Tuesday, August 4, 2020

'फ्रेंड्स लायब्ररी' ची दशकपूर्ती...

दि.२२ मे १९८६ रोजी 'फ्रेंड्स लायब्ररी'ची मुहूर्तमेढ रोवली आणि त्या संकल्पाची यंदा, १९९६ च्या मे महिन्यात दशकपूर्ती होणार होती. 100 पुस्तकांनी सुरुवात केलेल्या लायब्ररीत आज जवळपास पाच हजार पुस्तकं जमा झाली होती. त्याकाळी डोंबिवलीत मोठमोठी वाचनालयं होती. प्रत्येक वाचनालयात हजाराच्या आसपास सभासद होते.सगळी वाचनालयं जुनी असल्यानं त्यांच्या पुस्तकांची संख्याही जास्त असे. सुशिक्षित डोंबिवली नगरीतला वाचकवर्गही मोठा. त्याकाळी चित्रपट आणि वाचन हेच लोकांचे आवडते विषय. वाचक दोन-तीन वाचनालयांचे सभासद असायचे. प्रत्येक घरी दोन-तीन तरी लोक पुस्तकं वाचणारे होते. पैसे देऊन पुस्तकं विकत घेणं सर्वाना शक्य नव्हतं, म्हणून वाचक मासिक वर्गणी भरून वाचनालयांतून पुस्तकं, मासिकं आणून वाचायचे. या वाचनालयांमुळे वाचकांच्या वाचनाचा छंद जोपासला गेला. वाचनामुळे लोकांचा वेळही जाण्याबरोबरच त्यांची वैचारिक, बौद्धिक वाढही चांगली होऊन विचारसरणी प्रगल्भ व्हायला मदत झाली.

टिळकनगर परिसरात थोड्याशा आतील भागात लायब्ररी असून गेल्या दशकभरात ५०० हून अधिक सभासदांची नोंदणी झाली.त्यात नियमित पुस्तकं बदलणाऱ्या सभासदांची संख्या ३०० च्या आसपास, ५० हून अधिक सभासद पुस्तकं किंवा मासिकं बदलायला दररोज येत असत.बाल वाचनालय सुरू केल्यानंतर लायब्ररीत नेहमी समोरच्या टिळक नगर शाळेच्या विद्यार्थ्यांची झुंबड उडत असे. शाळा सुटली की बरेच विद्यार्थी पुस्तकं बदलायला आणि त्यांच्याबरोबरचे विद्यार्थी पुस्तकं चाळायला गर्दी करायचे. ही मुलं आली की थोड्या वेळातच सर्व पुस्तकं विस्कटून ठेवत असत. पुस्तकं वाचायला आलेल्या विद्यार्थ्यांकडून आम्ही एकही पैसा आकारात नव्हतो. लायब्ररी सुरू असेपर्यंत त्यांना तिकडे बसून गोष्टीची पुस्तकं वाचायची मुभा होती. माझा असा विचार होता की, शालेय विद्यार्थी एकदा पुस्तक वाचायला लागले की  तेच आपल्या लायब्ररीचे भावी वाचक ठरतील



'फ्रेंड्स लायब्ररी' सुरू केली तेव्हा त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा नाही, तर त्याहीपेक्षा या व्यवसायातून माणसं कशी जोडली जातील, याचा जास्त विचार केला होता. चांगली माणसं जोडली गेली की उत्पन्न आपोआप वाढलं असतंच. पण शेवटी व्यवसाय म्हटल्यावर कमाई हवीच. नाही तर घर कसं चालणार? त्याच बरोबर बाकीचेही खर्च होतेच. लायब्ररीत १० वर्षांत मी खूप काही बदल केले. एका व्यवसायात -आणि तेही लायब्ररीसारख्या १० वर्षं टिकणं सोपं नव्हतं. जिथं उत्पन्न खूप कमी, पण मेहनत व गुंतवणूक जास्त होती. या काळात अनेकांचा हातभार लागला. सभासदांचा माझ्यावरचा विश्वास, मित्र, नातेवाईक, परिवारातल्या लोकांचे सल्ले व पाठबळ जोडीला होतंच. त्याशिवाय लायब्ररीत केलेल्या सुधारणा,यामुळे 'फ्रेंड्स लायब्ररी'नं वाचनालय व्यवसायात एका दशकाचा पल्ला गाठला. याचं श्रेय मी नेहमी माझे कर्मचारी वर्ग, माझ्या घरातले सर्वजण आणि लायब्ररीच्या सगळ्या सभासदांना देतो.
'फ्रेंड्स लायब्ररी' चं नांव सगळ्या डोंबिवलीत पसरलं. लायब्ररीच्या वेळा वाढवल्या. दर महिन्याला पुस्तकांची भर पडत असल्यामुळे पुस्तक संख्याही चांगली वाढत होती. जे कर्मचारी नेमले होते, त्यांना सभासदांशी कसं वागायचं, याचं चांगलं प्रशिक्षण दिलं. कर्मचारी सर्व सभासदांशी चांगले संबंध ठेवून होते. या सर्वांमुळे सभासद समाधानी होते. सभासदांनी सुचवलेली पुस्तकं, नवीन पुस्तकं, मराठी, इंग्रजी मासिकं नियमितपणे यायला लागली. अजयला लायब्ररीत कामाला लागून तीन वर्षे पूर्ण झाली. तोही चांगला स्थिरावला. मीही जातीनं लायब्ररीत लक्ष द्यायला लागलो.
नियमितपणे पुस्तकं बदलणाऱ्या सभासदांशी एक वेगळं नात जुळलं.काही सभासद नुसते गप्पा मारायला येत असत. तर काही लोक खाऊ घेऊन यायचे. अनेक सभासदांना आम्ही त्यांच्या नंबरवरून हाका मारत होतो.
मला आठवतंय, लायब्ररी समोरील उदयांचल सोसायटीत लिमये काकू या वयस्कर सभासद रहात होत्या. त्या शक्यतो मासिकंच वाचत असत. त्यांना दर दोन -तीन दिवसांनी नवीन मासिक वाचायला लागत असे. मासिकं बदलायला सुरुवातीला आत येणाऱ्या काकूंना नंतर आत यायला जमेना. मग त्या बाहेरूनच हाक मारत असत. मग आम्ही त्यांना त्यांनी न वाचलेलं मासिक निवडून बाहेर नेऊन देत होतो. त्या न विसरता एक गोष्ट नियमितपणे करायच्या. येताना त्यांच्या बरोबर फुलांचे दोन  गजरा असायचे. एक लायब्ररीत कामाला असलेल्या मुलीसाठी आणि दुसरा सुमनसाठी. त्या नेहमी सांगायच्या, 'गजरा घातलेल्या मुली सुंदर दिसतात'. प्रत्येक मुलींनं गजरा घालावा, अशी त्यांची अपेक्षा.

टिळक नगरमधल्या वाचकांचा लायब्ररीला चांगला प्रतिसाद होता. लायब्ररीच्या दहाव्या वर्धापनदिनी सर्व सभासदांना आमंत्रण देऊन तो साजरा करायचं ठरवलं. त्यादिवशी येणाऱ्या सर्व सभासदांना काही तरी भेटवस्तू द्यायचा विचार करत होतो.कामत पेन कंपनीचे मालक लक्ष्मण कामत हे चांगले परिचयाचे होते.त्यांनी मला वेळोवेळी चांगले सल्लेही दिले होते. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पेन किंवा की चेन देण्याचं सांगितलं. मला जास्तीत जास्त दोन रुपयांपर्यंतची वस्तू हवी होती. तशी की चेन बनवून देण्याचं कामत काकांनी मान्य केलं. एका बाजूला मराठीत तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीत 'फ्रेंड्स लायब्ररी' प्रिंट केलेली फायबरची छान की चेन बनवून घेतली. त्यावेळी एक हजार की चेनसाठी दोन हजार रुपये खर्च आला होता.

सर्व सभासदांना वर्धापनदिनाचं तोंडी आमंत्रण दिलं. लहान मुलांसाठी पार्ले कंपनीच्या २०० मेलडी चॉकलेट आणून ठेवल्या होत्या. नियमित येणाऱ्या काही मुलांना भेट म्हणून देण्यासाठी गोष्टीची पुस्तकंही तयार ठेवली होती. त्याच दिवशी, म्हणजे  बुधवार, २२ मे १९९६ रोजी लायब्ररी स्वच्छ करून फुगे आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी छान सजवली.

संध्याकाळी ४.३० वाजता लायब्ररी उघडली.आम्ही सर्व छानसा नवीन पोशाख घालून सभासदांच्या स्वागतासाठी तयार होतो. पाच वाजल्यापासून वाचक यायला लागले.आलेल्या प्रत्येकाला एक की चेन, मुलांना चॉकलेटं वाटण्यात आली. निवडक मुलांसाठी गोष्टीची पुस्तकंही भेटीदाखल देण्यात आली. आलेल्या सर्वांशी बोलण्यासाठी मी हजर होतोच. प्रत्येकानं लायब्ररीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.काही जणांनी येताना भेटकार्डं आणली, तर काही जणांनी भेटवस्तूही दिल्या.वाचकांनी लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक केलं. त्यादिवशी चार तासांत जवळपास 200 सभासदांनी लायब्ररीला भेट दिली असेल.कारण आणलेली २०० चॉकलेटं संपली होती. एवढ्या सभासदांनी एकाच दिवशी लायब्ररीला भेट देणं, हे माझ्यासाठी कौतुकास्पद होतं. भले मी या 10 वर्षांत पैसे कमावले नसतील, पण माणसं नक्कीच जोडली होती. हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा विषय होता...

6 comments:

  1. वर्धापन दिन छान साजरा केला.उत्सव साजरे करणे व माणसे जोडणे याचा आनंद वाटतो

    ReplyDelete
  2. छान वाटतंय वाचायला. मी स्वतः जवळ जवळ 12वर्षे लायब्ररीरीची सभासद आहे. अनेक उपक्रमात आनंदाने सहभागी झाले आहे. माझ्या मुळे माझ्या लेकीलाही वाचनाची आवड निर्माण झाली आहे. माझ्यापेक्षा तिची पुस्तकं जास्त वाचून झाली आहेत. फ्रेड्स लायब्ररीची ती लाईफ मेंबर आहे. धन्यवाद पै काका. लिहीत रहा आम्ही वाचत राहतो. 💐💐🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रोत्साहनामुळे ह्या पुढे हि लिहीत राहणार आहे.... धन्यवाद.

      Delete
  3. दिवस योग्य प्रकारे साजरे करण्यात तुमची हातोटी आहे !!

    ReplyDelete