Wednesday, August 26, 2020

माझा बेंगळुरू शहरातील एक आठवडा...

 'जसा देश तसा वेष' असं जरी असले तरी माझा बेंगरूळु दौरा प्रामुख्याने व्यवसाय वृद्धीसाठी असल्याने मी नेहमीचाच कार्यालयीन पेहराव घालून म्हणजे काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शुभ्र शर्ट, गळ्यात लाल रंगाची टाय, पायात काळे बुट व बरोबर आणलेली बॅग घेऊन बेंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयाकडे निघालो. बेंगरूळुच्या राजाजीनगर मधील डॉक्टर राजकुमार रस्त्यापासून आमच्या कंपनीचे कार्यालय खूप लांब होते. बस सेवा उपलब्ध होती परंतु मला कोणत्या बस थांब्यावरून कोणती बस पकडायची याची माहिती नव्हती. रिक्षावाल्याला विचारल्यावर त्याने रुपये पन्नास भाडे सांगितले. शेवटी नाईलाजाने रिक्षेत बसलो. बेंगळुरूमधील रिचमंड सर्कलजवळ आमच्या कंपनीचे कार्यालय होते. मला कन्नड येत असल्याने वाटेत रिक्षावाल्याशी गप्पा मारत होतो. तिकडे मुंबईसारखी उपनगरीय रेल्वेसेवा नसल्याने लोकांना वाहनाने प्रवास करणे हा एकमेव पर्याय होता व त्यामुळे बेंगळुरूमधील बहुतेक करून सर्वांकडे दुचाकीसारखी वाहने होती. रिक्षेतून कार्यालयाकडे जाताना रस्त्यात दुचाकी वाहनांचा जणूकाही समुद्र भरला आहे असं वाटत होते. सकाळी कार्यालयात जाणाऱ्या लोकांची संख्या भरपुर असल्याने रहदारी खोळंबत होती. परिणामतः रिक्षेवाल्याला वाटेत खूप वेळा रिक्षा थांबवावी लागली. वास्तविक पाहता राजाजीनगर ते रिचमंड सर्कल हे फक्त दोन किलोमीटर इतकेच अंतर होते. परंतु तरी सुद्धा रिक्षाने तिकडे पोहचायला मला अर्धा तास लागला. रिचमंड सर्कल हा भाग मुंबईतील नरिमन पॉईंटसारखा चकाचक होता. मोठ मोठ्या काचेच्या इमारती होत्या. अश्या झगमगीत भागात आमच्या कंपनीचे कार्यालय असल्याचा मला अभिमान वाटला.


रिचमंड सर्कल, बेंगळुरू.

एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेले आमच्या कंपनीचे कार्यालय छोटे परंतु छान होते. आतमध्ये मोजकीच माणसे चर्चा करत बसली होती. मी थेट व्यवस्थापकांच्या (मॅनेजरच्या) दालनात शिरलो. मचाडो नावाची एक ख्रिश्चन व्यक्ती तिकडे कार्यकारी प्रभारी (इनचार्ज) पदावर होती. मी माझी ओळख करून दिली. कार्यालयात कन्नड येणारी एक वरिष्ठ व्यक्ती आल्याने त्यांना खूप समाधान वाटले. दुपारी एक वाजता चर्चासत्र होते. हळूहळू लोक यायला सुरूवात झाली. मला ठाणे कार्यालयाची सवय होती. ठाणे कार्यालयात नेहमी लोकांची वर्दळ असायची. बेंगरूळुचे कार्यालय नवीन असल्यामुळे इथे फक्त दहा-वीस माणसे जमत होती. परंतु त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे मला आलेल्या प्रत्येकाकडे जातीने लक्ष देणे शक्य होणार होते. कार्यालयाच्या सभागृहात कमी लोक असल्याने मी सुद्धा खूप दिवसांनी वसंत पंडित यांची चित्रफित (व्हिडिओ) निवांतपणे पाहू शकलो. ज्यांना इंग्रजी समजत नव्हते त्या सर्वांना मी कन्नडमध्ये कंपनी आणि स्लिपींग सिस्टिमबद्दल पूर्ण माहिती दिली. आलेले पाहुणे निघून गेल्यावर तिथल्या सभासदांना मी माझे अनुभव सांगितले. संध्याकाळी सहाच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडलो.

श्री. पी. आर. नायक यांनी त्यांच्याकडेच राहायला सांगितले होते. मला उगाचंच कोणाला त्रास देणे आवडत नसे आणि त्यात हा तर सात दिवसांचा रहीवास होता. मी दिवसाचे कामकाज संपल्यावर संध्याकाळी माझी बॅग घेऊन बेंगळुरू कार्यालयातून बाहेर पडलो. आता माझ्याकडे वेळच वेळ होता. मला एखादे मस्त व स्वस्त राहण्याचे ठिकाण शोधायचे होते. बेंगळुरूला बी.व्ही.के. अय्यंगार मार्गावर स्वस्त दरात खोली मिळते असे मी ऐकले होते म्हणून कार्यालयाच्या बाहेरून रिक्षा करून बी.व्ही.के. अय्यंगार मार्गावर पोहोचलो. त्या मार्गावर कपड्यांची आणि इलेक्ट्रॉनिक्सची बरीच दुकाने होती. बहुसंख्य व्यापारी गुजराती होते परंतु सर्वांना कन्नड बोलता येत होते. कदाचित ते खूप आधीपासूनच तिकडे स्थायिक झाले असतील किंवा त्यांचा जन्म तिकडेच झाला असेल. सर्व वस्तू मुंबईपेक्षा स्वस्त होत्या. मी खोलीच्या (लॉजच्या) शोधात हिंडत होतो. दोन चार ठिकाणी चौकशी केल्यावर शेवटी एक विश्रामधाम (लॉज) पसंत पडले. नांव आठवत नाही परंतु स्वस्त आणि मस्त लॉज होती. छोटीशी एकच खोली, त्यात एक पलंग, दोन खुर्च्या, एक मेज (टेबल) व त्या मेजवर ठेवलेला छोटा रंगीत दूरदर्शन संच होता. त्या खोलीचे एका दिवसाचे भाडे रुपये १२०/- इतके होते. तीन दिवसांची आगाऊ (Advance) रक्कम भरून खोली आरक्षित केली. हे सर्व आटपता आटपता रात्रीचे सुमारे आठ वाजले असतील. 

बी वि के अय्यंगार रोड  

लॉजमधील जेवण महाग होते. खोली ताब्यात घेतल्यावर कपडे बदलून बाहेर पडलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुष्कळ गर्दी होती. सकाळी बेंगळुरूला पोहचल्यावर घाईगडबडीत सुमनला एकदाच दूरध्वनीवरून संपर्क केला होता. आता माझ्याकडे पुरेसा वेळ होता. मी भ्रमणध्वनी (मोबाईल) बरोबर नेला होता परंतु त्यातील सिमकार्ड तिकडे चालत नव्हते. दुसरे सिमकार्ड मी घेतले नाही. आधी सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्र (पी. सि.ओ.) गाठले व घरी दूरध्वनी करून प्रवासाबद्दल आणि कार्यालयीन अनुभवांची सविस्तर माहिती दिली. संतोषची खबरबात जाणून घेऊन मग वाचनालयातील कामकाजाचा चौकशीवजा आढावा घेतला. आता पोटपुजेसाठी उपहारगृह शोधायचे बाकी राहीले होते. बी.व्ही.के. अय्यंगार मार्गावरून केम्पे गौडा सर्कल म्हणजे मॅजेस्टिक हे ठिकाण अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होते. मॅजेस्टिक हे बेंगळुरूमधील सर्वात मोठे बसस्थानक होते. कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तिथून बससेवा उपलब्ध होती. आजूबाजूला दुकानबाजार (मार्केट) होता. तिकडे एकाच रस्त्यावर सहा ते सात चित्रपटगृहे होती. चित्रपटगृहाच्या बाहेर तिथे सुरू असलेल्या चित्रपटातील नायकाच्या भव्य प्रतिमेला (कटआऊटला) तेवढाच मोठा फुलांचा हार घालून त्यावर विद्युत दिपमाळांची रोषणाई केलेली मी पाहिली. मी असे ऐकले की शनिवार, रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कोणताही चित्रपट असला तरी त्याचे तिकीट काळ्याबाजारात विकत घ्यावे लागते. लोकांना चित्रपटाचे कमालीचे वेड होते. 

मी उपहारगृहाच्या शोधात असताना थोडे फिरल्यावर एके ठिकाणी माश्याचे चित्र असलेला फलक लांबूनच नजरेस पडला. जवळ जाऊन पाहिल्यावर समजले की ते करावळी नावाचे उपहारगृह आहे. मग आत जाऊन फिश थाळी मागवली. फिश थाळी मस्तच होती. जेवणानंतर समजले की त्या उपहारगृहाचे मालक कुंदापूरचे राहणारे होते. गावाकडची व्यक्ती भेटल्यावर मग काय बघायलाच नको. बेंगळुरूचे कन्नड आणि कुंदापूरचे कन्नड यामध्ये खूप फरक होता. त्यांच्याशी कुंदापूर कन्नडमध्ये गप्पा मारल्या. मग विश्रामधामाकडे (लॉजवर) परतलो. थोडावेळ टिव्ही पहिला. मग झोपून गेलो.

सकाळी लवकर जाग आली. मला अकरा वाजेपर्यंत कार्यालयात पोहचायचे होते. लॉजमधील मुलाकडून चहा मागवला. चहाबरोबर मारी बिस्किटे खल्ल्यावर सकाळचे नित्य कार्यक्रम आवरून नाष्ट्यासाठी बाहेर पडलो. सकाळचे आठ वाजले तरी सर्व दुकाने बंद होती. पुढे काही अंतरावर नाष्टा मिळेल अशी माहिती तिथे थोडी चौकशी केल्यावर मिळाली. बेंगळुरूमध्ये मस्त 'सेट डोसा' मिळतो असे ऐकले होते. तसे उपहारगृह शोधून काढून 'सेट डोसाची' फर्माईश (ऑर्डर) केली. 'सेट डोसा' म्हणजे चटणी सांबार बरोबर छोट्या आकाराचे तीन डोसे मिळतात. ते सुद्धा फक्त पंधरा रुपयात. 'सेट डोसा' खाऊन निघालो. वाटेत एक एक करून दुकाने उघडायला लागलेली दिसत होती. तिकडची लोकं आरामात उठत असत. आपल्या मुंबई सारखे भल्या पहाटेपासून सुरू होणारे धावपळीचे जीवन नव्हते. सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्र (पी.सी.ओ.) शोधून घरी दूरध्वनी केला. सुमनला रात्री ते सकाळपर्यंतची सर्व बितंबातमी दिली. संतोषची ख्यालीखुशाली विचारली. सुमनने पत्नी या नात्याने अधिकारवाणीने मला वेळेवर जेवायला व धावपळ कमी करायला आग्रहपुर्वक सांगितले. धर्मपत्नीने हक्काने दिलेल्या सल्ल्यांना निव्वळ होकार देणे मला भागच होते. 

मॅजेस्टिक बस स्टेशन, बेंगळुरू.

सर्व आवरून सकाळी दहा वाजता कंपनीच्या कार्यालयाकडे निघालो. अकरा वाजेपर्यंत कार्यालयात पोहचायचे होते. माझ्याकडे एक तास होता म्हणून चालत जायचे ठरवले. चार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या कार्यालयात चालत पोहचायला जेमतेम अर्धा तास लागणार होता. परत चालत जाण्याच्या इतर फायद्यांबरोबर माझा आणखी एक फायदा झाला. वाटेत दिसणारे बेंगळुरू शहर मला व्यवस्थित पाहायला मिळाले. छोटी मोठी मंदिर बघायला मिळाली. ऊन असले तरी झाडांमुळे चालताना गर्मी जाणवत नव्हती. वाटेत खूप रहदारी सुद्धा अडवायची. तरी सुद्धा साडेदहापर्यंत कंपनीच्या कार्यालयात पोहोचलो. तेथील सभासदांना माझे कंपनी बरोबरचे व्यवसायिक अनुभव कन्नडमधून सांगताना बरं वाटत होते. माझ्यामुळे चार पाच दिवसात कार्यालयात लोकांची वर्दळ वाढायला लागली. शुक्रवारपर्यंत माझा हाच दिनक्रम होता. शनिवारी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघायचं होते म्हणून शुक्रवारी संध्याकाळीच संतोषसाठी काही खेळणी आणि सुमनसाठी साडी खरेदी केली. शनिवारचे रेल्वेचे तिकिट न मिळाल्याने बसचे तिकिट काढले. शनिवारी सकाळीच खोली रिकामी करून बॅग घेऊन कार्यालयात गेलो. शनिवारी काही लोकांना सुट्टी असल्यामुळे कार्यालयात चांगली गर्दी जमली होती. आलेल्या बहुतेक लोकांशी संवाद साधून कार्यालयातून बाहेर पडलो. संध्याकाळी सात वाजता व्हिआरएलच्या खाजगी बसने मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो.....

4 comments:

  1. सुंदर लिहिले सविस्तर वर्णन

    ReplyDelete
  2. अजून थोडे दिवस थांबला असतात तर तिथे पण लायब्ररीची शाखा काढली असतीत....

    ReplyDelete
  3. हो नक्की शाखा उघडली असती....

    ReplyDelete