'साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना' हे सुप्रसिद्ध गीतवाक्य संघभावनेने काम का करावे ते मोजक्या आशयघन शब्दात अचूकपणे विशद करते. संघभावना संपुर्ण संघाच्या मनात व्यवस्थित रूजली असेल तर अशक्य वाटणारे ध्येय सुद्धा साध्य करता येते. आमच्या कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये संघभावनेने काम करणे हे अतिशय महत्वाचे व आवश्यक होते. श्री. झांग हे वरिष्ठ कोरियन अधिकारी माझ्या घरी येऊन गेल्यावर जपान लाईफ कंपनीच्या व्यवसायातील माझा आत्मविश्वास दुणावला होता. श्री. झांग यांनी मला घरी येऊन उत्कृष्ट मार्गदर्शन केले होते. त्या मार्गदर्शनाचा कार्यालयामध्ये लोकांबरोबर बोलताना व वागताना मला खूप फायदा होत होता. माझे इतर काही वरिष्ठ अधिकारी माझ्यापेक्षा कमी वयाचे असले तरी त्यांच्याकडे जपान लाईफ कंपनीच्या व्यवसायाचा माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. श्री. झांग जसे सांगतात तसेच आपल्याला केले पाहिजे असे या माझ्या वरिष्ठ अधिकार्यांचे धोरण असायचे. श्री. झांग माझ्या घरी येऊन गेलेले असल्याने कनिष्ठ वयाच्या त्या वरिष्ठ अधिकार्यांचे ते धोरण मला पटू लागले होते. त्यांच्या त्या धोरणानुसार मी चालायला लागलो व त्यामुळे जपान लाईफ कंपनीच्या व्यवसायामध्ये मला जास्त यश मिळत गेले.
जपान लाईफ कंपनीच्या व्यवसायामध्ये आम्ही सर्व सभासद व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन नवीन प्रयोग करायचो व ज्या प्रयोगामध्ये यश मिळत असे त्याचे अनुसरण करायचो. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी चिकाटी, जिद्द व ध्येय या काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक होत्या. लोकांना हा व्यवसाय जरी आवडला तरी एक लाख रुपये गुंतवताना लोकं अंतर्मुख होऊन दहावेळा विचार करायचे. त्यामुळे आम्ही सर्व सभासद एकत्र जमून आपले अनुभव एकमेकांना सांगायचो. एकाचा अनुभव दुसऱ्याला उपयोगी पडायचा. एकमेकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही एकत्र खुली चर्चा करायचो. त्यातूनच एकप्रकारची संघभावना व संघकार्य (टिम वर्क) संस्कृतीचा विकास होत होता.
एक रविवार पूजा चित्रपटगृहातील बारा वाजताचा लगान चित्रपटाचा खेळ (शो) फक्त जपान लाईफ कंपनीतील सभासद व त्यांच्या परिवारातील लोकांकरिता आरक्षित (बुक) करायचे ठरवले. प्रथमच आम्ही असा मोठा निर्णय घेत होतो. श्री. विक्रम दुबल यांच्या गटातील (टीममधील) बरेच सभासद डोंबिवलीत राहणारे होते. परंतु चित्रपटगृह भरेल एवढी लोकं जमणे गरजेचे होते. श्री. विक्रम आणि श्री. विनायक यांनी चित्रपटगृहाचा एक संपुर्ण खेळ (शो) आरक्षित (बुक) केला व मग सर्वांना कळवले. सर्वजण यायला तयार झाले. काही दिवसांतच सर्व तिकीटे विकली गेली. आम्ही सर्वजण त्या रविवारची उत्सुकतेने वाट पाहत होतो.
"संतोषसह आपल्याला दोघांना लगान चित्रपट पहायला जायचे आहे. आम्ही चित्रपटगृह एका खेळासाठी (शो) आरक्षित केले आहे", असं मी सुमनला सांगितले. सुमनने चित्रपट पहायला येण्याचे कबूल केल्याने मला बरं वाटले. खरंतर याआधी आम्ही तिघांनी बरेच चित्रपट पाहिले होते. संतोषला चित्रपट पाहण्यापेक्षा खाण्यापिण्यामध्ये जास्त रुची होती. त्याला पॉपकॉर्न, आईस्क्रीम, सामोसे खायला आवडायचे. कहो ना प्यार है, कुछ कुछ होता है, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हॅरी पॉटर-भाग पहिला असे बरेच चित्रपट आम्ही तिघांनी एकत्र पाहिले होते. मला सुद्धा सुमन, संतोषबरोबर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायला आवडायचे. आता यावेळी लगान चित्रपट पाहण्याचा योग आला होता.
आमच्या गटातील कंपनीच्या सर्व सभासदांना कुटुंबासह एकत्र आणून एखादा चित्रपट दाखवणे हा आमचा पहिलाच प्रयोग होता आणि तो चांगलाच यशस्वी झाला. त्या दिवशी चित्रपट पहायला येणाऱ्या सर्वांच्या स्वागतासाठी जपान लाईफ कंपनीचे आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी जातीने हजर होतो. दुपारी बारा वाजता चित्रपट सुरू होणार होता. आम्ही आर्धा तास आधीच पोहचलो होतो. मी सुमन व संतोषला चित्रपटगृहातील त्यांच्या जागेवर जाऊन बसवले. सर्वजण ओळखीचेच असल्याने चित्रपट बघण्यात एक वेगळीच मजा येणार होती. ठीक बारा वाजता चित्रपटाला सुरुवात झाली. संतोष माझीच वाट पहात होता. चित्रपट पाहताना त्याला माझ्याच शेजारी बसायचे होते. मी संतोष व सुमन बरोबर माझ्या जागेवर स्थानापन्न झालो.
चित्रपटाला सुरुवात होण्याआधी चित्रपटगृहामध्ये खूप गोंगाट चालू होता. परंतु चित्रपटाला सुरुवात झाल्यावर सर्वजण निशब्द झाले. चित्रपटाच्या शिर्षकामध्येच पटकथेचा आशय ठासून भरला होता. अगोदर मला लगान या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. गरीब शेतकरी मेहनत करून शेती करायचा परंतु त्या शेतातील धान्याचा काही भाग बळजबरीने इंग्रज लोक शेतसारा म्हणजे लगान (कर) म्हणून वसुल करायचे. या बलाढ्य जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध एकटी व्यक्ती यशस्वी लढा देऊ शकत नव्हती. परंतु संघटितपणे इंग्रजी सत्तेचा यशस्वी प्रतिकार करणे शक्य होते. भुवन नावाचा एक सर्वसामान्य ग्रामीण तरूण शेतकरी इंग्रजांनी अटी व शर्तीसह सक्तीने लादलेले आवाहन संघटित प्रतिकाराची संधी समजून स्विकारतो. इंग्रजांनी सक्तीने लादलेले क्रिकेट खेळण्याचे आवाहन भुवन स्विकारतो कारण क्रिकेटचा सामना जर आपण भारतीयांनी जिंकला तर तीन वर्षे शेतसारा म्हणजे लगान द्यावा लागणार नव्हता व सामना हरलो किंवा आवाहन स्विकारले नाही तर मात्र तिप्पट लगान भरणे सक्तीचे होते. क्रिकेट खेळता येत नसल्याने दोन्हीकडून मरणच सर्व गावकर्यांना दिसत होते. परंतु क्रिकेट शिकून या संधीचे विजयात परिवर्तन करण्याचा वाङ्गनिश्चय भुवनने मनात पक्का केलेला असतो. आता 'शेंडी तुटो वा पारंबी' मागे हटायचे नाही असा वज्रनिर्धार करायला तो गावकर्यांना प्रवृत्त करतो. खूप परिश्रम करून गावकरी क्रिकेट कसे शिकतात व त्यांच्यात त्यातूनच संघभावना व संघकार्य संस्कृती कशी विकसित होते याचे चित्रपटात चित्तवेधक पद्धतीने चित्रीकरण केले होते. चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय असल्याने प्रत्येक गाण्याला शिट्ट्या वाजत होत्या. सर्वांनी चित्रपटाचा खूप आनंद घेतला होता. तीन तासाच्या चित्रपटामध्ये दीड तासानी मध्यंतर झाला. आम्ही सर्वांसाठी सामोसे मागवले होते. सर्वांना गरम गरम सामोसे वाटण्यात आले.
मध्यंतरानंतर चित्रपट खर्या अर्थाने जागेवर खिळवून ठेवणारा, लक्षवेधी व उत्सुकता निर्माण करणारा होतो. क्रिकेट खेळाचा कोणताच स्पर्धात्मक अनुभव गाठीशी नसताना इंग्रजांच्या दिग्गज संघाला हरवणे भारतीयांसाठी सोपे नसते. इंग्रजांना फक्त आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी सामना जिंकायचा होता. परंतु भुवनसमोर मात्र सामना जिंकून तीन वर्षांचा लगान म्हणजे कर माफ करून घेण्याचे आव्हानात्मक लक्ष्य होते. सर्व गावकर्यांसाठी तो जीवन मरणाचा, अस्तित्वाचा प्रश्न होता. परिणामतः गावातील गरीब, भुकेकंगाल, दुष्काळग्रस्त शेतकरी जिवाच्या कराराने, जिद्दीने तो सामना खेळत होते. दोन संघातील संघभावनेत हाच मोठा लाक्षणीय 'लक्ष्यमात्र' फरक होता.
क्रिकेटमधील अनुभवी व मुरलेला इंग्रजांचा संघ भुवनच्या नवख्या अनुभवशुन्य संघासमोर जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान उभे करतो. भारतीय फलंदाज प्रथमच फलंदाजी करत असतात व त्यात असे बिकट आव्हान समोर असते. संपुर्ण चित्रपटगृहामध्ये गंभीर शांतता पसरली होती. भारतीय फलंदाज एक एक धाव काढू लागले की टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागत. माझ्या लक्षात राहीला तो शेवटचा भुवनने उंच मारलेला चेंडू. इंग्रज संघाचा उद्दाम कर्णधार अँड्र्यु रसेल धावत जाऊन तो झेल पकडतो. एकदम सर्वांच्या चेहऱ्यावर निराश पसरते. परंतु कॅमेर्याचा झोत (फोकस) जेव्हा कॅप्टन रसेलच्या पायावर येतो तेव्हा सर्वांना समजते की त्याने सीमारेषेच्या बाहेर पाय टेकवला आहे आणि तो झेल षटकार म्हणून घोषित केला जातो. भारतीय संघ विजयी होतो. सर्वांच्या चेहऱ्यावर हर्षोल्लास झळकतो. त्या एका चेंडूमुळे पुढील तीन वर्षाचा कर म्हणजे लगान माफ केला जातो. हा खरे तर संघभावना व संघकार्य संस्कृतीचा विजय असतो. या चित्रपटातून हिच महत्त्वाची गोष्ट आमच्या कंपनीच्या सर्व व्यवसायिक सभासदांनी शिकावी अशी आमची माफक अपेक्षा होती. पराभवाचा अपमान इंग्रजांना सहन होत नाही. ते लवाजम्यासह पंचक्रोशीतून काढता पाय घेत असताना सर्व गावकरी ते दृश्य पहायला येतात. तेव्हा रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक वृद्ध व्यक्ती उत्स्फुर्तपणे म्हणते की, "कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की असाही एक सोनेरी दिवस जिवंतपणी पहायला मिळेल''. एखादे उद्दिष्ट गाठायचे असेल तर दुर्दम्य जिद्द व चिकाटी लागते. अनुभव नसला तरी सतर्क राहून पूर्व तयारी केली व सर्वांनी एकत्र येऊन लक्ष्य गाठायचे प्रयत्न केले तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते. एक व्यवसायिक म्हणून हिच महत्त्वाची गोष्ट मी लगान चित्रपटातून शिकलो......
स्पेशलच म्हणायला हवा हा अनुभव
ReplyDeleteहो एक वेगळा प्रयत्न
ReplyDelete