Tuesday, September 22, 2020

जेव्हा जपान लाईफ कंपनीचा वरिष्ठ कोरियन अधिकारी माझ्या घरी येतात....

'अतिथी देवो भवः' या आम्हा भारतीयांच्या मनावर झालेल्या सांस्कृतिक संस्कारामुळे 'महेमान जो हमारा होता है, वह चाँद से प्यारा होता है, जिस देस में गंगा बहती है।' हे सांगताना देव, देश, धर्म, संस्कृती, शिष्ठाचार यांचे गुणगान गाताना आपला उर अभिमानाने भरून येतो. दिवसाची तिथी कोणती हे पंचांग किंवा दिनदर्शिका पाहून सांगता येते. परंतु जो तिथी न पहाताच अचानक दाराशी येतो तो अतिथी. अश्या अतिथीला देवासमान समजून मग त्याचे आगतस्वागत करणे हा तर आपल्यासाठी अतिशय आनंदाचा विषय असतो. तिथी न पहाताच वाचनालयाचे नूतनीकरण केल्यापासून अतिथीसमान सभासद संख्या वेगाने वाढत होती. माझा सर्वाधिक वेळ जपान लाईफच्या ठाणे कार्यालयात जात होता. माझ्या चमूतील (टीममधील) सभासदसंख्या जसजशी वाढत गेली तसतशी त्यांच्याबरोबर चर्चासत्राला (सेमिनार) भेट देणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत गेली. आधी फक्त दुपारी एकच चर्चासत्र होत असे परंतु लोकांची गर्दी वाढल्याने नंतर सकाळी व दुपारी असे दिवसांतून दोन वेळा चर्चासत्राचे आयोजन करण्यात येऊ लागले. तेव्हापासून माझी धावपळ आणखीनच वाढली. माझ्या चमूतील सभासदांकडून आलेल्या नविन लोकांना मी भेटणे व त्यांच्याशी बोलणे हे आवश्यक होते. त्यांना कंपनी व स्लीपिंग सिस्टीमबद्दल (गादीबद्दल) तपशीलवार माहिती द्यावी लागायची. Healthy Wealthy Happy Life हे आमच्या कंपनीचे ब्रीद वाक्य होते. स्लीपिंग सिस्टीममुळे चांगले निरोगी आरोग्य राखण्याबरोबरच या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याची सुद्धा सुवर्णसंधी साधता येते. आरोग्य व पैसा मिळाला की चांगले जीवन जगता येते. 'आरोग्यम् धनसंपदा' हाच सुखी, आनंदी जीवनाचा मुलमंत्र आहे असा कंपनीच्या ब्रीद वाक्याचा अर्थ होता.


जपान लाईफ व्यवसायात स्लीपिंग सिस्टीम म्हणजे गादी हे महत्त्वाचे उत्पादन (प्रॉडक्ट) होते. ते खुल्या बाजारात विक्रीसाठी कुठेही उपलब्ध नव्हते. एम.एल.एम. म्हणजे मल्टी लेव्हल मार्केटिंगद्वारे या उत्पादनाची विक्री होत होती. अँम्वे, टपरवर, हर्बल लाईफ या कंपन्यांनी आपली उत्पादने कंपनीकडून थेट ग्राहकाला विकायला सुरुवात केली होती. त्या कंपनींची उत्पादने दर्जेदार होती, परंतु ती सामान्य माणसाला परवडण्यासारखी नव्हती. ती उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्या कंपन्यांनी एम.एल.एम. ही वस्तुविक्रीपद्धत प्रचारात आणली होती. आमची जपान लाईफ कंपनी सुद्धा याच पद्धतीने स्वतःचे स्लीपिंग सिस्टीम (गादी) हे उत्पादन विकत होती. स्लीपिंग सिस्टीम आधी स्वतः विकत घेऊन ती वापरून पहायची. मग आपल्या चांगल्या अनुभवाची महती दुसऱ्यांना सांगायची आणि जर दुसर्‍यांनी ती सिस्टीम विकत घेतली तर त्यात भरपूर नफा कमवण्याची संधी कंपनीने दिली होती. जपान लाईफ कंपनीचे स्लीपिंग सिस्टीम हे उत्पादन आम्ही याच पद्धतीने विकत होतो.

जपान लाईफचा सभासद (जॉईन) होऊन मला आता तीन वर्षे झाली होती. कंपनी आणि स्लीपिंग सिस्टीमबद्दल माझ्याकडे बरीचशी तपशीलवार माहिती होती. माझ्या चमूतर्फे (टीमतर्फे) ज्या लोकांनी स्लीपिंग सिस्टीम घेऊन ते कंपनीचे नव्याने सभासद (जॉईन) झाले होते त्यांना ती सिस्टीम कशी वापरायची? ती सिस्टीम ते नविन सभासद नीट वापरत आहेत की नाहीत? त्यांना त्याचे काय फायदे झाले? वगैरे वरिष्ठ पातळीवरील माहिती जाणून घेणे हे माझे काम होते. या संदर्भात कधी कधी मला या नव्या सभासदांच्या घरी जावे लागायचे. मी या व्यवसायाकडे फक्त कमाईच्या दृष्टिकोनातून न बघता लोकांना प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा कसा फायदा होईल व त्यांना सुद्धा पैसे कमविण्याची कशी संधी मिळेल या अनुषंगाने नेहमी विचार करायचो. एकदा हे नविन सभासद स्लीपिंग सिस्टीम विकत घेऊन वापरायला लागले की ते त्यांचा चांगला अनुभव त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगून त्यांना आमच्या कंपनीच्या कार्यालयात चर्चासत्रासाठी घेऊन येऊ शकत होते.

एकदा आमच्या ठाण्याच्या कार्यालयामध्ये कोरियाहून श्री. जे एम. झांग (Mr. J. M. Jhang) नावाचे वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी आम्हाला कंपनी आणि स्लीपिंग सिस्टीमबद्दल बरीच माहिती दिली. ते रोज सकाळी व्यवसायाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करायचे. त्यांना इंग्रजी भाषा नीट बोलता येत नव्हती. ते बोलताना आम्हाला समजेल अश्या पद्धतीची सुलभ इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचे. ते भारतात येऊन जाऊन असत त्यामुळे ते थोडे थोडे हिंदी सुद्धा बोलायला शिकले होते. शोले चित्रपटातील अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या तोंडी असलेले 'ये दोस्ती हम नही छोडेंगे' हे गाणं ते आवडीने म्हणायचे. आम्हाला त्या गोष्टीचे खूप कौतुक वाटायचे. परदेशातून येऊन इकडची भाषा शिकायची व ती भाषा बोलायची यासाठी जिद्द लागते. तसेच त्यासाठी आवडही असायला लागते. आवड आणि जिद्द या दोन्ही गोष्टी श्री. झांग यांच्याकडे होत्या. 


 श्री. झांग आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी काही दिवस ठाण्याला रहायला आले होते. कार्यालयाच्या जवळपास रहाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी ते भेट देत (हाऊस व्हिझीट) असत. त्यांच्या बरोबर वेलंकिनी नावाची त्यांची सहाय्यक असायची. श्री. झांग काही मोजक्या सभासदांच्याच घरी भेट देऊन त्यांच्या घरातील लोकांबरोबर चर्चा करायचे. घरी स्लीपिंग सिस्टीम कोण वापरते? ती कश्या पद्धतीने वापरतात? त्यांना सिस्टीमचा काय फायदा झाला? इत्यादींची ते नोंद करून घ्यायचे. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवांचा ते इतर सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयोग करायचे. त्यांच्या भेटीने घरातल्या सदस्यांना समाधान वाटायचे. ते ज्यांच्या घरी भेट देऊन यायचे ते सर्व सभासद श्री. झांग यांच्या मार्गदर्शनामुळे व्यवसायाकडे जास्त लक्ष द्यायला प्रवृत्त व्हायचे. 

एक दिवस मी कार्यालयात माझे काम करीत होतो. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले की श्री. झांग यांची सहाय्यक वेलांकिनीने मला बोलावले आहे. मी तिला भेटायला गेलो तेव्हा ती म्हणाली की, "श्री. झांग यांनी दुपारी जेवणानंतर तुम्हाला भेटायला बोलावले आहे". मला वाटले की काही काम असेल. ते मला पै या नावाने ओळखायचे. पण मी त्यांना कधी भेटलो नव्हतो. आम्ही सर्वजण त्यांचा खूप आदर करायचो. जेवणानंतर मी त्यांच्या कक्षालयात (केबीनमध्ये) गेलो. मी प्रथमच त्यांच्या कक्षालयात प्रवेश करत होतो. समोरच्या खुर्चीवर श्री. झांग व त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर वेलांकिनी बसल्या होत्या. आधी त्यांनी माझी विचारपूस केली. मग माझ्या रविवारच्या कार्यक्रमाबाबत विचारले. मी काहीजणांच्या घरी भेटीला (हाऊस व्हिझीटला) जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणाले की, "मी तुमच्या घरी भेट देणार आहे". त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर मी एक मिनिट स्तब्ध झालो. मला विश्वासच बसेना. "माझ्या घरी तुमचे स्वागत असेल" असं बोलून मी होकार दिला. त्यांच्या कक्षालयातून बाहेर येताच मी सर्वांना ही गोष्ट सांगितली. 'तू भाग्यवान आहेस' अश्या सद्-भावना सर्वजण व्यक्त करू लागले.

मी घरी आल्यावर सुमनला श्री. झांग रविवारी येणार असल्याचे सांगितले. माझे घर छोटे होते. दोनच खोल्या म्हणजे सिंगल रूम व किचन. पण सुमनने ते स्वच्छ व नीटनेटके ठेवले होते. रविवारी ते कोणत्या वेळी येणार? त्यांच्या जेवणाची, खाण्यापिण्याची काय व्यवस्था करावी लागेल? वगैरे प्रश्न उभे राहिल्याबरोबर मी त्यांची सहाय्यक वेलांकिनीला दुरध्वनी केला. ''ते सकाळी दहाच्या सुमारास येतील आणि ते फक्त फळं खातात'' असं तिने सांगितले. माझी सुमन सुगरण असली तरी श्री. झांग हे बाहेरचे काही खात नाही हे स्पष्ट झाले होते. त्यांना फक्त फळं चालणार होती. माझे दोघे भाऊ, बहीण आणि माझ्याबरोबर कार्यालयात काम करणारा माझा एक मित्र अश्या मोजक्या लोकांना मी माझ्या घरी रविवारी उपस्थित रहायला सांगितले.


श्री. झांग रविवारी ठरल्याप्रमाणे ठीक सकाळी दहा वाजता आपल्या सहाय्यक वेलांकिनीला बरोबर घेऊन आले. प्रथमच एखादी परदेशी व्यक्ती माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला. श्री. झांग यांच्यासाठी सफरचंद आणि द्राक्षे आणून ठेवली होती. सर्वात प्रथम आल्या आल्या ते माझ्या आईला भेटले. त्यांनी बाकीच्या सर्वांना नमस्ते केले. माझी चौकशी केली. मी कधीपासून स्लीपिंग सिस्टीम वापरतोय? कशा पध्दतीने वापरतोय? त्याने काय फायदे झालेत? वगैरे प्रश्न ते विचारत होते. ते बोलत असताना आम्हाला त्यांचे काही शब्द समजत नव्हते. ते वेलांकिनी आम्हाला समजावून सांगत होती. श्री. झांग यांनी माझे खूप कौतुक केले. नंतर मला सांभाळणाऱ्या सुमनचे सुद्धा त्यांनी मनापासून कौतुक केले. कंपनीच्या ठाणे कार्यालयातील माझ्या कामाबाबत (वर्क परफॉर्मन्सबाबत) ते माझ्यावर खुश होते. मी वाचनालयाचा सुद्धा व्यवसाय करतो हे त्यांना माहित होते. दोन्ही व्यवसायामुळे मी लोकांची सेवा करतोय असे ते बोलून गेले. एक तर ते माझ्या घरी आले, त्यावर त्यांनी माझे कौतुक केले या सर्वांमुळे माझे मन भरून आले. कल्पना केलेली नसताना सुद्धा वेळ, वार सांगून आलेला अतिथी देव पावला असेच मला वाटले....



7 comments:

  1. छान वर्णन,,सुंदर लिखाण
    सुभाष कपोते

    ReplyDelete
  2. अजूनही त्यांच्या संपर्कात आहात का ?

    ReplyDelete
    Replies
    1. ये दोस्ती नही तोडेंगे हे गाणे त्यांनी गंभीरपणे म्हटले होते असं वाटतयं का?

      Delete