Wednesday, June 17, 2020

एल.आय.सी.एजन्सी घेतली,(४४९ ९१जी) रात्री १२.३० वाजता विमा पॉलिसी उतरवली....

डोंगरे साहेब महिन्यातून एकदा तरी आमच्या दुकानात काही कागदपत्रे घेऊन यायचे. आले की वेंकटेश अण्णाला विचारायचे.कुठे गेलाय? कधी येणार? त्यांनी काही कागदपत्रे किंवा चेक देऊन ठेवलंय का?वगैरे विचारायचे. मला नेहमी प्रश्न पडायचा की डोंगरे साहेब का येत असतील? वेंकटेश अण्णा आणि हे काय कामं करत असतील? डोंगरे साहेब उंचीला कमी तोंडात नेहमी पान, डोळ्यांना चष्मा, चांगले कपडे घालून जेटलमन दिसायचे. ते कधी कधी गाडी पण घेऊन यायचे. मला ते पुंडलिका म्हणून हाक मारायचे. डोंगरे साहेब डोंबिवलीतल्या जीवन आयुर्विमा मंडळात अधिकारी असल्याचे मला समजले. वेंकटेश अण्णा एल आय सी चे एजंट म्हणून डोंगरे साहेबांबरोबर काम करायचा. माझा भाऊ वेंकटेश अण्णा जोगेश्वरीला इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असल्यामुळे त्याला वेळ मिळत नव्हता. एके दिवशी डोंगरे साहेबांनी वेंकटेश अण्णा ची एजन्सी तू घेशील का? असं मला विचारलं. माझ्याजवळ खूप कामे होती. दुकान सांभाळायचं त्यात लायब्ररी, फ्रेंड्स प्लॅस्टिकस या सर्व व्यापामुळे मला वेळ मिळत नव्हता. तरी पण त्यांना विचार करून कळवतो अस सांगितल.


        भारतीय आयुर्विमा म्हणजेच "एल आय सी'एजंट बनायचं सोपं पण दरवर्षी टार्गेट पूर्ण करायचं कठीण असत असं मी ऐकलं होतं. प्रत्येकाने विमा उतरवला पाहिजे जेणे करून घरच्या लोकांना संरक्षण मिळणे शक्य होतं. आपल्याकडे कितीही पैसे आले तरी खर्चाला मार्ग खूप पण त्यातले थोडे पैसे बाजूला काढून ठेवले की पुढे हेच पैसे व्याजा सकट आपल्याला वापरायला मिळणार हाच खरा विमाचा उपयोग. त्यात पॉलिसी धारकाला काही बरे वाईट झाले तर घरच्यांना एक रकमी पैसे मिळणार म्हणजे सेविंग बरोबर फॅमिली प्रोटेक्शन हा एल आय सी चा उद्देश. पण एल आय सी एजंट हे आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लोकांच्या मागे लागायचे ज्यामुळे लोक एल आय सी एजंट दिसला की रस्ता बदलायचे त्यांच्याशी बोलणंही टाळायचे कधी हा पॉलिसी गळ्यात मारेल याची भीती वाटायची लोकांना. त्यामुळे लोक एल आय सी एजंटना टाळायचे. मी खूप विचार करून एल आय सी एजंट बनायचं ठरवलं.

      डोंगरे साहेबांनी मला एल. आय. सी. (L.I.C.) ऑफिसला बोलावलं. आधी ऑफिस रामनगरला होतं. आता पेंढरकर कॉलेजच्या पुढे स्वतंत्र जागा घेऊन ऑफिस तिकडे हलवलं होतं. मी डोंगरे साहेबाना भेटायला ऑफिस वर गेलो. ऑफिसची जागा तशी मोठी होती. तिथे बरेच लोक काम करत होते. एका बाजूला कॅश काउंटर मागच्या बाजूला सर्व अधिकाऱ्यांना बसण्यासाठी टेबल होते. मी आत गेलो आणि डोंगरे साहेब कुठे आहेत विचारलं. साहेब अजून यायचे होते. तिकडच्या कर्मचाऱ्यांनी मला बसायला सांगितले. मी ऑफिसवर नजर फिरवली. एका फलकांवर बरीचशी नावं लिहलेली होती त्यात डी. डी. देशपांडे यांचं नाव होतं. तेवढ्यात डोंगरे साहेब आले. माझं साहेबांकडे लक्ष होतं.त्यांचा स्वभाव वेगळाच, आल्याबरोबर सर्वांशी काय? कस काय? असं सर्वांशी गप्पा मारत आत आले. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. कोणाकडून कसं काम करून घ्यायचे ते त्यांच्या कडून शिकायला पाहिजे. मला त्यांनी सर्वांशी ओळख करून दिली. तसे सर्व अधिकारी त्यांचे प्रतिस्पर्धी होते तरी पण सर्वांशी हसत खेळत ते काम करायचे. मला बसायला सांगितले आणि दोन कटिंग चहा ची ऑर्डर दिली. थोडेसे इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या मग त्यांनी सांगितलं एजन्सी घ्यायचं असेल तर परीक्षा द्यावी लागेल. मी माझी तयारी दाखवली. डोंगरे साहेबांनी परीक्षेच्या तयारीला लागायला सांगितले आणि पहिली पॉलिसी तयार ठेवायला सांगितले.

     डोंगरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षेची तयारी केली. एल. आय. सी. च्या ऑफिसमध्ये परीक्षा घेतली गेली ब्रँच मधील बरेचसे अधिकारी उपस्थित होते. काही दिवसात मला कळलं की मी परीक्षेत उत्तीर्ण झालो मला एल आय सी ची एजन्सी मिळाली. डोंबिवलीत एजन्सी असल्या कारणाने माझा एजंट नंबर ४४९९१G असा होता. पुढे सर्व व्यवहारात हा नंबर वापरायचा असं सांगितलं गेलं. पहिली पॉलिसी मी अण्णांची दहा हजाराची काढली नंतर माझी अजून काही मित्रांच्या पॉलिसी काढल्या. मला जसं वेळ मिळेल तसं मी ऑफिसला जात होतो. डोंगरे साहेबांकडून शिकण्यासारखे खूप होत. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळीच. ते मला नेहमी म्हणायचे तुझे एवढी माणसे ओळखीची आहेत, आज प्रत्येकाला जीवन विमाचे गरज आहे तू जर त्यांना समजावून सांगून पॉलिसी दिली तर आज न उद्या ते सर्व लोकं तुझं कौतुक करतील मात्र तुला यासाठी वेळ द्यावा लागेल. पॉलिसी असे पटकन कोण घेत नाही, प्रत्येकाचे कोण न कोणतरी विमा एजंट ओळखीचा निघतो. तुझ्याकडे कोण येणार? तुला यासाठी खूप मेहनत करावी लागेल. बाकीच्या व्यवसायापेक्षा यात जास्त पैसे मिळू शकतील!!!

     मी जो पर्यंत एल. आय. सी. ऑफिस मध्ये होतो तो पर्यंत मनात विमाचा विचार असायचा तिकडून निघालो की बाकीच्या कामामुळे विम्याचे विचार डोक्यातून निघून जायचे. दुकानात आलो की दुकानाची कामे, लायब्ररीत गेलो की लायब्ररीची कामे त्यातच दिवस जायचा. एके दिवशी दुपारी दुकानात बसून विमासाठी ज्यांना भेटायला जायचय अशा लोकांची जे माझे खास ओळखीचे होते त्यांची यादी बनवली. यादीतल्या सर्वांना एक एक करून भेटायचा विचार केला. यादीत पहिलं नाव नाईक अंकल यांचं होतं. ते लायब्ररीच्या समोरच मेघदूत बिल्डिंगमध्ये राहायचे आणि कामाला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वितरण विभागात मोठ्या पदावर होते. माझी त्यांच्याशी खूप जुनी ओळख होती. त्यांची बायको डॉक्टर श्रीमती तारा नाईक या डोंबिवलीतील सुप्रसिद्द स्त्री रोग तज्ञ होत्या. त्या लायब्ररीच्या सभासद होत्या त्यांनी बरीचशी पुस्तके आपल्या लायब्ररीला भेट म्हणून दिलेली. अंकल आणि डॉक्टर दोघे एकत्र भेटणं म्हणजे खूप कठीण. तरी मी एकदा त्यांच्या घरी गेलो आणि एल आय सी एजन्सी घेतल्याचे सांगितले. त्यांनी विम्याची सविस्तर माहिती विचारली मी नवीनच असल्या कारणाने मला काहीच माहीत नव्हत. त्याच्या काही प्रश्नांनी माझी तारांबळ उडाली. कशी बशी त्यांची समजूत घातली आणि पुढच्या वेळी माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन येतो सांगून त्यांच्या घरून निघालो. घडलेली घटना सर्व जशीच्या तशी डोंगरे साहेबाना सांगितली. परत ते कधी भेटू शकतील मी येतो तुझ्या बरोबर त्यांच्याकडे असे ते बोलले. मला थोडासा धीर आला.एके दिवशी रात्री भेटायच ठरलं. नाईक अंकल रोज दहाच्या सुमारास घरी यायचे ते आले की कळवतो अस सांगून मी लायब्ररीत त्यांची वाट बघत थांबलो. अकरा वाजले तरी अंकल आले नाहीत काय करायचं कळत नव्हतं डोंगरे साहेब बोलले होते किती उशीर झाला तरी चालेल आज त्यांना भेटायचंच. त्यादिवशी अंकलना यायला पावणे बारा वाजले मी लायब्ररीतच होतो समोरच त्यांचं घर असल्या कारणाने ते घरी जाताना दिसले मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या आम्ही थोड्या वेळात येतो. मला त्यांच्या नकाराची भीती होती. पण ते माझी जिद्ध बघून चालेल या अस बोलले. माझ्या जिवात जीव आला. मी डोंगरे साहेबाना बोलवून घेतलं. अंकलच जेवण झाल्यावर आम्ही त्यांचा घरी गेलो. डोंगरे साहेबांनी त्यांना वेगवेगळ्या प्लॅन्स समजावून सांगितले. मला वाटत अंकल ने आधीच प्लॅन ठरवले होते, फक्त हप्ते किती येतात ते विचारलं आणि त्यांनी त्यांची मुलगी सुषमा साठी  अंडउमेन्ट प्लॅन त्यांच्या दोघांसाठी जीवनसाथी हा प्लॅन घेतला!!! सर्व कागदपत्र सही करून चेक घेऊन निघेपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले असतील. फक्त आणि फक्त चिकाटी मुळेच त्याकाळी एका मोठ्या रकमेची मी पॉलिसी उतरवू शकलो......

6 comments:

  1. लिखाण आवडलं.

    ReplyDelete
  2. तुमचं नवीन क्षेत्र, नवा अनुभव आणि आमच्यासाठी तुमच्या आयुष्यातलं आणखी एक मोरपीस!!

    ReplyDelete
  3. नवीन व्यवसा।य स्विकारला प्रगती केली जिद्दी आहात

    ReplyDelete