Friday, September 18, 2020

कुलदेवीच्या मंदिरात वेळेवर पोहचल्यामुळे मला लाभलेले अलौकिक समाधान...

'ऊँचे पर्बत लंबा रस्ता, पर मैं रहे ना पाया शेरावाँलीये, तुने मुझे बुलाया शेरावाँलीये' या आशा चित्रपटातील सुप्रसिद्ध गाण्याच्या पंक्ती आठवण्यास कारण म्हणजे मी जिद्दीने चालू केलेला प्रवास आमच्या कुलदेवीचा बुलावा आल्याने वाटेतील संकट, अडथळे पार पाडीत दरमजल करीत होणार होता. हा प्रवास आईच्या बुलाव्याची साक्ष देणारा ठरला. गोव्याला जाण्यासाठी मी रेल्वेने प्रवास केला असता तर एव्हाना पणजी जवळ पोहोचलो सुद्धा असतो. परंतु  पनवेलला गाडीतून सक्तीने उतरावे लागल्यामुळे हा असा प्रवास करावा लागत होता. या प्रवासातील अनुभव वेगळाच होता. ती कुलदेवीची कृपाच होती त्यामुळे प्रत्येक क्षणाचा मला आनंद मिळत होता. सकाळी सहाच्या सुमारास रत्नागिरीच्या बसस्थानकावर पाऊल ठेवले. बाहेर थंडी होती. पहाटेचा अंधार सरून सर्वत्र उजाडले होते. बसस्थानकात काही लोकं बसची प्रतिक्षा करत होते. तिथे चौकशी केली असता समजले की थेट पणजीला जाणारी बस उपलब्ध नाही. परंतु पंधरा मिनिटांनी सिंधुदुर्गला जाणारी बस येणार आहे असे समजले. तेवढ्या कालावधीत बसस्थानकावरील सुविधांचा फायदा घेऊन ताजातवाना झालो. मग गरम गरम चहा घेतला. चहा बरोबर बिस्किटं खल्ल्यामुळे थोडासा उत्साह आला. काही वेळातच सिंधुदुर्गसाठी बस आली. त्या बसमध्ये चढून स्थानापन्न झालो. मग बसने सिंधुदुर्गकडे प्रयाण केले.

सकाळचे सात वाजले असतील. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग तीन तासांचा प्रवास होता. मला खिडकी जवळची जागा मिळाली होती. मी बाहेरचे निसर्ग सौंदर्य न्याहळत होतो. रत्नागिरी आमच्या कुंदापूर सारखेच दिसत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती, कौलारू घरे, घरासमोर बगीचा, नारळाची आणि काजूची झाडे, आंब्याची कलमं खूपच सुंदर दृश्य दिसत होते. मला कुंदापूरची राहून राहून आठवण येत होती. अधूनमधून नदी दिसायची. नदीच्या पुलावरून बस जायची तेव्हा खूप मजा वाटायची. खिडकीजवळ बसलेलो असल्यामुळे गार वारा चेहऱ्यावर आदळत होता. अजून तीन तास बसमध्ये घालवायचे होते. थोड्यावेळाने परत झोप लागली. पुढे डोंगराळ रस्ता असल्याने खूप वेडीवाकडी वळणं येत होती. बस वळायला लागली की मला मधूनच एकदम जाग येत असे. दहाच्या सुमारास सिंधुदुर्ग बसस्थानक आले. आतापर्यंतचा बसचा प्रवास सुखकर झाला होता.

सिंधुदुर्ग ते पणजी जाणारी बस मला लगेचच मिळाली. सिंधुदुर्ग ते पणजी हे कमीत कमी दीड तासाचे अंतर म्हणजे मी पणजीला पोहचेस्तोवर साडे अकरा वाजणार होते. तिथून म्हारदोळ वीस मिनिटाच्या अंतरावर होते. दुपारच्या पूजेच्या आधी मला मंदिरात पोहचायचे होते आणि मी सहज पोहचेन असा माझा कयास होता. बस जलद गतीने धावत होती. महाराष्ट्र गोवा हद्दीजवळ बस पोहचली होती. पुढे काही समस्या निर्माण झाल्यामुळे बस एका जागेवर दहा ते पंधरा मिनिटे थांबून राहीली. मी कुतूहलापोटी खाली उतरलो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे काय समस्या झाली आहे ते बघायला पुढे गेलो. मी चालत चालत पुढे जसा गेलो तशी सर्व वाहने पुढे सरकायला लागली. माझी बस सुद्धा पुढे निघून गेली. मी धावत धावत कशीबशी बस परत पकडली. बसमधील सर्व प्रवासी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे टकामका पाहू लागले. बस वाहकाने (कंडक्टरने) विचारले, 'कुठे गायब झाला होतास?' मी करंगळी दाखवून विषय संपवू शकलो असतो परंतु लोकलज्जेस्तव मी काहीच उत्तर दिले नाही व शांत बसून राहीलो. मग बाकीचे प्रवासी काय समजायचे ते समजून गेले. त्या घटनेने मी आंतर्बाह्य हादरून गेल्यामुळे आजतागायत तो प्रसंग माझ्या लक्षात आहे. देवीआईने संकट निवारण केले होते. 

श्री म्हाळसा नारायणी

बस माझ्या एकट्यासाठी थांबणार नव्हती. त्यांनी थोडावेळ माझी वाट सुद्धा पाहिली. मग बस मार्गस्थ झाली. माझे सर्व कपडे व इतर सामानांची बॅग बसमध्येच होती. बस निघून गेली असती तर म्हारदोळला वेळेवर पोहचलो नसतो आणि बॅग सुद्धा गेली असती. या सर्व प्रकारात बस पंधरा मिनिटे उशिरा धावत होती. माझे सारखे घड्याळाकडे लक्ष जात होते. मला कोणत्याही परिस्थितीत साडेबारापर्यंत महारदोळला पोहचायचे होते व त्यासाठीच मी एवढी धावपळ केली होती. मला काहीच सुचत नव्हते. बसने आता वेग पकडला होता. काही वेळातच मला माहीत असलेला गोव्याकडे जाणारा मोठा पुल बसने ओलांडला. आता माझ्या जीवात जीव आला. मला खूप बरं वाटले. बसने पणजी स्थानकामध्ये प्रवेश करायच्या आधीच चालत्या बसमधून मी खाली उतरलो. पुढच्या बसची वाट न पाहता थेट म्हारदोळला घेऊन जाणारी टॅक्सी पकडली.

टॅक्सी पंधरा मिनिटात म्हारदोळला पोहचणार होती. बस मात्र थांबत थांबत जाणार असल्याने जर बसने गेलो असतो तर किमान दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाला असता. टॅक्सी केल्यामुळे मी बरोबर सव्वा बाराच्या सुमारास आमच्या कुलदेवी म्हाळसा नारायणी मंदिरासमोर उभा होतो. टॅक्सीतून उतरलो बॅग घेऊन थेट मंदिरात गेलो. आमच्याकडे बाहेरून कोणी आले की सुरुवातीला देवीची धूळ भेट असते म्हणजे थेट मंदिरात प्रवेश करून देवीचे दर्शन घ्यायचे व मग विश्रामधामाकडे (रूमवर) जायचे. धूळ भेट घेऊन मी तिथेच उभा राहिलो. तिकडची लोकं सुचवू लागली की बाहेरून आला आहात तर मग आता ताजेतवाने (फ्रेश) होऊन या. परंतु मी तिथून कुठेच गेलो नाही. काही वेळातच आरती होणार होती. हातातील बॅग बाजूला ठेवून देवीच्या पाया पडलो व तिथेच उभा राहिलो. घंटानादासह आरतीला सुरुवात झाली. त्या मंगलमय वातावरणात माझे देहभान हरपले. माझ्या कालपासूनच्या धावपळीचा अर्थ आता मला कळला होता. मला आईनेच बोलावले होते व म्हणूनच तिने माझा असा प्रवास घडवून आणला होता. आता मला त्याचे फळ मिळाले होते.

श्री म्हाळसा नारायणी मंदिर, गोवा.

म्हाळसा नारायणी देवीवर आमच्या आईची खूप श्रद्धा होती. काही संकट आले किंवा काही नवीन कार्य करायचे असेल तर ती नेहमी देवीचे नांव घेत असे. आईमुळेच माझी सुद्धा देवीवर खूप श्रद्धा होती. देवीची पूजा संपल्यावर प्रसाद वाटण्यात आला. मी तो प्रसाद घेऊन खोली आरक्षित (बुक) करण्यासाठी निघालो. मंदिर खूप मोठे होते. बाहेरून आलेल्या लोकांना अत्यल्प दरात खोली दिली जात असे. सर्व खोल्या अतिशय स्वच्छ आणि सुंदर होत्या. खोलीवर पोहचल्यावर सर्वात प्रथम मी आंघोळ केली. मग कपडे बदलून जेवणासाठी बाहेर पडलो. तिकडे त्याकाळी फक्त दहा रुपयात पोटभर जेवण मिळायचे. रोज नवीन भाजी असायची. सकाळी रत्नागिरीला चहा घेतल्यापासून पोटात काहीच गेले नव्हते त्यामुळे कडाक्याची भूक लागली होती. देवीदर्शनाच्या ध्यासामुळे भूक विसरलो होतो. जेवणादी कामे उरकून दुपारी दोनच्या सुमारास खोलीवर जाऊन झोपलो. 

संध्याकाळी सहा वाजता बेळगावला निघायचे ठरवले होते. दोन तास निवांत झोप काढली. रात्रभराच्या प्रवासाचा थकवा निघत होता. देवीच्या दर्शनाने तो कमी झाला होता. झोपून उठल्यावर खूपच बरं वाटले. संध्याकाळी पाच वाजता देवळात जाऊन बसलो. तिथले वातावरण प्रसन्न वाटत होते. परत खोलीवर येऊन बॅग घेतली व बेळगावसाठी निघालो. तिथल्या एका परिचित व्यक्तीने मला त्याच्या दुचाकीवरून पोंडा बस स्थानकापर्यंत सोडले. तिथून बेळगावसाठी मुकांबिका लक्झरी बस निघणार होती. साडेसहाच्या सुमारास ती बस पकडून बेळगावला निघालो. रात्री नऊ वाजता बेळगावला पोहोचलो. बेळगावमध्ये माझा चार पाच दिवसांचा मुक्काम होता म्हणून चांगले विश्रामधाम (लॉज) शोधायचे होते. परंतु आधी आमच्या कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता शोधला. मग त्याच्या जवळपास असलेले विश्रामधाम शोधून काढले. खोली ताब्यात घेतल्यावर आधी ताजातवाना झालो. नंतर जेवणाची तजवीज केली. दहाच्या सुमारास अंथरूणावर जाऊन पडलो परंतु झोप काही लागेना. काल रात्रीपासून मी केलेला प्रवास सारखा माझ्याडोळ्या समोर तरळत होता. प्रवासाचा शेवट मात्र माझ्या मनाप्रमाणे झाला होता व याचा मला खूप आनंद होत होता. वेळेवर पोहचल्यामुळे दुपारच्या पूजेत सहभागी होता आले. 'इरादे और हौसले चाहे कितने भी बुलंद हो, मगर देवीदर्शन की यात्रा उसी की होती है जिसको देवीमाँ बुलाती है।' याची मी आज प्रचिती घेत होतो. कुलदेवीचे नयनमनोहरी रूप डोळ्यासमोर उभे राहिले. भक्तीभावाने ते न्याहळत असतानाच नंतर कधी डोळा लागला ते समजलेच नाही.....

श्री म्हाळसा नारायणी


3 comments:

  1. गोव्यापर्यंत पर्यायी रस्त्याचा आराखडाच दिला हो काका तुम्ही...

    ReplyDelete
    Replies
    1. रस्ता तोच आहे. फक्त डोंबिवली ते गोवा असा थेट बसचा पर्याय उपलब्ध नाही.

      Delete
  2. मस्तच 👌👌💐🙏🏻

    ReplyDelete