्राचा जेवणानंतरचा भाग खूप महत्वाचा होता. जेवणानंतर जपान लाइफचे भारतातील संचालक श्री. वसंत पंडित स्वतः बोलणार होते. आम्हा सर्वांना त्यांच्या भाषणाची खूप उत्सुकता होती. अर्ध्या तासात जेवण उरकून चर्चासत्राच्या पुढील भागाला कधी सुरूवात होते याची आम्ही सर्वजण वाट पाहू लागलो.

जपान लाईफ ही कंपनी श्री. वसंत पंडित यांनी भारतात आणली होती. ते भारतातील जपान लाईफ इंडियाचे संचालक होते. ते नेहमी इंग्रजीत बोलत असत. त्यांची इंग्रजी साधी आणि सोपी होती. सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने ते बोलायचे. त्यांचे इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व होते. वेळेच्या बाबतीत ते खूपच कडक होते. त्यांना खोटं बोललेलं आवडत नसे. सर्वजण त्यांना घाबरत असत. त्यांच्यासमोर बोलायची कोणाची हिंमत नसायची. आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधायचो. ते नेहमी मुंबईच्या कार्यालयात असायचे. मी ठाणे कार्यालयात असल्याने त्यांच्याशी प्रत्यक्ष कधीच बोललो नव्हतो. मी व्यवसायात काहीच चुका केल्या नव्हत्या त्यामुळे मला त्यांची कधीच भीती वाटली नाही. उलट मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटत होता.

आता अधिवेशन स्वतः श्री. वसंत पंडित घेत असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे लागले होते. जपान लाईफमध्ये सभासद (जॉईन) होणार्‍या सर्व लोकांना पैसे मिळत नव्हते. फक्त वीस ते तीस टक्के सभासद चांगले पैसे कमवत होते. श्री. पंडीत यांना या गोष्टीची खूप चिंता वाटत होती. सर्वांना कमाईची संधी देण्यासाठी स्लीपिंग सिस्टीम बरोबर दोन जोड व्यवसाय योजना त्यांनी जाहीर केल्या. येत्या काही काळात हर्बल प्रॉडक्ट्सचे उत्पादन सुरू करण्याची कल्पना त्यांनी मांडली. ती सर्व हर्बल उत्पादने बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपेक्षा स्वस्तात मिळणार होती. तसेच ती सर्व उत्पादने भारतातच तयार होणार होती. ही सर्व उत्पादने उत्तम दर्जाची रहाणार असल्याने त्यांच्या विक्रीतून  सर्वांना कमाईची संधी मिळणार होती. त्याचबरोबर भारतात अजून तीन चार ठिकाणी कंपनीच्या नवीन शाखा उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याबाबत पुढच्या दोन दिवसात सविस्तर माहिती दिली जाईल असेही ते म्हणाले. त्यांचे प्रास्ताविक थोडक्यात झाले परंतु ते खूप महत्त्वाचे होते. पंधरा मिनिटे चहापानाचा मध्यंतर झाला. चहापानानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्या दिवसाच्या चर्चासत्राची सांगता झाली.


हर्बल प्रॉडक्ट्स आले की सर्वांना कमाईची संधी मिळेल या विचाराने मला खूप आनंद झाला होता. कधी एकदा ठाण्याला जातो आणि सर्वाना ही बातमी देतो असे मला झाले होते. चर्चासत्र संपल्यावर संध्याकाळी आम्ही सर्व खोलीवर आलो. सर्वांनी पोहण्यासाठी एक तास घालवायचा असे ठरले. आम्ही पोहण्याचा खास पेहराव (स्वीमिंग ड्रेस) घालून त्याच्यावर टॉवेल गुंडाळून स्विमिंग पूलाकडे रवाना झालो. स्विमिंग पूल खूप मोठा होता. आमच्या आधीच काही लोकं त्यात उतरले होते. आम्ही सुद्धा उतरलो. मला पोहता येत नव्हते परंतु पाणी कमी खोल असल्यामुळे सहज तरंगता येत होते. बाजूला अपेयपानाची (हॉट ड्रिंकसची) सोय होती. परंतु त्याला पैसे लागणार होते. खूप महाग असल्यामुळे आम्ही तो विचार सोडून दिला. प्रोत्साहनार्थ (काँप्लिमेंट) काही मिळत असेल तरच विचार करायचा अन्यथा पैसे खर्च करायचे नाही यावर आमचे एकमत झाले. तसे रात्री जेवण होते. तिकडे खण्यापिण्याची सर्व सोय असणारच होती व ती सुद्धा मोफत. अश्या प्रकारे दिवसाचे सोने केले. ही गोष्ट मग जेव्हा आपल्याला जगाला सांगावीशी वाटते तेव्हा 'जग में रह जाऐंगे प्यारे तेरे बोल' याचा अर्थ सुद्धा उमगतो.

4 comments:

  1. उत्तम गाण्याचे संदर्भ दिल्याने वाचनाची रंगत अधिक वाढते.

    ReplyDelete
  2. छान वर्णन केलेत

    ReplyDelete