Tuesday, June 23, 2020

...आणि थेट सुमनच्या घरीच!

...आणि थेट सुमनच्या घरीच !

सुमनला गावी जाऊन पाच महिने झाले होते. यादरम्यान, तिचा होकारही आला... आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ! माझ्या घरच्यांना मी काहीच सांगितलं नव्हतं, तसंच तीही तिच्या घरी यासंबंधी काहीच बोलली नव्हती. मी कामात बुडालेलो असल्यामुळे दिवस कसा संपायचा, हेही मला कळत नसे. शेवटी मलाच पुढाकार घ्यायला लागणार होता.

सुमन मुंबईत येऊन गेली होती. मला असं वाटत होतं की, मीही तिच्या गावाला जाऊन तिला एकदा भेटून यावं. पण कधी जायचं? कसं जायचं? तिला भेटण्यासाठी घरी सबब काय सांगायची? एकटंच जायचं की अजून कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं? असे एक ना एक असे बरेचसे प्रश्न फेर धरत होते. सुमनला भेटायला जायचं म्हटलं तर गाव काही जवळ नव्हतं. दोन दिवस जायला, दोन दिवस यायला लागायचे आणि तिकडे गेल्यावर कमीत कमी चार पाच दिवस रहायला लागणार होतं. म्हणजे सर्व मिळून आठ दिवस तरी काढणं आवश्यक होतं.

लायब्ररी संभाळायला स्टाफ होता. प्लॅस्टिकचंही जास्त काम घेऊन ठेवलं नव्हतं. दुकानाचं काय? दुकान मी एकटाच संभाळत असे. डिसेंबर महिन्यात शाळांना आठ दिवसांची ख्रिसमसची सुट्टी असते. डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सुमनच्या गावी जायचं ठरवलं. अण्णांना विचारलं, 'डिसेंबर महिन्यात मी गावी फिरायला जाऊन येऊ का? खूप वर्षं झाली, गाव बघितलं नाही. तिकडूनच इंदिरा अक्काकडेही जाऊन येईन. मला जाऊन यायला आठ दिवस लागतील. लायब्ररीची सर्व व्यवस्था मी केली आहे'. अण्णा अधूनमधून लग्न मुंज जत्रेला वगैरे गावाला जात असत. ते म्हणाले,' मी नेहमी गावाला जात असतो. तू एकदा जाऊन ये' .अण्णांकडून पडत्या फळाची आज्ञा मिळताच मी गावी जायचं बाशिंद बांधायला उत्साहात सुरुवात केली !

त्यावेळी आमच्या गावाला जाण्यासाठी थेट डोंबिवलीहून बस सेवा नव्हती. बससाठी ठाण्याला किंवा सायनला जावं लागायचं... आमच्या गावचे तिकीट विकणारे एक एजंट आमच्या दुकानात येत असत. त्यांच्याकडून २२ डिसेंबर १९९१ चं ठाण्याहून सुटणाऱ्या बसचं तिकिट बुक केलं. माझ्याकडे तयारीसाठी काही दिवस होते. गावाला जाताना सुमनसाठी काय घेऊन जायचं, असा प्रश्न पडला. मी नक्की कशासाठी गावी चाललोय, हे घरी माहीत नसल्यामुळे घरच्यांची मदत घेऊ शकत नव्हतो. 'रेडी मेड ड्रेस' घेण्यात अर्थ नव्हता. कारण फिटींग नीट नसेल तर नेलेला ड्रेस बदलून घेणं शक्य नव्हतं. म्हणून ड्रेस मटेरियल आणि साडी घ्यायचं ठरवलं. तेव्हा माझ्याकडे हजार एक रुपये असतील. जाण्या येण्याचा खर्च आणि खरेदीसाठी लागणारे पैसे याच रकमेतून बसवायचे होते.

गावाला जाण्याच्या काही दिवस आधी माझ्या एका मित्राबरोबर डोंबिवली महापालिकेसमोरच्या 'मोर्विका साडी'च्या दुकानात शिरलो. दुकानात साडी घेणाऱ्या सर्व महिलाच होत्या. आम्हाला बघून दुकानदारही विचार करायला लागले. 'हे नक्की साडीच घ्यायला आलेत का टाईमपास करायला'? आम्ही बऱ्याच साड्या बघितल्या. पण मला कळेना की सुमनला कुठली साडी आवडेल? शेवटी ३०० रूपयांची पिवळ्या रंगाची साडी घेतली. तिथून दुसऱ्या दुकानात गेलो. तिकडे पिवळ्या आणि हिरव्या रंगांचं १५० रुपयांचं 'ड्रेस मटेरियल' ही घेतलं.आता हे सर्व नेण्यासाठी माझ्याकडे बॅग नव्हती. जवळच्या दुकानातून १०० रुपयांची व्ही.आय.पी. बॅग विकत घेतली आणि बॅगसकट सर्व सामान मित्राच्या घरी नेऊन ठेवलं. गावाला जायच्या आदल्या दिवशी दुकानातून 10-12 मॅग्गी ची पाकीटं, थोडी चॉकलेटस, फरसाण वगैरे खाऊ घेतला.



आईच्या पाया पडून तब्बल १३ वर्षांनी गावाला निघालो होतो, तेही एकटाच. ठाण्याहून संध्याकाळी बस सुटणार होती. मित्राच्या घरून न विसरता बॅग घेतली. आता दुकान आणि बाकीचं काम विसरून फक्त सुमनला बघण्यासाठीच गावी जायचा एकच निर्धार होता. ट्रेन पकडून ठाण्याला पोहोचलो. टेम्भी नाक्यावरून बस सुटणार होती. तिथं सुजय हॉटेलात चहा घेतला.काही वेळात बस आली. मी कुंदापूरपर्यंत तिकीट काढलं होतं. कुंदापूरला उतरून अजून तीन बस बदलायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी कुंदापूरला पोहोचलो.

कुंदापूरला उतरून वेंकटरमण देवस्थानात गेलो. याच देवळात माझं बालपण फुललं होतं. देवाच्या पाया पडलो, नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. कुंदापूरला बरेचसे नातेवाईक होते. काकांचं घरही होतं. पण कुठेच गेलो नाही. सुमनचं घर डोंगरावर असल्या कारणानं अंधार होण्यापूर्वी मला कळसाला पोहोचायचं होतं. कुंदापूरहून उडुपी, तिथून कारकळा, मग कळसा ! दुपारी एकच्या सुमारास कुंदापूरहून उडपीची बस पकडली असेल. कुंदापूरहून निघताना लहानपणच्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालत होत्या ! लहानपणी मी केलेली मस्ती,धडपड...  ती सगळी ठिकाणं माझ्या डोळ्यासमोर येत होती. दुपारी दोनच्या दरम्यान उडुपीला पोहोचलो. समोरच कारकळाला जाणारी बस उभी होती. पटकन चढलो. आता अजूनही एक बस बदलायची होती. कळसाचे वेध लागत होते, तशी माझी उत्सुकता वाढत चालली होती. कधी एकदा कळसाला पोहोचून सुमनला भेटतो, यासाठी मन कमालीचं अधीर झालं होतं !

लहानपणी कळसाला जात असतानाचा मार्ग वेगळा होता, तर आताच वेगळा. तेव्हा अक्काला भेटायला जात असे. तर आता सुमनला भेटण्यासाठी ! थोड्याच वेळात कारकळाला पोचलो. आता पकडायची, शेवटची बस !कळसाला जाणाऱ्या बससाठी मला थोडा वेळ वाट बघायला लागली. भूक लागली होती. पण खायला गेलो आणि मध्येच बस आली तर? म्हणून काही न खाताच बसची प्रतीक्षा करत राहिलो आणि तेवढ्यात बस आलीच. बसमध्ये खूप गर्दी होती. कसंतरी धक्के मारून आत शिरलो. ती बस चुकली असती तर पुढच्या बससाठी अजून तासभर वाट बघायला लागली असती. पुढे 'कुद्रेमुख आयर्न ओर' प्रोजेक्ट सुरू झाला होता. तिकडे जाणारे सगळे या बसमध्ये चढले होते. 'कुद्रेमुख' बसस्टॉप वर सर्व उतरले. मला खिडकीजवळ बसायला जागा मिळाली. बस निघाली. बाहेर 'लख्या धरण ' दिसत होतं. माझ्यासारखे नवीन प्रवासी आश्चर्यानं ते दृश्य बघत होते. मातीनं बांधलेल्या या धरणावर 'Lakya Dam' असं लिहिलेलं सुंदर दिसत होतं.



पुढे 'संसे टी इस्टेट' आलं. एका डोंगरावर फक्त चहाची झाडं लावली होती.ते बघून मला आसाममध्ये आल्यासारखंच वाटलं. आता कळसा फक्त २० मिनिटांवर आणि माझी उत्सुकता, तसंच हुरहूरही वाढत चालली होती. संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान मी कळसाला पोहोचलो. मला एक स्टॉप आधीच उतरायचं होतं. पण गडबडीत पुढच्या स्टॉपवर उतरलो. आता परत चालत मागे यायला लागलं. मला रस्ताही माहीत नव्हता. आजूबाजूला पाहिलं तर सर्व डोंगरच दिसत होते.



सुमनची मोठी बहीण प्रतिमा पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करीत होती. तिची तिथं चौकशी केली. तर ती नव्हती. तेव्हा 'देवरपाल'ला कसं जायचं, हे तिथंच विचारलं. तिकडच्या लोकांनी रस्ता दाखवला. हातात मोठी बॅग, त्यात वजनही घेऊन डोंगर चढायचा होता.जवळपास एक किलोमीटर चालल्यावर डोंगराच्या पायथ्याशी आलो. रस्त्याच्या बाजूला एक छोटा झरा वाहत होता. त्यावर बांधलेल्या तीन लाकडांच्या लहानशा बांधावरून पलीकडे जायचं होतं. तिकडच्या लोकांना याची सवय असली तरी, माझ्यासाठी हे नवीन होतं. जीव मुठीत धरून मी  बांध ओलांडला.खाली पाणी वाहत होतं. डिसेंबर महिना असूनही पाणी स्वच्छ होतं.पाण्याखालचे पांढरे दगड दिसत होते. बांध ओलांडल्यावर शेती लागली.त्या शेतामधूनच डोंगराला सुरुवात झाली. लोकांच्या वहिवाटीमुळे दोन शेतांमधून  पायवाट निर्माण झाली होती. थोडावेळ चालल्यावर पायऱ्या दिसू लागल्या.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे मला तेवढा थकवा जाणवत नव्हता. मी लहानपणी आलो होतो, त्यावेळी अक्काचं सासरचं अख्खं कुटुंब एकत्र राहत असे. आता तीन भावंडं वेगळी झाली होती. सुमनच्या छोट्या काकांचं घर पाहिलं लागलं. त्यांना न कळत त्यांचं घरं ओलांडलं. आता मोठ्या काकांचं घर येणार होतं. डोंगर संपतच नव्हता.आता मात्र मी खूप दमलो.त्यात खूप तहानही लागली.कसंबसं मोठ्या काकांच घर गाठलं. तेवढ्यात कोणीतरी मला पाहिलं असेल. त्यांनी काकूंना हाक मारली. काकू बाहेर आल्या त्यांनी मला आत बोलावलं, पण बहुधा ओळखलं नसावं. मी 'पुंढा' म्हटल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. काहीच न कळवता मी आलो होतो. त्यांनी प्यायला पाणी दिलं. चहा नाष्ट्यासाठी आग्रह केला. पण मला अंधार पडायच्या आधी सुमनचं घर गाठायचं होतं. काकूंनी त्यांच्याकडच्या एका मुलाला माझ्या सोबत पाठवलं.

इकडून पुढे जंगलच होतं. मी एकटा जाऊ शकलो नसतोच. पुढे त्या झाडांमधून 10 मिनिटं चाललो असेन. पपई, पेरुची झाडं दिसायला लागली. मनाशी खात्री पटली की आता घर जवळ आलं. काही पायऱ्या चढलो. समोर मोठं अंगण दिसलं. बाजूला वेगवेगळ्या फुलांची झाडं लावली होती. बाहेरून कौलारू घर मोठं दिसत होतं.समोरच छान सुंदर तुळशीचं झाड होतं. घरात शिरलो. पण कोणीच नव्हतं. इतक्यात इंदिरा अक्का स्वयंपाक घरातून बाहेर आली. मला बघून अक्काला आश्चर्याचा धक्काच बसला !



...कारण मी 13 वर्षांनंतर (२३ डिसेंबर १९९१) सुमनला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचलो  होतो आणि ही बाब अक्काला मात्र ठाऊक नव्हती !

13 comments:

  1. सुमनच्या भेटीची ओढ लागली. खूपच कठीण रस्ता पार करून गेलात पण आनंद मिळाला पण साडी आवडली का सुमनला प्रेमाचे प्रतिक पुढे सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. पुढच्या Blog वर कळेलच.

      Delete
  2. केवढा प्रवास करत करत पोचलात आणि केवढी उत्सुकता निर्माण केली आहेत तुमच्या आणि सुमनच्या भेटीचे वर्णन ऐकायला! लेखन बहरतंय!!

    ReplyDelete
    Replies
    1. पुढच्या Blog मध्ये अजून काही गोष्टी उलघडतील.

      Delete
  3. वा.... तुमच्याबरोबर आम्ही ही प्रवास केला...👌

    ReplyDelete
  4. सुमन साठी ऐवढी धडपड करुन गेल्यावर पुढे काय झाले. सुमन भेटली का?
    तिला तुम्ही जे पिवळी साडी व ड्रेस मटेरियल नेलेत ते दिले का? तिला आवडल कि नाही.
    हे सर्व ऐकण्याची ओढ लागली. तरि सविस्तर सांगा.
    छुपे रुस्तम 😍 😍 😍 😍

    ReplyDelete
    Replies
    1. पुढचे Blog वर सविस्तर माहिती मिळतील

      Delete
  5. पै सर
    खूप छान लिखाण
    इतक्या वर्षांनी आठवणी लिहिताना तशाच निरागसतेने लिहिणे हे अत्यंत निर्मळ मनाचे लक्षणं आहे।

    ReplyDelete
  6. Lockdown mein scenery ka varnan karke mamaji Kalasa trip ki yaadein taaja kiya aapne...

    ReplyDelete
  7. बाळूमामा सारखी चालली आहे आता तुमची story

    ReplyDelete