Saturday, August 22, 2020

सुमन आणि संतोष बरोबर १ जानेवारी १९९९ ला एलिफंटा गुफा सहल....

'घार उडते उंच उंच आकाशी, परी तिचे लक्ष झाडावरील घरट्यापाशी' या काव्यपंक्ती कुटुंबवत्सल माणसाच्या भावविश्वाला अनुसरूनच कवीने लिहील्या आहेत यात शंका नाही. दिनांक १६ डिसेंबर १९९८ रोजी माझा पहिला परदेश दौरा आटपून मी मुंबई विमानतळावर पोहचलो. मी हॉंगकॉंगहून चॉकलेटस् सोडून बाकी काहीच वस्तू बरोबर आणल्या नव्हत्या, त्यामुळे मला विमानतळावरून पटकन बाहेर येता आले. मुंबई विमानतळ ते घाटकोपर रिक्षा केली. मग उपनगरीय रेल्वेने डोंबिवलीला पोहचलो. हॉंगकॉंग आणि आपल्याकडे खूपच फरक जाणवत होता. तिकडचे रस्ते, बस सेवा, ट्रेन, माणसं, मोठ मोठे मॉल वगैरे सर्व वेगळेच होते. काही दिवसांसाठी फिरून येण्यास ठीक होते. परंतु दिर्घकाळ तिकडे रहायचे असते तर तिकडचे जेवणखाण व राहणीमान मला तरी मानवले नसते. शेवटी काही झाले तरी आपला देश तो आपलाच. सहा दिवसांनी डोंबिवली गाठल्यावर मला खूप आनंद झाला.

सन १९९२ला सुमनशी विवाह झाल्यानंतर सहा वर्षांनी प्रथमच सुमन आणि संतोषला सोडून दूर देशी गेलो होतो. साधारणतः संध्याकाळी सातच्या सुमारास घरी पोहोचल्यावर संतोषला आनंदाने कडकडून मिठी मारली व बरोबर आणलेल्या चॉकलेटस् त्याला दिल्या. सुमनला जवळ घेतलं आणि चहा ठेवायला सांगितला. सुमनच्या हातचा चहा खूप दिवस प्यायलो नव्हतो. सुमनने नाष्ट्याची तयारी केली होती म्हणुन मी आधी आंघोळ करून ताजातवाना झालो. एकदा वाचनालयात जाऊन मला तेथील कामकाजाचा आढावा घ्यायचा होता. सुमनने निरडोस्याची तयारी केली होती. त्या दिवशी मी कमीत कमी आठ निरडोसे खाल्ले असतील. सुमनच्या हातच्या निरडोसा, सांबारची चवच निराळी. नाष्टा उरकून तडक वाचनालयात गेलो. हॉंगकॉंगहून आणलेल्या चॉकलेटस सर्वांना वाटल्या. माझ्या गैरहजेरीत सुमन रोज वाचनालयात जात असे. गेल्या सहा दिवसांचा आढावा घेतल्यावर लक्षात आले की सर्व काही सुरळीत चालले होते. अजय सर्व व्यवस्थित सांभाळत असल्याने मी निश्चिंत झालो होतो. फक्त नवीन पुस्तके कोणती व किती मागवायची याकडे मला स्वतः जातीने लक्ष द्यायला लागायचे. वाचनालयातून नंतर फ्रेंड्स स्टोअर्समध्ये जाऊन अण्णांना सुद्धा भेटून आलो. दुसऱ्या दिवसांपासून परत कंपनीच्या ठाणे येथील कार्यालयात जायला सुरुवात केली. माझ्या हॉंगकॉंगमधील व्यवसायिक अनुभवांचे सर्वांसमोर सादरीकरण केले व प्रत्येकाला पुढील उद्दिष्टे गाठण्यासाठी तयार केले. 

माझ्या परदेश दौर्‍यामुळे माझी सहा दिवसांची घरातील उणीव सुमनला थोडेसे नाराज करण्यास पुरेशी होती म्हणून मी सुमनला आणि संतोषला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा बेत आखला. शेवटी आपण एवढी धावपळ कोणासाठी करतोय? आपल्या कुटुंबासाठीच ना? मग एक दिवस त्यांच्यासाठी द्यायलाच पाहिजे असं ठरवले. शुक्रवार दिनांक १ जानेवारी रोजी कंपनीचे कार्यालय बंद असल्याची सूचना मिळाली होती. मग एक जानेवारी हा संपुर्ण दिवस सुमन व संतोषसाठी राखून ठेवण्याचे मनात पक्के केले. त्यादिवशी मोबाईल, फोनकॉल वगैरे सर्व बंद असे ठरवले. मुंबईच्या जवळपास असलेल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जायचे ठरवले. लहानपणी मी इयत्ता सातवीत असताना एलिफंटा गुंफा पाहण्यासाठी सहलीला गेलो होतो. गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा गुंफा असा बोटीतून प्रवास केला होता. तेव्हा खूप मजा आली होती. सुमनला एक जानेवारी रोजी एलिफंटा गुंफा पहायला जायचे का असे विचारले. तिचा होकार मिळताच मला खूप समाधान वाटले. 

दिनांक १ जानेवारी १९९९ रोजी एलिफंटा येथे सहकुटुंब निघण्यासाठी सकाळी लवकर उठलो. सकाळची कामे उरकली. संतोष आणि सुमन तयार होईपर्यंत वाचनालयात जाऊन आलो. सकाळचा नाष्टा करून साडेआठ वाजता निघालो. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने नेहमीपेक्षा गाडीमध्ये गर्दी कमी होती. संतोषला ट्रेन मधून घेऊन जाणे खूप कठीण काम होते. संतोष एका जागेवर कधीच स्वस्थ बसत नसे. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येईपर्यंत त्याने खूप त्रास दिला. त्याचा राग यायचा पण तितकीच मजा सुद्धा वाटायची. गाडी जलद (फास्ट ट्रेन) असल्याने एका तासात मुंबईला पोहोचलो. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाबाहेर येऊन गेटवे ऑफ इंडियासाठी बस पकडली. संतोषची मस्ती सुरूच होती. बसमधून जाताना मी मासिक व पुस्तके जिथून घ्यायचो ते ठिकाण सुमनला दाखवले. दहा मिनिटांत आम्ही तिघे गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बस स्थानकावर उतरलो. बस नरिमन पॉईंटकडे जाणारी असल्याने ती पुढे निघून गेली. आम्ही तिघे चालत गेट ऑफ इंडियाच्या दिशेने निघालो. नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. दुपारचे अकरा वाजले असतील. ऊन खूप होते परंतु समुद्राच्या लाटांमुळे खूप वारा सुटला होता त्यामुळे गर्मी जाणवत नव्हती. डाव्या बाजूला एलिफंटा गुंफाला जाण्यासाठी तिकिट मिळत होते. मी तीन तिकिटे काढली.

आम्ही तिघेजण काही पायऱ्या खाली उतरून तिथे उभ्या असलेल्या बोटीत चढलो. संतोषला सांभाळणे कठीण काम होते. बोट अजूनही रिकामी होती त्यामुळे काही वेळ वाट बघायला लागली. पुरेसे प्रवासी जमल्यावर बोट एलिफंटा गुंफाच्या दिशेने निघाली. संतोषला पाण्यात हात घालायचा होता त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे होते. इतके दिवस गेट ऑफ इंडियावरून समुद्राकडे पाहायचो परंतु आज बोटीत बसल्यावर समुद्रातून मुंबई कशी दिसते हे प्रथमच पाहायला मिळत होते. मोठ मोठ्या इमारती दिसत होत्या. त्या सर्व विभागात मी फिरलेलो असल्याने बर्‍याच इमारती माझ्या परिचयाच्या होत्या. गेट ऑफ इंडिया ते मरिन ड्राईव्हपर्यंतची सर्व ठिकाणे सुंदर दिसत होती. समुद्रात छोट्या मोठ्या बोटी ये जा करीत होत्या. मध्येच दोन मोठाली जहाजे बघायला मिळाली. संतोषला ती जहाजे दाखवली. परंतु तो पाण्याशी खेळण्यात मग्न होता. त्याच्या मस्तीमुळे आमच्या बोटीतील बरेच प्रवासी संतोषकडे वारंवार पाहत होते. ती सर्व प्रवासीमंडळी मला संतोषकडे लक्ष द्यायची सूचना करत होती. नंतर पुढच्या दहा मिनिटांत बोटीने एलिफंटा गुंफा गाठले.


आम्ही गुंफांच्या पायथ्याशी पोहचलो होतो. आजूबाजूला छोटी मोठी दुकाने होती. दुकानात विकायला ठेवलेल्या वस्तू बघितल्यावर त्या विकत घेण्यासाठी संतोष आग्रह करू लागला. कुठलीही वस्तू घेतली तरी ती संतोषकडे जास्तीत जास्त अर्धा तास टिकायची. ती वस्तू मोडून तोडून टाकल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. त्याच्या आग्रहाखातर बंदूकीच्या आकाराची एक 'की चेन' त्याला घेऊन दिली. त्याचबरोबर एक वेफर्सच पाकीट सुद्धा घेतले. एका हातात 'की चेन' आणि दुसऱ्या हातात वेफर्स खात खात पायऱ्या चढत होतो. काही पायऱ्या चढताच एक माकड आमच्या दिशेने आले आणि संतोषच्या हातातले वेफर्सचे पाकीट खेचून घेऊन गेले. मी बघतच राहिलो. संतोष अजिबात घाबरला नव्हता. उलट तो त्या माकडाकडे टक लावून पाहत होता. आम्ही तिघे शंभर एक पायऱ्या चढून गेल्यावर समोर सुप्रसिद्ध पुरातन मंदिर दिसले. शंकराची मूर्ती सुंदर दिसत होती. आमच्यासारखी बरीच पर्यटक मंडळी शंकराची मूर्ती पाहायला जमली होती. काही विदेशी पर्यटक फोटो काढत होते. काही लोक मार्गदर्शकाला (गाईडला) सुद्धा बरोबर घेऊन आले होते. ते मार्गदर्शक (गाईड) त्या स्थळाचा प्राचीन इतिहास सांगत होते. मी, सुमन आणि संतोष त्या ठिकाणी अर्धा तास फिरलो आणि नंतर जवळच्या बागेत जाऊन बसलो. तीन वाजायला आले होते. प्रवासामुळे भूक लागायला सुरुवात झाली होती. आलेल्या दिशेने खाली उतरलो. उजव्या बाजूला असलेल्या उपहारगृहात (हॉटेलात) शिरलो. सुमनची परवानगी घेऊन दोन पुरी भाजी थाळ्या मागवल्या. तिघांनी मिळून पुरी भाजी खाल्ली. चार वाजता एलिफंटा गुंफावरून निघालो. संध्याकाळी सात वाजता डोंबिवलीला घर गाठले. सुमनला दिलेल्या शब्दानुसार एक जानेवारी संपुर्ण दिवस सुमन आणि संतोषसाठी राखीव ठेवला होता. मग पुढील चार वर्षे दर एक जानेवारीला जुहू चौपाटी, सुरज वॉटर पार्क, डिसनी लॅन्ड आणि टिटवाळा अश्या निरनिराळ्या ठिकाणी सुमनला आणि संतोषला फिरायला घेऊन गेलो......

5 comments:

  1. नवीन वर्षाच्या निमित्ताने छान पायंडा पाडलात

    ReplyDelete
  2. नविन वर्ष त्यानमित्त भेट. कौटुंबिक आनंद मिळविला

    ReplyDelete
    Replies
    1. थोडावेळ घरच्यांसाठी देणं गरजेचं असतं...

      Delete