Sunday, August 16, 2020

माझा पहीला विमानप्रवास व पहीली परदेशवारी...

"पंख होती तो उड आती रे" हे केवळ सुप्रसिद्ध गीत नसून अनादी काळापासून मानवाच्या सर्व वयोगटातील मंडळींनी पहीलेले ते एक स्वप्न होते. आधुनिक विज्ञानाने मानवाची ही सुप्त इच्छा विमानाच्या माध्यमातून साकार केली. तेव्हा अश्या या विमानातून आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा असं स्वप्न प्रत्येकजण कधी ना कधी मनी पहात आलेला असतो. लहानपणी कुंदापूरला असताना विमानाचा आवाज आला रे आला की मी व माझ्या बालमित्रांची टोळी जोरजोरात ओरडायला सुरुवात करीत असे. परंतु महिन्यातून एखाद्या दिवशीच विमानाचा आवाज यायचा. आवाज करत विमान गेले की आमची विमानावर गहन चर्चा चालू होत असे. विमान कसं उडत असेल? विमानामध्ये माणसं कशी चढत असतील? समजा विमान पडले तर? असे भल्या भल्या शास्त्रज्ञांना लाजवणारे प्रश्न आम्हा बालगोपाळांच्या चर्चेत यायचे. विमान दिसलं की मी मित्रांना सांगायचो "आपण दगड मारून विमान पाडू या." उत्साहाच्या भरात एकदोन वेळा आम्ही दगड मारले सुद्धा परंतु आम्ही मारलेला दगड विमानापर्यंत कसा पोहचणार? विमान पडायचे राहीले बाजूला उलट तो आम्ही मारलेला दगड परत आमच्याच टाळक्यावर येऊन पडायचा. कधी कधी विमान थोडेसे खालून गेले की त्याचा आवाज जोरात येत असे. त्यावेळी असं वाटायचे की विमान आता डोक्यावर पडते की काय? मग काय विचारता आम्ही सर्व बालवैज्ञानिक झाडाखाली लपायचो. अर्थात ही झाली लहानपणीची गंमत जम्मत. 


कुंदापुरहून डोंबिवलीला म्हणजे मुंबई विमानतळाच्या नजिकच्या शहरात स्थायिक होऊन सुद्धा प्रत्यक्षात विमान जवळून किंवा आतून बघायचा योग अद्याप आला नव्हता. परंतु त्याआधी चित्रपटात बर्‍याचवेळा विमान आतून बाहेरून जवळून पाहिले होते. चित्रपट सुरू असताना वाटायचे की मी सुद्धा विमानातून प्रवास करत आहे आणि चित्रपट संपल्यावर बघतो तर काय आपण अजून चित्रपट गृहामध्येच आहोत! विमानाने प्रवास करून आलेल्यांचे अनुभव मी ऐकले होते. विमान जमिनीवरून उड्डाण (टेक ऑफ) करताना कसे वाटते? जमिनीवरून उडाले की आकाशातून खालची दृश्य कशी दिसतात? रस्ते, दिवे, झाडं, नदी वगैरे कसे दिसतात?मध्येच मोठा ढग आला की विमान कसे हलते? वगैरे कुतुहलपुर्ण प्रश्नांची उत्तरं देणारे अनुभव मी ऐकले होते. आमच्या घरातील फक्त पांडुरंग अण्णांनी विमान प्रवास केला होता. ते विमानाने बँकॉक ते पाट्टया फिरून आले होते. आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करायचा हे मी ठरवले होते.

मी जपान लाईफ जॉईन करताच माझ्या वरिष्ठांनी म्हणजे विनायक आणि विक्रम यांनी मला सांगितले होते की पासपोर्ट काढून ठेव. कंपनीकडून कोरियाला जायची संधी मिळेल. मी कधीच या दोघांचे ऐकत नसे. ते माझ्यापेक्षा वयानी खूप लहान होते. उद्योग-व्यवसायात मला त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव होता. हे कोण मला शिकवणारे? मी माझंच डोकं चालवायचो. जेव्हा की ते चुकीचं होतं. जपान लाईफ हा वेगळा व्यवसाय होता व त्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव होता. शेवटी त्यांनी सांगितलेलं खर झाले. ऑक्टोबर १९९८ला कंपनी काही लोकांना कोरियाला घेऊन जाणार होती. त्यात माझे सुद्धा नाव होते. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने माझा कोरिया दौरा राहून गेला. तेव्हा कुठे मला अक्कल आली. मी लगेच मानपाडा रस्त्यावरील 'रवी इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स'कडे  पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रं व फोटोसहीत अर्ज भरला. पारपत्र लवकर म्हणजे एका महिन्यात मिळवण्यासाठी जास्तीचे तीन हजार रुपये सुद्धा भरले. मला वाटले की एकदा पैसे भरले की मला काहीही करावे लागणार नाही. पारपत्र थेट घरी येईल. परंतु मला एकदा पोलीस ठाण्यामध्ये आणि एकदा पारपत्र कार्यालयामध्ये (पासपोर्ट ऑफिसमध्ये) हेलपाटा घालावा लागला होता. त्यानंतर एका महिन्यात मला पासपोर्ट मिळाले!!

पासपोर्ट हाती पडल्याचा मला खूप आनंद झाला. ते पारपत्र सर्व मित्रांना व नातेवाईकांना सुद्धा दाखवले. आता मला परदेशवारी करता येणार होती. काहीजण चेष्टामस्करी करत म्हणाले की 'तू आता मोठा माणूस झालास. आमच्याकडे लक्ष असु दे, आम्हाला विसरू नकोस. आता तुला भेटायला परवानगी घ्यावी लागेल, एक असिस्टंट नेमावा लागेल' वगैरे वगैरे... 'तुमची कंपनी खरोखरच परदेशी घेऊन जाणार का? व्यवसाय वाढविण्यासाठी अमिष दाखवत असतील', असे सुद्धा काही मित्र व नातेवाईक गंभीरपणे म्हणू लागले. कोणालाच उत्तर द्यायचे नाही असं मी ठरवले होते. वेळ आली की त्यांना कळेल अशी स्वतःची समजूत घातली व मी माझे काम करत राहिलो. जनसंपर्क वाढल्यामुळे माझी टीम व उत्पन्न दोन्ही वाढत चालले होते.

दरम्यान विनायक आणि विक्रम कोरियाला जाऊन आले. ते त्यांचे अनुभव सांगायला लागले. ते कोरियामधील पुसान या शहरामध्ये उतरले होते. तेथील लोकं, रस्ते, वाहनं, मालवाहतूक यंत्रणा, कारखाना, स्लीपिंग सिस्टिम तयार करायची पद्धत वगैरे बाबत ते सांगत होते. कंपनी जपानची असली तरी कारखाना कोरियात असल्याने आपले प्रॉडक्ट कोरियावरून भारतात येत होते. तेथील कर्मचारी उत्पादन निर्मितीवर (प्रॉडक्शनवर) बारीक नजर ठेवून होते. त्यामुळे स्लीपिंग सिस्टिमचा दर्जा खूप चांगला राखला गेला होता. हे सर्व ऐकल्यावर एकदा तरी परदेश दौरा करायला पाहिजे असं मला सुद्धा वाटू लागले होते.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ठाण्याच्या कार्यालयात आमची मीटिंग भरली. डिसेंबर महिन्यात हॉंगकॉंगला आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (इंटरनॅशनल सेमिनार) असल्याचे त्या सभेमध्ये सांगण्यात आले. त्या चर्चासत्रामध्ये विविध देशातली लोकं सुद्धा येणार होती. पण माझे नांव त्यात नव्हते. मी थोडासा नाराज झालो. आता पासपोर्ट तयार असून सुद्धा माझे नांव नसल्याने मला हॉंगकॉंगला जात येणार नव्हते. परंतु दोन दिवसांनी नवीन यादी जाहीर करण्यात आली. काही जणांकडे पासपोर्ट नसल्याने मला हॉंगकॉंगला जायची संधी मिळाली होती. सदर दौऱ्यासाठी या वेळेला अर्धे पैसे आम्हाला भरायला लागणार होते. अर्धे पैसे कंपनी भरणार होती. पाच दिवसांच्या दौऱ्यातील विमानप्रवास, रहाणे, खाणेपिणे इत्यादी सर्वांचा एकूण खर्च रूपये १२०००/- येणार होता. मी माझ्या टीम बरोबर चर्चा केली. जर मी हॉंगकॉंगला जाऊन आलो तर सर्वांचा फायदा होणार होता. माझे ज्ञान वाढणार होते. तेथील लोकांचा अनुभव मला समजणार होता. सर्वांनी होकार दिला. घरी सुमनला सांगितलं. तिला या विषयात रस नव्हता. नाईलाजाने तिने होकार दिला. अखेर सर्वांच्या अनुमतीने माझं हॉंगकॉंगला जायच ठरलं!

आमच्या कंपनीचे मुख्य कार्यालय नरिमन पॉईंटला दलामल टॉवर्समध्ये होते. हॉंगकॉंगला जाणाऱ्या सर्वांना नोव्हेंबरमध्ये या मुख्य कार्यालयात बोलावले होते. संध्याकाळची मीटिंग होती. आम्हा सर्वांची  पासपोर्ट त्या कार्यालयात जमा केली गेली. व्हिसासाठी पासपोर्ट लागणार होते. व्यवसायिक दौरा (बिझनेस टूर) असल्याने व्हिसाचे काम कंपनी करणार होती. मीटिंगमध्ये कोण कोण कुठून येणार, विमानतळावर किती वाजता जमायचे, येताना काय काय बरोबर आणायला लागेल, वगैरे बाबत सर्व माहिती या मुख्य कार्यालयात भरलेल्या सभेमध्ये देण्यात आली. डिसेंबर महिना असल्याने तिकडे थंडी खूप असते त्यामुळे स्वेटर आणि जास्तीत जास्त उबदार कपडे बरोबर आणायला सांगण्यात आले. वैयक्तिक औषध गोळ्या बरोबर ठेवायच्या सूचना करण्यात आल्या. सर्व माहिती मिळाल्यावर मी डोंबिवलीला निघालो.

माझ्याकडे तयारीसाठी १५ दिवस होते. मी हॉंगकॉंगला जाणार कळल्यावर बरेच मित्र भेटायला आले. बर्‍याच लोकांनी त्यांचा विमानाचा अनुभव सांगितला. काही लोकांनी उपयुक्त मार्गदर्शनही केले. मला कधी एकदा विमानात बसतो असं झाले होते. प्रवासाला लागणार्‍या सर्व वस्तूंची यादी तयार केली. एक एक सामान जमवत गेलो. अभिरूची नसताना सुद्धा सुमनने खूप मदत केली. दिनांक ११ डिसेंबरला दुपारचे विमान होते. आम्हां सर्वांना तीन तास आधीच विमानतळावर यायला सांगितले होते. सुमन आणि संतोषचा निरोप घेऊन सर्व तयारीनिशी हॉंगकॉंगला जाण्यासाठी सकाळी ९च्या दरम्यान मी घरातून बाहेर पडलो.गुरुवार दिनांक ११ डिसेंबर १९९८ रोजी माझ्या आयुष्यातील पहिल्या अविस्मरणीय परदेश दौऱ्यासाठी त्याचबरोबर पहिल्या विमान प्रवासासाठी मी मार्गस्थ झालो होतो.....

6 comments:

  1. पहिला विमान प्रवास अनुभव छान फोटो व वर्णन सुंदर

    ReplyDelete
  2. खूप सुंदर अनुभव आहे !

    ReplyDelete
  3. पहिल्यांदा विमानाने जाणं खूप आनंददायी अनुभव असतो.‌तोतुम्ही छान रंगवला आहे.

    ReplyDelete