'अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु' असे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे जणु काही सोनेरी दिवस उजाडला असून त्यात अमृताचा वर्षाव होत आहे असं वाटावे अश्या आनंदी व उत्साही मनाने मी पहील्या विमान प्रवासासाठी डोंबिवलीहुन निघालो. घाटकोपरपर्यंतचा प्रवास उपनगरीय रेल्वेने केला. घाटकोपरवरून आम्ही टॅक्सी केली. अकरा वाजेपर्यंत आम्ही विमानतळावर पोहोचलो. मी याआधी बर्याचवेळा विमानतळावर आलो होतो, परंतु कोणाला तरी घ्यायला किंवा सोडायला. आज मात्र मी स्वतःच्याच पहील्या विमान प्रवासासाठी विमानतळावर पोहचलो होतो. आम्ही सर्व जण पुर्वसूचनेनुसार तीन तास अगोदरच विमानतळावर जमलो होतो. आमच्या गटामध्ये बरीच लोकं असल्याने आम्हा सर्वांची तपासणी होऊन आतील दालनात प्रवेश मिळायला वेळ लागणार होता. माझी वेळ आल्यावर मला तपासून आतील दालनात सोडण्यात आले. आतील दालनात गेल्यावर तिथल्या काचेतून जाणारी येणारी विमाने दिसू लागली. दर पाच मिनिटांनी एक विमान धावपट्टीवर उतरत होते किंवा धावपट्टीवरून उड्डाण (टेक ऑफ) करत होते. विमानतळ माणसांनी गजबजलेला होता. रोज एवढी माणसं विमानाने प्रवास करत होती. माझा मात्र आजचा पहिला विमान प्रवास. आम्ही सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत असल्यामुळे वेळ कसा गेला कळले नाही. इतक्यात आम्हा सर्वांना प्रत्यक्ष विमानात चढण्याचा संदेश मिळाला. आम्ही सर्व जण एकामागोमाग विमानाच्या दरवाजाच्या दिशेने निघालो.
'या नव नवल नयनोत्सवा' या नाट्यगीताप्रमाणे आता दिसणारी प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यांना नवनवीन व उत्सवी आनंद देणारी ठरत होती. मी ज्या विमानात प्रवेश करत होतो ते विमान स्विस एअर कंपनीचे होते. विमानाच्या आत गेल्यावर दिसले की किमान २०० प्रवासी बसू शकतील एवढ्या जागा तिथे होत्या. माझ्याकडची छोटी बॅग वरती ठेवली आणि मी माझ्या जागेवर बसलो. माझ्या बाजूला खिडकी जवळील जागा (विंडो सीट) होती. त्या जागेवरील प्रवासी अजून आला नव्हता. मला खिडकी जवळची जागा हवी होती परंतु नाईलाजाने बाजूच्या जागेवर बसायला लागत होते. विमान आतून खूप मोठे होते. प्रत्येक खुर्ची समोर टिव्ही होता. काही वेळात विमानाचे दरवाजे बंद करण्यात आले. माझ्या बाजूचा प्रवासी येऊन बसला. आता विमान टेक ऑफ करण्यास तयार असल्याचा इशारा करण्यात आला. एक हवाईसुंदरी (एअर होस्टेस) आली व विमान उड्डाण करण्याआधी प्रवाश्यांनी काय करावे ते हाताने इशारे करून सांगायला लागली. मग काही क्षणांतच विमानाने उड्डाण केले.
विमान प्रवासाला सुरुवात तर झाली परंतु माझ्यासाठी सर्व गोष्टी नविन व अनभिज्ञ असल्याने मला प्रत्येक गोष्ट शोधायला लागायची. आपआपल्या जागेवर बसलेल्या प्रवाश्यांना खुर्चीचा पट्टा (सीट बेल्ट) लावून घेण्याची सूचना करण्यात आली. खुर्चीचा पट्टा बाजूलाच होता परंतु त्याचा वापर कसा करायचा ते मला माहीत नव्हतं. मी स्वतः भोवती पट्टा गुंडाळून तो लावायचा प्रयत्न केला परंतु मला काही केल्या जमेना. बाजूचा प्रवासी खडूस दिसत होता. तो माझी धडपड पाहत होता. त्याने मला हिंदीतून विचारले सुद्धा की प्रथमच विमान प्रवास करत आहेस का? मी 'हो' म्हटल्यावर मग त्याने खुर्चीचा पट्टा कसा लावायचा ते मला दाखवले. खुर्चीच्या हँडलवर टिव्हीचे बटण होते. ते कसं वापरायचे समजत नव्हतं. परत त्या प्रवाश्याला विनंती केली. मग त्यानेच टिव्ही कसा लावायचा ते दाखवून दिले. खर तर मला खिडकीबाहेर बघायचे होते. विमान उंचावरून उडत असताना जमिनीवरचे दृश्य कसे दिसते ते पाहायचे होते. समोरच्या टिव्हीवर विमान किती उंचीवर आहे? आपण आता कुठे आहोत? आपले पुढचे शहर किती अंतरावर आहे? तिथे पोहचायला किती वेळ लागेल? वगैरे सविस्तर माहिती मिळत होती.
मी ऐकले होते की विमानात सारखे खायला-प्यायला मिळते. झालंही तसचं. विमान उड्डाण झाल्यावर काही वेळातच हवाई सुंदर्या आल्या. सर्वांना कोल्ड ड्रिंक्स द्यायला सुरुवात झाली. आखडून बसलेले व बसून आखडलेले दोन्ही प्रकारचे प्रवासी मोकळे होण्यासाठी उठून फिरायला लागले. कोणी वॉशरूमसाठी तर कोणी हात धुवायला उठले होते. मला आश्चर्य वाटत होते की आपले विमान एवढ्या उंच उडत आहे आणि आपल्याला आतमध्ये ह्याचा काहीच पत्ता नाही. मी सुद्धा विमानात कुठेही फिरु शकत होतो परंतु मला उठायची हिंमत झाली नाही. माझ्या बाजूचा प्रवासी उठून प्रसाधनगृहाकडे निघून गेला.
जपान लाईफ इंडिया कंपनीच्या भारतात तीन शाखा होत्या. मुंबई, ठाणे आणि दिल्ली. मी कंपनीच्या ठाणे शाखेत जायचो. आमच्या ठाण्याच्या कार्यालयातील माझे सहकारी मित्र सर्व दुसऱ्या विमानात होते. मी एकटाच या विमानातून प्रवास करत होतो. बाकीचे सर्व कंपनीच्या दिल्ली शाखेतील सहकारी माझ्या विमानात होते. मी त्यांना कोणाला ओळखत नव्हतो. त्यामुळे विमानात मी तसा एकटा पडलो होतो. प्रसाधनगृहातून परत आल्यावर माझ्या बाजूच्या प्रवाश्याने मला बाजूच्या खिडकी जवळील जागेवर बसायची विनंती केली. मी मनातल्या मनात म्हणालो यांनी आधीच सांगितलं असते तर? विमान उड्डाण करताना खालचे जमिनीवरचे दृश्य बघायला तरी मिळाले असते. त्या प्रवाश्याच्या विनंतीला मान देऊन मी बाजूच्या खिडकी जवळील जागेवर बसलो.
हवाई सुंदरीने शीतपेय द्यायला सुरुवात केली. मी आपला मोसंबीचा रस घेतला. बाजूच्या प्रवाश्याने काहीतरी पांढऱ्या रंगाचे पेय मागवले. विमानात बसलेले आमच्या कंपनीचे दिल्ली शाखेतील सहकारी अधून मधून एक एक करून माझ्या बाजूच्या प्रवाश्याच्या पाया पडून जात होते. तो प्रकार पाहून मला समजले की हा कोणीतरी मोठा माणूस आहे. 'असुदे आपल्याला काय त्याचे? आमच्या ठाणे शाखेचे एक धोरण होते की कितीही मोठी व्यक्ती असली तरी आम्ही सर्व कंपनीचे स्वावलंबी प्रतिनिधी (इंडिपेंडेंट रिप्रेझेंटिव्ह) आहोत. तेव्हा सर्वजण सारखेच.' वगैरे मी विचार करत असताना अचानक त्या प्रवाश्याने मला विचारले की 'तुमचे नाव काय? तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये असता?' हे ऐकून मी थोडासा गडबडलो. माझे नाव पुंडलिक पै असून मी ठाणे कार्यालयातून आल्याचे त्यांना सांगितले. मग मी त्यांची चौकशी केल्यावर ते म्हणाले की 'माझे नावं बाळ आंग्रे असून मी दिल्ली कार्यालयात इनचार्ज आहे.' हे ऐकताच मी आवाक् झालो. म्हणूनच सर्वजण त्यांच्या पाया पडत होते. मी गप्पगार झालो. नंतर कळलं की ते आमच्या कंपनीचे मालक वसंत पंडित यांचे मित्र होते. त्यांनी ते पांढरे पेय सात आठ ग्लास तरी मागवले असेल. नंतर मला समजले की ते वोडका पीत होते. एवढे पिऊन सुद्धा ते व्यवस्थित बोलत होते. कदाचित त्यांना त्याची सवय असेल. माझे नाव व मी कंपनीच्या ठाणे शाखेतून आल्याचे कळल्यावर त्यांनी माझ्याशी थेट मराठीतुन बोलायला सुरुवात केली. आता मात्र आमची चांगलीच मैत्री जमली होती.
मुंबईहून हॉंगकॉंगचा प्रवास जवळपास सहा तासांचा असेल असे सांगितले गेले होते. तीन वाजता मुंबईहून विमान निघाले होते. विमानात खाण्यापिण्याची चांगलीच सोय होती. हवं ते मिळत होते. विमानात जेवण मस्त होते. मसाले कमी. तेल सुद्धा वेगळंच वापरलेले होते. असं जेवण मी प्रथमच जेवत होतो. जेवण झाल्यावर बहुतेक सर्वजण झोपले होते. परंतु मला कुठे झोप येणार? पहिलाच विमान प्रवास ते सुद्धा थेट हॉंगकॉंगला. खिडकी जवळची जागा, समोर टिव्ही, मी प्रत्येक सेकंदाचा आनंद घेत होतो. मधूनच विमान हलत असल्याचे जाणवायचे. 'घाबरू नको. कधी कधी मोठे ढग समोर आले की असं होतं' असे सांगून बाळ आंग्रे यांनी मला धीर दिला. काही वेळात बँकॉक आले.
बँकॉक एअरपोर्ट |
जवळपास एक तास बँकॉक विमानतळावर विमान थांबणार असल्याचे सांगण्यात आले. आम्हाला विमानातच बसून राहायची सूचना केली गेली. त्यावेळी तिकडे संध्याकाळचे ७ वाजले असावेत. बाहेर अंधार पडला होता. खिडकीतून बँकॉक विमानतळ सुंदर दिसत होते. बरीच विमाने ये जा करत होती. माझे लक्ष बाहेरच होते. फक्त एकदाच मध्यंतरी प्रसाधनगृहात जाऊन आलो. एक तास कसा गेला कळलेच नाही. परत आमच्या विमानाने उड्डाण केले. आता मात्र मला सीट बेल्ट बांधता येत होता. हॉंगकॉंगला पोहचायला अजून दोन तासाचं अंतर होते. या काळातील विमान प्रवासात प्रवाश्यांच्या जेवणाची ऑर्डर करण्यात आली. मी शाखाहारी जेवण मागवले. विमान प्रवासात खाण्यापिण्यामुळे वेळ कसा गेला ते कळले नाही. असे वाटत होते की हा प्रवास संपूच नये. बघता बघता हॉंगकॉंग जवळ आले. रात्रीच्या अकराच्या सुमारास आमचे विमान हॉंगकॉंगला पोहचले......
हॉंगकॉंग एअरपोर्ट |
अतिशय सुंदर वर्णन डोळ्या समोर आले
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवाह ! सुंदर !!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteविमान प्रवासात खिडकी मिळाली की खूप आनंद होतो.सगळंकसं छान लिहिलंयत.
ReplyDeleteसुरुवातीला नाही मिळाली नंतर मिळाली पुढचा प्रवास मजेशीर
Deleteमस्त घर बसल्या विमान प्रवास घडवून आणलात काका तुम्ही. 💐🙏🏻
ReplyDeleteधन्यवाद
Delete