Sunday, August 30, 2020

जेव्हा मी सुप्रसिद्ध गायक श्री. महेंद्र कपूर यांना प्रत्यक्ष भेटतो...

'उन्हे देखा तो ऐसी बहार आयी, की कभी हम उनको देखते, तो कभी उनके अंदाज को देखते।' मिर्झा गालीबच्या सुप्रसिद्ध शेरची ही खरे तर बदललेली आवृत्ती असली तरी ती माझ्याबाबतीत अचूकपणे लागू होईल अशी एक घटना माझ्या व्यवसायिक जीवनात घडली. व्यवसाय करताना सुरुवातीला मला वाटायचे की जपान लाईफच्या ठाणे येथील कार्यालयात आपण दुपारचे चार पाच तास काम केले तरी ते पुरेसे होईल. परंतु जस जशी माझी सभासद संख्या (टीम) वाढत गेली तसं तसा संपुर्ण दिवस कमी पडायला लागला. रोज नवीन लोकं चर्चासत्रात सामील व्हायचे. भेटायला आलेल्या लोकांच्या शंका निरसनासाठी मला त्यांच्या घरी जावे लागायचे. कंपनीच्या परिभाषेत आम्ही त्याला 'हाऊस व्हिझीट' असं म्हणायचो. या घरभेटीमध्ये इच्छुक व्यक्तीला तसेच त्याच्या कुटुंबीयांना कंपनी, स्लीपिंग सिस्टीम आणि व्यवसायाबाबत पुर्णपणे सविस्तर माहिती द्यावी लागत असे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातुन लोक येत असत. माझी दिवसभर धावपळ चालू असायची. जपान लाईफच्या या व्यवसायामुळे मी पुष्कळ लोकांच्या संपर्कात आलो.

श्री. राजेश खैतवास नावाची व्यक्ती माझ्या गटामध्ये (टीममध्ये) सभासद बनून सामिल (जॉईन) झाली होती. त्यांना मी लहानपणापासून ओळखायचो. त्यांचे शिक्षण मंजुनाथ शाळेत झाले होते. शाळेसमोरील संदेश स्टोअर्स हे आमचेच दुकान होते. माझे मोठे बंधू पांडुरंग अण्णा ते दुकान सांभाळायचे. श्री. राजेश खैतवास अधून मधून आमच्या दुकानात यायचे. त्यांची आणि माझी तेव्हापासूनची ओळख होती. एकदा ते आमच्या कंपनीच्या चर्चासत्रासाठी (सेमिनारसाठी) आले होते. तेव्हा तिथे त्यांची व माझी भेट झाली. त्यांना स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करायचा होता. माझ्याकडे पाहुन त्यांनी सुद्धा जपान लाईफचे सभासद होण्याचा निर्णय घेतला. राजेश यांचे वडील भारत संचार निगम या सरकारी उपक्रमात नोकरीला होते. डोंबिवलीला कल्याण रस्त्यावर त्यांचे उपहारगृह (हॉटेल) होते. त्यांनी ते दुसऱ्यांना चालवायला दिले होते. राजेश छोटी मोठी कंत्राटी कामे घेत असे. 

जपान लाईफमध्ये नवीन सभासद झालेल्यांना त्यांच्या नातेवाईक, मित्र व परिचित मंडळींच्या नावांची यादी तयार करायला आम्ही सांगायचो. राजेशने त्यांची यादी तयार केली होती. त्या यादीमध्ये प्रख्यात गायक श्री. महिंद्र कपूर यांचे नांव होते. ते नांव बघून मी आश्चर्यचकित झालो. राजेश यांना विचारलं की, "तुम्ही यांना कसे ओळखता?" तेव्हा ते म्हणाले की, "श्री. महिंद्र कपूर यांच्याबरोबर माझ्या वडिलांचे घरगुती संबंध (फॅमिली फ्रेंड) आहेत. माझ्या वडीलांना ते चांगले ओळखतात". आमच्या कंपनीची स्लीपिंग सिस्टीम घेणारी लोकं ही दोन प्रकारची होती. एक वर्ग फक्त आरोग्यासाठी ते घेणारा होता तर दुसरा वर्ग आरोग्याबरोबर व्यवसाय करू पहाणारा होता. श्री. महिंद्र कपूर यांना फक्त आरोग्यासाठी स्लीपिंग सिस्टीम द्यायची होती. त्यासाठी त्यांनी किंवा त्यांच्या घरातील कोणीतरी किमान एकदा तरी कार्यालयात येऊन चर्चासत्रामध्ये (सेमिनारमध्ये) सहभागी होणे गरजेचे होते. तसं मी राजेश यांना सूचीत केले. त्यांनी ती गोष्ट त्यांच्या वडिलांना सांगितली. 

. महेंद्र कपूर यांचा मुलगा श्री. रोहन कपूर यांना कंपनीच्या कार्यालयात येण्याचे महत्व कसं तरी समजावून सांगितले. त्यावेळी आमच्या कंपनीचे कार्यालय नरिमन पॉईंट येथून माहीम रेल्वे स्थानकाजवळ हलवण्यात आले होते. श्री. रोहन कपूर यांना आमचे ठाणे कार्यालय खूप लांब पडणार असल्याने त्यांनी माहीमच्या कार्यालयात यावे असे ठरले. श्री. रोहन कपूर हे नेहमी खूप व्यस्त (बिझी) असायचे. वडीलांप्रमाणे त्यांनी सुद्धा बरीच गाणी म्हटली होती. काही चित्रपटात तर कलाकार म्हणून काम सुद्धा केले होते. त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे एक दोन वेळा तारीख ठरवून सुद्धा त्यांना आमच्या कंपनीच्या चर्चासत्रासाठी येता आले नाही. मी ठाणे कार्यालयात जात असल्यामुळे माहीमच्या कार्यालयात माझे जाणं येणं कमी असायचे. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला भेटायचे असेल तरच मी माहीमच्या कार्यालयात जायचो.


एका शनिवारी सकाळी मला राजेशकडून कळले की आज श्री. रोहन कपूर चर्चासत्रासाठी येणार आहेत. मग मी त्यादिवशी ठाण्याला न जाता थेट माहीमच्या कार्यालयात गेलो. मी बारा वाजताच माहीमच्या कार्यालयात पोहचलो. आम्ही बरेच जण श्री. रोहन कपूर यांची वाट पाहत होतो. दुपारी १.१५ वाजता चर्चासत्र सुरू होणार होते. वेळेच्या बाबतीत आमच्या कंपनीत शिस्त पाळली जात असल्याने दुपारी १.१०ला सभागृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात येणार होते. दुपारी एक वाजेपर्यंत इमारती खाली उभे राहून आम्ही त्यांची खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो. आम्हाला वाटले ते आज येणार नाहीत. परत परत त्यांना दूरध्वनीवरून संपर्क करणे मला योग्य वाटत नव्हते. आम्ही सर्वजण थोडेसे नाराज झालो होतो. परंतु एक वाजून पाच मिनिटांनी त्यांची गाडी आली. चर्चासत्र चालू होण्यास अजून दहा मिनिटांचा कालावधी शिल्लक होता. घाईघाईने त्यांना कार्यालयात घेऊन गेलो. कार्यालयातील सर्वजण त्यांच्याकडे पाहायला लागले. सभागृहाचे प्रवेशद्वार बंद होण्याआधी त्यांना आतमध्ये नेलं. शनिवार असल्याने खूप गर्दी होती. सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या त्यामुळे ४५ मिनिटे त्यांना उभे राहून चर्चासत्राचा समारंभ पहावा लागला. 


श्री. रोहन कपूर यांना बसायला सुद्धा न मिळाल्याने श्री. राजेश खैतवास थोडेसे नाराज झाले होते. दुपारी बरोबर दोन वाजता चर्चासत्राचा समारोप झाल्यावर श्री. रोहन कपूर बाहेर आले. आता त्यांना फक्त स्लीपिंग सिस्टीमबद्दलची माहिती द्यायची होती. परंतु त्यांना आणखी कुठेतरी बाहेर कामाला जाण्याची घाई असल्यामुळे विनंती करून त्यांच्याकडून फक्त दहा मिनिटे वेळ मागून घेतला. मग माहीमच्या कार्यालयातील पेटरेसिया नावाच्या वरिष्ठ अधिकरीने श्री. रोहन कपूर यांना कंपनीच्या उत्पादनाची (प्रॉडक्टची) आरोग्यविषयक संपूर्ण व सविस्तर माहिती दिली. कॉफी पित त्यांनी सर्वकाही शांतपणे ऐकून घेतले. 'स्लीपिंग सिस्टीम आवडली, घरी जाऊन कळवतो' असे सांगून ते जायला निघाले. मी आणि राजेश त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला गेलो. मग त्यांनी आमचा निरोप घेतला. ते येऊन गेले व त्यांना स्लीपिंग सिस्टीम आवडली या दोन्ही गोष्टींमुळे आम्हाला समाधान वाटले.

नंतर आम्ही श्री. महिंद्र कपूर यांच्याकडून निरोप येण्याची वाट पाहत होतो. परंतु त्यांच्याकडून काही निरोप आला नाही. मग मी राजेशला त्यांना संपर्क करण्यास सांगितले. राजेशच्या वडिलांचे श्री. महेंद्र कपूर यांच्याशी घरगुती संबंध होते. काही दिवस वाट पाहून राजेशच्या वडिलांनी श्री. महेंद्र कपूर यांच्याशी संपर्क साधला. स्लीपिंग सिस्टीमबद्दल अधिक माहिती देण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला भेटण्यास इच्छुक असल्याचे त्यांना कळविले. त्यांनी भेटीस होकार दिला. एक दोन वेळा तारीख ठरवून सुद्धा त्यांच्या कामाच्या व्याप्तीमुळे थेट भेट घेण्याचे बारगळले. अखेर एका रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरी येण्याचा निरोप मिळाला. त्यांचा निरोप येताच आम्हाला खूप आनंद झाला.

श्री. महिंद्र कपूर यांच्याकडे कोणी कोणी जायचे? कसे जायचे? किती वाजता निघायचे? वगैरे सर्व ठरवायचे होते. खर तर जपान लाईफ व्यवहाराबाबत मी सविस्तर माहिती देऊ शकत होतो. परंतु फक्त आरोग्यविषयक माहिती द्यायची आणि ती सुद्धा एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर संवाद साधून हे मला थोडेसे कठीणच वाटत होते. माझे बंधू वेंकटेश अण्णांना सदर समस्या समजावून सांगितली. त्यांनी आमच्याबरोबर येण्याचे कबुल केले. वेंकटेश अण्णा जोगेश्वरीच्या इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषय शिकवायचे. त्यांना स्लीपिंग सिस्टीमबद्दलची सर्व माहिती होती. त्यांनी स्वतः डबल सिस्टीम घेतली होती. श्री. महिंद्र कपूर यांच्या घरी जाणे आणि त्यांना आरोग्यविषयी माहिती देणे ही गोष्ट वेंकटेश अण्णांना फार आवडली. राजेशकडे स्वतःची गाडी होती. मी, वेंकटेश अण्णा, राजेश व त्यांचे वडील असे चौघांनी जायचे ठरले. 

रविवारी सकाळी आठच्या सुमारास आम्ही चौघेजण गाडीने निघालो. अकरा वाजेपर्यंत त्यांच्या घरी पोहचायचे होते. ते वांद्रे येथे राहत होते. रविवारी रहदारी कमी असल्याने अवघ्या दोन तासात आम्ही त्यांच्या घरी पोहचलो. दरवाज्यावरील सुरक्षा रक्षकाने विचारपूस करून आम्हाला आत सोडले. त्यांचे घर आलिशान होते. मनोज कुमार यांच्या उपकार या गाजलेल्या चित्रपटातील 'मेरे देश की धरती सोना उगले...' हे अजरामर गीत माझ्या डोळ्यासमोर आले. आज मी त्या गीताचे गायक श्री. महिंद्र कपूर यांना प्रत्यक्ष 'याची देही याची डोळा' पाहत होतो. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी त्यांना पाहून गप्पगार झालो. एरवी मी खूप बोलणारा परंतु यावेळी माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हते. माझी अवस्था मिर्झा गालीबच्या शेरप्रमाणे झाली होती. '...कभी हम उनको देखते, तो कभी उनके अंदाज को'... राजेशच्या वडिलांनी आमचा परिचय करून दिला. वेंकटेश अण्णांनी बरोबर आणलेले पुस्तक त्यांना भेट देऊन मग बोलायला सुरुवात केली. इतक्यात आम्हां सर्वांसाठी नाष्टा आला. नाष्टा करताना गप्पा मारल्या. मी वाचनालय चालवतो व वेंकटेश अण्णा अर्थशास्त्र शिकवतात हे कळल्यावर श्री. महेंद्र कपूर यांनी आम्हा दोघांचे कौतुक केले. 



मग त्यांनी स्लीपिंग सिस्टीमबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेतली. त्यांना ती आवडली होती. राजेशच्या वडिलांकडे निरोप देतो असं ते म्हणाले. रविवार असल्याने दुपारी जेवून त्यांना एका कार्यक्रमाला जायचे होते. श्री. महेंद्र कपूर यांच्या सोबत दोन चार फोटो काढले. नंतर त्यांचा निरोप घेऊन आम्ही चौघेजण डोंबिवलीला निघालो. जपान लाईफमुळे मला श्री. महेंद्र कपूर यांच्यासारख्या एका थोर कलाकाराच्या घरी जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी एक अलभ्य लाभ होता......



Friday, August 28, 2020

माझ्या वाचनालयातील विश्वासू व प्रामाणिक कर्मचारी मंडळी...

'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' हे सहकाराचे तत्व मानवाच्या सामाजिक जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होते. या सहकाराच्या तत्वानुसार काम करणारे विश्वासू व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी जेव्हा व्यवसाय करताना भेटतात तेव्हा ते प्रामाणिक कर्मचारी हाच त्या व्यावसायिकाचा खरा नफा ठरत असतो. माझ्या गैरहजेरीत अजय वाचनालय सांभाळायला लागला होता. अजयबरोबर शुभांगी नावाची एक मुलगी सुद्धा होती. वाचनालयाच्या सभासदांबरोबर कसं वागायचं? कसं बोलायचं? कोणाला कोणती पुस्तके द्यायची? वगैरे सर्व मी त्यांना शिकवले होते. त्या दोघांची सभासदांबरोबर चांगली वर्तणुक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे वादविवाद होत नसत. वाचनालयाच्या सभासदांना पाहिजे ते पुस्तक वेळेवर मिळाले की ते खुश होत असत. खर तर वाचनालय जेव्हा सुरू झाले तेव्हा प्रारंभीच्या काळात वाचनालयासाठी कडक कायदे, कानून वगैरे असं काही नव्हतेच. नियम व अटी सुद्धा मर्यादित होत्या. पुस्तक परत करताना उशीर झाला तरी त्यासाठी विलंब शुल्क आकारले जात नसे. एखाद्यावेळी पुस्तक घरी राहिले तरी सुद्धा दुसरे पुस्तक घेऊन जायला परवानगी दिली जात असे. त्यासाठी कधी वेगळे शुल्क आकारले गेले नाही. पुस्तक बरोबर आणले नाही म्हणून सभासदाला परत माघारी पाठवले असं कधी झाल्याचे निदान मला तरी आठवत नाही. या सर्व गोष्टी सभासदांना आवडत असत. एकूणच काय तर त्यावेळी वाचनालयामध्ये खेळी मेळीचं वातावरण होते. 

पुढे दिवसागणिक सभासद संख्या वाढत गेल्याने मेजवरील (टेबलावरील) फाईल्सची संख्या सुद्धा वाढत गेली. वाचनालयात बसायला फक्त दोन खुर्च्या व दोन मेज (टेबल) असल्यामुळे तिसरा माणूस आला की त्याला उभे रहावे लागायचे. वाचनालयाच्या बहुसंख्य जागेमध्ये व कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पुस्तकांची मांडणी केली होती. एकदा मी मुंबईहून येताना सचिन तेंडुलकरचे चांगले मोठे छायाचित्र (पोस्टर) घेऊन आलो. वाचनालयात जिथे आम्ही बसायचो तिथे पाठीमागे ते छायाचित्र (पोस्टर) लावले. बाहेरून जाणारे येणारे सर्वजण त्या छायाचित्राकडे बघायचे. सर्वांना ते खूप आवडले. काही जणांनी विकत घेण्यासाठी चौकशी सुद्धा केली. मी विचार केला की जर हे छायाचित्र विकले तर त्या रिकाम्या जागेवर आपल्याला परत दुसरे छायाचित्र लावता येईल. दर आठवड्याला ते बदलता येईल. मग सचीनचे ते छायाचित्र मी विकायचे ठरवले. वीस रूपयाला विकत घेतलेले छायाचित्र वीस रूपयालाच विकले. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना नवीन छायाचित्र दिसायला लागले. बाहेरून जाणारे काही जण छायाचित्र बघण्यासाठी वाचनालयाच्या आत प्रवेश करू लागले. त्यानंतर मग आम्ही दर आठ दिवसांनी नवीन छायाचित्र लावायला सुरुवात केली. जुही चावला, मधुबाला, कपिल देव अश्या नामवंत चित्रपट कलाकार व क्रिकेटपटुंची छायाचित्रे लावायला सुरुवात केली. ती सर्व छायाचित्रे विकली सुद्धा जायची. त्यामध्ये मधुबालाचे कृष्णधवल छायाचित्र सर्वात जास्त वेळा विकले गेले होते. एवढ्या छोट्याश्या एका निर्णयामुळे वाचनालयच्या सभासदांची संख्या वाढायला लागली.

वाढत्या सभासद संख्येबरोबरच मासिकांच्या मागणीत सुद्धा वाढ झाली होती. मी जपान लाईफच्या ठाणे कार्यालयात जात असल्यामुळे मला मासिके आणायला उशीर होत असे. त्यामुळे अधून मधून अजय मासिके आणत असे. रोज मासिके आणणे त्याला जमत नव्हते. त्यासाठी कोणाची तरी नियुक्ती करावी या विचारात मी होतो. अजय म्हणाला होता की 'त्याच्या मानलेल्या मामाची कंपनी बंद झाल्याने ते सध्या घरीच आहेत व त्यांना कामाची गरज आहे.' अजय डोंबिवलीच्या पश्चिमेकडील गरिबाचा वाडा या विभागात राहायचा. त्याचे मामा सुद्धा त्याच्या बाजूलाच राहायचे. अजयतर्फे निरोप पाठवून एक दिवस त्यांना वाचनालयात बोलावून घेतले.

श्री. सुनील वडके(मामा)

अजयने त्याच्या मामांबद्दलची सर्व माहिती मला अगोदरच दिली होती. त्यांचे नांव श्री. सुनील वडके. प्रसाद व पूजा ही दोन मुले व पत्नी असे चार जणांचे त्यांचे कुटुंब होते. ते मुंबईतील एका मोठ्या कंपनीत कामाला होते. कंपनी बंद झाल्यामुळे ते काही दिवस घरीच होते. ते कामाच्या शोधात होते. अजयला सुद्धा त्यांनी काम शोधण्याबाबत सांगून ठेवले होते. उंची अंदाजे सव्वा पाच फूट, कुरळे केस, वय साधारणतः चाळीशीच्या आसपास असलेले असे हे श्री. सुनिल वडके एके रविवारी मी वाचनालयात असताना मला भेटायला आले. वाचनालयात बसायला जागा नसल्याने उभे राहूनच मी त्यांना काही प्रश्न विचारले. मग त्यांना कामाचे स्वरूप, कामाच्या वेळा, सुट्टी आणि पगार सर्वकाही समजावून सांगितले. विचार करून त्यानुसार अजयतर्फे निरोप पाठवतो असे सांगून ते निघून गेले.

मला खरोखरच एका चांगल्या प्रामाणिक माणसाची गरज होती. मुंबईहून मासिके आणायचे काम जवाबदारीचे व जिकरीचे होते. रोज रेल्वेचा प्रवास त्यात परत येताना बरोबर मासिकांचे ओझे वरून पैश्यांच्या व्यवहाराची जवाबदारी इत्यादी बरोबरच कुठली मासिके कधी येतात? ती कुणाकडे मिळतात? त्यांची छापील किंमत किती असते? त्यावर सुट किती मिळते? वगैरे सर्व काही लक्षात सुद्धा ठेवायला लागायचे. कधी कधी पैसे देताना घेताना कमी जास्त होण्याची शक्यता असायची. पैसे नीट हाताळायला लागायचे. हे सर्व व्यवहार नीट सांभाळणे गरजेचे होते. त्यासाठी अनुभवी, प्रामाणिक व जवाबदारीने काम करणाऱ्या माणसाची मला खूप गरज होती.

वाचनालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली तर त्यांना वेळेवर पगार देणे मला भागच होते. मग त्यांना पगार देणे आपल्याला झेपेल का? हा विचार सुद्धा कधी कधी माझ्या मनात यायचा. श्री. सुनील वडके यांची दोन्ही मुले लहान होती. दोघांचे शालेय शिक्षण चालू होते. मी देईन त्या पगारात त्यांचे घर चालेल का? ते माझ्याकडे कामावर रूजु होतील का? समजा त्यांनी नकार दिला तर दुसरे कोणीतरी मला शोधायला लागणार होते. हे सर्व विचार चालू असतानाच काही दिवसांनी (एप्रिल १९९९) अजयच्या मानलेल्या मामांनी म्हणजे श्री. सुनील वडके यांनी अजयकडून निरोप पाठवला की ते कामावर रुजू होऊ इच्छितात. अजय त्यांना मामा या नावाने हाक मारायचा त्यामुळे श्री. सुनील वडके यांना नंतर वाचनालयातील सर्व कर्मचारी मामा या टोपण नावानेच हाक मारायला लागले.

आता मामा नियमितपणे कामावर यायला लागले होते. ते वेळेच्या बाबतीत खूप काळजी घ्यायचे. सकाळी साडेसात वाजता वाचनालय उघडायचे. वाचनालयाच्या साफसफाईची जवाबदारी त्यांनी स्वतःहूनच घेतली होती. बाजूला पिठाची चक्की असल्यामुळे वाचनालयात धुळीपेक्षा पीठकण खूप जमा होत असत. पुस्तकांवर पीठकण बसत असल्यामुळे पुस्तके वारंवार साफ करायला लागायची. अजय साफसफाई करायचाच परंतु मामा आल्यामुळे त्या कामाला मामांचा सुद्धा हातभार लागून पुस्तके स्वच्छ व नीटनेटकी दिसायला लागली. खर तर मामांना ज्या कामासाठी नियुक्त केले होते ते महत्वाचे काम म्हणजे मुंबईतील पुस्तक बाजारातून मासिके आणणे हे काम मला त्यांना एकदा दाखवायचे होते. मला वेळच मिळत नसल्याने शेवटी एकदा त्यांना एकट्यानेच मासिके आणायला पाठवले. त्यांना अगोदर मी थोडेफार समजावून सांगितलेले होतेच. त्याप्रमाणे मामा मुंबईच्या पुस्तक बाजारात गेले. तिथे गेल्यावर त्यांनी सर्वांशी ओळख करून घेतली व सांगितलेली सर्व मासिके व्यवस्थित आणली. त्या दिवसापासून मासिके आणायची संपुर्ण जवाबदारी मामांकडे गेली.

डोंबिवलीतील बहुसंख्य वाचनालये आपली पुस्तके प्रभाकर कोठावळे यांच्याकडे पुनर्बांधणीसाठी (बाईंडिंगसाठी) देत असत. ते पुस्तकांना पुठ्ठा लावून पुस्तकांची पुनर्बांधणी (बाईंडिंग) करायचे. त्यामुळे पुस्तके जास्त काळ टिकायची परंतु त्यामुळे काही तोटे सुद्धा होत असत. पुस्तकाचे वजन वाढायचे, पावसात पुस्तक भिजले की पुठ्ठ्यामुळे त्यांची जाडी वाढायची. मी हे सर्व बदलून टाकले. आमच्या वाचनालयात नवीन पुस्तके आली की त्यांना प्रत्येकाला क्रमांक दिला जायचा. एका नोंदवहीमध्ये (रजिस्टरमध्ये) त्या पुस्तकांची तपशीलवार नोंद केली जायची. पुस्तकाचे नांव, लेखक आणि त्याची किंमत हे सर्व तपशील त्या नोंदवहीमध्ये (रजिस्टरमध्ये) नोंदविल्यावर त्या पुस्तकांना शिवून पुठ्ठा लावण्याऐवजी प्लॅस्टिकचे अच्छादन (कव्हर) लावायला आम्ही सुरुवात केली. ज्या जुन्या पुस्तकांची प्लास्टिकची अच्छादने खराब झाली असतील त्यांना नवीन प्लास्टिकची अच्छादने घातली जाऊ लागली. ही सर्व कामे अजय आणि मामांना मी शिकवली. काही दिवसातच मामांनी सर्व कामे शिकून घेतली. सर्व सभासदांबरोबरच्या चांगल्या वर्तणुकीमुळे ते सर्वांचे लाडके मामा बनले. 

कोणतीही इमारत उभी करण्यासाठी इमारतीचा पाया भक्कम असावा लागतो. फ्रेंड्स लायब्ररीची लोकप्रियता वाढत होती. यामध्ये अजयचे खूप मोठे योगदान होते. आता अजयबरोबर मामा सुद्धा त्यात सहभागी झाल्याने फ्रेंड्स लायब्ररीचा पाया अधिकच मजबूत झाला होता. व्यवसायवृद्धीसाठी पुरक अशी प्रामाणिक, विश्वासू व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी मंडळी मला मिळाल्यामुळे फ्रेंड्स लायब्ररीचे नांव एका समृद्ध वाचनालयाच्या दिशेने वेगाने घोडदौड करू लागले होते.....

Wednesday, August 26, 2020

माझा बेंगळुरू शहरातील एक आठवडा...

 'जसा देश तसा वेष' असं जरी असले तरी माझा बेंगरूळु दौरा प्रामुख्याने व्यवसाय वृद्धीसाठी असल्याने मी नेहमीचाच कार्यालयीन पेहराव घालून म्हणजे काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शुभ्र शर्ट, गळ्यात लाल रंगाची टाय, पायात काळे बुट व बरोबर आणलेली बॅग घेऊन बेंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयाकडे निघालो. बेंगरूळुच्या राजाजीनगर मधील डॉक्टर राजकुमार रस्त्यापासून आमच्या कंपनीचे कार्यालय खूप लांब होते. बस सेवा उपलब्ध होती परंतु मला कोणत्या बस थांब्यावरून कोणती बस पकडायची याची माहिती नव्हती. रिक्षावाल्याला विचारल्यावर त्याने रुपये पन्नास भाडे सांगितले. शेवटी नाईलाजाने रिक्षेत बसलो. बेंगळुरूमधील रिचमंड सर्कलजवळ आमच्या कंपनीचे कार्यालय होते. मला कन्नड येत असल्याने वाटेत रिक्षावाल्याशी गप्पा मारत होतो. तिकडे मुंबईसारखी उपनगरीय रेल्वेसेवा नसल्याने लोकांना वाहनाने प्रवास करणे हा एकमेव पर्याय होता व त्यामुळे बेंगळुरूमधील बहुतेक करून सर्वांकडे दुचाकीसारखी वाहने होती. रिक्षेतून कार्यालयाकडे जाताना रस्त्यात दुचाकी वाहनांचा जणूकाही समुद्र भरला आहे असं वाटत होते. सकाळी कार्यालयात जाणाऱ्या लोकांची संख्या भरपुर असल्याने रहदारी खोळंबत होती. परिणामतः रिक्षेवाल्याला वाटेत खूप वेळा रिक्षा थांबवावी लागली. वास्तविक पाहता राजाजीनगर ते रिचमंड सर्कल हे फक्त दोन किलोमीटर इतकेच अंतर होते. परंतु तरी सुद्धा रिक्षाने तिकडे पोहचायला मला अर्धा तास लागला. रिचमंड सर्कल हा भाग मुंबईतील नरिमन पॉईंटसारखा चकाचक होता. मोठ मोठ्या काचेच्या इमारती होत्या. अश्या झगमगीत भागात आमच्या कंपनीचे कार्यालय असल्याचा मला अभिमान वाटला.


रिचमंड सर्कल, बेंगळुरू.

एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेले आमच्या कंपनीचे कार्यालय छोटे परंतु छान होते. आतमध्ये मोजकीच माणसे चर्चा करत बसली होती. मी थेट व्यवस्थापकांच्या (मॅनेजरच्या) दालनात शिरलो. मचाडो नावाची एक ख्रिश्चन व्यक्ती तिकडे कार्यकारी प्रभारी (इनचार्ज) पदावर होती. मी माझी ओळख करून दिली. कार्यालयात कन्नड येणारी एक वरिष्ठ व्यक्ती आल्याने त्यांना खूप समाधान वाटले. दुपारी एक वाजता चर्चासत्र होते. हळूहळू लोक यायला सुरूवात झाली. मला ठाणे कार्यालयाची सवय होती. ठाणे कार्यालयात नेहमी लोकांची वर्दळ असायची. बेंगरूळुचे कार्यालय नवीन असल्यामुळे इथे फक्त दहा-वीस माणसे जमत होती. परंतु त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे मला आलेल्या प्रत्येकाकडे जातीने लक्ष देणे शक्य होणार होते. कार्यालयाच्या सभागृहात कमी लोक असल्याने मी सुद्धा खूप दिवसांनी वसंत पंडित यांची चित्रफित (व्हिडिओ) निवांतपणे पाहू शकलो. ज्यांना इंग्रजी समजत नव्हते त्या सर्वांना मी कन्नडमध्ये कंपनी आणि स्लिपींग सिस्टिमबद्दल पूर्ण माहिती दिली. आलेले पाहुणे निघून गेल्यावर तिथल्या सभासदांना मी माझे अनुभव सांगितले. संध्याकाळी सहाच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडलो.

श्री. पी. आर. नायक यांनी त्यांच्याकडेच राहायला सांगितले होते. मला उगाचंच कोणाला त्रास देणे आवडत नसे आणि त्यात हा तर सात दिवसांचा रहीवास होता. मी दिवसाचे कामकाज संपल्यावर संध्याकाळी माझी बॅग घेऊन बेंगळुरू कार्यालयातून बाहेर पडलो. आता माझ्याकडे वेळच वेळ होता. मला एखादे मस्त व स्वस्त राहण्याचे ठिकाण शोधायचे होते. बेंगळुरूला बी.व्ही.के. अय्यंगार मार्गावर स्वस्त दरात खोली मिळते असे मी ऐकले होते म्हणून कार्यालयाच्या बाहेरून रिक्षा करून बी.व्ही.के. अय्यंगार मार्गावर पोहोचलो. त्या मार्गावर कपड्यांची आणि इलेक्ट्रॉनिक्सची बरीच दुकाने होती. बहुसंख्य व्यापारी गुजराती होते परंतु सर्वांना कन्नड बोलता येत होते. कदाचित ते खूप आधीपासूनच तिकडे स्थायिक झाले असतील किंवा त्यांचा जन्म तिकडेच झाला असेल. सर्व वस्तू मुंबईपेक्षा स्वस्त होत्या. मी खोलीच्या (लॉजच्या) शोधात हिंडत होतो. दोन चार ठिकाणी चौकशी केल्यावर शेवटी एक विश्रामधाम (लॉज) पसंत पडले. नांव आठवत नाही परंतु स्वस्त आणि मस्त लॉज होती. छोटीशी एकच खोली, त्यात एक पलंग, दोन खुर्च्या, एक मेज (टेबल) व त्या मेजवर ठेवलेला छोटा रंगीत दूरदर्शन संच होता. त्या खोलीचे एका दिवसाचे भाडे रुपये १२०/- इतके होते. तीन दिवसांची आगाऊ (Advance) रक्कम भरून खोली आरक्षित केली. हे सर्व आटपता आटपता रात्रीचे सुमारे आठ वाजले असतील. 

बी वि के अय्यंगार रोड  

लॉजमधील जेवण महाग होते. खोली ताब्यात घेतल्यावर कपडे बदलून बाहेर पडलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुष्कळ गर्दी होती. सकाळी बेंगळुरूला पोहचल्यावर घाईगडबडीत सुमनला एकदाच दूरध्वनीवरून संपर्क केला होता. आता माझ्याकडे पुरेसा वेळ होता. मी भ्रमणध्वनी (मोबाईल) बरोबर नेला होता परंतु त्यातील सिमकार्ड तिकडे चालत नव्हते. दुसरे सिमकार्ड मी घेतले नाही. आधी सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्र (पी. सि.ओ.) गाठले व घरी दूरध्वनी करून प्रवासाबद्दल आणि कार्यालयीन अनुभवांची सविस्तर माहिती दिली. संतोषची खबरबात जाणून घेऊन मग वाचनालयातील कामकाजाचा चौकशीवजा आढावा घेतला. आता पोटपुजेसाठी उपहारगृह शोधायचे बाकी राहीले होते. बी.व्ही.के. अय्यंगार मार्गावरून केम्पे गौडा सर्कल म्हणजे मॅजेस्टिक हे ठिकाण अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होते. मॅजेस्टिक हे बेंगळुरूमधील सर्वात मोठे बसस्थानक होते. कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तिथून बससेवा उपलब्ध होती. आजूबाजूला दुकानबाजार (मार्केट) होता. तिकडे एकाच रस्त्यावर सहा ते सात चित्रपटगृहे होती. चित्रपटगृहाच्या बाहेर तिथे सुरू असलेल्या चित्रपटातील नायकाच्या भव्य प्रतिमेला (कटआऊटला) तेवढाच मोठा फुलांचा हार घालून त्यावर विद्युत दिपमाळांची रोषणाई केलेली मी पाहिली. मी असे ऐकले की शनिवार, रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कोणताही चित्रपट असला तरी त्याचे तिकीट काळ्याबाजारात विकत घ्यावे लागते. लोकांना चित्रपटाचे कमालीचे वेड होते. 

मी उपहारगृहाच्या शोधात असताना थोडे फिरल्यावर एके ठिकाणी माश्याचे चित्र असलेला फलक लांबूनच नजरेस पडला. जवळ जाऊन पाहिल्यावर समजले की ते करावळी नावाचे उपहारगृह आहे. मग आत जाऊन फिश थाळी मागवली. फिश थाळी मस्तच होती. जेवणानंतर समजले की त्या उपहारगृहाचे मालक कुंदापूरचे राहणारे होते. गावाकडची व्यक्ती भेटल्यावर मग काय बघायलाच नको. बेंगळुरूचे कन्नड आणि कुंदापूरचे कन्नड यामध्ये खूप फरक होता. त्यांच्याशी कुंदापूर कन्नडमध्ये गप्पा मारल्या. मग विश्रामधामाकडे (लॉजवर) परतलो. थोडावेळ टिव्ही पहिला. मग झोपून गेलो.

सकाळी लवकर जाग आली. मला अकरा वाजेपर्यंत कार्यालयात पोहचायचे होते. लॉजमधील मुलाकडून चहा मागवला. चहाबरोबर मारी बिस्किटे खल्ल्यावर सकाळचे नित्य कार्यक्रम आवरून नाष्ट्यासाठी बाहेर पडलो. सकाळचे आठ वाजले तरी सर्व दुकाने बंद होती. पुढे काही अंतरावर नाष्टा मिळेल अशी माहिती तिथे थोडी चौकशी केल्यावर मिळाली. बेंगळुरूमध्ये मस्त 'सेट डोसा' मिळतो असे ऐकले होते. तसे उपहारगृह शोधून काढून 'सेट डोसाची' फर्माईश (ऑर्डर) केली. 'सेट डोसा' म्हणजे चटणी सांबार बरोबर छोट्या आकाराचे तीन डोसे मिळतात. ते सुद्धा फक्त पंधरा रुपयात. 'सेट डोसा' खाऊन निघालो. वाटेत एक एक करून दुकाने उघडायला लागलेली दिसत होती. तिकडची लोकं आरामात उठत असत. आपल्या मुंबई सारखे भल्या पहाटेपासून सुरू होणारे धावपळीचे जीवन नव्हते. सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्र (पी.सी.ओ.) शोधून घरी दूरध्वनी केला. सुमनला रात्री ते सकाळपर्यंतची सर्व बितंबातमी दिली. संतोषची ख्यालीखुशाली विचारली. सुमनने पत्नी या नात्याने अधिकारवाणीने मला वेळेवर जेवायला व धावपळ कमी करायला आग्रहपुर्वक सांगितले. धर्मपत्नीने हक्काने दिलेल्या सल्ल्यांना निव्वळ होकार देणे मला भागच होते. 

मॅजेस्टिक बस स्टेशन, बेंगळुरू.

सर्व आवरून सकाळी दहा वाजता कंपनीच्या कार्यालयाकडे निघालो. अकरा वाजेपर्यंत कार्यालयात पोहचायचे होते. माझ्याकडे एक तास होता म्हणून चालत जायचे ठरवले. चार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या कार्यालयात चालत पोहचायला जेमतेम अर्धा तास लागणार होता. परत चालत जाण्याच्या इतर फायद्यांबरोबर माझा आणखी एक फायदा झाला. वाटेत दिसणारे बेंगळुरू शहर मला व्यवस्थित पाहायला मिळाले. छोटी मोठी मंदिर बघायला मिळाली. ऊन असले तरी झाडांमुळे चालताना गर्मी जाणवत नव्हती. वाटेत खूप रहदारी सुद्धा अडवायची. तरी सुद्धा साडेदहापर्यंत कंपनीच्या कार्यालयात पोहोचलो. तेथील सभासदांना माझे कंपनी बरोबरचे व्यवसायिक अनुभव कन्नडमधून सांगताना बरं वाटत होते. माझ्यामुळे चार पाच दिवसात कार्यालयात लोकांची वर्दळ वाढायला लागली. शुक्रवारपर्यंत माझा हाच दिनक्रम होता. शनिवारी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघायचं होते म्हणून शुक्रवारी संध्याकाळीच संतोषसाठी काही खेळणी आणि सुमनसाठी साडी खरेदी केली. शनिवारचे रेल्वेचे तिकिट न मिळाल्याने बसचे तिकिट काढले. शनिवारी सकाळीच खोली रिकामी करून बॅग घेऊन कार्यालयात गेलो. शनिवारी काही लोकांना सुट्टी असल्यामुळे कार्यालयात चांगली गर्दी जमली होती. आलेल्या बहुतेक लोकांशी संवाद साधून कार्यालयातून बाहेर पडलो. संध्याकाळी सात वाजता व्हिआरएलच्या खाजगी बसने मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो.....

Monday, August 24, 2020

कल्याण ते बेंगळुरू जाताना "उद्यान एक्सप्रेस" मधील २४ तास....

'पोटासाठी दाही दिशा' या वाक्याप्रमाणे 'व्यवसायासाठी दाही दिशा' असं म्हणायची पाळी बर्‍याचवेळा व्यवसायवृद्धीच्या वेळी येते. जपान लाईफ कंपनीच्या ठाणे येथील कार्यालयात जायला सुरुवात केल्यापासून माझ्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये बराच बदल झाला होता. आता वाचनालयाऐवजी मी जपान लाईफच्या व्यवसायामध्ये जास्त गुंतत चाललो होतो. त्यामुळे उत्पन्नही वाढत होते. माझ्या सभासदांची संख्या तसेच कार्यालयात येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत चालली होती. त्या सर्वांना नीट मार्गदर्शन करणे हे माझे कर्तव्य होते. कार्यालयात आलेल्या नवख्या मंडळींना कंपनी आणि स्लीपिंग सिस्टीमची पूर्ण व व्यवस्थित माहिती द्यायला लागायची. सकाळी दहाच्या सुमारास घरून डबा घेऊन निघायचो. डबा नसेल त्या दिवशी बाहेर उपहारगृहात जेवण करायचो. कार्यालयातून परत घरी येताना संध्याकाळचे सात-आठ वाजायचे. मग संध्याकाळी एक तास वाचनालयात जाऊन बसायचो. दिवसभर काहीना काही काम असायचेच.

आमच्या कंपनीची भारतातील तीन कार्यालये दिल्ली, मुंबई व ठाणे येथे होती. दिल्ली शाखेचे कार्यालय कालकाजी येथे तर मुंबईचे नरिमन पॉइंटला व ठाण्याचे कार्यालय देवप्रयाग येथे होते. मी ठाण्याच्या कार्यालयात जायचो. सन १९९९ च्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीचे चौथे कार्यालय कर्नाटकातील बंगलोर म्हणजे आताचे बेंगळुरू येथे उघण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. माझी बरीच नातेवाईक आणि परिचित मंडळी बेंगळुरू येथील रहीवाशी असल्याने मला तेथिल कंपनीच्या नविन शाखा कार्यालयाचा फायदा होणार होता. कानावर पडणार्‍या चर्चेनुसार खरोखरच फेब्रुवारी महीन्यात बेंगरूळुचे कार्यालय सुरू करण्यात आले. बेंगळुरू कार्यालयात येणारी लोकं जास्त करून इंग्रजीमध्ये बोलायची. पण काही लोकांना कन्नडमध्ये समजावून सांगायला लागायचे. माझे वरिष्ठ विक्रम आणि विनायक यांनी मला बेंगळुरू शाखेबद्दल विचार करायला सांगितले. मी जर तिकडे गेलो तर माझी सभासद संख्या आणखी वाढणार होती. मी बेंगळुरूला जायची तयारी दर्शवली. ठाण्याहून इतर काही लोक सुद्धा बेंगळुरूला जाण्यासाठी तयार झाले.

मुंबईच्या कार्यालयात बेंगळुरूला जाणाऱ्यांची सभा बोलावली होती. त्यासाठी मला मुंबईच्या कार्यालयात जावे लागले. सभेत कोण कोण जाणार व किती दिवस राहणार याची चौकशी करून त्याची नोंद केली गेली. मी फक्त आठ दिवस तिथे राहणार असल्याचे सांगितले. मुंबईच्या कार्यालयातील सभासद जास्त करून इंग्रजीमध्ये बोलायचे. सर्व श्रीमंत घरातील वाटत होते. मी त्यांच्याशी मराठी किंवा हिंदीतून बोलायचो. तसेही मला भाषेशी काही देणं घेणं नव्हते. समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे समजण्याशी मला मतलब होता. त्या दिवशी मुंबईच्या कार्यालयात संजय बांगर आणि विश्वास वालावलकर या दोन क्रिकेटपटुशी भेट झाली. संजय बांगर यांची नंतर भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये सुद्धा निवड झाली होती. मला त्याचा खूप अभिमान वाटायचा.

मला आता बेंगळुरूला जायची तयारी करायची होती. वाचनालयातील कर्मचार्‍यांना तसे कळवून आठ दिवसांच्या माझ्या अनुपस्थितीत करावयाची सर्व कामे त्यांना समजावून सांगितली. सुमनला कसेबसे समजावले. आठ दिवसांच्या दौर्‍यासाठी कपडे व इतर सामानाची तयारी केली. कल्याण स्थानकावरून बेंगळुरूला जाणाऱ्या रेल्वेगाडीचे तिकीट काढले. तिकीट रविवारचे असल्याने रविवारी सकाळी निघालो की सोमवारी पहाटे बेंगरूळुला पोहचणार होतो. बेंगळुरूला माझे नातेवाईक व परिचित बरेच असले तरी कोणाच्या घरी थांबणे मला आवडत नसे. परंतु मित्राने आग्रह केला. त्याचे परिचित श्री. पी. आर. नायक हे बेंगळुरूला बँकेत कामाला होते. त्यांच्याकडे उतरून ताजातवाना होऊन बेंगळुरूच्या कार्यालयात जाण्यास मित्राने सांगितले. त्याच्या आग्रहामुळे मी होकार दिला. रविवारी सकाळी नऊ वाजता कल्याण बेंगरूळु उद्यान एक्सप्रेस गाडी सुटणार होती म्हणून आठ वाजता घरून निघालो.

गाडी अर्धा तास उशिरा आली. गाडीमध्ये जास्ती करून नुकतीच कामाला लागलेली तरुण मुले आणि मुली होत्या. सर्व आपसात अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होते. कदाचित सर्व उच्च विद्याविभूषित असावीत. चांगल्या कंपनीतील कर्मचारी वाटत असल्याने त्यांचे कपडे, बॅग व बाकीच्या वस्तू भारी किंमतीच्या वाटत होत्या. कल्याण ते बेंगळुरू मधील अंतर ११०० किलोमीटर इतके होते. चोवीस तासांचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी बेंगळुरूला पोहचणार होतो. चोवीस तास गाडीमध्ये व्यतीत करायचे होते. माझ्यासोबत कोणीच नव्हते. मी एकटाच प्रवास करत असल्याने सगळा दिवस कसा काढायचा हा माझ्यापुढे यक्ष प्रश्न होता. मी सहप्रवासी असलेल्या मुलांना विनंती करून वरचा बर्थ मिळवला. माझी बॅग वर ठेवली व बरोबर आणलेली उशी काढली. सकाळी दहाच्या सुमारास मस्तपैकी झोपून गेलो. दुपारी एकच्या दरम्यान उठलो व जेवण मागवले. छानपैकी पोटभर जेवलो आणि थोड्यावेळाने परत एकदा दुपारची वामकुक्षी केली. खाली कोण काय करत आहे, कुठले स्थानक आले, गेले वगैरे काहीच पत्ता लागत नव्हता. परत संध्याकाळी उठलो व चहा नाष्टा केला. आता मात्र रात्र होईपर्यंत काही तास काढायचे होते. बॅगमधून स्वेटर काढले व ते घालून दरवाजात जाऊन बसलो. गाडी वेगाने धावत होती. संध्याकाळची वेळ होती. अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतं व त्या शेतात काम करणारी माणसे बघताना छान वाटत होते. मी त्या सर्वांना टाटा करत होतो. त्यातले काहीजण मला हात दाखवून प्रतिसाद देत होते. एखाद्या रेल्वे स्थानकात गाडी थांबली की मी लगेच खाली उतरून पाय मोकळे करायचो. बघता बघता सूर्य मावळला आणि अंधार पडू लागला. गाडीच्या दारात बसून सूर्य मावळतानाचे दृश्य पाहून मी स्वतःला विसरून गेलो. 


गेले दोन तीन तास पोटात काहीच नव्हते. गाडीतून प्रवास करताना काहीच काम नसल्याने सारखे काहीतरी खावेसे वाटायचे. त्यात परत खाण्याचे पदार्थ विकणारे सारखे ये जा करत होते. मी संयम पाळला. आठ वाजेपर्यंत काहीच खाल्लं नाही. थेट जेवण मागवले. जेवण झाल्यावर गाडीमध्येच थोडासा हिंडलो फिरलो व मग झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. दिवसभर झोपल्यामुळे रात्री झोप लागत नव्हती. इतर सहप्रवासी शांत झोपले होते. गाडी वेगाने धावत होती. आतमध्ये शांतता पसरलेली. फक्त पंख्याचा आवाज येत होता. घरची आठवण येत होती. संतोष दिवसभर मस्ती केल्याने रात्री लवकर झोपायचा. 'क्यूँ की साँस भी कभी बहू थी' मालिका बघून आई, मी, सुमन रात्री अकराच्या सुमारास झोपायचो. घरची आठवण येत असताना कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी सहाच्या सुमारास जाग आली. चहावाले किटली घेऊन 'चाय चाय' आवाज करत फिरत होते. चहा घेतला व बॅगमधून मारी बिस्किटे काढली. चहा बिस्किटे घेतल्यानंतर सकाळच्या नित्यनेमाला लागलो. अजुन सर्व झोपले होते त्यामुळे प्रसाधनकक्ष मोकळा होता. सुमनने टूथब्रश, पेस्ट, पावडर, फणी सर्व काही आठवणीने दिले होते. सात वाजता तयार होऊन बसलो. गाडी नऊ वाजता बेंगळुरूला पोहचली. मार्च महिना असून सुद्धा बाहेर थंडी जाणवत होती. स्थानकाबाहेर पडलो. ज्यांच्या घरी जाणार होतो ते श्री. पी.आर. नायक स्थानकाच्या बाहेर त्यांची दुचाकी घेऊन माझी वाट पाहत होते. त्यांच्या दुचाकीवर बसून त्यांच्या घरी पोहोचलो.


श्री. पी. आर. नायक हे डोंबिवलीत बँकेत कामाला होते. ते मंजुनाथ शाळेच्या बाजूला असलेल्या अश्वमेध सोसायटीमध्ये राहायचे. बँकेत कामाला असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांची बेंगळुरूला बदली झाली होती. दहा मिनिटांत आम्ही त्यांच्या घरी पोहचलो. त्यांचा बंगला होता. समोर छान फुलांचा छोटासा बगीचा होता. घर स्वछ ठेवलेलं होते. घरी पोहचल्यावर आंघोळ केली. आंघोळ करून बाहेर येताच नाष्टा तयार असल्याचे दिसले. गरम गरम रवा इडली त्याच बरोबर कडीपत्त्याची फोडणी घातलेली चटणी मस्त लागत होती. त्यांनी फक्त चार इडल्या दिल्या होत्या. अश्या चटणी बरोबर मी कमीत कमी दहा इडल्या तरी सहज खाल्या असत्या. परंतु करणार काय पाहुण्यांच्या घरी होतो ना. त्यांनी 'अजून हवी आहे का' असं विचारलेच नाही. मी चार इडल्या खावून स्वतःला समजावले व नाष्टा आटपून बेंगळुरूच्या नवीन कार्यालयात जायच्या तयारीला लागलो......

Saturday, August 22, 2020

सुमन आणि संतोष बरोबर १ जानेवारी १९९९ ला एलिफंटा गुफा सहल....

'घार उडते उंच उंच आकाशी, परी तिचे लक्ष झाडावरील घरट्यापाशी' या काव्यपंक्ती कुटुंबवत्सल माणसाच्या भावविश्वाला अनुसरूनच कवीने लिहील्या आहेत यात शंका नाही. दिनांक १६ डिसेंबर १९९८ रोजी माझा पहिला परदेश दौरा आटपून मी मुंबई विमानतळावर पोहचलो. मी हॉंगकॉंगहून चॉकलेटस् सोडून बाकी काहीच वस्तू बरोबर आणल्या नव्हत्या, त्यामुळे मला विमानतळावरून पटकन बाहेर येता आले. मुंबई विमानतळ ते घाटकोपर रिक्षा केली. मग उपनगरीय रेल्वेने डोंबिवलीला पोहचलो. हॉंगकॉंग आणि आपल्याकडे खूपच फरक जाणवत होता. तिकडचे रस्ते, बस सेवा, ट्रेन, माणसं, मोठ मोठे मॉल वगैरे सर्व वेगळेच होते. काही दिवसांसाठी फिरून येण्यास ठीक होते. परंतु दिर्घकाळ तिकडे रहायचे असते तर तिकडचे जेवणखाण व राहणीमान मला तरी मानवले नसते. शेवटी काही झाले तरी आपला देश तो आपलाच. सहा दिवसांनी डोंबिवली गाठल्यावर मला खूप आनंद झाला.

सन १९९२ला सुमनशी विवाह झाल्यानंतर सहा वर्षांनी प्रथमच सुमन आणि संतोषला सोडून दूर देशी गेलो होतो. साधारणतः संध्याकाळी सातच्या सुमारास घरी पोहोचल्यावर संतोषला आनंदाने कडकडून मिठी मारली व बरोबर आणलेल्या चॉकलेटस् त्याला दिल्या. सुमनला जवळ घेतलं आणि चहा ठेवायला सांगितला. सुमनच्या हातचा चहा खूप दिवस प्यायलो नव्हतो. सुमनने नाष्ट्याची तयारी केली होती म्हणुन मी आधी आंघोळ करून ताजातवाना झालो. एकदा वाचनालयात जाऊन मला तेथील कामकाजाचा आढावा घ्यायचा होता. सुमनने निरडोस्याची तयारी केली होती. त्या दिवशी मी कमीत कमी आठ निरडोसे खाल्ले असतील. सुमनच्या हातच्या निरडोसा, सांबारची चवच निराळी. नाष्टा उरकून तडक वाचनालयात गेलो. हॉंगकॉंगहून आणलेल्या चॉकलेटस सर्वांना वाटल्या. माझ्या गैरहजेरीत सुमन रोज वाचनालयात जात असे. गेल्या सहा दिवसांचा आढावा घेतल्यावर लक्षात आले की सर्व काही सुरळीत चालले होते. अजय सर्व व्यवस्थित सांभाळत असल्याने मी निश्चिंत झालो होतो. फक्त नवीन पुस्तके कोणती व किती मागवायची याकडे मला स्वतः जातीने लक्ष द्यायला लागायचे. वाचनालयातून नंतर फ्रेंड्स स्टोअर्समध्ये जाऊन अण्णांना सुद्धा भेटून आलो. दुसऱ्या दिवसांपासून परत कंपनीच्या ठाणे येथील कार्यालयात जायला सुरुवात केली. माझ्या हॉंगकॉंगमधील व्यवसायिक अनुभवांचे सर्वांसमोर सादरीकरण केले व प्रत्येकाला पुढील उद्दिष्टे गाठण्यासाठी तयार केले. 

माझ्या परदेश दौर्‍यामुळे माझी सहा दिवसांची घरातील उणीव सुमनला थोडेसे नाराज करण्यास पुरेशी होती म्हणून मी सुमनला आणि संतोषला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा बेत आखला. शेवटी आपण एवढी धावपळ कोणासाठी करतोय? आपल्या कुटुंबासाठीच ना? मग एक दिवस त्यांच्यासाठी द्यायलाच पाहिजे असं ठरवले. शुक्रवार दिनांक १ जानेवारी रोजी कंपनीचे कार्यालय बंद असल्याची सूचना मिळाली होती. मग एक जानेवारी हा संपुर्ण दिवस सुमन व संतोषसाठी राखून ठेवण्याचे मनात पक्के केले. त्यादिवशी मोबाईल, फोनकॉल वगैरे सर्व बंद असे ठरवले. मुंबईच्या जवळपास असलेल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जायचे ठरवले. लहानपणी मी इयत्ता सातवीत असताना एलिफंटा गुंफा पाहण्यासाठी सहलीला गेलो होतो. गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा गुंफा असा बोटीतून प्रवास केला होता. तेव्हा खूप मजा आली होती. सुमनला एक जानेवारी रोजी एलिफंटा गुंफा पहायला जायचे का असे विचारले. तिचा होकार मिळताच मला खूप समाधान वाटले. 

दिनांक १ जानेवारी १९९९ रोजी एलिफंटा येथे सहकुटुंब निघण्यासाठी सकाळी लवकर उठलो. सकाळची कामे उरकली. संतोष आणि सुमन तयार होईपर्यंत वाचनालयात जाऊन आलो. सकाळचा नाष्टा करून साडेआठ वाजता निघालो. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने नेहमीपेक्षा गाडीमध्ये गर्दी कमी होती. संतोषला ट्रेन मधून घेऊन जाणे खूप कठीण काम होते. संतोष एका जागेवर कधीच स्वस्थ बसत नसे. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येईपर्यंत त्याने खूप त्रास दिला. त्याचा राग यायचा पण तितकीच मजा सुद्धा वाटायची. गाडी जलद (फास्ट ट्रेन) असल्याने एका तासात मुंबईला पोहोचलो. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाबाहेर येऊन गेटवे ऑफ इंडियासाठी बस पकडली. संतोषची मस्ती सुरूच होती. बसमधून जाताना मी मासिक व पुस्तके जिथून घ्यायचो ते ठिकाण सुमनला दाखवले. दहा मिनिटांत आम्ही तिघे गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बस स्थानकावर उतरलो. बस नरिमन पॉईंटकडे जाणारी असल्याने ती पुढे निघून गेली. आम्ही तिघे चालत गेट ऑफ इंडियाच्या दिशेने निघालो. नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. दुपारचे अकरा वाजले असतील. ऊन खूप होते परंतु समुद्राच्या लाटांमुळे खूप वारा सुटला होता त्यामुळे गर्मी जाणवत नव्हती. डाव्या बाजूला एलिफंटा गुंफाला जाण्यासाठी तिकिट मिळत होते. मी तीन तिकिटे काढली.

आम्ही तिघेजण काही पायऱ्या खाली उतरून तिथे उभ्या असलेल्या बोटीत चढलो. संतोषला सांभाळणे कठीण काम होते. बोट अजूनही रिकामी होती त्यामुळे काही वेळ वाट बघायला लागली. पुरेसे प्रवासी जमल्यावर बोट एलिफंटा गुंफाच्या दिशेने निघाली. संतोषला पाण्यात हात घालायचा होता त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे होते. इतके दिवस गेट ऑफ इंडियावरून समुद्राकडे पाहायचो परंतु आज बोटीत बसल्यावर समुद्रातून मुंबई कशी दिसते हे प्रथमच पाहायला मिळत होते. मोठ मोठ्या इमारती दिसत होत्या. त्या सर्व विभागात मी फिरलेलो असल्याने बर्‍याच इमारती माझ्या परिचयाच्या होत्या. गेट ऑफ इंडिया ते मरिन ड्राईव्हपर्यंतची सर्व ठिकाणे सुंदर दिसत होती. समुद्रात छोट्या मोठ्या बोटी ये जा करीत होत्या. मध्येच दोन मोठाली जहाजे बघायला मिळाली. संतोषला ती जहाजे दाखवली. परंतु तो पाण्याशी खेळण्यात मग्न होता. त्याच्या मस्तीमुळे आमच्या बोटीतील बरेच प्रवासी संतोषकडे वारंवार पाहत होते. ती सर्व प्रवासीमंडळी मला संतोषकडे लक्ष द्यायची सूचना करत होती. नंतर पुढच्या दहा मिनिटांत बोटीने एलिफंटा गुंफा गाठले.


आम्ही गुंफांच्या पायथ्याशी पोहचलो होतो. आजूबाजूला छोटी मोठी दुकाने होती. दुकानात विकायला ठेवलेल्या वस्तू बघितल्यावर त्या विकत घेण्यासाठी संतोष आग्रह करू लागला. कुठलीही वस्तू घेतली तरी ती संतोषकडे जास्तीत जास्त अर्धा तास टिकायची. ती वस्तू मोडून तोडून टाकल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. त्याच्या आग्रहाखातर बंदूकीच्या आकाराची एक 'की चेन' त्याला घेऊन दिली. त्याचबरोबर एक वेफर्सच पाकीट सुद्धा घेतले. एका हातात 'की चेन' आणि दुसऱ्या हातात वेफर्स खात खात पायऱ्या चढत होतो. काही पायऱ्या चढताच एक माकड आमच्या दिशेने आले आणि संतोषच्या हातातले वेफर्सचे पाकीट खेचून घेऊन गेले. मी बघतच राहिलो. संतोष अजिबात घाबरला नव्हता. उलट तो त्या माकडाकडे टक लावून पाहत होता. आम्ही तिघे शंभर एक पायऱ्या चढून गेल्यावर समोर सुप्रसिद्ध पुरातन मंदिर दिसले. शंकराची मूर्ती सुंदर दिसत होती. आमच्यासारखी बरीच पर्यटक मंडळी शंकराची मूर्ती पाहायला जमली होती. काही विदेशी पर्यटक फोटो काढत होते. काही लोक मार्गदर्शकाला (गाईडला) सुद्धा बरोबर घेऊन आले होते. ते मार्गदर्शक (गाईड) त्या स्थळाचा प्राचीन इतिहास सांगत होते. मी, सुमन आणि संतोष त्या ठिकाणी अर्धा तास फिरलो आणि नंतर जवळच्या बागेत जाऊन बसलो. तीन वाजायला आले होते. प्रवासामुळे भूक लागायला सुरुवात झाली होती. आलेल्या दिशेने खाली उतरलो. उजव्या बाजूला असलेल्या उपहारगृहात (हॉटेलात) शिरलो. सुमनची परवानगी घेऊन दोन पुरी भाजी थाळ्या मागवल्या. तिघांनी मिळून पुरी भाजी खाल्ली. चार वाजता एलिफंटा गुंफावरून निघालो. संध्याकाळी सात वाजता डोंबिवलीला घर गाठले. सुमनला दिलेल्या शब्दानुसार एक जानेवारी संपुर्ण दिवस सुमन आणि संतोषसाठी राखीव ठेवला होता. मग पुढील चार वर्षे दर एक जानेवारीला जुहू चौपाटी, सुरज वॉटर पार्क, डिसनी लॅन्ड आणि टिटवाळा अश्या निरनिराळ्या ठिकाणी सुमनला आणि संतोषला फिरायला घेऊन गेलो......

Thursday, August 20, 2020

माझे हाँगकाँगमधील अनुभव...

 'स्वप्नी आले काही एक मी गांव पाहीला बाई, किलबिल किलबिल पक्षी बोलती' असं एक बालगीत असून त्यात रम्य अश्या काल्पनिक दुनियेतील एका गावाचे नवल वाटावे असं वर्णन केले आहे. प्रत्येक गोष्टीचे नवल व नाविन्य वाटावे अशी माझ्या मनाची सुद्धा अवस्था झालेली असली तरी मी मात्र स्वप्नात पाहिलेले वास्तवात कसे दिसते याचा प्रत्यक्षपणे अनुभव घेत होतो. आमचे विमान रात्री अकराच्या सुमारास हॉंगकॉंग विमानतळावर व्यवस्थित उतरले. मी माझी बॅग घेऊन विमानातून बाहेर पडलो परंतु मोठी बॅग घेण्यासाठी थोडावेळ वाट पहावी लागली. सर्वांनी आपआपले सामान घेतले. पारपत्रावर शिक्का मारून आम्ही सर्वजण विमानतळा बाहेर पडलो. डिसेंबर महिना असल्याने बाहेर खूप थंडी होती. मी घरून स्वेटर आणले होते. ते परिधान केलेले असून सुद्धा शरीर थंडीने थरथरत होते. आमच्यासाठी विमानतळाच्या बाहेर हॉटेलची बस उभी होती. आम्ही बसमध्ये चढल्यावर बस हॉटेलच्या दिशेने निघाली. अर्धा तासात हॉटेलवर पोहोचलो. 'रिव्हर साईड' नावाच्या एका मोठ्या आलिशान पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केली होती. या हॉटेलच्या समोर एक छानसं तळं होते. ख्रिसमस जवळ आलेला असल्यामुळे ते तळं आणि हॉटेल दोन्ही मस्तपैकी सजवण्यात आले होते. मी हॉटेलात जाऊन माझी खोली कोणती आहे ते तपासले. उद्-वाहनाने (लिफ्टने) खोलीकडे गेलो. एकाच खोलीमध्ये माझ्याबरोबर ठाणे कार्यालयातील दोघे जण सुद्धा होते. ते दोघे माझ्या ओळखीचे असल्याने मला खूप आनंद झाला. रात्रीचे बारा वाजायला आले होते. प्रत्येकाने विमानातील आपले अनुभव सांगितले. गप्पा मारता मारता आम्ही सर्वजण झोपी गेलो.


गुरूवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी रात्री आम्ही हॉंगकॉंगला पोहोचलो होतो. दुसर्‍या दिवशी शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी काहीच कार्यक्रम नव्हता. सकाळी आरामात उठलो. सकाळचे वैयक्तिक कार्यक्रम उरकून नाष्ट्यासाठी तयार झालो. हॉटेलच्या एका वेगळ्या भागात नाष्ट्याची सोय केली होती. आपल्याकडचे डोसा, इडली, सांबर सोडून नाष्ट्याला कमीत कमी वीस निरनिराळया प्रकारचे पदार्थ होते. काय खायचे आणि काय नाही खायचे तेच समजत नव्हते. नाष्टा उरकून आम्हाला हॉंगकॉंग फिरायला जायचे होते. सकाळी अकराच्या सुमारास आम्ही सर्व हॉटेलच्या बाहेर पडलो.

बाहेर अजूनही थंडी होती. नुकतीच जमिनीवर सूर्याची किरणे पडू लागली होती. सर्व परिसर धुक्यानी भरला होता. त्यातून सूर्याची किरणे सर्वत्र पसरलेली असे ते दृश्य खूप छान दिसत होते. जवळच्या बस स्थानकावरून बस पकडली. तिकडे बसच्या आत गेल्यावर नाणी टाकायला लागायची. बससाठी वाहक (कंडक्टर) नव्हता. प्रत्येकानी नाणी टाकली व बस निघाली. बसमध्ये लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे तिकडे बसमध्ये फक्त आमचा गोंगाट होता. तिथली स्थानिक लोकं एकमेकांशी बोलत नव्हती. काही लोकं मोबाईलमध्ये मग्न होते. बस पूर्ण काचेची होती. बाहेरचे दृश्य छान दिसत होते. मोठ मोठ्या इमारतींची बांधकामे चालू होती तरी सुद्धा रस्त्यावर कणभरही माती किंवा सिमेंटचा पसारा नव्हता. ना कुठे कचऱ्याचा ढीग होता, ना कुठे साठलेले पाणी. संपुर्ण रस्ता स्वच्छ होता. आश्चर्य म्हणजे बसचालकाने कुठेही हॉर्न वाजवला नव्हता. बसने थोडावेळ फिरून परत हॉटेलवर आलो.

हॉटेल छान होते पण जेवण पाहिजे तसे नव्हते. मग काय संध्याकाळी भारतीय हॉटेलच्या शोधात निघालो. जवळपास कुठे भारतीय समुदाय आहे का याचा शोध घेतला. काही अंतरावर खूप मोठी भारतीय बाजारपेठ (मार्केट) होती. तिकडे पंजाबी ढाबा असल्याचे समजले. मग काय शोधत शोधत पंजाबी ढाबा गाठला. त्या पंजाबी ढाब्याचा (हॉटेलचा) मालक सरदारजी होता. मस्तपैकी दाल मखनी, रोटी, राईसची फर्माईश केली. असे वाटले की भारतातल्या कुठल्या तरी महामार्गावरील (हायवे वरील) ढाब्यावर बसून जेवत आहे. परदेशात सुद्धा आपल्याला भारतीय जेवण मिळाले याचा आनंद घेऊन आम्ही सर्वजण परत हॉटेलकडे रवाना झालो.

शनिवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (इंटरनॅशनल सेमिनार) होते. आम्ही सर्व लवकर उठून तयारीला लागलो. खोलीमध्ये आम्ही तिघे असल्याने तयार होण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. मी उठून आधी चहा बनवला. रूममध्ये चहाचे भांडे होते. तिकडे दूध पावडर, टी बॅग्ज् व शुगर क्युब्स उपलब्ध होते. मस्तपैकी गरम गरम चहा बनवला. बाकीच्या दोघांनाही चहा पाजला. वेळ पाळण्या बाबतीत आमची कंपनी खूप कडक होती. वेळेवर पोहचलो नसतो तर दंड बसला असता. आम्हां सर्वांना हॉलवर घेऊन जाण्यासाठी बस तयार ठेवली होती. दहा वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार होती. आम्ही वेळे आधीच हॉलवर पोहचलो.

चर्चासत्रासाठी खूप मोठा हॉल होता. संपुर्ण हॉल छानपैकी सजवला होता. सर्वांना बसण्यासाठी गोलाकार मेजांची (टेबलांची) व्यवस्था केली होती. विविध देशातून चारशे ते पाचशे लोक आले होते. एका गोलमेजवर (राऊंड टेबलवर) पाच लोकांच्या बसण्याची सोय केली होती. ठीक दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिकडच्या स्थानिक लोकांच्या ड्रॅगन शोने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मी ड्रॅगन शो चित्रपटात पाहिला होता. आज मात्र प्रत्यक्षात पाहत होतो. तिकडची ध्वनीयंत्रणा (साऊंड सिस्टीम), प्रकाशयोजना (लायटींग), हॉलमधील शांतता, उत्तम सादरीकरण इत्यादीमुळे कार्यक्रमातील उत्साह वाढत होता. नंतर तिकडच्या लोकांनी कंपनी बरोबर काम करत असताना त्यांना आलेले अनुभव सांगितले. महत्वाच्या भाषणाला सुरुवात झाली. जपान लाईफची सुरुवात कशी झाली?, आता कुठल्या कुठल्या देशांमध्ये व्यवसाय सुरू आहे?, पुढील उद्दिष्टे काय आहेत? वगैरे बद्दलची रितसर माहिती देण्यात आली. मी सर्व नीट लक्ष देऊन ऐकत होतो. कारण मी याच सर्व गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी एवढ्या लांब आलो होतो. मला बरीचशी माहिती मिळाली. बरोबर दोन वाजता चर्चासत्र संपले. 

सत्र संपताच जेवणाच्या तयारीला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येकाला त्याच्या आवडीचे पेय घेण्याची सोय केली होती. मी चार ते पाच कॅन बिअर घेतली. त्या बिअरची टेस्ट वेगळीच होती. प्रत्येकाच्या गोलमेजवर जेवण मांडून ठेवले होते. आमच्या मेजवर एका मोठ्या थाळीत (प्लेटमध्ये) हाफ फ्राय केलेला संपुर्ण मासा आणून ठेवला होता. त्याच्यासाठी तिखट, मीठ, तेल खूप कमी वापरलेले होते. तो मासा आजही माझ्या डोळ्यासमोर येतो. तो खूपच स्वादिष्ट होता. आम्ही पाचही जणांनी मिळून तो सगळा मासा संपवला. त्याच्या बरोबर पालकाची भाजी मस्त लागत होती. जेवण झाल्यावर तिकडच्या लोकांशी थोडावेळ गप्पा मारल्या. इतक्यात हॉटेलवर जाण्यासाठी बस आली. पोट भरले असल्याने चांगली झोप येत होती. हॉटेलवर आलो आणि झोपी गेलो.

रविवार, दिनांक १४ डिसेंबर आज ऑफिसचे काही काम नव्हते. आम्ही सर्वांनी बाजारहाट (शॉपिंगला) करायला जायचे ठरवले. सकाळी आराम केला. दुपारी जेवणानंतर खरेदीला निघालो. तिकडची लोकं मॉलमधून खरेदी करायची. मोठ मोठाले मॉल होते. क्रिसमस जवळ आल्याने सर्व मॉल छान सजवले होते. खरेदी करायला मजा येत होती. वस्तूंच्या किंमती 'हॉंगकॉंग डॉलर' या चलनानुसार छापलेल्या होत्या. आम्ही वस्तूची किंमत पाहून त्याची तुलना आपल्या रुपयाशी करायचो. तिकडे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतापेक्षा खूप स्वस्त होत्या. माझ्याबरोबरच्या लोकांनी पुष्कळ खरेदी केली. मी फक्त किंमती बघायचो आणि वस्तू ठेवून द्यायचो. मी घरी व वाचनालयात वाटण्यासाठी खूप चॉकलेटस् घेतल्या. खरेदीसत्र संपवून आम्ही रात्री आठच्या सुमारास हॉटेलवर परतलो.

सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी आमच्या कंपनीच्या स्थानिक शोरूमला भेट द्यायचा कार्यक्रम होता. सर्वांसाठी बसची व्यवस्था केलेली होती. तिकडे प्रत्येक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. त्यांच्या सर्व वेळा ठरलेल्या असायच्या. ठरल्याप्रमाणे वेळेवर शोरूमवर पोहोचलो. शोरूममध्ये आमच्या कंपनीच्या सर्व वस्तू छानपैकी मांडून ठेवल्या होत्या. वस्तूंचे प्रदर्शन (डेमो) केले जायचे. तिकडच्या लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. आमच्या सर्वांची मीटिंग घेण्यात आली. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय काय करावे लागेल याबाबत माहितीपुर्ण मार्गदर्शन करण्यात आले. तिथल्या अनुभवांची शिदोरी घेऊन संध्याकाळी हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघायचे होते म्हणून सामान, बॅग वगैरे भरून तयार ठेवले.

मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी आमचे परतीच्या प्रवासाचे विमान होते. पाच दिवस कसे निघून गेले समजलेच नाही. एकंदरीत दौरा यशस्वी झाला होता. खूप काही शिकायला मिळाले. इंग्रजीमध्ये 'चेरिश्ड आयडियाज्' असा एक शब्दप्रयोग वापरला जातो ज्याचा अर्थ हृदयात जपून ठेवलेल्या सोनेरी आठवणी असा आहे. विमानाचा प्रवास, तेथिल हॉटेल, चर्चासत्र (सेमिनार), जेवण, शोरूम, मॉल, इत्यादी हॉंगकॉंगमधील प्रत्येक गोष्ट म्हणजे माझ्यासाठी हृदयात कायमची जतन करून ठेवलेली एक सोनेरी मर्मबंधातली ठेव आहे......

Tuesday, August 18, 2020

माझ्या पहील्या विमान प्रवासातील अनुभव...

'अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु' असे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे जणु काही सोनेरी दिवस उजाडला असून त्यात अमृताचा वर्षाव होत आहे असं वाटावे अश्या आनंदी व उत्साही मनाने मी पहील्या विमान प्रवासासाठी डोंबिवलीहुन निघालो. घाटकोपरपर्यंतचा प्रवास उपनगरीय रेल्वेने केला. घाटकोपरवरून आम्ही टॅक्सी केली. अकरा वाजेपर्यंत आम्ही विमानतळावर पोहोचलो. मी याआधी बर्‍याचवेळा विमानतळावर आलो होतो, परंतु कोणाला तरी घ्यायला किंवा सोडायला. आज मात्र मी स्वतःच्याच पहील्या विमान प्रवासासाठी विमानतळावर पोहचलो होतो. आम्ही सर्व जण पुर्वसूचनेनुसार तीन तास अगोदरच विमानतळावर जमलो होतो. आमच्या गटामध्ये बरीच लोकं असल्याने आम्हा सर्वांची तपासणी होऊन आतील दालनात प्रवेश मिळायला वेळ लागणार होता. माझी वेळ आल्यावर मला तपासून आतील दालनात सोडण्यात आले. आतील दालनात गेल्यावर तिथल्या काचेतून जाणारी येणारी विमाने दिसू लागली. दर पाच मिनिटांनी एक विमान धावपट्टीवर उतरत होते किंवा धावपट्टीवरून उड्डाण (टेक ऑफ) करत होते. विमानतळ माणसांनी गजबजलेला होता. रोज एवढी माणसं विमानाने प्रवास करत होती. माझा मात्र आजचा पहिला विमान प्रवास. आम्ही सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत असल्यामुळे वेळ कसा गेला कळले नाही. इतक्यात आम्हा सर्वांना प्रत्यक्ष विमानात चढण्याचा संदेश मिळाला. आम्ही सर्व जण एकामागोमाग विमानाच्या दरवाजाच्या दिशेने निघालो.

'या नव नवल नयनोत्सवा' या नाट्यगीताप्रमाणे आता दिसणारी प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यांना नवनवीन व उत्सवी आनंद देणारी ठरत होती. मी ज्या विमानात प्रवेश करत होतो ते विमान स्विस एअर कंपनीचे होते. विमानाच्या आत गेल्यावर दिसले की किमान २०० प्रवासी बसू शकतील एवढ्या जागा तिथे होत्या. माझ्याकडची छोटी बॅग वरती ठेवली आणि मी माझ्या जागेवर बसलो. माझ्या बाजूला खिडकी जवळील जागा (विंडो सीट) होती. त्या जागेवरील प्रवासी अजून आला नव्हता. मला खिडकी जवळची जागा हवी होती परंतु नाईलाजाने बाजूच्या जागेवर बसायला लागत होते. विमान आतून खूप मोठे होते. प्रत्येक खुर्ची समोर टिव्ही होता. काही वेळात विमानाचे दरवाजे बंद करण्यात आले. माझ्या बाजूचा प्रवासी येऊन बसला. आता विमान टेक ऑफ करण्यास तयार असल्याचा इशारा करण्यात आला. एक हवाईसुंदरी (एअर होस्टेस) आली व विमान उड्डाण करण्याआधी प्रवाश्यांनी काय करावे ते हाताने इशारे करून सांगायला लागली. मग काही क्षणांतच विमानाने उड्डाण केले. 

विमान प्रवासाला सुरुवात तर झाली परंतु माझ्यासाठी सर्व गोष्टी नविन व अनभिज्ञ असल्याने मला प्रत्येक गोष्ट शोधायला लागायची. आपआपल्या जागेवर बसलेल्या प्रवाश्यांना खुर्चीचा पट्टा (सीट बेल्ट) लावून घेण्याची सूचना करण्यात आली. खुर्चीचा पट्टा बाजूलाच होता परंतु त्याचा वापर कसा करायचा ते मला माहीत नव्हतं. मी स्वतः भोवती पट्टा गुंडाळून तो लावायचा प्रयत्न केला परंतु मला काही केल्या जमेना. बाजूचा प्रवासी खडूस दिसत होता. तो माझी धडपड पाहत होता. त्याने मला हिंदीतून विचारले सुद्धा की प्रथमच विमान प्रवास करत आहेस का? मी 'हो' म्हटल्यावर मग त्याने खुर्चीचा पट्टा कसा लावायचा ते मला दाखवले. खुर्चीच्या हँडलवर टिव्हीचे बटण होते. ते कसं वापरायचे समजत नव्हतं. परत त्या प्रवाश्याला विनंती केली. मग त्यानेच टिव्ही कसा लावायचा ते दाखवून दिले. खर तर मला खिडकीबाहेर बघायचे होते. विमान उंचावरून उडत असताना जमिनीवरचे दृश्य कसे दिसते ते पाहायचे होते. समोरच्या टिव्हीवर विमान किती उंचीवर आहे? आपण आता कुठे आहोत? आपले पुढचे शहर किती अंतरावर आहे? तिथे पोहचायला किती वेळ लागेल? वगैरे सविस्तर माहिती मिळत होती.

मी ऐकले होते की विमानात सारखे खायला-प्यायला मिळते. झालंही तसचं. विमान उड्डाण झाल्यावर काही वेळातच हवाई सुंदर्‍या आल्या. सर्वांना कोल्ड ड्रिंक्स द्यायला सुरुवात झाली. आखडून बसलेले व बसून आखडलेले दोन्ही प्रकारचे प्रवासी मोकळे होण्यासाठी उठून फिरायला लागले. कोणी वॉशरूमसाठी तर कोणी हात धुवायला उठले होते. मला आश्चर्य वाटत होते की आपले विमान एवढ्या उंच उडत आहे आणि आपल्याला आतमध्ये ह्याचा काहीच पत्ता नाही. मी सुद्धा विमानात कुठेही फिरु शकत होतो परंतु मला उठायची हिंमत झाली नाही. माझ्या बाजूचा प्रवासी उठून प्रसाधनगृहाकडे निघून गेला.

जपान लाईफ इंडिया कंपनीच्या भारतात तीन शाखा होत्या. मुंबई, ठाणे आणि दिल्ली. मी कंपनीच्या ठाणे शाखेत जायचो. आमच्या ठाण्याच्या कार्यालयातील माझे सहकारी मित्र सर्व दुसऱ्या विमानात होते. मी एकटाच या विमानातून प्रवास करत होतो. बाकीचे सर्व कंपनीच्या दिल्ली शाखेतील सहकारी माझ्या विमानात होते. मी त्यांना कोणाला ओळखत नव्हतो. त्यामुळे विमानात मी तसा एकटा पडलो होतो. प्रसाधनगृहातून परत आल्यावर माझ्या बाजूच्या प्रवाश्याने मला बाजूच्या खिडकी जवळील जागेवर बसायची विनंती केली. मी मनातल्या मनात म्हणालो यांनी आधीच सांगितलं असते तर? विमान उड्डाण करताना खालचे जमिनीवरचे दृश्य बघायला तरी मिळाले असते. त्या प्रवाश्याच्या विनंतीला मान देऊन मी बाजूच्या खिडकी जवळील जागेवर बसलो.

हवाई सुंदरीने शीतपेय द्यायला सुरुवात केली. मी आपला मोसंबीचा रस घेतला. बाजूच्या प्रवाश्याने काहीतरी पांढऱ्या रंगाचे पेय मागवले. विमानात बसलेले आमच्या कंपनीचे दिल्ली शाखेतील सहकारी अधून मधून एक एक करून माझ्या बाजूच्या प्रवाश्याच्या पाया पडून जात होते. तो प्रकार पाहून मला समजले की हा कोणीतरी मोठा माणूस आहे. 'असुदे आपल्याला काय त्याचे? आमच्या ठाणे शाखेचे एक धोरण होते की कितीही मोठी व्यक्ती असली तरी आम्ही सर्व कंपनीचे स्वावलंबी प्रतिनिधी (इंडिपेंडेंट रिप्रेझेंटिव्ह) आहोत. तेव्हा सर्वजण सारखेच.' वगैरे मी विचार करत असताना अचानक त्या प्रवाश्याने मला विचारले की 'तुमचे नाव काय? तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये असता?' हे ऐकून मी थोडासा गडबडलो. माझे नाव पुंडलिक पै असून मी  ठाणे कार्यालयातून आल्याचे त्यांना सांगितले. मग मी त्यांची चौकशी केल्यावर ते म्हणाले की 'माझे नावं बाळ आंग्रे असून मी दिल्ली कार्यालयात इनचार्ज आहे.' हे ऐकताच मी आवाक् झालो. म्हणूनच सर्वजण त्यांच्या पाया पडत होते. मी गप्पगार झालो. नंतर कळलं की ते आमच्या कंपनीचे मालक वसंत पंडित यांचे मित्र होते. त्यांनी ते पांढरे पेय सात आठ ग्लास तरी मागवले असेल. नंतर मला समजले की ते वोडका पीत होते. एवढे पिऊन सुद्धा ते व्यवस्थित बोलत होते. कदाचित त्यांना त्याची सवय असेल. माझे नाव व मी कंपनीच्या ठाणे शाखेतून आल्याचे कळल्यावर त्यांनी माझ्याशी थेट मराठीतुन बोलायला सुरुवात केली. आता मात्र आमची चांगलीच मैत्री जमली होती.

मुंबईहून हॉंगकॉंगचा प्रवास जवळपास सहा तासांचा असेल असे सांगितले गेले होते. तीन वाजता मुंबईहून विमान निघाले होते. विमानात खाण्यापिण्याची चांगलीच सोय होती. हवं ते मिळत होते. विमानात जेवण मस्त होते. मसाले कमी. तेल सुद्धा वेगळंच वापरलेले होते. असं जेवण मी प्रथमच जेवत होतो. जेवण झाल्यावर बहुतेक सर्वजण झोपले होते. परंतु मला कुठे झोप येणार? पहिलाच विमान प्रवास ते सुद्धा थेट हॉंगकॉंगला. खिडकी जवळची जागा, समोर टिव्ही, मी प्रत्येक सेकंदाचा आनंद घेत होतो. मधूनच विमान हलत असल्याचे जाणवायचे. 'घाबरू नको. कधी कधी मोठे ढग समोर आले की असं होतं' असे सांगून बाळ आंग्रे यांनी मला धीर दिला. काही वेळात बँकॉक आले. 

बँकॉक एअरपोर्ट 

जवळपास एक तास बँकॉक विमानतळावर विमान थांबणार असल्याचे सांगण्यात आले. आम्हाला विमानातच बसून राहायची सूचना केली गेली. त्यावेळी तिकडे संध्याकाळचे ७ वाजले असावेत. बाहेर अंधार पडला होता. खिडकीतून बँकॉक विमानतळ सुंदर दिसत होते. बरीच विमाने ये जा करत होती. माझे लक्ष बाहेरच होते. फक्त एकदाच मध्यंतरी प्रसाधनगृहात जाऊन आलो. एक तास कसा गेला कळलेच नाही. परत आमच्या विमानाने उड्डाण केले. आता मात्र मला सीट बेल्ट बांधता येत होता. हॉंगकॉंगला पोहचायला अजून दोन तासाचं अंतर होते. या काळातील विमान प्रवासात प्रवाश्यांच्या जेवणाची ऑर्डर करण्यात आली. मी शाखाहारी जेवण मागवले. विमान प्रवासात खाण्यापिण्यामुळे वेळ कसा गेला ते कळले नाही. असे वाटत होते की हा प्रवास संपूच नये. बघता बघता हॉंगकॉंग जवळ आले. रात्रीच्या अकराच्या सुमारास आमचे विमान हॉंगकॉंगला पोहचले......

हॉंगकॉंग एअरपोर्ट 


Sunday, August 16, 2020

माझा पहीला विमानप्रवास व पहीली परदेशवारी...

"पंख होती तो उड आती रे" हे केवळ सुप्रसिद्ध गीत नसून अनादी काळापासून मानवाच्या सर्व वयोगटातील मंडळींनी पहीलेले ते एक स्वप्न होते. आधुनिक विज्ञानाने मानवाची ही सुप्त इच्छा विमानाच्या माध्यमातून साकार केली. तेव्हा अश्या या विमानातून आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा असं स्वप्न प्रत्येकजण कधी ना कधी मनी पहात आलेला असतो. लहानपणी कुंदापूरला असताना विमानाचा आवाज आला रे आला की मी व माझ्या बालमित्रांची टोळी जोरजोरात ओरडायला सुरुवात करीत असे. परंतु महिन्यातून एखाद्या दिवशीच विमानाचा आवाज यायचा. आवाज करत विमान गेले की आमची विमानावर गहन चर्चा चालू होत असे. विमान कसं उडत असेल? विमानामध्ये माणसं कशी चढत असतील? समजा विमान पडले तर? असे भल्या भल्या शास्त्रज्ञांना लाजवणारे प्रश्न आम्हा बालगोपाळांच्या चर्चेत यायचे. विमान दिसलं की मी मित्रांना सांगायचो "आपण दगड मारून विमान पाडू या." उत्साहाच्या भरात एकदोन वेळा आम्ही दगड मारले सुद्धा परंतु आम्ही मारलेला दगड विमानापर्यंत कसा पोहचणार? विमान पडायचे राहीले बाजूला उलट तो आम्ही मारलेला दगड परत आमच्याच टाळक्यावर येऊन पडायचा. कधी कधी विमान थोडेसे खालून गेले की त्याचा आवाज जोरात येत असे. त्यावेळी असं वाटायचे की विमान आता डोक्यावर पडते की काय? मग काय विचारता आम्ही सर्व बालवैज्ञानिक झाडाखाली लपायचो. अर्थात ही झाली लहानपणीची गंमत जम्मत. 


कुंदापुरहून डोंबिवलीला म्हणजे मुंबई विमानतळाच्या नजिकच्या शहरात स्थायिक होऊन सुद्धा प्रत्यक्षात विमान जवळून किंवा आतून बघायचा योग अद्याप आला नव्हता. परंतु त्याआधी चित्रपटात बर्‍याचवेळा विमान आतून बाहेरून जवळून पाहिले होते. चित्रपट सुरू असताना वाटायचे की मी सुद्धा विमानातून प्रवास करत आहे आणि चित्रपट संपल्यावर बघतो तर काय आपण अजून चित्रपट गृहामध्येच आहोत! विमानाने प्रवास करून आलेल्यांचे अनुभव मी ऐकले होते. विमान जमिनीवरून उड्डाण (टेक ऑफ) करताना कसे वाटते? जमिनीवरून उडाले की आकाशातून खालची दृश्य कशी दिसतात? रस्ते, दिवे, झाडं, नदी वगैरे कसे दिसतात?मध्येच मोठा ढग आला की विमान कसे हलते? वगैरे कुतुहलपुर्ण प्रश्नांची उत्तरं देणारे अनुभव मी ऐकले होते. आमच्या घरातील फक्त पांडुरंग अण्णांनी विमान प्रवास केला होता. ते विमानाने बँकॉक ते पाट्टया फिरून आले होते. आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करायचा हे मी ठरवले होते.

मी जपान लाईफ जॉईन करताच माझ्या वरिष्ठांनी म्हणजे विनायक आणि विक्रम यांनी मला सांगितले होते की पासपोर्ट काढून ठेव. कंपनीकडून कोरियाला जायची संधी मिळेल. मी कधीच या दोघांचे ऐकत नसे. ते माझ्यापेक्षा वयानी खूप लहान होते. उद्योग-व्यवसायात मला त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव होता. हे कोण मला शिकवणारे? मी माझंच डोकं चालवायचो. जेव्हा की ते चुकीचं होतं. जपान लाईफ हा वेगळा व्यवसाय होता व त्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव होता. शेवटी त्यांनी सांगितलेलं खर झाले. ऑक्टोबर १९९८ला कंपनी काही लोकांना कोरियाला घेऊन जाणार होती. त्यात माझे सुद्धा नाव होते. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने माझा कोरिया दौरा राहून गेला. तेव्हा कुठे मला अक्कल आली. मी लगेच मानपाडा रस्त्यावरील 'रवी इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स'कडे  पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रं व फोटोसहीत अर्ज भरला. पारपत्र लवकर म्हणजे एका महिन्यात मिळवण्यासाठी जास्तीचे तीन हजार रुपये सुद्धा भरले. मला वाटले की एकदा पैसे भरले की मला काहीही करावे लागणार नाही. पारपत्र थेट घरी येईल. परंतु मला एकदा पोलीस ठाण्यामध्ये आणि एकदा पारपत्र कार्यालयामध्ये (पासपोर्ट ऑफिसमध्ये) हेलपाटा घालावा लागला होता. त्यानंतर एका महिन्यात मला पासपोर्ट मिळाले!!

पासपोर्ट हाती पडल्याचा मला खूप आनंद झाला. ते पारपत्र सर्व मित्रांना व नातेवाईकांना सुद्धा दाखवले. आता मला परदेशवारी करता येणार होती. काहीजण चेष्टामस्करी करत म्हणाले की 'तू आता मोठा माणूस झालास. आमच्याकडे लक्ष असु दे, आम्हाला विसरू नकोस. आता तुला भेटायला परवानगी घ्यावी लागेल, एक असिस्टंट नेमावा लागेल' वगैरे वगैरे... 'तुमची कंपनी खरोखरच परदेशी घेऊन जाणार का? व्यवसाय वाढविण्यासाठी अमिष दाखवत असतील', असे सुद्धा काही मित्र व नातेवाईक गंभीरपणे म्हणू लागले. कोणालाच उत्तर द्यायचे नाही असं मी ठरवले होते. वेळ आली की त्यांना कळेल अशी स्वतःची समजूत घातली व मी माझे काम करत राहिलो. जनसंपर्क वाढल्यामुळे माझी टीम व उत्पन्न दोन्ही वाढत चालले होते.

दरम्यान विनायक आणि विक्रम कोरियाला जाऊन आले. ते त्यांचे अनुभव सांगायला लागले. ते कोरियामधील पुसान या शहरामध्ये उतरले होते. तेथील लोकं, रस्ते, वाहनं, मालवाहतूक यंत्रणा, कारखाना, स्लीपिंग सिस्टिम तयार करायची पद्धत वगैरे बाबत ते सांगत होते. कंपनी जपानची असली तरी कारखाना कोरियात असल्याने आपले प्रॉडक्ट कोरियावरून भारतात येत होते. तेथील कर्मचारी उत्पादन निर्मितीवर (प्रॉडक्शनवर) बारीक नजर ठेवून होते. त्यामुळे स्लीपिंग सिस्टिमचा दर्जा खूप चांगला राखला गेला होता. हे सर्व ऐकल्यावर एकदा तरी परदेश दौरा करायला पाहिजे असं मला सुद्धा वाटू लागले होते.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ठाण्याच्या कार्यालयात आमची मीटिंग भरली. डिसेंबर महिन्यात हॉंगकॉंगला आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (इंटरनॅशनल सेमिनार) असल्याचे त्या सभेमध्ये सांगण्यात आले. त्या चर्चासत्रामध्ये विविध देशातली लोकं सुद्धा येणार होती. पण माझे नांव त्यात नव्हते. मी थोडासा नाराज झालो. आता पासपोर्ट तयार असून सुद्धा माझे नांव नसल्याने मला हॉंगकॉंगला जात येणार नव्हते. परंतु दोन दिवसांनी नवीन यादी जाहीर करण्यात आली. काही जणांकडे पासपोर्ट नसल्याने मला हॉंगकॉंगला जायची संधी मिळाली होती. सदर दौऱ्यासाठी या वेळेला अर्धे पैसे आम्हाला भरायला लागणार होते. अर्धे पैसे कंपनी भरणार होती. पाच दिवसांच्या दौऱ्यातील विमानप्रवास, रहाणे, खाणेपिणे इत्यादी सर्वांचा एकूण खर्च रूपये १२०००/- येणार होता. मी माझ्या टीम बरोबर चर्चा केली. जर मी हॉंगकॉंगला जाऊन आलो तर सर्वांचा फायदा होणार होता. माझे ज्ञान वाढणार होते. तेथील लोकांचा अनुभव मला समजणार होता. सर्वांनी होकार दिला. घरी सुमनला सांगितलं. तिला या विषयात रस नव्हता. नाईलाजाने तिने होकार दिला. अखेर सर्वांच्या अनुमतीने माझं हॉंगकॉंगला जायच ठरलं!

आमच्या कंपनीचे मुख्य कार्यालय नरिमन पॉईंटला दलामल टॉवर्समध्ये होते. हॉंगकॉंगला जाणाऱ्या सर्वांना नोव्हेंबरमध्ये या मुख्य कार्यालयात बोलावले होते. संध्याकाळची मीटिंग होती. आम्हा सर्वांची  पासपोर्ट त्या कार्यालयात जमा केली गेली. व्हिसासाठी पासपोर्ट लागणार होते. व्यवसायिक दौरा (बिझनेस टूर) असल्याने व्हिसाचे काम कंपनी करणार होती. मीटिंगमध्ये कोण कोण कुठून येणार, विमानतळावर किती वाजता जमायचे, येताना काय काय बरोबर आणायला लागेल, वगैरे बाबत सर्व माहिती या मुख्य कार्यालयात भरलेल्या सभेमध्ये देण्यात आली. डिसेंबर महिना असल्याने तिकडे थंडी खूप असते त्यामुळे स्वेटर आणि जास्तीत जास्त उबदार कपडे बरोबर आणायला सांगण्यात आले. वैयक्तिक औषध गोळ्या बरोबर ठेवायच्या सूचना करण्यात आल्या. सर्व माहिती मिळाल्यावर मी डोंबिवलीला निघालो.

माझ्याकडे तयारीसाठी १५ दिवस होते. मी हॉंगकॉंगला जाणार कळल्यावर बरेच मित्र भेटायला आले. बर्‍याच लोकांनी त्यांचा विमानाचा अनुभव सांगितला. काही लोकांनी उपयुक्त मार्गदर्शनही केले. मला कधी एकदा विमानात बसतो असं झाले होते. प्रवासाला लागणार्‍या सर्व वस्तूंची यादी तयार केली. एक एक सामान जमवत गेलो. अभिरूची नसताना सुद्धा सुमनने खूप मदत केली. दिनांक ११ डिसेंबरला दुपारचे विमान होते. आम्हां सर्वांना तीन तास आधीच विमानतळावर यायला सांगितले होते. सुमन आणि संतोषचा निरोप घेऊन सर्व तयारीनिशी हॉंगकॉंगला जाण्यासाठी सकाळी ९च्या दरम्यान मी घरातून बाहेर पडलो.गुरुवार दिनांक ११ डिसेंबर १९९८ रोजी माझ्या आयुष्यातील पहिल्या अविस्मरणीय परदेश दौऱ्यासाठी त्याचबरोबर पहिल्या विमान प्रवासासाठी मी मार्गस्थ झालो होतो.....

Friday, August 14, 2020

माझ्या आयुष्यातील पहिला मोबाईल....

 'चलते चलते किस्मत चमके' असं शिर्षक गीत असलेली चेरी ब्लॉसम नावाच्या बुटपॉलीशची जाहीरात दूरदर्शनवर लागत असे. या जाहीरातीच्या शिर्षक गीताचा विधीलिखीत अर्थ समजावा अशी एक घटना माझ्या आयुष्यात नियतीने घडवून आणली. सन १९९६च्या मे महिन्यात मी वाचनालयाच्या पुस्तक खरेदीसाठी चर्नीरोडला गेलो होतो. चर्नीरोड स्थानकावर उतरून 'स्टुडंट एजन्सी' नावाच्या पुस्तक विक्रेत्याकडे निघालो. मला कॉलेजची काही पुस्तक विकत घ्यायची होती कारण काही विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या पुस्तकांची मागणी केली होती. पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन पुस्तकांची यादी दिली. त्यांनी यादी तर घेतली परंतु त्यांची जेवणाची वेळ झालेली असल्यामुळे त्यांनी मला थोड्यावेळाने यायला सांगितले. दुपारची वेळ असल्याने मलाही भूक लागली होती. तिकडून बाहेर पडलो. उडुपी हॉटेलच्या शोधात बाजूच्या पदपथावरून चालायला लागलो. 

पदपथावरून चालत असताना माझं लक्ष माझ्यापुढे चालणाऱ्या व्यक्तीकडे गेले. त्या व्यक्तीने काळ्या रंगाचा ब्लेझर घातला होता. स्थूलप्रकृतीमान असलेली ती व्यक्ती दिसायला खुप श्रीमंत वाटत होती. त्या धनवानाच्या एका हातात ब्रिफकेस होती तर दुसऱ्या हातात एक यंत्र होतं. जसं चित्रपटात दाखवतात तसं वॉकिटॉकी सारखे ते यंत्र दिसत होते. असे यंत्र जास्त करून पोलीस वापरतात. ते यंत्र कानाला लावून तो श्रीमंत माणूस चालता चालता कोणाशी तरी इंग्रजीमध्ये बोलत होता. मी त्याच्या मागूनच चालत होतो. तो काय बोलत आहे ते समजत नव्हते. चालताना कोणी बरोबर नसताना सुद्धा त्या व्यक्तीला बोलताना बघून मला खूप आश्चर्य वाटत होते. हा माणूस स्वतःशीच बोलत आहे का? जर नाही तर मग कोणाशी बोलत आहे? दुसर्‍या व्यक्तीबरोबर हा कसे काय बोलत आहे? त्याच्या हातात जे आहे ते काय आहे? असे अनेक कुतूहलपुर्ण प्रश्नार्थक विचार माझ्या मनात येत होते. तसेच पदपथावरून जाणारी येणारी माणसे सुद्धा त्याच कुतूहलाने त्या व्यक्तीकडे पाहत होती. काही पावले चालल्यावर बाजूला एक उडुपी हॉटेल दिसले. मी हॉटेलात शिरलो आणि तो माणूस बोलत बोलत पुढे निघून गेला. उडप्याच्या इडली सांबाराचा आस्वाद घेऊन मी परत पुस्तक विक्रेत्याकडे गेलो. त्यांनी मला हवी असलेली पुस्तके काढून ठेवली होती. त्यांना पैसे देऊन तडक डोंबिवलीला निघालो. परंतु ट्रेनमध्ये मला डोळ्यासमोर सारखा तो माणूस दिसत होता. त्याच्या 'हातात काय होते?' हाच विचार सारखा माझ्या मनात घोळत होता. डोंबिवलीला आल्यावर जेव्हा माझ्या मित्रांना मी ही गोष्ट सांगितली तेव्हा कळले की तो भ्रमणध्वनी (मोबाईल) होता व त्या भ्रमणध्वनीवरून (मोबाईलवरून) आपण कोणाशीही, कधीही, कुठेही बोलु शकतो. आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला तरी मोबाईलवरून बोलताना मी पाहिले होते. एक ना एक दिवस माझ्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी (मोबाईल) असेल असा मी त्यावेळी वज्रनिर्धार केला. 

पुढे सन १९९८ च्या एप्रिलमध्ये जेव्हा मी जपान लाईफ जॉईन केलं तेव्हा मी माझ्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ठाण्याला कंपनीच्या कार्यालयात घेऊन जायला लागलो. त्यातील काहीजण माझ्या व्यवसायात सहभागी (जॉईन) झाले. कालांतराने माझी जशी टीम वाढायला लागली तसे माझे उत्पन्नही वाढू लागले. दरम्यान माझा मित्र दिनेश पै हा कारवारहून काही दिवसांसाठी त्याच्या कामा निमित्ताने डोंबिवलीला आला होता. एके दिवशी रात्री वाचनालय बंद झाल्यावर त्याला भेटायला गेलो. गप्पा मारता मारता त्याने त्याच्याकडील दोन छोट्याश्या चिप दाखवल्या आणि तो म्हणाला की याला 'सिमकार्ड' म्हणतात. हे भ्रमणध्वनीमध्ये (मोबाइलमध्ये) टाकले की आपण आपल्याकडे दूरध्वनी क्रमांकाची नोंद असलेल्या व्यक्तीशी बोलु शकतो. त्यातील एक सिमकार्ड मुंबईचे आणि एक सिमकार्ड बेंगळुरूचे होते. मला ते छोटेसे सिमकार्ड बघून खूप आश्चर्य वाटले होते. एवढ्याश्या चिपमध्ये एवढे दूरध्वनी क्रमांक कसे काय असू शकतात?आणि ते मोबाईलमध्ये टाकले की आपण लोकांशी कसे काय बोलु शकतो? वगैरे विचार मनात येऊन मला त्या सर्व गोष्टींचे त्यावेळी खूप नवल वाटत असे. जग बदलत आहे तेव्हा आपण सुद्धा बदलले पाहिजे व त्यासाठी नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे जेणेकरून आपण सुद्धा व्यवसायिक यश मिळवु शकतो याची मला जाणीव झाली. 

जपान लाईफमध्ये माझी टीम वाढत होती. माझ्याकडे घरी ०२५१-४३२७६३ हा दूरध्वनी क्रमांक असलेला लँडलाईन फोन होता. मी रात्री घरी आल्यावर घरातील लँडलाईन दूरध्वनीवरून माझ्या टीममधल्या सभासदांशी उद्याच्या कामाच्या पुर्वतयारीसाठी संपर्क करायचो. परंतु ट्रेनमध्ये असताना व कार्यालयात गेल्यावर मला त्यापैकी कोणाशीच संपर्क साधता येत नव्हता. कार्यालयातील बर्‍याच लोकांकडे एक तर मोबाईल किंवा पेजर असायचे. पेजरमधून फक्त संदेश (मेसेज) पाठवता येत असे. परंतु बोलता मात्र येत नसे. पेजर स्वस्त होते तर मोबाईल खूप महाग होते. मोबाईलचे महिन्याचे बिल सुद्धा खूप येत असे हे मी ऐकले होते. सर्वांशी झटपट संपर्क करता यावा यासाठी मी मोबाईल घ्यायचे ठरवले. 

त्याकाळी बाजारात नोकिया, सोनी आणि मोटोरोला कंपनीचे मोबाईल प्रचलित होते. नोकिया आणि सोनी कंपनीचे मोबाईल खूप महाग होते. मोटोरोला कंपनीचे त्यामनाने स्वस्त होते. फक्त ते मोबाईल आकाराने सोनी किंवा नोकियापेक्षा थोडे मोठे होते. मला मोबाईलच्या आकाराने काही फरक पडणार नव्हता. मला लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईलची गरज होती. मग मोटोरोला कंपनीचा हँड सेट घ्यायचे ठरवले. आता मोबाईल कार्यरत करण्यासाठी त्यामध्ये सिमकार्ड टाकायची गरज होती. त्याकाळी ऑरेंज आणि बीपीएल कंपनीची सिमकार्डे बाजारात उपलब्ध होती. दोन्ही सिमकार्डमध्ये इनकमिंग आणि आऊट गोईंग कॉल या दोन्ही वेळेला पैसे मोजावे लागायचे. बीपीएल स्वस्त होते तर ऑरेंजची सर्विस चांगली होती पण ते खूप महाग होते. बीपीएलचे सिमकार्ड घ्यायचे ठरवले. इनकमिंग म्हणजे माझ्या मोबाईल क्रमांकावर जर कोणी कॉल केला तर मला दोन रुपये प्रति मिनिटाला भरायला लागायचे आणि आऊट गोईंग म्हणजे मी कोणाला कॉल केला तर सहा रुपये प्रति मिनिट मला भरायला लागायचे. दर महिन्याला बिल यायचे. ठरलेल्या तारखेला बिल भरले नाही की मोबाईल आपोआप बंद पडायचा. काही लोकं जास्त बिल झाले की पैसे भरायचे नाहीत. मग तो नंबर बंद करून दुसरा नंबर घ्यायचे. 

मोटोरोला मोबाईल


बर्‍याच लोकांशी चर्चा व चौकशी करून शेवटी ठाण्यातील एका दुकानातून रूपये १२०००/- किंमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल विकत घेतला. सिमकार्ड विना मोबाईल चालू करता येणार नव्हता. मोबाईल घरी आणून सुमनला दाखविला. तिला मोबाईल पाहून खूप आनंद झाला. सुमनने प्रथमच मोबाईल हातात धरला होता. सिमकार्डसाठी आवश्यक कागदपत्रे दिली होती. चार दिवसांनी बीपीएल कंपनीचे सिमकार्ड मिळाले. 

हा माझ्या आयुष्यातील पहिला मोबाईल होता त्यामुळे मी तो खूप जपून वापरायचो. त्या मोबाईलमुळे माझा व्यवसाय सुद्धा वाढत होता. त्या मोबाईलमध्ये बर्‍याच लोकांचे नंबर सेव्ह करून ठेवले होते. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहणे मला शक्य झाले होते. मोबाईलमुळे मी जपान लाईफच्या सभासदां प्रमाणेच वाचनालय, एल.आय.सी. पॉलिसीधारक अश्या सर्वांच्या संपर्कात राहू शकत होतो. सन १९९८च्या सप्टेंबर महिन्यात आमच्या जपान लाईफ कंपनीचा अंधेरी येथे खूप मोठा इव्हेंट होता. त्यासाठी आम्ही चांगली तयारी केली होती. त्यावेळी मोबाईलचा चांगला उपयोग झाला. त्या एका महिन्याचे मोबाईलचे बिल रूपये १२,५००/- इतके आले होते. असे असूनही ते बील वेळेवर भरण्या इतके माझे नशीब चमकू लागले होते. समय के साथ साथ चालल्यामुळे 'चलते चलते किस्मत चमके' या जाहीरातीतील शिर्षक गीताचा मला थोडा थोडा उलगडा होऊ लागला होता...

Wednesday, August 12, 2020

स्वप्न विकत घेताना…

'सपनों का सौदागर' या नावाचा राजकपुरचा एक चित्रपट होता. त्या चित्रपटाची आठवण होण्याचे कारण असे की सुरक्षित जीवन व त्याचे फायदे सांगणाऱ्या विमा योजनांची स्वप्नं लोकांना विकण्यात मी बऱ्यापैकी यश मिळवत असल्याने माझ्याकडे एल.आय.सी.च्या पॉलिसीधारकांची संख्या वाढत चालली होती. पॉलिसी घेतलेल्या या सर्व विमा ग्राहकांना झटपट व अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी मी त्यांची सर्व माहिती संगणकामध्ये जमा करण्याचे ठरविले. एका एल. आय.सी. एजंटने श्री. नागेश कोरगावकर यांच्याशी माझी ओळख करून दिली. सर्वेश हॉलच्या समोरील इमारतीत त्यांचे कार्यालय होतं. मी माझ्याकडच्या सर्व पॉलिसीधारकांची माहिती त्यांना दिली. त्यांनी मला आठ दिवसांनी यायला सांगितले. त्यानुसार मी आठ दिवसांनी त्यांच्या कार्यालयात पोहचलो. माझ्याकडच्या सर्व पॉलिसीधारकांच्या माहितीची एक पद्धतशीर फाईल त्यांनी मला बनवून दिली. माझ्या सर्व पॉलिसीधारकांना झटपट व अधिक चांगली सेवा देण्यासाठी ही संगणकीय फाईल मला उपयोगी पडणार होती. सदर फाईल घेतल्यानंतर श्री. नागेश कोरगावकर यांच्याशी मी थोडावेळ गप्पा मारत बसलो. गप्पा मारताना त्यांनी मला विचारले की वाचनालय आणि एल.आय.सी. व्यवसाय या बरोबर अजून काही जोड व्यवसाय करायचा विचार आहे का? खरं तर दिवसभर कामं असल्याने मला वेळ मिळत नव्हता. असे असून सुद्धा मी त्यांना व्यवहाराशी निगडीत असलेले बरेच प्रश्न विचारले. कुठला व्यवसाय? किती भांडवल लागेल? मला काय करावं लागेल? त्यात नफा किती आहे? वगैरे माझे प्रश्न ऐकून ते म्हणाले की तुम्हाला एक दिवस तुमच्या सवडीनुसार माझ्यासोबत ठाण्याला यावं लागेल. तिकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मी त्यांना विचारले की रविवारी आलो तर चालेल का? त्यावर ते म्हणाले की रविवारी साप्ताहीक सुट्टी असते. रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तीन तास द्यावे लागतील. सोमवारी माझे वाचनालय बंद असल्या कारणाने मी सोमवारी दुपारी येतो असे त्यांना सांगितले.

सोमवारी मुंबईहून मासिक खरेदी करून थेट ठाणे स्थानकात उतरलो. ठरल्याप्रमाणे मी एक वाजता ठाणे स्थानकाच्या बाहेर येऊन श्री. नागेश कोरगावकर यांची वाट बघत थांबलो. काही वेळातच ते स्कूटरवरून आले. आम्ही दोघे एकत्र दुचाकीवर बसून त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. ठाणे स्थानकावरून पाच मिनिटांत आम्ही देवप्रयाग या इमारतीत पोहचलो. तिथे दुपारी दिड वाजता एका चर्चासत्राचे (सेमिनारचे) आयोजन केले गेले होते. दीड वाजायला अजून दहा मिनिटे बाकी होती. तो पर्यंत मला नागेश कोरगावकर यांनी बाहेर बसायला सांगितले. दरम्यान गरम गरम कॉफी प्यायला मिळाली. तेथील चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी माझ्यासारखी बरीच माणसे तिथे जमली होती. दीड वाजायला पाच मिनिटं असताना मला चर्चासत्रासाठी आतल्या खोलीत जायला सांगून श्री नागेश कोरगावकर माझ्या पाठीमागे येऊन बसले.

वातानुकूलिन असलेल्या आतल्या खोलीत बसायला पांढऱ्या रंगाच्या फायबरच्या खुर्च्या होत्या. ठीक दिड वाजता सर्व दिवे मालविण्यात आले. वातावरणात शांतता पसरली. एका निवेदकाने सेमिनारबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि सेमिनारला सुरुवात झाली. समोरील मोठ्या टिव्हीवर कंपनीचे मालक श्री. वसंत पंडित हे बोलत होते. चर्चासत्र इंग्रजीतून होते परंतु त्यांची भाषा सोपी असल्याने मला थोडं थोडं समजत होतं. जपान लाइफ असं कंपनीच नांव होते. स्लीपिंग सिस्टिम (गादी) हे त्यांचे उत्पादन (प्रॉडक्ट) होते. ते आधी स्वत: घेऊन वापरायचं. त्यात मोठा बिझनेस होता. ते चर्चासत्र पंचेचाळीस मिनिटांचे होते. मला जास्त काही समजलं नव्हतं. दुपारची वेळ त्यात एसीमुळे झोप येत होती. चर्चासत्र संपवून मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर श्री. नागेश कोरगावकर यांनी त्यांच्या एका मित्राशी माझी ओळख करून दिली. त्याने मला कंपनी प्रॉडक्ट आणि बिसनेस बद्दल सविस्तर माहिती दिली. मला परत आतल्या खोलीत जायला सांगण्यात आले. जे आधीपासून कंपनीत होते त्यातील काही लोकांच्या अनुभवांचे कथाकथन आतल्या खोलीत चालू होतं. अमर कोरगावकर, निलेश गोखले, अनिल राऊल, कर्णिक, गफूर इत्यादी लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. मी त्यांच्या निवेदनाकडे जास्त लक्ष देऊ शकलो नाही. मला डोंबिवलीला जायची घाई होती. बरोबर मासिकं असल्याने घरी जाऊन जेवून साडेचार वाजता वाचनालयात पोहचायचे होतं. श्री. नागेश कोरगांवकर माझ्याबरोबर खाली उतरले. त्यांनी मला जवळच्या रिक्षा स्टँडपर्यंत सोडलं. रिक्षा पकडून ठाणे स्थानक गाठले व डोंबिवलीला निघालो.

मी दिवसभर वाचनालयाच्या व्यवसायात व्यस्त असल्याने मला वेगळा वेळ देता येणे शक्य नव्हतं त्यामुळे मी जपान लाईफ या बिझनेसचा विचार मनातून काढून टाकला होता. काही दिवसानंतर परत श्री. नागेश कोरगावकर यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी व्यवसायाची सविस्तर माहिती देण्यासाठी अजून एक दिवस सकाळी वेळ काढून कार्यालयात येण्याचा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव मी परत एकदा ठाण्याच्या त्या कार्यालयात जायचे ठरवले. सकाळी दहा वाजता लेक्चर होते. मी थोडावेळ आधीच तिकडे पोहचलो. मी ऑफिसच दार उघडून आत शिरत नाही तोच माझी नजर माझ्या ओळखीची व्यक्ती असलेल्या श्री. विनायक कावीळकर याच्यावर गेली.

श्री. विनायक कावीळकर हे आमच्या दुकानासमोरील गुलमोहर सोसायटीत राहायचे. त्यांना मी लहानपणापासून ओळखत होतो. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मला ठाण्याला एका बिसनेससंबंधी बोलावले सुद्धा होते. परंतु मी काही कारणास्तव त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकलो नाही. आज ते माझ्यासमोर उभे होते. त्यांना पाहून मला थोडा धीर आला. मग त्याच धीराने व आत्मविश्वासाने मी त्यादिवशी तेथील माहीतीसत्रात सहभागी झालो. आता बऱ्याचश्या गोष्टींचा उलगडा होऊ लागला होता. त्या व्यवसायामध्ये स्लीपिंग सिस्टीम (गादी) हे त्यांचे प्रमुख उत्पादन (प्रॉडक्ट) होते. आधी ते आपण विकत घेऊन आपण स्वतः वापरायचे आणि मग आपल्याला आलेला अनुभव आपल्या जवळच्या लोकांना सांगायचा. जर जवळची लोक सुद्धा त्यात सहभागी (जॉईन) झाली तर आपल्याला कमिशन मिळणार होतं. Dreams Are The Most Powerful Energy हे जपान लाइफ या कंपनीच ब्रीद वाक्य होते. हे वाक्य माझ्या मनाला खूप भावलं. माझे सुद्धा खूप मोठे स्वप्न होते. मला वाचनालयाच्या क्षेत्रात खूप मोठं नाव कमवायचे होते. त्यासाठी भांडवल लागणार होते. जर मी दोन तीन वर्षे या नवीन व्यवसायात काम केले तर माझे ते स्वप्न पूर्ण होणार होते. मग अधिक वेळ न घालवता मी तो बिझनेस जॉईन करायचं ठरवलं. लोकांना जीवन विम्यांची सुरक्षित व फायदेशीर स्वप्ने विकणारा मी आज स्वत:च एक फायदेशीर वाटणारे स्वप्न विकत घ्यायला तयार झालो होतो.

परंतु जपान लाईफ जॉईन करण्यासाठी रुपये ६१,२००/- भरायचे होते. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. माझा जिवलग मित्र विष्णू नाईक याच्याकडे त्या बिझनेस संदर्भात चर्चा केली. त्यांनी पैसे जमवण्यासाठी माझी मदत केली. आता पैसे कधी भरायचे एवढेच बाकी होते. पण त्यात एक अडचण होती. श्री. नागेश कोरगावकर यांच्याशी माझी जास्त ओळख नव्हती. परंतु श्री. विनायक कावीळकरला मी लहानपणापासून ओळखत होतो. विनायकला मी विचारले मला बिझनेस तुझ्याबरोबर जॉईन करायचा आहे परंतु असं करता येते का? मग त्यांनी त्याचे वरिष्ठ (सिनियर) श्री. विक्रम दुबल व श्री. दीपक परूळेकर यांना विचारून कळवतो असे सांगितले.

श्री. विक्रम दुबल हे डोंबिवलीतल्या सर्वेश हॉलच्या समोरील अलंकार सोसायटीमध्ये राहत होते. श्री. दीपक परूळेकर हे दादरला सिद्धिविनायक मंदिरासमोर राहायला होते. त्यांच्या परवांनगीने व सहमतीने मी कंपनी जॉईन करण्याचा विचार केला. परंतु एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मला कावीळ झाली. त्यावर्षी टिळकनगरमधील पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी फुटली होती. जलवाहीनीमध्येच नाल्याचे पाणी शिरून टिळकनगरमधील बरेच रहिवासी आजारी पडले होते. आजारी पडल्यामुळे मी काही दिवस घरीच आराम करत होतो. मला कंपनी जॉईन करायची होती म्हणून मी माझा मित्र विष्णुकडे पैसे देऊन ते विनायक बरोबर कंपनीत पाठवून दिले. दिनांक १४ एप्रिल १९९८ रोजी 'मयूर एंटरप्राइझेस्' या नावाने जपान लाइफ कंपनी जॉईन केली.....

Monday, August 10, 2020

सरस्वती येता दारी…

सर्वसाधारणत: एप्रिल-मे महिन्यात शालेय सुट्ट्यांचा हंगाम चालू होत असल्यामुळे दरवर्षी एप्रिलपासून सभासदांची संख्या वाढायला सुरुवात व्हायची. त्याचबरोबर सभासदांकडून नवीन पुस्तकांची मागणी सुद्धा वाढायची. डोंबिवलीमध्येच सुप्रसिद्ध लेखक अरुण हरकारे यांच्याकडे बरीचशी पुस्तके स्वस्त दरात मिळतात असं मी ऐकले होते. त्यांची स्वतःची 'रावजी प्रकाशन' ही संस्था होती. लेखक अरूण हरकारे यांचा पत्ता मी पुस्तकातून शोधून काढला. डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोडवरील जलाराम मंदीराजवळ असलेल्या या 'रावजी प्रकाशन' संस्थेच्या कार्यालयात मी एके दिवशी सकाळी पुस्तकं खरेदीसाठी गेलो. तिथून जवळच असलेल्या सारस्वत कॉलनीतील गुरुमंदिराजवळ सदर संस्थेचे पुस्तकांचे दुकान होते. पुस्तकांनी खच्चून भरलेल्या या दुकानात एक गृहस्थ खुर्चीत बसून कसला तरी विचार करत होते. माझी ओळख करून देऊन मी त्यांना पुस्तकं विकत घ्यायला आल्याचं सांगितले. त्यांनी सुद्धा त्यांची ओळख करुन दिली. ते स्वतः लेखक अरुण हरकारे होते. माझ्या वाचनालयाच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत मी प्रथमच एका सुप्रसिद्ध लेखकाला भेटत होतो.

श्री. अरुण हरकारे दिसायला साधेसुदे, उंची सहा फूट, पांढरा पोशाख, डोक्यावर काऊबॉयची टोपी, आवाज खणखणीत असं भारदस्त व्यक्तीमत्व. त्यांच्याशी थोडावेळ गप्पा मारल्यानंतर त्यांनी मला विविध प्रकाशनांची अनेक पुस्तकं दाखवली. त्यांच्याकडे पंचवीस टक्क्यांपासून ते ऐंशी टक्क्यांपर्यंत सवलत असलेल्या पुस्तकांचा विपुल साठा होता. मला फक्त तीन हजार रुपयांची पुस्तके खरेदी करायची असल्याने मी बाबा कदम, श्रीकांत सिनकर, जयंत रानडे, सुहास शिरवळकर अश्या निवडक लेखकांच्या कादंबऱ्या विकत घेतल्या. मी डोंबिवलीतल्या दुकानातुन केलेल्या पुस्तकांच्या आतापर्यंतच्या खरेदीपैकी ही सर्वात मोठी पुस्तक खरेदी होती.

सुप्रसिद्ध लेखक श्री. अरुण हरकारे

श्री. अरुण हरकारे यांच्याकडून विविध पुस्तके खरेदी करून आल्यानंतर काही दिवसातच श्री. सुनील पोतेकर नावाचे इसम माझ्या वाचनालयात आले. त्यांनी येताना जनार्दन ओक या लेखकाच्या काही कादंबऱ्या आणल्या होत्या. सुरुवातीला मला वाटले होते की ते स्वतः लेखक जनार्दन ओक असतील. परंतु नंतर त्यांनी आपला परिचय करून दिल्यामुळे श्री. सुनील पोतेकर हे माझ्या चिरस्मरणात राहिले. 'हे पुस्तक रात्री वाचू नये' असं श्री. जनार्दन ओक यांच्या एका कादंबरीच्या मुखपृष्ठावर छापले होते. मी आणि अजय वाचनालयात येणाऱ्या सभासदांना आवर्जून ती कांदबरी वाचायला द्यायचो व सभासद सुद्धा आवडीने ती कांदबरी घेऊन जात असत. दरम्यान श्री. सुनील पोतेकर यांच्याशी चांगला परिचय झाला व ते बाकीच्या लेखकांची पुस्तके सुद्धा घेऊन येऊ लागले. नंतर मी त्यांच्याकडून अधिकाधिक पुस्तके खरेदी करु लागलो.

याच दरम्यान 'ललित वितरण' या संस्थेचे मालक श्री. लिमये पुण्याहून माझ्या फ्रेंड्स लायब्ररीत आले. ते ज्ञानविकास वाचनालयात नियमितपणे पुस्तके देत असत. ज्ञानविकासचे मालक श्री. परांजपे यांनी श्री. लिमये यांना फ्रेंड्स लायब्ररीचा पत्ता दिला होता. श्री. लिमये पुण्याहून पुस्तके आणून आमच्या सारख्या बऱ्याच वाचनालयात पुस्तकांचा पुरवठा करत असत. अनेक वर्षे पुस्तकांच्या व्यवसायात असल्या कारणामुळे त्यांना पुस्तकांचे अफाट ज्ञान होते. त्यांच्याकडे नावाजलेल्या लेखकांची पुस्तके तर असायचीच परंतु कोणतेही नवीन पुस्तक बाजारात येणार असले की ते त्या पुस्तकाची आगाऊ ऑर्डर सुद्धा घेऊन जायचे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत नवीन पुस्तक वाचनालयात उपलब्ध होऊ लागले. श्री. लिमये यांच्यामुळे पुण्यातील प्रकाशकांची दर्जेदार पुस्तके आमच्या लायब्ररीत यायला प्रारंभ झाला.

श्री. लिमये (ललित वितरण, पुणे)

मराठी पुस्तके वाचनालयाच्या दारात येऊ लागल्यामुळे आता मला मराठी पुस्तकांसाठी बाहेर हिंडायची गरज नव्हती. मात्र इंग्रजी पुस्तके मला मुंबईहून आणायला लागायची. दर सोमवारी सकाळी मी इंग्रजी पुस्तकं खरेदीसाठी मुंबईला जायचो. फ्लोरा फॉऊंटन म्हणजे आताच्या हुतात्मा चौक येथे अनेक विक्रेते पदपथावरच जुन्या इंग्रजी पुस्तकांचे ढिगच्या ढिग लावून ती विकायचे. त्यामध्ये निरनिराळ्या इंग्रजी लेखकांची पुस्तके स्वस्त दरात मिळायची म्हणून मी अधूनमधून तिकडून चारपाचशे रुपयांची इंग्रजी पुस्तके खरेदी करायचो. काहीवेळा माटुंगा येथून काही इंग्रजी पुस्तके विकत घेतली. वाचनालयातील इंग्रजी पुस्तकांची मागणी वाढत होती. सिडने शेलडॉन, रॉबिन कूक, विलबर स्मिथ, रॉबर्ट लुडलूम, आर्थर हेली इत्यादी लेखकांच्या पुस्तकांची सभासद चौकशी करत असत. 'मे. रूपा आणि कंपनी' यांच्याकडे अश्या लेखकांची पुस्तके उपलब्ध असल्याचं जसे मला समजले तसे मी त्यांचा पत्ता मुंबईच्या पुस्तक बाजारातील एका विक्रेत्याकडून मिळवला.

'मे. रूपा आणि कंपनी' ही संस्था ग्रँट रोडच्या पूर्वेला असलेल्या मिनर्व्हा चित्रपटगृहाच्या बाजूच्या गल्लीत होती. शोले चित्रपटामुळे मिनर्व्हा हे नाव सुप्रसिद्ध झाले होते. सदर पत्ता शोधत असतानाच लांबूनच 'मे. रूपा आणि कंपनी'चा फलक दिसला. बाहेरील काचेतून पुस्तकं सजवलेली दिसत होती. आतमध्ये माझ्यासारख्या पुस्तकं विकत घेणाऱ्यांची गर्दी होती. श्री. पॉयस नावाचे ख्रिश्चन गृहस्थ तेथील व्यवस्थापक (मॅनेजर) होते. मी माझे नाव सांगताच ते माझ्याशी कोकणीतून बोलायला लागले. ते गोव्याकडील कोकणी बोलत होते. मी पुस्तके पाहायला सुरुवात केली. एकाच पुस्तकाच्या हजार हजार प्रतींचे ढीग रचून ठेवलेले मी प्रथमच पाहत होतो. पुस्तकं निवडायला मला बराच वेळ लागला. मी शंभरच्या आसपास पुस्तकं निवडली होती. माझ्या अगोदर आलेल्या विक्रेत्यांचे बिल बनवण्याचे काम चालू होते. मी पुस्तके बाजूला ठेवून जेवण करून येतो असं श्री. पॉयस यांना सांगितले. तोपर्यंत त्यांना माझे बिल बनवायला वेळ मिळणार होता. मी समोरच्या एका हॉटेलमध्ये शिरलो. चांगली भूक लागली असल्याने जेवणाची थाळी घेतली व पोटभर जेवलो. मी परत येईस्तोवर माझे बिल श्री. पॉयस यांनी बनवून ठेवले होते. मी चेक दिल्यावर ते म्हणाले की चेक पास झाला की मग डोंबिवलीतल्या किशोर ट्रान्सफोर्टने सर्व पुस्तके पाठवून देतो. पुस्तकं भरपूर होती त्यामुळे पुस्तकांची दोन मोठी बंडले झाली होती. व्यवहार पुर्ण करून मी डोंबिवलीला निघालो.

नवीन पुस्तकांच्या खरेदीमुळं सभासद संख्याही वाढत होती. पुस्तकं खरेदी करताना मी कधी पुस्तकांच्या किंमतीचा विचार करत नसे. एखादे पुस्तक आपल्या वाचनालयात हवं असेल तर ते मी कुठूनही मिळवण्याचा प्रयत्न करायचो. त्यासाठी धडपड करायचो. माझ्या पुस्तकांच्या खरेदीची खबर पुस्तक विक्रेत्यांकडे पोहचायला सुरुवात झाली आणि मग विक्रेते स्वत:च वाचनालयात येऊ लागले. वाचनालयाच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे इंग्रजी, मराठी पुस्तकं दारात यायला सुरुवात झाली. मात्र मासिकं खरेदीसाठी मला मुंबईला जावं लागत असे. मुंबईला पुस्तक बाजारात जाऊन मासिकं खरेदी करणे हे माझं आवडत काम होतं. कारण त्यामुळे मला पुस्तक बाजारातून नविन व विविध पुस्तकांबद्दल माहितीही मिळायची आणि म्हणूनच मी न चुकता स्वतः मासिकं खरेदीसाठी मुंबईला जात असे….

Saturday, August 8, 2020

रोटरीच्या कार्यक्रमांचा आनंद.

 कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांगल्या टीमची गरज असते. फक्त चांगली टीमच नव्हे तर नेतृत्व कोण करतं, हेही महत्त्वाचं. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं सर्वांचा विश्वास जिंकलेला असतो. बाकीच्या सदस्यांकडून व्यवस्थित कामं करून घ्यायची काळजी ती व्यक्ती घेत असते. मी रोटरी क्लब जॉईन करून काही दिवस झाले होते. १९९७-९८ साठी डॉ. लीना लोकरस या क्लबच्या अध्यक्षा झाल्या होत्या. लीना मॅडम यांनी एखादं काम सुचवलं की आम्ही सर्व तयारीला लागत होतो.


डॉ. लोकरस एक वेगळं व्यक्तिमत्त्व. स्वतःचा डॉक्टरी पेशा, वैयक्तिक कामं संभाळून क्लबसाठी त्या वेळ द्यायच्या. क्लबमधल्या सर्वांशी गोड बोलून कामं करून घ्यायच्या. मी क्लब जॉईन केल्यावर वृक्षारोपणाचा पहिला कार्यक्रम होता. हा माझा आवडता कार्यक्रम. रोपटी कोणी आणायची ?  कुठली निवडायची ? ती कुठे लावायची?पुढे त्याची जबाबदारी ? अशा विविध मुद्द्यांची सर्वाना सविस्तर माहिती दिली. जुलै महिन्याच्या अखेरीस एका रविवारी आम्ही काहीजण भेटलो. आमच्यातल्या एका सदस्यानं निरनिराळ्या प्रकारच्या झाडांची रोपटी आणली होती. तेव्हा पाऊस पडत होता. त्याच पावसात ठरावीक अंतरावर जमिनीत रीतसर खड्डा खणून आणलेली रोपटी ठिकठिकाणी लावण्यात आली. ही मजा वेगळीच होती. वृक्षारोपण कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

ऑगस्ट महिन्यात एका रविवारी आमच्या क्लबतर्फे डोंबिवलीत आंबेडकर सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं ठरवलं. शिबिराची जवाबदारी साई ब्लड बँकेला देण्यात आली. सर्वाना रविवारी वेळ मिळत असल्यानं क्लबचे जास्त करून सर्व कार्यक्रम रविवारी घेण्यात येत असत. मी पेंढारकर कॉलेजमध्ये असताना रक्तदान शिबिरात  बारावीपासून शेवटच्या वर्षापर्यंत न चुकता रक्तदान केलं होतं. रक्तदान झाल्यनंतर दूध आणि बिस्किटं घ्यायला मी फारसा थांबत नसे. रक्तदान केल्यावर आयोजक कार्ड द्यायचे. कोणाला कधी रक्त द्यायचं असेल तर ते कार्ड दाखवून रक्त घेता यायचं. पण त्याचा कधी वापर केला नव्हता.

आमच्या क्लबमध्ये जास्त करून सर्व तरुण होते. रक्तदान शिबिराच्या दिवशी काही सदस्यांनी आपल्या मित्रांनाही बरोबर आणलं होतं. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या वाढली. रविवार असल्यानं लायब्ररीत जास्त गर्दी असायची. त्यामुळे मी आधीच रक्तदान केलं. नाश्त्याला गरम गरम उपमा होता. बाकीच्या सदस्यांनी आग्रह केल्यानं सर्वांशी गप्पा मारत उपमा खाल्ला आणि गरम गरम कॉफी पिऊन  लायब्ररीकडे रवाना झालो.

डिसेंबरचा महिना होता. रोटरी इंटरनॅशनलचा मोठा कार्यक्रम  एका रविवारी बांद्रा रेक्लमेशनला आयोजित करण्यात आला होता. मला त्या कार्यक्रमाला जायची संधी मिळाली. तिथं खूप मोठं थिएटर होतं. सकाळीच आम्ही पोहोचलो. जास्त करून सर्वांनी काळ्या रंगाचे ब्लेझर घातले होते. तळमजल्यावर विविध प्रकारचा चविष्ट नाश्ता तयार होता. ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीची काही भाषणं सफाईदार इंग्रजीत असल्यानं मला फार कळत नव्हतं. मधल्या तासाभराच्या जेवणाच्या काळात डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्याशी माझी ओळख झाली. रोटरी इंटरनॅशनलमध्ये तेही सक्रिय होते.जेवणं उरकून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शेवटचा अर्धा तास लेझर शो होता. त्या शोमधून रोटरीची माहिती, रोटरी क्लबनं केलेली कामं दाखवण्यातआली. शो बघण्यासारखा होता. थिएटर वातानुकूलित असल्यामुळे 'साऊंड इफेक्ट' उत्तम होता.असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहत होतो.

भारत सरकारनं पोलिओ निर्मूलन अभियान भारतभर राबवलं होतं. यासाठी रोटरी क्लब निवडण्यात आला होता आणि आमच्या क्लबनंही त्यासाठी पुढाकार घेतला होता. मॉडेल कॉलेजात माझी नेमणूक झाली होती. रविवारी सकाळी नऊपासून दुपारी एकपर्यंत मी हजर होतो. पालक मोठ्या संख्येनं आपल्या बाळाला घेऊन येत होते. पहिल्यांदाच एवढा मोठा उपक्रम भरविण्यात आल्यामुळे पालकांमध्येही खूप उत्साह होता. मुलांना पोलिओ डोस पाजण्याचा हाही कार्यक्रम यशस्वी ठरला.

आम्हा सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारे राणे सर होते. राणे हे सर्वात ज्येष्ठ आणि रोटरी क्लबची इत्यंभूत माहिती असणारी व्यक्ती. डॉ. लोकरस या अध्यक्षा असूनही राणे सरांकडून सल्ले घेत असत. 

जानेवारी महिन्यात 'वसुंधरा' हा एक मोठा कार्यक्रम डॉ. लोकरस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्याचा विचार सुरू होता. प्रमुख पाहुणे म्हणून मनेका गांधी आणि त्यांच्याबरोबर एम.सी. मेहता (मॕगसेसे पुरस्कार विजेते) यांना बोलावण्याचं ठरलं. कार्यक्रमासाठी पूजा-मधूबन टॉकीज निवडण्यात आली. या कार्यक्रमात माझं योगदान जास्त नव्हतं. बाकीच्या सर्व क्लबच्या सदस्यांनी पुष्कळ मेहनत घेतली होती. तारीख ठरवणं, प्रमुख पाहुणे यांच्याशी संपर्क, निवडक लोकांना आमंत्रण-अशी बरीचशी  कामं सर्वांनी वाटून घेतली.  आम्ही रात्री उशिरापर्यंत पूजा मधुबन टॉकीजचं स्टेज सजवत होतो.



रविवारी वेळेवर कार्यक्रम सुरु झाला. श्रीमती मनेका गांधी वेळेवर आल्या. आमंत्रित मान्यवरांचं स्वागत करण्याचं काम माझ्याकडे होतं. या गडबडीत गांधी यांचं पूर्ण भाषण मला ऐकायला मिळालं नाही. श्रीमती मनेका गांधी यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. भाषणात त्या म्हणाल्या, 'मला पुष्पगुच्छ देण्याऐवजी तुम्ही एखादं रोपटं दिलं असतं तर अजून जास्त आनंद झाला असता'. तेवढं सुरुवातीचं भाषण मी ऐकलं. नंतर गर्दी वाढल्यामुळे बाहेरच उभा राहिलो. आतमध्ये सर्व जागा भरल्या होत्या. नंतर आलेले लोक पायऱ्यांवर उभे होते. मनेका गांधी भाषण ऐकण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्साह दिसून येत होता. एकंदरीत एक मोठा कार्यक्रम आमच्या क्लबनं डोंबिवलीत पार पडला. या कार्यक्रमात सक्रिय काम केल्यामुळे मला क्लबकडून 'Sergeant At Arms' ही ट्रॉफी देण्यात आली होती !