'पोटासाठी दाही दिशा' या वाक्याप्रमाणे 'व्यवसायासाठी दाही दिशा' असं म्हणायची पाळी बर्याचवेळा व्यवसायवृद्धीच्या वेळी येते. जपान लाईफ कंपनीच्या ठाणे येथील कार्यालयात जायला सुरुवात केल्यापासून माझ्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये बराच बदल झाला होता. आता वाचनालयाऐवजी मी जपान लाईफच्या व्यवसायामध्ये जास्त गुंतत चाललो होतो. त्यामुळे उत्पन्नही वाढत होते. माझ्या सभासदांची संख्या तसेच कार्यालयात येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत चालली होती. त्या सर्वांना नीट मार्गदर्शन करणे हे माझे कर्तव्य होते. कार्यालयात आलेल्या नवख्या मंडळींना कंपनी आणि स्लीपिंग सिस्टीमची पूर्ण व व्यवस्थित माहिती द्यायला लागायची. सकाळी दहाच्या सुमारास घरून डबा घेऊन निघायचो. डबा नसेल त्या दिवशी बाहेर उपहारगृहात जेवण करायचो. कार्यालयातून परत घरी येताना संध्याकाळचे सात-आठ वाजायचे. मग संध्याकाळी एक तास वाचनालयात जाऊन बसायचो. दिवसभर काहीना काही काम असायचेच.
आमच्या कंपनीची भारतातील तीन कार्यालये दिल्ली, मुंबई व ठाणे येथे होती. दिल्ली शाखेचे कार्यालय कालकाजी येथे तर मुंबईचे नरिमन पॉइंटला व ठाण्याचे कार्यालय देवप्रयाग येथे होते. मी ठाण्याच्या कार्यालयात जायचो. सन १९९९ च्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीचे चौथे कार्यालय कर्नाटकातील बंगलोर म्हणजे आताचे बेंगळुरू येथे उघण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. माझी बरीच नातेवाईक आणि परिचित मंडळी बेंगळुरू येथील रहीवाशी असल्याने मला तेथिल कंपनीच्या नविन शाखा कार्यालयाचा फायदा होणार होता. कानावर पडणार्या चर्चेनुसार खरोखरच फेब्रुवारी महीन्यात बेंगरूळुचे कार्यालय सुरू करण्यात आले. बेंगळुरू कार्यालयात येणारी लोकं जास्त करून इंग्रजीमध्ये बोलायची. पण काही लोकांना कन्नडमध्ये समजावून सांगायला लागायचे. माझे वरिष्ठ विक्रम आणि विनायक यांनी मला बेंगळुरू शाखेबद्दल विचार करायला सांगितले. मी जर तिकडे गेलो तर माझी सभासद संख्या आणखी वाढणार होती. मी बेंगळुरूला जायची तयारी दर्शवली. ठाण्याहून इतर काही लोक सुद्धा बेंगळुरूला जाण्यासाठी तयार झाले.
मुंबईच्या कार्यालयात बेंगळुरूला जाणाऱ्यांची सभा बोलावली होती. त्यासाठी मला मुंबईच्या कार्यालयात जावे लागले. सभेत कोण कोण जाणार व किती दिवस राहणार याची चौकशी करून त्याची नोंद केली गेली. मी फक्त आठ दिवस तिथे राहणार असल्याचे सांगितले. मुंबईच्या कार्यालयातील सभासद जास्त करून इंग्रजीमध्ये बोलायचे. सर्व श्रीमंत घरातील वाटत होते. मी त्यांच्याशी मराठी किंवा हिंदीतून बोलायचो. तसेही मला भाषेशी काही देणं घेणं नव्हते. समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे समजण्याशी मला मतलब होता. त्या दिवशी मुंबईच्या कार्यालयात संजय बांगर आणि विश्वास वालावलकर या दोन क्रिकेटपटुशी भेट झाली. संजय बांगर यांची नंतर भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये सुद्धा निवड झाली होती. मला त्याचा खूप अभिमान वाटायचा.
मला आता बेंगळुरूला जायची तयारी करायची होती. वाचनालयातील कर्मचार्यांना तसे कळवून आठ दिवसांच्या माझ्या अनुपस्थितीत करावयाची सर्व कामे त्यांना समजावून सांगितली. सुमनला कसेबसे समजावले. आठ दिवसांच्या दौर्यासाठी कपडे व इतर सामानाची तयारी केली. कल्याण स्थानकावरून बेंगळुरूला जाणाऱ्या रेल्वेगाडीचे तिकीट काढले. तिकीट रविवारचे असल्याने रविवारी सकाळी निघालो की सोमवारी पहाटे बेंगरूळुला पोहचणार होतो. बेंगळुरूला माझे नातेवाईक व परिचित बरेच असले तरी कोणाच्या घरी थांबणे मला आवडत नसे. परंतु मित्राने आग्रह केला. त्याचे परिचित श्री. पी. आर. नायक हे बेंगळुरूला बँकेत कामाला होते. त्यांच्याकडे उतरून ताजातवाना होऊन बेंगळुरूच्या कार्यालयात जाण्यास मित्राने सांगितले. त्याच्या आग्रहामुळे मी होकार दिला. रविवारी सकाळी नऊ वाजता कल्याण बेंगरूळु उद्यान एक्सप्रेस गाडी सुटणार होती म्हणून आठ वाजता घरून निघालो.
गाडी अर्धा तास उशिरा आली. गाडीमध्ये जास्ती करून नुकतीच कामाला लागलेली तरुण मुले आणि मुली होत्या. सर्व आपसात अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होते. कदाचित सर्व उच्च विद्याविभूषित असावीत. चांगल्या कंपनीतील कर्मचारी वाटत असल्याने त्यांचे कपडे, बॅग व बाकीच्या वस्तू भारी किंमतीच्या वाटत होत्या. कल्याण ते बेंगळुरू मधील अंतर ११०० किलोमीटर इतके होते. चोवीस तासांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी बेंगळुरूला पोहचणार होतो. चोवीस तास गाडीमध्ये व्यतीत करायचे होते. माझ्यासोबत कोणीच नव्हते. मी एकटाच प्रवास करत असल्याने सगळा दिवस कसा काढायचा हा माझ्यापुढे यक्ष प्रश्न होता. मी सहप्रवासी असलेल्या मुलांना विनंती करून वरचा बर्थ मिळवला. माझी बॅग वर ठेवली व बरोबर आणलेली उशी काढली. सकाळी दहाच्या सुमारास मस्तपैकी झोपून गेलो. दुपारी एकच्या दरम्यान उठलो व जेवण मागवले. छानपैकी पोटभर जेवलो आणि थोड्यावेळाने परत एकदा दुपारची वामकुक्षी केली. खाली कोण काय करत आहे, कुठले स्थानक आले, गेले वगैरे काहीच पत्ता लागत नव्हता. परत संध्याकाळी उठलो व चहा नाष्टा केला. आता मात्र रात्र होईपर्यंत काही तास काढायचे होते. बॅगमधून स्वेटर काढले व ते घालून दरवाजात जाऊन बसलो. गाडी वेगाने धावत होती. संध्याकाळची वेळ होती. अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतं व त्या शेतात काम करणारी माणसे बघताना छान वाटत होते. मी त्या सर्वांना टाटा करत होतो. त्यातले काहीजण मला हात दाखवून प्रतिसाद देत होते. एखाद्या रेल्वे स्थानकात गाडी थांबली की मी लगेच खाली उतरून पाय मोकळे करायचो. बघता बघता सूर्य मावळला आणि अंधार पडू लागला. गाडीच्या दारात बसून सूर्य मावळतानाचे दृश्य पाहून मी स्वतःला विसरून गेलो.
गेले दोन तीन तास पोटात काहीच नव्हते. गाडीतून प्रवास करताना काहीच काम नसल्याने सारखे काहीतरी खावेसे वाटायचे. त्यात परत खाण्याचे पदार्थ विकणारे सारखे ये जा करत होते. मी संयम पाळला. आठ वाजेपर्यंत काहीच खाल्लं नाही. थेट जेवण मागवले. जेवण झाल्यावर गाडीमध्येच थोडासा हिंडलो फिरलो व मग झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. दिवसभर झोपल्यामुळे रात्री झोप लागत नव्हती. इतर सहप्रवासी शांत झोपले होते. गाडी वेगाने धावत होती. आतमध्ये शांतता पसरलेली. फक्त पंख्याचा आवाज येत होता. घरची आठवण येत होती. संतोष दिवसभर मस्ती केल्याने रात्री लवकर झोपायचा. 'क्यूँ की साँस भी कभी बहू थी' मालिका बघून आई, मी, सुमन रात्री अकराच्या सुमारास झोपायचो. घरची आठवण येत असताना कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी सहाच्या सुमारास जाग आली. चहावाले किटली घेऊन 'चाय चाय' आवाज करत फिरत होते. चहा घेतला व बॅगमधून मारी बिस्किटे काढली. चहा बिस्किटे घेतल्यानंतर सकाळच्या नित्यनेमाला लागलो. अजुन सर्व झोपले होते त्यामुळे प्रसाधनकक्ष मोकळा होता. सुमनने टूथब्रश, पेस्ट, पावडर, फणी सर्व काही आठवणीने दिले होते. सात वाजता तयार होऊन बसलो. गाडी नऊ वाजता बेंगळुरूला पोहचली. मार्च महिना असून सुद्धा बाहेर थंडी जाणवत होती. स्थानकाबाहेर पडलो. ज्यांच्या घरी जाणार होतो ते श्री. पी.आर. नायक स्थानकाच्या बाहेर त्यांची दुचाकी घेऊन माझी वाट पाहत होते. त्यांच्या दुचाकीवर बसून त्यांच्या घरी पोहोचलो.
श्री. पी. आर. नायक हे डोंबिवलीत बँकेत कामाला होते. ते मंजुनाथ शाळेच्या बाजूला असलेल्या अश्वमेध सोसायटीमध्ये राहायचे. बँकेत कामाला असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांची बेंगळुरूला बदली झाली होती. दहा मिनिटांत आम्ही त्यांच्या घरी पोहचलो. त्यांचा बंगला होता. समोर छान फुलांचा छोटासा बगीचा होता. घर स्वछ ठेवलेलं होते. घरी पोहचल्यावर आंघोळ केली. आंघोळ करून बाहेर येताच नाष्टा तयार असल्याचे दिसले. गरम गरम रवा इडली त्याच बरोबर कडीपत्त्याची फोडणी घातलेली चटणी मस्त लागत होती. त्यांनी फक्त चार इडल्या दिल्या होत्या. अश्या चटणी बरोबर मी कमीत कमी दहा इडल्या तरी सहज खाल्या असत्या. परंतु करणार काय पाहुण्यांच्या घरी होतो ना. त्यांनी 'अजून हवी आहे का' असं विचारलेच नाही. मी चार इडल्या खावून स्वतःला समजावले व नाष्टा आटपून बेंगळुरूच्या नवीन कार्यालयात जायच्या तयारीला लागलो......
नायक साहेबांनी हा ब्लॉग वाचला तर ईडलीचा घोळ त्यांच्या लक्षात येईल....
ReplyDeleteपै साहेब थोडीशी गंमत...👇
Deleteश्री. पी. आर. नायकांनी चारच इडल्या दिल्या. 'अजून हवी का' असे विचारले सुद्धा नाही कारण ते अनुभवी होते. त्यांना अनुभवातून लक्षात आले होते की आपल्याकडे येणारे पाहुणे कामधाम सोडून दिवसभर फक्त इडल्याच खात बसतात. 🤣🤣🤣
हो ना ते मी कधीच विसरू शकत नाही ....
ReplyDeleteखरंच इतकं सुंदर लिहिलं आहे तुम्ही की सगळ चित्र डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले.
ReplyDeleteधन्यवाद
Delete