Saturday, June 27, 2020

.....आणि दुर्लभ संधी मिळाली!

...आणि दुर्लभ संधी मिळाली !


सुमनचं कळसा हे गांव कर्नाटकच्या चिकमंगळूर या जिल्ह्यात येतं. याच जिल्ह्यातून  माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी १९७८ मध्ये निवडून आल्या होत्या. सुमनचं घर ज्या डोंगरावर होतं, त्याचं नांव ‘देवर गुड्डे’ आणि  घरच्या ठिकाणाला ‘देवरपाल’ म्हणत असत. सुमनचा जन्म १९६७ मधला. कॉलेज घरापासून खूप लांब असल्यामुळे तिचं शिक्षण झालं, कनिष्ठ महाविद्यालात. शाळाही खूप लांब. पावसाळ्यात शाळेत जाता येत नसे. घर मोठं असल्यामुळे घरात प्रचंड कामं. ही कामं करून मग शाळेचा अभ्यास करायला सुमनला वेळ मिळत नसे. तरीही जिद्दीनं चांगले गुण मिळवून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे उच्च शिक्षण घ्यायची खूप इच्छा असूनही ते घेता आलं नाही. अधूनमधून अक्का आजारी पडल्यावर सुमन एकटीच सगळं घर संभाळत असे.

स्वयंपाकात ती एकदम तरबेज. कधी कधी त्यांच्याकडे खूप कामगार असायचे. त्या सगळ्यांचा नाश्ता, जेवण सुमन एकटीच सहजपणे तयार करायची. तिला उत्तम सुगरण म्हणायला हरकत नाही. इडली सांबार आणि गोडाची खीर हे तिचे एकदम चविष्ट खाद्यपदार्थ ! त्यामुळे घरात ती सर्वांचीच लाडकी ! नेहमी हसत खेळत काम करायच्या सुमनच्या स्वभावमुळेच मी तिच्यावर फिदा झालो. सुमनलाही मी आवडू लागलो होतो... आमच्या अबोध कहाणीची ही सुरुवात होती !

आता, ‘कट टू’... दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास मला जाग आली असेल.खूप थंडी होती. सुमनचे दोघे भाऊ अजून झोपलेलेच होते. पंखा नसल्यानं आत अक्का कामं करत असल्याची चाहूल लागतच होती. सुमन जागी झाली आहे का, याचा हळूच अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण तिच्या खोलीचं दार बंदच होतं. देवाला नमस्कार केला. स्वयंपाक घरात डोकावून पाहिलं. अक्काचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी हळूच बाहेर पडलो. बाहेरच्या दृश्यानं डोळे दिपून गेले. गायी चारा खात होत्या. मी दार उघडलेलं बघून गायी माझ्याकडेच एकटक बघू लागल्या. डिसेंबर महिन्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्यानं बाहेर थोडा अंधार होता, पण सूर्यनारायणाचीही चाहूल लागत होती. थंड हवेची लाट चेहऱ्याला मुलायम स्पर्श करत होती. चेहऱ्यावर थंडी जाणवत होती.श्वास घेताना तोंडातून वाफ बाहेर पडत होती. सर्व झाडांवर धुक्याची दुलई पसरली होती. झाडांच्या पानांवर धुक्याच्या पाण्याचे पडत असलेले मोत्यासारखे थेंब पावसाचीच जाणीव करून देत होते. त्यात अधूनमधून पक्ष्यांचे मधुर गुंजन एकूण वातावरणात उत्साह निर्माण करत होते.





मागच्या दरवाजातून बाहेर पडलो. तिथलं दृश्यही वेधक होतं. भरपूर फुलांची झाडं, त्यात निरनिराळ्या रंगांची गुलाबाची आणि डेलियाची झाडं होती. गुलाबाची झाडं उंचीला माझ्याएवढी, मोठमोठ्या गुलाबांनी लगडलेली. त्यावर धुक्याचं पाणी विखुरलेलं बघून एखाद्या चित्रपटातल्या दृश्याचा भास होत होता ! एकूणच वातावरण अतिशय ‘रोमॅण्टिक’ ! त्यात फक्त कमतरता सुमनची...जी मला प्रकर्षानं जाणवली !



साहजिकच सुमन ज्या खोलीत झोपली होती, तिथली बंद खिडकी हळूच उघडायचा प्रयत्न केला. आजूबाजूला बघून कोणी आपल्याला बघत नसल्याची खात्री करून घेतली आणि एक छानसं गुलाबाचं मोठं फूल हळूच झाडावरून तोडलं. मला फुलं आवडतात. त्यामुळे फूल तोडताना जीवावर आलं. गुलाबाचं फूल तोडताना हात थरथरत होते. सुमनच्या खोलीची खिडकी आवाज न करता उघडली. परत एकदा इकडे तिकडे नजर टाकून हातातलं गुलाबाचं फूल सुमनच्या अंगावर फेकलं! ती गाढ झोपेत होती. समोरच्या बाजूला कुत्रा असल्यानं मी तातडीनं घरात शिरलो.



अक्कानं माझ्यासाठी चहा केला. मी बाहेर पडल्याचं अक्कानं पाहिलं तर नसेल ना? असा विचार मनात आला. तसा मी अक्काचा खूप लाडका असल्यानं ती माझे खूप लाड करायची. मी चहा पीत होतो. सुमनचे दोघे भाऊही उठलेले दिसले. अजून ‘पैंजणां’चा आवाज ऐकू आला नव्हता. पटकन उठून बाहेरच्या खोलीत गेलो. तेव्हा मात्र सुमन उठून अंथरुणं गुंडाळीत होती. तिनं माझ्याकडे कटाक्ष टाकून ‘गुलाबाचं फूल तूच टाकलंस ना, माझ्या अंगावर’? असं दबक्या स्वरात विचारलं. मीही आजूबाजूला पाहून कबुली देत, ‘अजून कोण टाकणार, माझ्याशिवाय’? असं विचारलं. सुमन हसायला लागली. या गोड हास्याचा अर्थ मला अचूक उमगला. मी गुलाबाचं फूल तिच्या अंगावर टाकलेलं आवडलं, हे तिनं सूचकपणे सांगितलं होतं !

दिवसभरात काय काय करायचं, हे मी आधीच ठरवलं होतं. सुमन अंगण झाडायला बाहेर पडली आणि तिनं मलाही बोलावलं. सुमन मला एकेरी हाक मारत असे. तिनं `ये रे, इकडे’ म्हटलं की मी तिच्या मागे गेलोच ! दिवसभरात ती काय काय कामं करते, तेही पहायचं होतं मला. अंगण झाडल्यावर गायीचं दूध काढायला निघाली. आधी सर्व गायींना चारा घालून मग वासराला गायीपाशी सोडायची. नंतर वासराला बाजूला करून दूध काढायला सुरुवात. मी हे सर्व पहिल्यांदा पाहत होतो, तेही सुमन तिथं आहे म्हणून ! नंतर आम्ही आत गेलो. अक्का नाश्त्याची तयारी करत होती. सुमन तिच्या मदतीला लागली. मी आल्यामुळे दररोज नाश्त्याला  छान छान वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अक्का बनवत असे. नाश्ता झाल्यावर सर्व आपापल्या कामाला लागले.

आता मी ‘योग्य वेळे’ची प्रतीक्षा करत होतो. कोणाला न कळत मी आणलेलं ड्रेस मटेरियल आणि साडी सुमनला द्यायची होती. सकाळपासून माझ्या नियोजनाप्रमाणेच सगळं चाललं होतं. अक्काच्या बेडरूममध्ये गेलो. बॅग उघडली. त्यातलं ड्रेस मटेरियल आणि साडी काढून सुमनच्या खोलीत गेलो. ते तिच्या हातात दिलं. साडी बघून सुमन खूश झाली, पण एवढं किंमती तिला अपेक्षित नव्हतं. ‘पण हे सर्व आणायची काय गरज होती’?  तिनं विचारलंच. मी काहीच बोललो नाही. मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. पण एवढ्या किंमतीच्या वस्तू याआधी कधीच घेतल्या नसल्यानं ती खूशच झाली होती, हे तिचा प्रसन्न चेहराच सांगत होता.

संध्याकाळी घरात कामं कमी असायची, हे मला ठाऊक होतं आणि हीच संधी साधून सुमनला मी तिला विचारलं, ‘संध्याकाळी आपण फिरायला जायचं का’? ती हळूच म्हणाली, ‘घरात काय सांगायचं? कुठे जायचं’? मी अक्काकडे ‘फिल्डिंग’ लावून दुपारी विचारलं, ‘मी आणि सुमन संध्याकाळी मंदिरात जाऊन येऊ का’? अक्कानं होकार दिला आणि मला स्वर्ग जणू दोन बोटं उरला ! कळसामध्ये खूप लांब पुरातन शिव मंदिर होतं आणि तिथं जाऊन यायला दोन ते तीन तास निश्चितच लागणार होते. म्हणजे मला आणि सुमनला एकमेकांचा एवढा दीर्घकाळ सुखद सहवास लाभणार होता, खूप गप्पा मारता येणार होत्या. मी हुरळलो...

मी माझ्याकडचा सर्वात छान ड्रेस घातला, सुमनही तयार झाली. ती मेकअप करत नसे. आज ड्रेसमध्ये छान दिसत होती. संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही निघालो. जाताना सुमनबरोबर काय बोलायचं, ते सुचत नव्हतं. तसं आम्हाला खूप काही बोलायचं होतं,बरंच काही तिला सांगायचं होतं, पण शब्द निघत नव्हते. ती माझ्याकडे बघून हसायची आणि मी तिच्याकडे. शब्दांवाचूनच आमचा परस्परांशी मूक संवाद सुरू होता. वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. आम्ही मंदिरात आलो. मंदिर खूप सुंदर. सुमननं मंदिराचं महत्व सांगितलं. पण माझं लक्ष त्याकडे नव्हतं ; तर ते होतं, सुमनकडे ! देवाला नमस्कार करून आम्ही निघालो. तिकडून निघताना सहा वाजले असतील. अंधार पडायला लागला होता. डोंगराच्या पायथ्याशी आलो, तर मला पुढे चालणं कठीण वाटत होतं. एकतर डोंगर,त्यात पायऱ्या शिवाय दोन्ही बाजूला झाडं.अंधारात मला पुढचं काही दिसत नव्हतं. पण त्या संपूर्ण भागाचा कायम सराव असलेल्या सुमनला ते बरोबर कळलं आणि तिनं माझा हात धरला... तो भारलेला क्षण मला आजही आठवतोय. तिच्या स्पर्शात माझ्याबद्दल कमालीचा अबोल विश्वास होता, अबोल प्रेमाची अव्यक्त कबुलीही होती ! त्या दिवशी माझ्या जीवनाचं सार्थकच झाल्यासारखं वाटलं... मावळत्या सूर्यकिरणांच्या साक्षीनं आमच्या भावी वाटचालीचा जणू तो मला एक शुभशकूनच वाटला, श्रीगणेशा वाटला ! सुमनच्या प्रेमळ हाताचा स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही. तिचा हात हाती घेऊन मी डोंगर चढायला लागलो. असं वाटत होतं की हा डोंगर संपूच नये, सुमनबरोबर असंच जीवनभर चालत राहावं. एरवी तिनं माझा हात धरला नसता. वाटेत  मी तिच्याशी गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता आम्ही घरी पोहोचलो. तब्बल तीन तास मी सुमनबरोबर होतो. पण आयुष्यभराच्या गाठी त्या प्रवासात घातल्या गेल्या. हे तेव्हा अप्रत्यक्षपणे ध्यानी आलं आणि ...

कळसा शिव मंदिर

12 comments:

  1. प्रेमकहाणी छान आहे. हळुवार पणे फुलविली आहे क था निसर्ग सौंदर्य मस्तच. अजुनही गुलाब फुलं आणतात का

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या फुल(सुमन) माझ्याच घरी आहे.

      Delete
  2. जितकी सुंदर प्रेम कथा आहे व तितक्याच सुंदर शब्दांत व्यक्त केल्यामुळे वाचताना चित्रं तयार होत होती.

    ReplyDelete
  3. नलिनी पाटील जून 27
    चंद्र असा झरझरतोय
    अबोलाही दरवळतोय
    मला आलाय नवा अर्थ!
    तिला ऐकू जायला हवा!
    कसा निघेल इथुन पाय!
    वेड लागेल नाहीतर काय!
    पुढे काय पुढे काय!
    हीच ओढ आता हाय!

    ReplyDelete
    Replies
    1. वाह वाह वाह अतिशय सुंदर.

      Delete
  4. आणि...
    एक प्रेमकहाणी नाजूक वळणावर येवून ठेपली...💐

    ReplyDelete
  5. इतकी सुंदर प्रेमकहाणी! सर ह्या ब्लाॅगची रोमांटिक कादंबरी होतेय.

    ReplyDelete
  6. निरागस प्रेमकथा !

    ReplyDelete