'हम तो बस युँ ही चलते गये और काँरवा अपने आप बनता गया' हे वाक्य लोकांना आपल्या पाठी यायला भाग पाडणार्या अलौकिक, प्रतिभाशाली व सामर्थ्यवान लोकांसाठी असावे असा माझा काही काळ गैरसमज होता. परंतु सामुहिक पातळीवर सुद्धा त्या वाक्याचा अनुभव येऊ शकतो. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' या विचारानुसार चालत व बदलत गेल्यावर मला सुद्धा इतरांबरोबर काँरवा आपोआप बनत गेल्याचा अनुभव आला. माझे काही मित्र आणि वाचनालयाचे कर्मचारी यांनी सन १९९७च्या जून महिन्यात पावसाळी सहल (पिकनिक) काढण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. माझा मित्र विनायक हा नियमितपणे त्याच्या मित्रांसोबत कुठेना कुठे पावसाळी सहलीला जात असे. उपनगरीय रेल्वेने प्रवास करून सहज परत येता येईल अश्या डोंबिवली जवळील एखाद्या सहलीसाठी सोयीस्कर असलेल्या स्थळांबद्दल मी विनायककडे चौकशी केली. त्यांनी भिवपुरी येथिल धबधब्याचे स्थळ सुचवले. भिवपुरी हे डोंबिवलीपासून रेल्वेने एक तासाच्या अंतरावर होते. त्या काळात वाचनालय फक्त सोमवारी अर्धा दिवस बंद असायचे. जून महिन्यातील शेवटच्या सोमवारी वर्षासहलीला जायचे ठरले. सोमवारी वाचनालय पुर्ण दिवस बंद रहाणार असल्याचे दहा दिवस आधीपासूनच सर्व सभासदांना कळविण्यास सुरुवात केलेली होती. मी, अजय, मामा, तृप्ती, शुभांगी आणि वाचनालयात येणारे माझे सहा मित्र असे सर्वजण सोमवारी सकाळी वर्षासहलीला निघालो. उपनगरीय रेल्वेने एका तासात भिवपुरीला पोहचलो. गंमत म्हणजे वर्षासहल होती परंतु अजूनपर्यंत पावसाचा पत्ताच नव्हता. त्यावर्षी पावसाळ्याला उशीरा सुरुवात झाली होती. आम्ही सर्व धबधब्यापाशी पोहचेपर्यंत पाऊस नव्हता. परंतु जेव्हा आम्ही धबधब्याजवळ पोहचलो तेव्हा तिथे पाऊस पडायला सुरुवात झाली. सर्वांनी पावसाचा मनसोक्त आनंद लुटला. आम्ही सर्वजण वर्षासहलीच्या आनंदात भिजतच संध्याकाळी डोंबिवलीला परत आलो. सन १९९७च्या जून महिन्यातील ही पावसाळी सहल पै फ्रेंड्स लायब्ररीची पहिली वर्षासहल ठरली...
आम्ही वर्षासहलीचा आनंद लुटून आल्याचे वाचनालयात नेहमी येणाऱ्या सभासदांना समजले. या पुढे वर्षासहल आयोजित केली तर आम्ही सुद्धा येणार असा त्या सर्व सभासदांनी आग्रह धरला. मी सर्वांना वर्षासहलीला घेऊन जायचे कबुलीवजा आश्वासन दिले. त्यानंतर दरवर्षी जून महिन्यात सर्व कर्मचारी व काही निवडक सभासद असे सर्व मिळून पावसाळी सहल आयोजित केली जाऊ लागली. पुढील काळात तर असं होऊ लागले की जून महिना आला की सभासदच यंदाची वर्षासहल कधी व कुठे आहे याची चौकशी करू लागत. सहलीचे स्थळ व दिनांक ठरल्यावर मग सर्व सभासदांना समजण्यासाठी आम्ही वाचनालयाच्या बाहेर त्याची माहिती देणारा फलक लावायला सुरुवात केली. काही सभासदांना सोमवारी सहलीला येणे जमत नसे त्यामुळे सोमवारच्या ऐवजी जूनचा शेवटचा रविवार पुढील काळातील वर्षासहलींसाठी निश्चित केला जाऊ लागला. रविवार ठरवल्याने सहलीला येणाऱ्या सभासदांची संख्या दरवर्षी वाढायला सुरुवात झाली.
सन २००२ चा जून महिना होता. दरवर्षी प्रमाणे पावसाळी सहलीची तयारी करायची होती. सहलीचे स्थळ व दिनांक ठरवायचे बाकी होते. सहलीचे स्थळ नेहमी अनुभवी विनायक रावच सुचवायचे. त्यांनी या वर्षी कर्जतला कोंडाणा लेणी येथे जायचे सुचवले. ''तिथे पुरातन बौद्ध लेण्या असून धबधबा सुद्धा आहे. थोडसं डोंगरावर सुद्धा चढावे लागेल", असंही विनायक यांनी सांगितले. मला त्या स्थळाबाबत काहीच माहिती नव्हती. मी सर्वसाधारणतः विनायकने ठरवलेले सहलीचे स्थळ मान्य करायचो. या वर्षीचे ठिकाण थोडे वेगळे होते. एक तास डोंगर चढायचा होता. सहलीला येणाऱ्या सर्वांची खाण्यापिण्याची सोय करावी लागणार होती. सहलीला अंदाजे खर्च किती येईल याचा सुद्धा हिशोब करायचा होता. सहलीला नेहमी येणाऱ्या काही लोकांशी चर्चा करून व लोकमताचा अंदाज घेऊन कोंडाणा लेणीला जायचे निश्चित केले. जून महिन्याचा चौथा रविवार म्हणजे २३ जून हा दिवस ठरला. त्याची माहिती देणारा फलक जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाचनालयाच्या बाहेर लावण्यात आला. रेल्वेतून जाणं-येणं, सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, बिस्किटे इत्यादी सर्व मिळून अंदाजे प्रत्येकी रुपये ३००/- एवढा खर्च गृहीत धरला होता. प्रत्येकी रूपये ३००/- खर्च येणार असल्याचे सर्वांना कळवले. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास तीस लोकांनी सहलीसाठी आपली नावे नोंदवली. आता विनायक आणि मला पुढची तयारी करावी लागणार होती. त्यासाठी विनायकला वाचनालयात बोलावून घेतले. त्याला तीस लोकं सहलीला येणार असल्याचे सांगितले. त्याला एवढे लोकं येतील अशी अपेक्षा नव्हती. कोंडाणा लेणी डोंगरावर असल्याने सहलीला येणाऱ्यांपैकी किती लोकांना डोंगर चढणे शक्य होणार आहे याबाबत विनायक साशंक होता. प्रत्येकाकडून सहलीसाठी रूपये ३००/- घ्यायचे ठरले असल्याचे सुद्धा त्याला सांगितले. तेवढ्याच पैशात सर्व खर्च बसवायचा होता. सर्वांसाठी डोंबिवलीहुन नाष्टा, जेवण घेऊन जाणे कठीण होते. सहलीच्या अगोदरच्या रविवारी म्हणजे दिनांक १७ जून रोजी कोंडाणा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या कोंडीवडे गावात जाऊन सर्वांसाठी खाण्यापिण्याची सोय करायची कल्पना विनायकने मांडली. माझ्या ठाणे कार्यालयाला रविवारी सुट्टी असल्याने मी आणि विनायक रविवारी १७ तारखेला पहाटे कर्जतला निघालो. मग कर्जत रेल्वे स्थानकावरून रिक्षेने कोंडीवडे गावाकडे प्रयाण केले. आम्हाला दोन वेळा रिक्षा बदलावी लागली. कोंडीवडे गावाजवळ पोहचताच विनायकने, ज्या डोंगरावर सर्वांना चढावे लागणार आहे, तो दाखवला. 'दुरून डोंगर साजरे' या म्हणीप्रमाणे लांबून डोंगर छान दिसत होता. पावसाळ्याला अजून सुरुवात झाली नव्हती. मध्यंतरी एक दोन दिवस थेंब थेंब पाऊस पडून गेला असल्याचे तिथे गेल्यावर कळले. कोंडीवडे गावातील एक छोटेसे उपहारगृह (हॉटेल) विनायकने त्याच्या ओळखीने गाठले.
ते कौलारू उपाहारगृह खूप जुनं असल्याचे दिसत होते. उपहारगृहाच्या समोर अवतीभवती तीस लोकं आरामात बसून जेवू शकतील एवढी जागा उपलब्ध होती. लेणी पहायला जाणार्यां पैकी काही पर्यटक याच उपहारगृहाला जेवणाची सोय करायला सांगायचे. सकाळी चहा, कांदा पोहे, दुपारी तांदळाची भाकरी, भाजी, डाळ, भात व संध्याकाळी चहा, बिस्किटे अश्या पद्धतीने तीस लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांना करायला सांगितली. पुढच्या रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान आम्ही तिथे पोहचत असल्याचे त्या उपहारगृहाच्या मालकाला आम्ही सांगितले. त्याने जेवण व नाष्ट्याचे प्रत्येकी रुपये २००/- खर्च सांगितल्यावर मी जवळ असलेले तीन हजार रुपये त्यांना आगाऊ रक्कम म्हणून दिली व पुढच्या रविवारी २३ जूनला आम्ही येत असल्याचे परत एकदा सांगितले. त्यांनी आम्हाला त्यांचा दूरध्वनी क्रमांक असलेले ओळखपत्र (कार्ड) देऊन "तुम्ही निश्चिंत रहा. आम्ही चांगली सोय करू", असं अश्वासन दिले. नंतर मी आणि विनायक डोंबिवलीला यायला निघालो. सहलीच्यावेळी पाऊस आला तर खूपच मजा येईल असा विचार करत आम्ही दोघे डोंबिवलीला पोहचलो.
वर्षासहलीला जायच्या आधी सर्वांची एकत्र बैठक घेणे गरजेचे होते. किती वाजता निघायचे? कुठे जमायचे?येताना काय काय बरोबर घेऊन यायचे? इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही सर्वजण शुक्रवारी २१ जूनला फ्रेंड्स लायब्ररीत एकत्र जमलो. विनायकने सर्वांना सहलीच्या जागेची थोडीफार कल्पना दिली. सकाळी सात वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकावर जमायचे ठरले. औषध, गोळ्या, पाण्याची बाटली अश्या काही वस्तू येताना बरोबर आणण्याबाबत सर्वांना सूचित केले गेले. नंतर कोंडीवडे गावातल्या त्या उपहारगृहाच्या मालकाला दूरध्वनी करून आम्ही सकाळी नऊच्या सुमारास पोहचत असल्याची परत एकदा आठवण करून दिली.
रविवारी सकाळी कर्जत लोकल पकडायची होती. अजून शनिवारचा दिवस हातात होता. शनिवारी ठाण्याच्या कार्यालयामधून लवकर घरी आलो. संध्याकाळी वाचनालयात जाऊन सहलीच्या पुर्व तयारीला लागलो. प्रत्येक सहलीला मनोरंजन म्हणून खेळले जाणार्या खेळांचे सूत्रसंचालन फक्त माझ्याकडेच असल्याने मी नेहमी नवीन नवीन खेळांचे शोध लावायचो. सहलीला आलेल्या सर्वांना किमान एकतरी बक्षीस मिळेल अश्या पद्धतीने खेळांचे आयोजन करायचो. पार्ले बिस्कीट, मॅगी, साबणाची वडी, पेन, पुस्तकं, अगरबत्ती अश्या काही वस्तू बक्षिस म्हणून द्यायचो. या सर्व वस्तू अगोदरच खरेदी करून त्यांना छानपैकी पारितोषिक पत्रात (गिफ्ट पेपरमध्ये) गुंडाळून तयार ठेवत असे. मग नंतर बरोबर घेऊन जायच्या सर्व वस्तूंची यादी तयार केली. त्या शनीवारी सर्व कामे आटोपून घरी परत जाताना रात्रीचे अकरा वाजले होते. आम्ही सर्वांनी मिळून सहलीची जी काही पुर्व तयारी केली होती त्याबाबत मला खूप समाधान वाटत होते. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' याचा अनुभव सहलीच्या पुर्व तयारीच्या आयोजनाच्या वेळी घेत होतो. वर्षासहलीच्या आयोजनामध्ये दरवर्षी वेळोवेळी केलेल्या बदलामुळे यंदा काँरवा तीस जणांचा झाला होता. आता उद्या सहलीला जायचे आहे तेव्हा उद्याचा दिवस कसा जाईल याचाच विचार करत मग झोपी गेलो....