Tuesday, June 9, 2020

ठाण्याच्या टेंभी नाक्याच्या जवळील आदर्श विवाह मंडळ येथे साकारलेलं कविताच लग्न ...

लता जवळजवळ एक वर्षतरी लायब्ररीत कामाला होती. तिला मी तीनशे रुपये पगार द्यायचो. तिची घरातील परिस्थिती खराब होती म्हणून ती दुसरा पर्याय शोधत होती. कविता लताची मैत्रीण. कविताने आपल्या मित्राला सांगून लताला जास्त पगारवाली दुसरी नोकरी मिळवून दिली. त्यानंतर कविता माझ्याकडे लायब्ररीत कामाला यायला लागली. तसं कविताला नोकरीची गरज नव्हती. स्वतः कमवून पुढचं शिक्षण पूर्ण करावं अशी तिची इच्छा.कविताला पुस्तक वाचायलाही आवडायचं. लायब्ररीत नोकरी केली की पुस्तकही वाचायला मिळतील.

   कविताने SNDT युनिव्हर्सिटी मधून B.A. पूर्ण केले होते. तिला पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. लायब्ररीत कामाला लागल्यावर सर्वांबरोबर ती रुळली होती. विनायक, प्रवीण, चेतन, शैलेंद्र, शर्मिला सर्वांबरोबर मैत्री झाली. कविताची उंची कमी असल्यामुळे आम्ही सर्वजण तिला 'दीड'म्हणून हाक मारायचो!! शर्मिला जरा ताब्यातीने होती तर तिला आम्ही "जाड' नाव ठेवलं, विनायक सर्वांना पिडायचा तर त्यांनी स्वतः ला पिड्या नाव ठेवलं. सर्वजण युथ असोसिएशन ऑफ डोंबिवलीचे सदस्य.

    कविता शिवमंदिराच्या बाजूच्या इमारतीत राहायची. तिच्या घरी वडील,आई, मोठा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा आणि एक छोटा भाऊ. मी कधी घरी गेलो तर तिची आई मस्त गप्पा मारायची. गरम गरम खाऊ त्याबरोबर चहा पण मिळायचा!! कविताच्या वडिलांनाही वाचनाची आवड होती. तिच्या वडिलांशी आणि भावाशी माझे जास्त संबंध नव्हते. कविता सकाळी ठीक नऊ वाजता लायब्ररीत यायची येताना काहीतरी खाऊ घेऊन यायची. मी आणि माझे मित्र ती येण्याची वाट बघत बसायचो. सकाळी सकाळी गरम गरम कांदे पोहे घेऊन यायची. ती उपमाही छान बनवायची. गरम गरम कांदे पोह्यांवर बारीक शेव, ओल खोबर, कोथिंबीर आणि त्यावर लिंबू पिळलेला असला की दोन ते तीन प्लेट माझ्या पोटात गेलंच समजा एवढं आवडायचे मला कांदे पोहे!! आमच्याकडे इडली, डोसा, मेंदू वडा, सांबर छान बनायचे पण कांदे पोहे आणि उपमा कविताचे हातचे मी कधीच विसरलो नाही.

        कविताचा मित्र वेणू नायर राहायला पेंडसे नगरला. तो आणि त्याची आई राहायचे वडील नव्हते. तो कन्सुमर सेंटर नावाने बिझिनेस करायचा. सम्राट बिस्कीट, चॉकलेट असे बरेचसे वस्तूंचे घाऊक विक्रेता, त्याचे डोंबिवलीत तीन चार ठिकाणी दुकाने होती. पैश्यांची कमतरता नव्हती. त्याच्याकडे बरीचशी लोकं कामाला होती. स्वभावाने शांत आणि दिसायला ही सुंदर टिपिकल मल्याळी वाटायचा. वेणूची आणि कविताची जोडी मला छान वाटायची. दोघे माझ्या माहितीप्रमाणे तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे. दुपारी बरोबर एक वाजता लायब्ररी बंद करताना वेणू कविताला भेटायला लायब्ररीत यायचा. एकदा मी दोघांना विचारलं तुम्हाला लग्न करायचा विचार आहे का? आम्ही लवकरच लग्न करणार आहोत लग्न सादेपणाने असेल शक्यतो कोर्ट मॅरेज करण्याचा विचार अस त्यांनी सांगितलं. मी मल्याळी आणि ती मराठी लग्न कुठल्या पद्धतीने करायचे? दोघांच्या घरातले राजी होतील का? असे बरेचसे प्रश्न होते. मी म्हटलं मी जबाबदारी घेतो..

    आधी मी कॉलेजमध्ये असताना एकाच्या लग्नासाठी मदत केली होती. दोघेही टिळकनगर मध्ये राहणारे. मुलगा क्रिशन तर मुलगी हिंदू. दोघांना ही मी ओळ्खयचो. मी शाळेत असल्यापासून त्यांना एकत्र फिरताना पाहिलं होतं. आमच्या इमारतीच्या मागे लतिका टाईल्स कंपनीच्या इकडे जिथे माझी ताई काम करायची तिकडे एक नारळाचं झाड होतं. शाळेत जाताना बरेच वेळा त्यांना तिकडे बसलेलं मी पाहिलं. मी बारावीत असताना तो मुलगा तिला घ्यायला आमच्या कॉलेजमध्ये आला. मी त्या मुलीच्या वर्गात जाऊन तिला बोलावून आणलं. नंतर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. मी ऐकलं की ते दोघे दुबईला जाऊन सेटल झाले. जर एकमेकांवर खरं प्रेम असेल तर त्यांनी एकत्र येऊन लग्न करावं असं माझं मत. त्याचं पुढे काय परिणाम होतील याचा मी विचार केलाच नव्हता. शेवटी त्यांच नशीब...

     कविताची लग्नाची जबाबदारी मी घेतली.कवितांच्या आईला भेटलो. घरच्यांना ते लग्न करणार ते माहीत होतं. कविताने जास्त खर्च न करता अगदी सध्या पद्धतीने लग्न करायचं ठरवलं!! तशी तयारी सर्व आधीच त्या दोघांनी करून ठेवलेली. कविता सर्वांची लाडकी त्यामुळे विरोधाचा प्रश्न नव्हताच. वेणूचा घरून पण होकार मिळाला. लग्न रजिस्टर करायच असल्यामुळे ठाण्याला टेम्बी नाक्या जवळचा आदर्श विवाह मंडळ हॉल निवडला. लग्नाची तारीख ठरली १२ डिसेंबर १९८९..

       आदल्या दिवशी आम्ही सर्व तयारी केली. कोण कोण कसं येणार? किती वाजता पोचणार? तस मोजक्याच लोकांना तोंडी आमंत्रण दिलं गेलं. कविताच्या आईला ट्रेनमध्ये चढायला जमत नव्हतं. ते पण सकाळची वेळ ट्रेनमध्ये ही गर्दी आमचेच चढायचे वांदे आईला तर जमलंच नसत. म्हणून मी गाडी केली. दुपारी बारा वाजताच मुहूर्त होता. मी पहाटे सात वाजताच गाडीवाल्याला बोलावलं तो माझ्या ओळखीचा निघाला. तो गोपाळनगर गल्लीत राहायचा. कविता तिचे आई, बाबा मामा आणि मी असे पाच जण गाडीने निघालो. बाकीचे काही मित्र आणि नातेवाईक ट्रेनने हॉलवर आमच्या आधीच पोचले. हॉल तसा छोटा पण छान सजवलेलं, बसायला खुर्च्या, विधीची सर्व तयारी आम्ही पोचायच्या आधीच तयार करून ठेवली होती. आम्ही पोचल्यावर लगेच नाश्ता तयार होता. नेमके नाश्त्याला कांदे पोहे होते!! लग्न लावून देणारे भटजी कुठेतरी अडकल्यामुळे विधी सुरू होयला उशीर झाला. तो पर्यंत मी आणि माझे मित्र तलाव पाली वर फिरून आलो. ठाण्याचे तलाव पाली मी पहिल्यांदा पहिलं लांबून गडकरी रंगायतन सुद्धा मला बघायला मिळालं. सर्व फिरून आम्ही एका तासात हॉलवर पोचलो. तो पर्यंत लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. तसे मी अगदी जवळच मित्र किंवा नातेवाईक असेल तरच लग्नाला जायचो. ते पण लांब बसून मित्रांसोबत गप्पा मारायचो. लग्नाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे आज मी समोरच बसलेलो पण विधिकडे लक्ष्य नव्हतं. मला सर्व चित्रपटात लग्न होतात अस दृश्य डोळ्यांसमोर आलं. तीन चार वर्ष मित्र मैत्रिण म्हणून एकत्र असलेले आज लग्नाच्या बंधनात बांधले जाणार....

12 comments:

  1. पै सर सत्कार्य केले. जीवनात आनंद मिळवून दिले

    ReplyDelete
  2. सुंदर आठवणी
    साधे सोपे शब्द आणि वर्णन यातून चित्र रेखाटले जाते आहे.

    ReplyDelete
  3. विविध प्रकारच्या अनुभवांनी संपन्न असं तुमचं आयुष्य आहे. तुम्ही लिहायला सुरुवात केल्यामुळे आम्ही ते सगळं एन्जाॅय करतोय...

    ReplyDelete
  4. सर शब्दांनी व्यक्त करता येत नाही, असे कार्य तुमच्या हातून झाले. अश्या व्यक्तीच्या,वाचनालयाचा मि एक सभासद आहे.याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
    आपल्याच वाचनालयामध्दे काम करणारी, आपलीच एक मैत्रीण असे समजून मदत करण्याचे भान सर्वांना नसते.
    Hat's of.sir

    ReplyDelete
  5. चांगल्या गोष्टींसाठी मदत करायला तुम्ही नेहेमी तयार असता! छान अनुभव कथन!

    ReplyDelete
  6. Always proud of you having a friend like you and being in your list of friends.

    ReplyDelete