Thursday, August 6, 2020

रोटरीत प्रवेश

दुपारी ४.३० वाजता लायब्ररी उघडायची. मी दुपारी मुंबईला जाऊन मासिकं घेऊन येईपर्यंत चार सव्वाचार वाजायचे. बरोबर साडेचार वाजता काही सभासद नवीन मासिकं घेण्यासाठी आधीच येऊन थांबायचे. मी मासिकं घेऊन साडेचार वाजता लायब्ररीत पोहोचलो की त्या मासिकाची नोंद करण्यात यायची. मासिकांच्या प्रत्येक पानावर फ्रेंड्स लायब्ररीचे शिक्के मारून होईपर्यंत अजून १० मिनिटं लागायची. मासिकं तयार झाली की सभासद घेऊन जायचे. काही सभासदांनी फक्त मासिकांसाठीच लायब्ररी लावली होती. ते पुस्तकांकडे फिरकायचेही नाहीत. त्यांच्यासाठी आम्हला मासिकं बाजूला काढून ठेवायला लागायची.सभासदांसाठी तत्पर सेवा हेच माझं उद्दिष्ट होतं.

एके दिवशी माझा मित्र संदीप खापरे मला भेटायला घरी येणार होता. त्यादिवशी मी मुंबईहून येतानाच मासिकं लायब्ररीत ठेवून आलो. मित्र भेटायला येणार असल्याने मला लायब्ररीत जायला उशीर होणार होता. माझ्यामुळे मासिकं द्यायला उशीर झाला असता. म्हणून मी लायब्ररीत मासिकं ठेवून घरी जाऊन थोडा आराम केला. सांगितलेल्या वेळेनुसार संदीप त्याच्या बरोबर अतुल या मित्राला घेऊन आला होता. 

संदीप खापरे हा माझा जुना मित्र. आम्ही दोघे T.Y.BCom. ला असताना पै सरांच्या गणेश क्लासमध्ये एकत्र शिकत होतो. तो अभ्यासात हुशार. अण्णांच्या आजारामुळे मला कधीकधी क्लासला जाता नाही आलं तर संदीप मला मदत करायचा. खूप दिवसांनी संदीप मला भेटायला आला होता. संदीपनं अतुलची ओळख करून दिली. संदीप इंटिरिअरची कामं घ्यायचा. अतुलकडे गॅसची एजन्सी होती. चहा येईपर्यंत गप्पांमधून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पै सरांविषयी, क्लासमधले बाकीचे मित्र आणि बी.कॉम. ची पदवी वगैरे.

संदीप आणि अतुल हे दोघे रोटरी क्लबला जॉईन झाले होते. मीही त्यांच्या बरोबर रोटरी क्लब जॉईन करावा, अशी त्यांची इच्छा  होती. त्यांनी रोटरी क्लबची सविस्तर माहिती दिली. तेव्हा डोंबिवलीत रोटरी क्लबच्या पाच-सहा शाखा कार्यरत होत्या. रोटरी क्लबचं उद्धिष्ट काय? रोटरी क्लब काय काम करतो? कोणासाठी काम करतो? त्यांची कोणाला मदत होते? वर्षभरात कुठले कुठले कार्यक्रम असतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी न विचारता त्यांनी स्वतःहून दिली. मी रोटरी क्लब जॉईन झालो तर मला त्याचे फायदे काय? मी क्लब का जॉईन करावा? याचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.मी क्लब जॉईन केला तर बऱ्याचशा नवीन लोकांशी ओळख झाली असती आणि त्याचा फायदा मला व्यवसायात होणार होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्लब जॉईन करूया, असं वाटलं. पण त्यांना दोघांना विचार करून दोन दिवसांत कळवतो, म्हणून सांगितलं.

दोघं गेल्यावर सुमनशी चर्चा केली. तिला अशा क्लबची माहिती नव्हती आणि ती घरातलं सगळंच बघत असल्यामुळे तिने निर्णय माझ्यावर सोपवला. दोन दिवस मी क्लबचा विचार करत होतो. मला आधी वाटायचं, क्लब म्हणजे काही श्रीमंत लोक एका ठिकाणी जमून पत्ते खेळत असतील, मौज मस्ती करत असतील. संदीपनं क्लबविषयी सविस्तर माहिती दिली, तेव्हा मला ती खूप आवडली. विविध क्षेत्रांतील नवीन लोकांचे परिचय, त्यातून समाजकार्य या सर्व गोष्टींचा विचार केला. शेवटी क्लब जॉईन करायचा निर्णय घेतला. क्लबची वार्षिक फी होती. ती मी दोन हप्त्यांत देणार असल्याचं संदीपला सांगितलं. तसं त्यांनी मान्यही केलं.

१९९७ च्या जुलै महिन्यात रोटरी क्लबमध्ये मी प्रवेश केला. 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन' असं त्या क्लबचं नांव होतं. १९९४ मध्ये क्लबची स्थापना झाली होती. क्लबमधले सर्व सदस्य तरुण होते. सर्वांमध्ये समाजासाठी काम करायची खूप इच्छा दिसत होती. प्रत्येकाची मोठी स्वप्नंही होते. सर्वजण आपल्या व्यवसायात यशस्वी होते. दर गुरुवारी दुपारी तीन वाजता क्लबची मिटिंग असे. रघुवीर नगरमध्ये माधवाश्रम हॉलच्या समोर रोटरी सेवा केंद्राची स्वतंत्र जागा होती. तिकडेच आम्ही सर्वजण जमत होतो.

रोटरी क्लबची माझी पहिलीच मिटिंग होती. मी १५ मिनिटं आधीच पोहोचलो होतो. माझ्या आधीच काहीजण हॉलवर आले होते. थोड्याच वेळात १०/१२ लोक जमले. संदीपने सर्वांशी माझी ओळख करून दिली. महिला एक आणि बाकी सर्व पुरुष होते. मला दुपारी झोपायची सवय.पण तेवढयात चहा घेतल्यामुळे जरा बरं वाटलं. मिटिंगकडे नीट लक्ष देता आलं. मी नवीन असल्यानं ते काय बोलताहेत, काहीच कळत नव्हतं. बहुतेक ते लोक मागच्या वर्षाच्या कार्याचा आढावा घेत होते. नंतर या वर्षाच्या कार्यक्रमांबाबत चर्चा करीत होते.



मी रोटरी क्लब जॉईन केल्यावर काहीजणांची चांगली ओळख झाली. डॉक्टर लीना लोकरस या क्लबच्या अध्यक्ष होत्या. प्रथमेश ज्वेलर्सचे मालक अजित कोठारी, डी. डी. देशपांडे, संजय कानिटकर, राणे, संजय पाटील, अतुल असे  वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक क्लबचे सदस्य होते. ब्लड डोनेशन कॅम्प, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप असे निरनिराळ्या प्रकारचे समाजकार्य हाती घेण्यात आले होते. याच वर्षांपासून पोलियो डोस देण्याचं मोठं काम रोटरी क्लबनं स्वीकारल होतं. रोटरी क्लब जॉईन केल्याचं मला समाधान लाभलं. मी इथे एकटा नसून माझ्यासारख्या विचारसरणीचे पुष्कळ लोक होते. त्यांच्याबरोबर काम करण्यात मजा होती. रोटरी क्लबचं "SERVICE ABOVE SELF" हे ब्रीदवाक्य मला खूप भावलं. समजाकडून खूप काही मिळालं होतं. समाजासाठी मी काही देणं लागत होतं.ते रोटरी क्लबमुळे माझ्याकडून शक्य होणार होतं...

4 comments:

  1. एखाद्या संस्थेत प्रवेश घेतला की सामाजिक भान येतं. आणि ते भान तुम्हाला उपजतच आहेच त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मार्ग सोपा झाला.

    ReplyDelete
    Replies
    1. समाजकार्याची ओढ होतीच त्यात रोटरी संस्थेची भर पडली...

      Delete
  2. एक नवीन अध्याय. मस्त !!

    ReplyDelete