Friday, August 28, 2020

माझ्या वाचनालयातील विश्वासू व प्रामाणिक कर्मचारी मंडळी...

'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' हे सहकाराचे तत्व मानवाच्या सामाजिक जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होते. या सहकाराच्या तत्वानुसार काम करणारे विश्वासू व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी जेव्हा व्यवसाय करताना भेटतात तेव्हा ते प्रामाणिक कर्मचारी हाच त्या व्यावसायिकाचा खरा नफा ठरत असतो. माझ्या गैरहजेरीत अजय वाचनालय सांभाळायला लागला होता. अजयबरोबर शुभांगी नावाची एक मुलगी सुद्धा होती. वाचनालयाच्या सभासदांबरोबर कसं वागायचं? कसं बोलायचं? कोणाला कोणती पुस्तके द्यायची? वगैरे सर्व मी त्यांना शिकवले होते. त्या दोघांची सभासदांबरोबर चांगली वर्तणुक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे वादविवाद होत नसत. वाचनालयाच्या सभासदांना पाहिजे ते पुस्तक वेळेवर मिळाले की ते खुश होत असत. खर तर वाचनालय जेव्हा सुरू झाले तेव्हा प्रारंभीच्या काळात वाचनालयासाठी कडक कायदे, कानून वगैरे असं काही नव्हतेच. नियम व अटी सुद्धा मर्यादित होत्या. पुस्तक परत करताना उशीर झाला तरी त्यासाठी विलंब शुल्क आकारले जात नसे. एखाद्यावेळी पुस्तक घरी राहिले तरी सुद्धा दुसरे पुस्तक घेऊन जायला परवानगी दिली जात असे. त्यासाठी कधी वेगळे शुल्क आकारले गेले नाही. पुस्तक बरोबर आणले नाही म्हणून सभासदाला परत माघारी पाठवले असं कधी झाल्याचे निदान मला तरी आठवत नाही. या सर्व गोष्टी सभासदांना आवडत असत. एकूणच काय तर त्यावेळी वाचनालयामध्ये खेळी मेळीचं वातावरण होते. 

पुढे दिवसागणिक सभासद संख्या वाढत गेल्याने मेजवरील (टेबलावरील) फाईल्सची संख्या सुद्धा वाढत गेली. वाचनालयात बसायला फक्त दोन खुर्च्या व दोन मेज (टेबल) असल्यामुळे तिसरा माणूस आला की त्याला उभे रहावे लागायचे. वाचनालयाच्या बहुसंख्य जागेमध्ये व कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पुस्तकांची मांडणी केली होती. एकदा मी मुंबईहून येताना सचिन तेंडुलकरचे चांगले मोठे छायाचित्र (पोस्टर) घेऊन आलो. वाचनालयात जिथे आम्ही बसायचो तिथे पाठीमागे ते छायाचित्र (पोस्टर) लावले. बाहेरून जाणारे येणारे सर्वजण त्या छायाचित्राकडे बघायचे. सर्वांना ते खूप आवडले. काही जणांनी विकत घेण्यासाठी चौकशी सुद्धा केली. मी विचार केला की जर हे छायाचित्र विकले तर त्या रिकाम्या जागेवर आपल्याला परत दुसरे छायाचित्र लावता येईल. दर आठवड्याला ते बदलता येईल. मग सचीनचे ते छायाचित्र मी विकायचे ठरवले. वीस रूपयाला विकत घेतलेले छायाचित्र वीस रूपयालाच विकले. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना नवीन छायाचित्र दिसायला लागले. बाहेरून जाणारे काही जण छायाचित्र बघण्यासाठी वाचनालयाच्या आत प्रवेश करू लागले. त्यानंतर मग आम्ही दर आठ दिवसांनी नवीन छायाचित्र लावायला सुरुवात केली. जुही चावला, मधुबाला, कपिल देव अश्या नामवंत चित्रपट कलाकार व क्रिकेटपटुंची छायाचित्रे लावायला सुरुवात केली. ती सर्व छायाचित्रे विकली सुद्धा जायची. त्यामध्ये मधुबालाचे कृष्णधवल छायाचित्र सर्वात जास्त वेळा विकले गेले होते. एवढ्या छोट्याश्या एका निर्णयामुळे वाचनालयच्या सभासदांची संख्या वाढायला लागली.

वाढत्या सभासद संख्येबरोबरच मासिकांच्या मागणीत सुद्धा वाढ झाली होती. मी जपान लाईफच्या ठाणे कार्यालयात जात असल्यामुळे मला मासिके आणायला उशीर होत असे. त्यामुळे अधून मधून अजय मासिके आणत असे. रोज मासिके आणणे त्याला जमत नव्हते. त्यासाठी कोणाची तरी नियुक्ती करावी या विचारात मी होतो. अजय म्हणाला होता की 'त्याच्या मानलेल्या मामाची कंपनी बंद झाल्याने ते सध्या घरीच आहेत व त्यांना कामाची गरज आहे.' अजय डोंबिवलीच्या पश्चिमेकडील गरिबाचा वाडा या विभागात राहायचा. त्याचे मामा सुद्धा त्याच्या बाजूलाच राहायचे. अजयतर्फे निरोप पाठवून एक दिवस त्यांना वाचनालयात बोलावून घेतले.

श्री. सुनील वडके(मामा)

अजयने त्याच्या मामांबद्दलची सर्व माहिती मला अगोदरच दिली होती. त्यांचे नांव श्री. सुनील वडके. प्रसाद व पूजा ही दोन मुले व पत्नी असे चार जणांचे त्यांचे कुटुंब होते. ते मुंबईतील एका मोठ्या कंपनीत कामाला होते. कंपनी बंद झाल्यामुळे ते काही दिवस घरीच होते. ते कामाच्या शोधात होते. अजयला सुद्धा त्यांनी काम शोधण्याबाबत सांगून ठेवले होते. उंची अंदाजे सव्वा पाच फूट, कुरळे केस, वय साधारणतः चाळीशीच्या आसपास असलेले असे हे श्री. सुनिल वडके एके रविवारी मी वाचनालयात असताना मला भेटायला आले. वाचनालयात बसायला जागा नसल्याने उभे राहूनच मी त्यांना काही प्रश्न विचारले. मग त्यांना कामाचे स्वरूप, कामाच्या वेळा, सुट्टी आणि पगार सर्वकाही समजावून सांगितले. विचार करून त्यानुसार अजयतर्फे निरोप पाठवतो असे सांगून ते निघून गेले.

मला खरोखरच एका चांगल्या प्रामाणिक माणसाची गरज होती. मुंबईहून मासिके आणायचे काम जवाबदारीचे व जिकरीचे होते. रोज रेल्वेचा प्रवास त्यात परत येताना बरोबर मासिकांचे ओझे वरून पैश्यांच्या व्यवहाराची जवाबदारी इत्यादी बरोबरच कुठली मासिके कधी येतात? ती कुणाकडे मिळतात? त्यांची छापील किंमत किती असते? त्यावर सुट किती मिळते? वगैरे सर्व काही लक्षात सुद्धा ठेवायला लागायचे. कधी कधी पैसे देताना घेताना कमी जास्त होण्याची शक्यता असायची. पैसे नीट हाताळायला लागायचे. हे सर्व व्यवहार नीट सांभाळणे गरजेचे होते. त्यासाठी अनुभवी, प्रामाणिक व जवाबदारीने काम करणाऱ्या माणसाची मला खूप गरज होती.

वाचनालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली तर त्यांना वेळेवर पगार देणे मला भागच होते. मग त्यांना पगार देणे आपल्याला झेपेल का? हा विचार सुद्धा कधी कधी माझ्या मनात यायचा. श्री. सुनील वडके यांची दोन्ही मुले लहान होती. दोघांचे शालेय शिक्षण चालू होते. मी देईन त्या पगारात त्यांचे घर चालेल का? ते माझ्याकडे कामावर रूजु होतील का? समजा त्यांनी नकार दिला तर दुसरे कोणीतरी मला शोधायला लागणार होते. हे सर्व विचार चालू असतानाच काही दिवसांनी (एप्रिल १९९९) अजयच्या मानलेल्या मामांनी म्हणजे श्री. सुनील वडके यांनी अजयकडून निरोप पाठवला की ते कामावर रुजू होऊ इच्छितात. अजय त्यांना मामा या नावाने हाक मारायचा त्यामुळे श्री. सुनील वडके यांना नंतर वाचनालयातील सर्व कर्मचारी मामा या टोपण नावानेच हाक मारायला लागले.

आता मामा नियमितपणे कामावर यायला लागले होते. ते वेळेच्या बाबतीत खूप काळजी घ्यायचे. सकाळी साडेसात वाजता वाचनालय उघडायचे. वाचनालयाच्या साफसफाईची जवाबदारी त्यांनी स्वतःहूनच घेतली होती. बाजूला पिठाची चक्की असल्यामुळे वाचनालयात धुळीपेक्षा पीठकण खूप जमा होत असत. पुस्तकांवर पीठकण बसत असल्यामुळे पुस्तके वारंवार साफ करायला लागायची. अजय साफसफाई करायचाच परंतु मामा आल्यामुळे त्या कामाला मामांचा सुद्धा हातभार लागून पुस्तके स्वच्छ व नीटनेटकी दिसायला लागली. खर तर मामांना ज्या कामासाठी नियुक्त केले होते ते महत्वाचे काम म्हणजे मुंबईतील पुस्तक बाजारातून मासिके आणणे हे काम मला त्यांना एकदा दाखवायचे होते. मला वेळच मिळत नसल्याने शेवटी एकदा त्यांना एकट्यानेच मासिके आणायला पाठवले. त्यांना अगोदर मी थोडेफार समजावून सांगितलेले होतेच. त्याप्रमाणे मामा मुंबईच्या पुस्तक बाजारात गेले. तिथे गेल्यावर त्यांनी सर्वांशी ओळख करून घेतली व सांगितलेली सर्व मासिके व्यवस्थित आणली. त्या दिवसापासून मासिके आणायची संपुर्ण जवाबदारी मामांकडे गेली.

डोंबिवलीतील बहुसंख्य वाचनालये आपली पुस्तके प्रभाकर कोठावळे यांच्याकडे पुनर्बांधणीसाठी (बाईंडिंगसाठी) देत असत. ते पुस्तकांना पुठ्ठा लावून पुस्तकांची पुनर्बांधणी (बाईंडिंग) करायचे. त्यामुळे पुस्तके जास्त काळ टिकायची परंतु त्यामुळे काही तोटे सुद्धा होत असत. पुस्तकाचे वजन वाढायचे, पावसात पुस्तक भिजले की पुठ्ठ्यामुळे त्यांची जाडी वाढायची. मी हे सर्व बदलून टाकले. आमच्या वाचनालयात नवीन पुस्तके आली की त्यांना प्रत्येकाला क्रमांक दिला जायचा. एका नोंदवहीमध्ये (रजिस्टरमध्ये) त्या पुस्तकांची तपशीलवार नोंद केली जायची. पुस्तकाचे नांव, लेखक आणि त्याची किंमत हे सर्व तपशील त्या नोंदवहीमध्ये (रजिस्टरमध्ये) नोंदविल्यावर त्या पुस्तकांना शिवून पुठ्ठा लावण्याऐवजी प्लॅस्टिकचे अच्छादन (कव्हर) लावायला आम्ही सुरुवात केली. ज्या जुन्या पुस्तकांची प्लास्टिकची अच्छादने खराब झाली असतील त्यांना नवीन प्लास्टिकची अच्छादने घातली जाऊ लागली. ही सर्व कामे अजय आणि मामांना मी शिकवली. काही दिवसातच मामांनी सर्व कामे शिकून घेतली. सर्व सभासदांबरोबरच्या चांगल्या वर्तणुकीमुळे ते सर्वांचे लाडके मामा बनले. 

कोणतीही इमारत उभी करण्यासाठी इमारतीचा पाया भक्कम असावा लागतो. फ्रेंड्स लायब्ररीची लोकप्रियता वाढत होती. यामध्ये अजयचे खूप मोठे योगदान होते. आता अजयबरोबर मामा सुद्धा त्यात सहभागी झाल्याने फ्रेंड्स लायब्ररीचा पाया अधिकच मजबूत झाला होता. व्यवसायवृद्धीसाठी पुरक अशी प्रामाणिक, विश्वासू व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी मंडळी मला मिळाल्यामुळे फ्रेंड्स लायब्ररीचे नांव एका समृद्ध वाचनालयाच्या दिशेने वेगाने घोडदौड करू लागले होते.....

3 comments:

  1. जबरदस्त लीडर ! जबरदस्त टीमवर्क !!

    ReplyDelete
  2. तुमच्या उत्तम नेतृत्व गुणांमुळे आणि देवाच्या कृपेने तुम्ही उत्तम सहकारी मिळवलेत आणि टिकवलेत!!

    ReplyDelete