Friday, June 19, 2020

मैने प्यार किया.....

सुमनचा स्वभाव मला खूप आवडायचा. तसं मी मुलींपासून खूप लांब असायचो. पहिल्यांदा सुमन बरोबर मुंबई फिरून आलो. सुमन काही दिवस आमच्याकडे राहणार असं कळल्यावर मला खूप आनंद झाला. रोज रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. एक दिवस भायखळा येथील राणीच्या बागेत फिरायला जायचं ठरलं. आमच्या बरोबर कविता आणि तिचा नवरा वेणू पण येणार होते. आम्ही चौघे भायखळाला निघालो. स्टेशनवर उतरून चालत गप्पा मारता मारता राणीच्या बागेत पोचलो. वेणूने पुढे जाऊन चौघांचे तिकिट काढले.आम्ही बागेत फिरायला सुरुवात केली. मी तर थोडावेळ स्वतःला विसरून तिकडच्या प्राणी बरोबर मिसळून गेलो. मला प्राणी म्हणजे जीव की प्राण. ते काय खातात? कसे उडया मारतात?ते कसे चालतात? आम्हाला बघून त्यांना काय वाटत असेल? याचा मी विचार करत होतो. आमच्या बरोबर सुमन पण बागेत चांगली रमली. तिच घरं डोंगरावर असल्या कारणाने तिला तसं प्राणी, पक्षी आणि झाडे नेहमीचेच!! जवळपास दोन तास फिरल्यानंतर आम्ही तिकडून निघालो. जसं आम्ही राणीच्या बागेतून निघालो पावसाला सुरुवात झाली. याच्या आधी मी आणि सुमन मुंबई फिरायला गेलो होतो तेव्हा पाऊस नव्हता. जून महिना म्हणजे पाऊस येणारच होता. आमच्याकडे दोन छत्र्या होत्या. पाऊस जोरात यायला लागला. एका छत्रीत कविता आणि वेणू तर दुसऱ्या छत्रीत मी आणि सुमन. छत्री छोटी त्यात पावसाचा वेग वाढल्यामुळे माझा एक हात पावसात पूर्णपणे भिजला. कसबस आम्ही भायखळा स्टेशन गाठलं. भिजल्यामुळे मला थोडीसी थंडी वाजत होती. गाडी पकडून डोंबिवलीत पोचलो.

        पावसात भिजल्यामुळे दुसऱ्या दिवशी मला ताप भरला. कधीच सुट्टी न घेणारा मी एक अखा दिवस अंथरुण पकडलं. त्यावेळी सुमनने दिवसभर माझी देखभाल केली. ताप जास्त होता डॉक्टर कडून औषध आणली. वेळेवर औषध द्यायचं, सकाळचा नास्ता, दुपारच जेवण,ताप तपासणे सर्वीकडे सुमनने माझी काळजी घेतली. तिला फिरवायला नेलं आणि मला ताप आला म्हणून याच तिला वाईट वाटलं. नेहमी हसत खेळत असणारी सुमन आज शांत शांत वाटत होती. दुसऱ्या दिवशी माझा ताप उतरला. पण त्यादिवशी सुमनला ताप आला डॉक्टर कडून तिच्यासाठी मी औषध आणलं. आता तिला ताप आल्यामुळे मला वाईट वाटायला लागलं. मी तिला फिरायला नेलं नेमका पाऊस आला दोघे भिजलो माझ्यामुळे हे सर्व घडलं. मला वाटत हा सर्व नियतीचा खेळ असेल. अजून एक दिवस मी घरीच आराम केला तिसऱ्या दिवशी परत कामाला लागलो. सुमनच मात्र मला खूप कौतुक वाटलं कुठे पाहुणी म्हणून आली मी आजारी पडलो आणि माझी सेवा करायला लागली. दुसऱ्या दिवशी ती स्वतः आजारी पडली!! काही दिवसांनी सुमन गावाला निघून गेली. ती असताना हसत खेळत कसे दिवस निघून गेले ते मला कळलेच नाही. पण ती निघून गावाला गेल्यावर मला मात्र काहीतरी चुकल्या चुकल्या सारख वाटायला लागलं. सारख तीच बोलणं आम्ही मुंबई फिरायला गेलेलो नंतर राणीच्या बागेत गेलेलो, छत्री असून सुद्धा पावसात भिजलेला तो क्षण. जेव्हा घरचं काम संपल्यावर सुमन दुकानात यायची मग मी तिला लायब्ररीत घेऊन जायचो. तिला मराठी येत नव्हतं आम्ही काय बोलायचो हे तिला नाही कळायचं तरी पण समजून घेण्याचा ती प्रयत्न करायची. मी आजारी पडल्यावर तिने जी माझी सेवा केली होती माझ्या बाजूला बसलेली ताप उतरण्यासाठी तिने घेतलेली काळजी. ती आजारी पडल्यावर मला वाईट वाटलेलं सर्व माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं. माझ्या सख्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी भाची. पण न कळत मी सुमनच्या प्रेमात पडलो!!!

     माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा विचार केला नसेल कदाचित. किंवा ते माझ्यापर्यंत आलं नसेल. तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. एक दोन वर्षात माझं लग्न झालंच असतं. माझ्या कामाच्या व्यापामुळे मी लग्नाचा विचारच नाही केला. मी प्रत्येक गोष्टीत घरच्यांवर अवलंबून होतो. निर्णय घेणारे अण्णांच. अण्णांच्या निर्णयाला आई, वहिनी, भाऊ बहिणींचा होकार असायचा. अण्णा मला वडीलांसारखे. वडील वारल्यापासून आमचं अखं कुटुंब अण्णांनी सांभाळल. त्यामुळे निर्णय सर्व अण्णांचेच. माझ्या मेहनतीमुळे घरात मी सर्वांचा लाडका.मी जे काही व्यवसाय सुरू केले प्रत्येकाला घरच्यांचा पाठिंबा असायचा. जे काही करशील नीट विचार करून कर एवढच ते मला सांगायचे. समाजसेवा कमी करून व्यवसायाकडे लक्ष्य द्यायला सांगायचे. मला सुमन विषयी त्यांच्याशी बोलायचं होतं. कसं बोलायचं? समजत नव्हतं. मी सुमनच्या प्रेमात पडलो हे ठीक आहे पण तिच्या मनात माझ्या विषयी काय असेल? तिला विचारायचं तिचे विचार जाणून मगच घरच्यांना सांगायचं असा मी विचार केला.

     सुमनच घर डोंगरावर होतं. काही समान आणायचं झालं तर घरच्यांना तीन किलोमीटरवर डोंगर उतरून चालत खालच्या गावात जावं लागायचं. पोस्टमन पत्र एका दुकानात ठेवायचा. रोज घरातून कोणीतरी खाली यायचे समान घ्यायला त्याबरोबर पत्र रोजचा पेपर आणि काही मासिक घेऊन जायचे. मला कुठल्याही परिस्थितीत आमचं प्रेमप्रकरण घरी कळून द्यायचं नव्हतं. मी सुमनला पहिलं साधं पत्र लिहलं. खाली मित्राचा पत्ता लिहला. पुढचे पत्र व्यवहार या पत्त्यावर करावे आणि एखाद्या मैत्रिणीचा पत्ता पाठवयाला सांगितले जेणे करून मी त्या पत्त्यावर पत्र पाठवू शकलो असतो. तिच्या पत्राची वाट बघत होतो. दहा दिवसांनी सुमनच पत्र आलं. पत्रात तिच्या मैत्रिणीचा पत्ता पाठवला होता. सुमन टायपिंग क्लासला जात होती तिथल्या मैत्रिणीचा पत्ता होता मैत्रिणीचे बाबा पोलीसमध्ये होते. पत्रात काय लिहायचे? याचा विचार मी करत होतो. मैत्रिणीचा पत्ता दिला याचा अर्थ कुठेतरी तिच्या मनात माझ्यासाठी जागा होती. मलाच पुढाकार घ्यायचा होता. खूप विचार करून माझं तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तुझ्याकडून होकार असेल तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम असेल तर आपण पुढचा विचार करूया असं पत्र लिहून तिच्या मैत्रिणीच्या पत्त्यावर पाठवल. आता तिच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो. एक मात्र होतं माझं कुठेच मन लागत नव्हतं. तिची प्रतिक्रिया काय असेल आणि पुढे काय याचा विचार करण्यात दिवस जात होते.

     दुकानात असतांना मला वेळ मिळायचं नाही पण लायब्ररीत गेलो की प्लॅस्टिक मशीनवर काम करत असताना सुमनच्या प्रेमात पडल्याच जाणवत होतं. माझ्याकडे एक तुटका फुटका टेप रेकॉर्डर होता तो अधून मधून बंध पडायचा. त्याला जोरात मारलं की तो परत चालायचा. तीन चित्रपटाची गाणी मी सतत ऐकायचो. त्या काळात "मैने प्यार किया" चित्रपट खूप चालला त्यामधील सर्व गाणी लोकप्रिय झाली होती.त्याच बरोबरीने आमिर खान चा "दिल", राहुल रॉय ची "आशिकी' असे एकसे एक चित्रपट गाजले होते. या तिन्ही चित्रपटाचे गाणी पण लोकप्रिय झाली. "मैने प्यार किया" चित्रपट मला खूप आवडला. व्हिडीओ कॅससेट्स आणून बरेच वेळा हा चित्रपट मी पहिला. त्यात नायिकेचे नाव पण "सुमन" होतं!! चित्रपटयाची गोष्ट सुरुवातीला जवळपास आमच्या सारखीच होती. इकडे गावावरून सुमन आमच्याकडे राहायला आली आणि  चित्रपटात नायिकेचे वडील नायिकेला नायकाचा घरी काही दिवसांसाठी राहायला सोडून जातात. चित्रपटातील सर्व गाणी मला पाठ झाली. काही दिवसात मित्राच्या घरी सुमनच पत्र आलं. पत्र उघडून वाचायला लागलो पत्र वाचता वाचता डोळ्यांसमोर सुमन दिसत होती जसं काय तीच माझ्यासमोर बोलतीये. पत्रात सुमनचा होकार होता ती पण माझ्या प्रेमात पडली होती......

16 comments:

  1. चांगले झाले आयष्याची सुरुवात झाली एकंदरीत सगळ व्यवस्थितझाले. सुमन ची साथ असल्यामुळे यशस्वी आहात

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर सांगितलं.

      Delete
  2. काय लिहावे न कळल्यामुळे,
    तुम्हांला व गोष्टीला मन:पुर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. Replies
    1. पुढचे Blog वाचा कळेलच.

      Delete
  4. प्यार सबकुछ सीखा देता है....

    ReplyDelete
  5. व्वा,काका गोष्टीला अनपेक्षित वळण! व्यवसायात यशस्वी आणि आता.... पुढच्या घडामोडींची उत्सुकता वाढली.

    ReplyDelete
  6. मस्त काका 🤘

    ReplyDelete
  7. Khup chhan apan jyachyawr prem karto tyachi saat asane khup mahatvach ahe

    ReplyDelete