साधारणपणे दुपारी साडेबारा वाजता लायब्ररी बंद झाली की जेवून मुंबईला नियमितपणे जाऊन मासिकं आणायला जात असे. सव्वा वाजताच्या जलद गाडीनं तासाभरात मुंबईला पोहोचून अर्ध्या तासात मासिकं खरेदी करणं आणि लगेचच तीनच्या गाडीनं चार- सवाचारच्या आसपास घरी यायचा कार्यक्रम होता. दर सोमवारी सकाळी लायब्ररी बंद असल्यानं थोडा लवकर निघून निवांतपणे मार्केटमध्ये फिरून निरनिराळी मासिकं, पुस्तकांचा शोधा घेत असे. तिकडच्या सगळ्या दुकांदारांशी परिचय करून घेतला. तिकडून समजलं की, वॉर्डन रोडवर फिनिक्स नावाची एक मोठी इंग्रजी पुस्तकांची लायब्ररी आहे. जुनी झालेली काही इंग्रजी कॉमिक्स/पुस्तकं ते १०/२० रूपयांना विकतात. माझ्याकडे लहान मुलांची खूप मराठी पुस्तक होती. इंग्रजी पुस्तकं महाग असल्यानं ती कमी होती. एप्रिल महिन्यात सुट्टीमध्ये मुलांना वाचायला कॉमिक्स आणि इतर इंग्रजी पुस्तकं लागणार होती. त्यासाठी एका सोमवारी 'फिनिक्स लायब्ररी' त जायचं ठरवून लवकर निघालो.
मला लायब्ररी बघायला, पुस्तकं निवडायला तास/दोन तास तरी लागणार होते. सकाळी १० च्या सुमारास ग्रांट रोड स्टेशनवर उतरून चालत निघालो. पुढे जात असताना काही दुकानदारांना लायब्ररीचा पत्ता विचारला. वॉर्डन रोड सगळ्यांना माहीत होता. पण मला 'फिनिक्स लायब्ररी' शोधायची होती. बरीचशी दुकानं उघडली नव्हती. नंतर कळलं, की तिकडे सर्व लोक उशिरा झोपून आरामात उठतात. त्यामुळे सगळी दुकानं ११ नंतर उघडतात.
थोडं पुढे गेल्यावर मला 'फिनिक्स लायब्ररी' दिसली, पण ती बंद होती. लायब्ररी सकाळी ११ ते रात्री आठ दरम्यान उघडी राहील, असा बाहेर फलक होता. आता मला काही वेळ तिकडे घालवायचा होता. जवळच एक फळ विक्रेता होता. त्यानं विविध फळं छान रचून ठेवली होती. त्यात मी आयुष्यात कधीच बघितली नव्हती, अशीही फळं पहिल्यांदा बघत होतो. तिथल्या परिसरात खूप श्रीमंत लोक रहात होते.फळं विक्रेत्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. त्याला ओळख सांगून मी डोंबिवलीहून पुस्तकं घ्यायला आल्याचं सांगितलं. 'अरे साब यहाँपें सुबह १२ बजेसे पहले कोई उठता नही, रातको दो बजेसे पहिले कोई सोते नही. सब रईसजादे हैं'. विक्रेता म्हणाला. त्याच्याकडून काही विकत घेऊ या, म्हटलं तर फळं खूप महाग होती. स्वस्तातली केळी, चिकू, पेरू हा प्रकार नव्हताच.
काही वेळात लायब्ररी उघडली. त्यांचं आवरून होईपर्यंत मी बाहेरच थांबलो. बाहेर छानसा इंग्रजीतून 'फिनिक्स लायब्ररी' नावाचा बोर्ड लावला होता. काचेचं मोठं डिस्प्ले होतं. आत पुस्तकं रचून ठेवली होती. बाहेरून पुस्तकं छान दिसत होती. काचेचा दरवाजा लोटून मी आत गेलो. एसी सुरू असल्यानं थंड वातावरण होतं. तळ मजला आणि पहिला मजला अशा दोन ठिकाणी पुस्तकांनी भरलेल्या रॅक्स होत्या. ४/५ कर्मचारी तिथं काम करीत होते.ते चांगले शिकलेले वाटत होते. आलेल्या वाचकांशी इंग्रजीतून बोलत होते. एकंदरीत तिथलं वातावरण वाचनालयास शोभेसं होतं.
लायब्ररीचे मालक अजून आले नव्हते. पुस्तकं घेण्यासाठी मी डोंबिवलीहून आल्याचं कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्या बरोबर त्यांनी जुनी विकायची पुस्तकं/कॉमिक्स दाखवली. तशी मला बरीचशी पुस्तकं घ्यायची होती आणि माझ्याकडे होते, फक्त २ हजार रु.
रिची रिच, इंद्रजाल कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स, अशी बरीचशी कॉमिक्स, काही लहान मुलांची इंग्रजी गोष्टींची पुस्तकं आणि मोठ्यांची मिल्स अँड बुन्स अशी इंग्रजी पुस्तकं निवडून मालक येण्याची वाट बघत राहिलो.
तिकडची पुस्तके बघून मी थक्क झालो. त्या वेळी त्यांच्याकडे दोन हजारांवर सभासद होते. त्यांचे नियम जरा वेगळे होते. पुस्तकाच्या किंमतीएवढं डिपॉझिट सभासदांना ठेवायला लागायचं. त्या पुस्तकाचं रोजच्या हिशोबानं ते भाडं आकारून पुस्तक परत आल्यावर डिपॉझिट परत द्यायचे. महिन्याची वर्गणी हा प्रकार नव्हताच तिकडे. सभासद एका पुस्तकाचं दिवसाला दोन रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत भाडं द्यायचे ! असं मी डोंबिवलीत केलं असतं तर एका महिन्यात लायब्ररी बंद करायला लागली असती.
सभासद संख्या खूप असल्यानं लायब्ररी उघडताच वाचक यायला सुरुवात झाली. मी त्या लायब्ररीतली प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघत होतो. येणारे सभासद जास्त करून इंग्रजीत बोलणारे होते. लहान मुलं आणि स्त्रियांची संख्या जास्त. पुरुष कमी दिसले. त्यांचे कपडे पाश्चात्य लोकांसारखे होते. पालक मुलांना हवं ते पुस्तक घेऊन देत होते. मुलं कुठली पुस्तकं घेतात, काय वाचतात, या कडे पालकांचं लक्ष नसे. पालक त्यांचं पुस्तक शोधण्यात मग्न. घरातले सगळे सदस्य पुस्तकं वाचायचे. ते पैशांचा विचार करीत नव्हते. मला वाटत, ते लोक पुस्तकांसाठी खूप पैसे खर्च करत असतील.
काही वेळात मालक आले. ते पन्नाशीचे असतील. दिसायला रईस, आवाज खणखणीत. ते आत येताच लायब्ररीत शांतता पसरली. गप्पा मारत असलेला कर्मचारी वर्ग आपापल्या कामाला लागला. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. मी बाजूला काढलेली पुस्तक त्यांना दाखवली. व्यवहारात कडक असले तरी ते मनानं चांगले होते. मी जवळपास २०० पुस्तकं निवडली होती. त्यांची एकूण किंमत २,२०० रु. झाली होती. माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये होते. त्यांनी २०० रुपये कमी केले आणि वर अजून १० कॉमिक्स भेट म्हणून दिली. या पुस्तकांनी फ्रेंड्स लायब्ररीच्या संग्रहात आणखी २१० पुस्तकांची भर पडली.
मी पुस्तकं आणण्यासाठी बॅग नेली होती. त्यात मावतील तेवढी पुस्तकं ठेवून बाकीची त्यांनी व्यवस्थित दोरीने बांधून दिली. जवळपास तीन तास तरी मी 'फिनिक्स लायब्ररी'त होतो. एसीमुळे खूप थंडी वाजत होती. मला 'एसी' ची सवय नव्हती. कितीही उन्हाळा असला तरी मी तो सहन करू शकत होतो.
लायब्ररीतून बाहेर पडलो. आता भूक लागली होती. त्या परिसरात साधी हॉटेल्स नव्हती. सर्व बार आणि रेस्टॉरंट होते.थोडं पुढे आल्यावर एक उडुपी हॉटेल दिसलं. मी खुश झालो. आत गेलो, मेनू कार्ड पाहिलं. ते मला मुळीच परवडणारं नव्हतं. शेवटी भूक लागली होती. नाईलाजानं २० रु. मोजून इडली सांबार खाल्ला. तिथून बाहेर पडलो. तो परिसर, तिकडची माणसं, दुकानं, रस्ते, रस्त्यावर ये जा करणारी मोठ-मोठी वाहनं यांनी व्यापला होता. कुठेच कचऱ्याचा ढिगारा नव्हता, कुठेही पाणी साठलेलं नव्हतं, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेली सुंदर झाडं बघितल्यावर मला एखाद्या युरोपियन देशात फिरून आल्याचा भास झाला. 'फिनिक्स लायब्ररी' ही कायमची माझ्या लक्षात राहिली...
फिनिक्स च्या निमित्ताने तुम्हाला बरीच माहिती झाली. निरिक्षण करता आले हा एक अनुभव
ReplyDeleteअशे बरेचशे अनुभव मी घेतले आहेत. त्यातील हा एक अविस्मरणीय अनुभव होता...
Deleteमस्त अनुभव काका लोकांच निरीक्षण करणे हा पण एक वेगळा छंद आहे.
ReplyDeleteहो...
Deleteमस्त अनुभव काका लोकांच निरीक्षण करणे हा पण एक वेगळा छंद आहे.
ReplyDeleteहो...
DeleteArchie परिवार बघून जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद !!
ReplyDeleteअजून हि ते जपावले आहेत...
Delete