'स्वप्नी आले काही एक मी गांव पाहीला बाई, किलबिल किलबिल पक्षी बोलती' असं एक बालगीत असून त्यात रम्य अश्या काल्पनिक दुनियेतील एका गावाचे नवल वाटावे असं वर्णन केले आहे. प्रत्येक गोष्टीचे नवल व नाविन्य वाटावे अशी माझ्या मनाची सुद्धा अवस्था झालेली असली तरी मी मात्र स्वप्नात पाहिलेले वास्तवात कसे दिसते याचा प्रत्यक्षपणे अनुभव घेत होतो. आमचे विमान रात्री अकराच्या सुमारास हॉंगकॉंग विमानतळावर व्यवस्थित उतरले. मी माझी बॅग घेऊन विमानातून बाहेर पडलो परंतु मोठी बॅग घेण्यासाठी थोडावेळ वाट पहावी लागली. सर्वांनी आपआपले सामान घेतले. पारपत्रावर शिक्का मारून आम्ही सर्वजण विमानतळा बाहेर पडलो. डिसेंबर महिना असल्याने बाहेर खूप थंडी होती. मी घरून स्वेटर आणले होते. ते परिधान केलेले असून सुद्धा शरीर थंडीने थरथरत होते. आमच्यासाठी विमानतळाच्या बाहेर हॉटेलची बस उभी होती. आम्ही बसमध्ये चढल्यावर बस हॉटेलच्या दिशेने निघाली. अर्धा तासात हॉटेलवर पोहोचलो. 'रिव्हर साईड' नावाच्या एका मोठ्या आलिशान पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केली होती. या हॉटेलच्या समोर एक छानसं तळं होते. ख्रिसमस जवळ आलेला असल्यामुळे ते तळं आणि हॉटेल दोन्ही मस्तपैकी सजवण्यात आले होते. मी हॉटेलात जाऊन माझी खोली कोणती आहे ते तपासले. उद्-वाहनाने (लिफ्टने) खोलीकडे गेलो. एकाच खोलीमध्ये माझ्याबरोबर ठाणे कार्यालयातील दोघे जण सुद्धा होते. ते दोघे माझ्या ओळखीचे असल्याने मला खूप आनंद झाला. रात्रीचे बारा वाजायला आले होते. प्रत्येकाने विमानातील आपले अनुभव सांगितले. गप्पा मारता मारता आम्ही सर्वजण झोपी गेलो.
गुरूवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी रात्री आम्ही हॉंगकॉंगला पोहोचलो होतो. दुसर्या दिवशी शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी काहीच कार्यक्रम नव्हता. सकाळी आरामात उठलो. सकाळचे वैयक्तिक कार्यक्रम उरकून नाष्ट्यासाठी तयार झालो. हॉटेलच्या एका वेगळ्या भागात नाष्ट्याची सोय केली होती. आपल्याकडचे डोसा, इडली, सांबर सोडून नाष्ट्याला कमीत कमी वीस निरनिराळया प्रकारचे पदार्थ होते. काय खायचे आणि काय नाही खायचे तेच समजत नव्हते. नाष्टा उरकून आम्हाला हॉंगकॉंग फिरायला जायचे होते. सकाळी अकराच्या सुमारास आम्ही सर्व हॉटेलच्या बाहेर पडलो.
बाहेर अजूनही थंडी होती. नुकतीच जमिनीवर सूर्याची किरणे पडू लागली होती. सर्व परिसर धुक्यानी भरला होता. त्यातून सूर्याची किरणे सर्वत्र पसरलेली असे ते दृश्य खूप छान दिसत होते. जवळच्या बस स्थानकावरून बस पकडली. तिकडे बसच्या आत गेल्यावर नाणी टाकायला लागायची. बससाठी वाहक (कंडक्टर) नव्हता. प्रत्येकानी नाणी टाकली व बस निघाली. बसमध्ये लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे तिकडे बसमध्ये फक्त आमचा गोंगाट होता. तिथली स्थानिक लोकं एकमेकांशी बोलत नव्हती. काही लोकं मोबाईलमध्ये मग्न होते. बस पूर्ण काचेची होती. बाहेरचे दृश्य छान दिसत होते. मोठ मोठ्या इमारतींची बांधकामे चालू होती तरी सुद्धा रस्त्यावर कणभरही माती किंवा सिमेंटचा पसारा नव्हता. ना कुठे कचऱ्याचा ढीग होता, ना कुठे साठलेले पाणी. संपुर्ण रस्ता स्वच्छ होता. आश्चर्य म्हणजे बसचालकाने कुठेही हॉर्न वाजवला नव्हता. बसने थोडावेळ फिरून परत हॉटेलवर आलो.
हॉटेल छान होते पण जेवण पाहिजे तसे नव्हते. मग काय संध्याकाळी भारतीय हॉटेलच्या शोधात निघालो. जवळपास कुठे भारतीय समुदाय आहे का याचा शोध घेतला. काही अंतरावर खूप मोठी भारतीय बाजारपेठ (मार्केट) होती. तिकडे पंजाबी ढाबा असल्याचे समजले. मग काय शोधत शोधत पंजाबी ढाबा गाठला. त्या पंजाबी ढाब्याचा (हॉटेलचा) मालक सरदारजी होता. मस्तपैकी दाल मखनी, रोटी, राईसची फर्माईश केली. असे वाटले की भारतातल्या कुठल्या तरी महामार्गावरील (हायवे वरील) ढाब्यावर बसून जेवत आहे. परदेशात सुद्धा आपल्याला भारतीय जेवण मिळाले याचा आनंद घेऊन आम्ही सर्वजण परत हॉटेलकडे रवाना झालो.
शनिवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (इंटरनॅशनल सेमिनार) होते. आम्ही सर्व लवकर उठून तयारीला लागलो. खोलीमध्ये आम्ही तिघे असल्याने तयार होण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. मी उठून आधी चहा बनवला. रूममध्ये चहाचे भांडे होते. तिकडे दूध पावडर, टी बॅग्ज् व शुगर क्युब्स उपलब्ध होते. मस्तपैकी गरम गरम चहा बनवला. बाकीच्या दोघांनाही चहा पाजला. वेळ पाळण्या बाबतीत आमची कंपनी खूप कडक होती. वेळेवर पोहचलो नसतो तर दंड बसला असता. आम्हां सर्वांना हॉलवर घेऊन जाण्यासाठी बस तयार ठेवली होती. दहा वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार होती. आम्ही वेळे आधीच हॉलवर पोहचलो.
चर्चासत्रासाठी खूप मोठा हॉल होता. संपुर्ण हॉल छानपैकी सजवला होता. सर्वांना बसण्यासाठी गोलाकार मेजांची (टेबलांची) व्यवस्था केली होती. विविध देशातून चारशे ते पाचशे लोक आले होते. एका गोलमेजवर (राऊंड टेबलवर) पाच लोकांच्या बसण्याची सोय केली होती. ठीक दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिकडच्या स्थानिक लोकांच्या ड्रॅगन शोने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मी ड्रॅगन शो चित्रपटात पाहिला होता. आज मात्र प्रत्यक्षात पाहत होतो. तिकडची ध्वनीयंत्रणा (साऊंड सिस्टीम), प्रकाशयोजना (लायटींग), हॉलमधील शांतता, उत्तम सादरीकरण इत्यादीमुळे कार्यक्रमातील उत्साह वाढत होता. नंतर तिकडच्या लोकांनी कंपनी बरोबर काम करत असताना त्यांना आलेले अनुभव सांगितले. महत्वाच्या भाषणाला सुरुवात झाली. जपान लाईफची सुरुवात कशी झाली?, आता कुठल्या कुठल्या देशांमध्ये व्यवसाय सुरू आहे?, पुढील उद्दिष्टे काय आहेत? वगैरे बद्दलची रितसर माहिती देण्यात आली. मी सर्व नीट लक्ष देऊन ऐकत होतो. कारण मी याच सर्व गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी एवढ्या लांब आलो होतो. मला बरीचशी माहिती मिळाली. बरोबर दोन वाजता चर्चासत्र संपले.
सत्र संपताच जेवणाच्या तयारीला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येकाला त्याच्या आवडीचे पेय घेण्याची सोय केली होती. मी चार ते पाच कॅन बिअर घेतली. त्या बिअरची टेस्ट वेगळीच होती. प्रत्येकाच्या गोलमेजवर जेवण मांडून ठेवले होते. आमच्या मेजवर एका मोठ्या थाळीत (प्लेटमध्ये) हाफ फ्राय केलेला संपुर्ण मासा आणून ठेवला होता. त्याच्यासाठी तिखट, मीठ, तेल खूप कमी वापरलेले होते. तो मासा आजही माझ्या डोळ्यासमोर येतो. तो खूपच स्वादिष्ट होता. आम्ही पाचही जणांनी मिळून तो सगळा मासा संपवला. त्याच्या बरोबर पालकाची भाजी मस्त लागत होती. जेवण झाल्यावर तिकडच्या लोकांशी थोडावेळ गप्पा मारल्या. इतक्यात हॉटेलवर जाण्यासाठी बस आली. पोट भरले असल्याने चांगली झोप येत होती. हॉटेलवर आलो आणि झोपी गेलो.
रविवार, दिनांक १४ डिसेंबर आज ऑफिसचे काही काम नव्हते. आम्ही सर्वांनी बाजारहाट (शॉपिंगला) करायला जायचे ठरवले. सकाळी आराम केला. दुपारी जेवणानंतर खरेदीला निघालो. तिकडची लोकं मॉलमधून खरेदी करायची. मोठ मोठाले मॉल होते. क्रिसमस जवळ आल्याने सर्व मॉल छान सजवले होते. खरेदी करायला मजा येत होती. वस्तूंच्या किंमती 'हॉंगकॉंग डॉलर' या चलनानुसार छापलेल्या होत्या. आम्ही वस्तूची किंमत पाहून त्याची तुलना आपल्या रुपयाशी करायचो. तिकडे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतापेक्षा खूप स्वस्त होत्या. माझ्याबरोबरच्या लोकांनी पुष्कळ खरेदी केली. मी फक्त किंमती बघायचो आणि वस्तू ठेवून द्यायचो. मी घरी व वाचनालयात वाटण्यासाठी खूप चॉकलेटस् घेतल्या. खरेदीसत्र संपवून आम्ही रात्री आठच्या सुमारास हॉटेलवर परतलो.
सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी आमच्या कंपनीच्या स्थानिक शोरूमला भेट द्यायचा कार्यक्रम होता. सर्वांसाठी बसची व्यवस्था केलेली होती. तिकडे प्रत्येक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. त्यांच्या सर्व वेळा ठरलेल्या असायच्या. ठरल्याप्रमाणे वेळेवर शोरूमवर पोहोचलो. शोरूममध्ये आमच्या कंपनीच्या सर्व वस्तू छानपैकी मांडून ठेवल्या होत्या. वस्तूंचे प्रदर्शन (डेमो) केले जायचे. तिकडच्या लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. आमच्या सर्वांची मीटिंग घेण्यात आली. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय काय करावे लागेल याबाबत माहितीपुर्ण मार्गदर्शन करण्यात आले. तिथल्या अनुभवांची शिदोरी घेऊन संध्याकाळी हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघायचे होते म्हणून सामान, बॅग वगैरे भरून तयार ठेवले.
मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी आमचे परतीच्या प्रवासाचे विमान होते. पाच दिवस कसे निघून गेले समजलेच नाही. एकंदरीत दौरा यशस्वी झाला होता. खूप काही शिकायला मिळाले. इंग्रजीमध्ये 'चेरिश्ड आयडियाज्' असा एक शब्दप्रयोग वापरला जातो ज्याचा अर्थ हृदयात जपून ठेवलेल्या सोनेरी आठवणी असा आहे. विमानाचा प्रवास, तेथिल हॉटेल, चर्चासत्र (सेमिनार), जेवण, शोरूम, मॉल, इत्यादी हॉंगकॉंगमधील प्रत्येक गोष्ट म्हणजे माझ्यासाठी हृदयात कायमची जतन करून ठेवलेली एक सोनेरी मर्मबंधातली ठेव आहे......
अशा आठवणी खर्याखुर्या सोनेरी असतात.ज्याची झळाळी आयुष्य नेहमी आनंदी करून जातात!!
ReplyDeleteहो सजून सर्व आठवणी डोळ्यासमोर आहेत
DeleteVery well described your experience in simple language. Thanks for sharing & keep writing. All the best.
ReplyDeleteThanks
Deleteकाका मासा कुठला होता ? जरा नाव आठवा की....
ReplyDeleteनांव माहीत नाही ना...
Deleteवा वा मस्तच 💐💐
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवाचनीय वर्णन,असेच इतर प्रवास असतील तर तेही लिहून पुस्तक काढा,,,अगोदरच काढले असेल तर नाव सांगा व वाचनालयात आहे का सांगा
ReplyDeleteआवडेल,,,,,आभार
आधीचे ब्लॉगवर लिहिलं आहे पुस्तक काढायचा विचार आहे....
Delete